विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोधला माणकोजी– एक संत. हा सोलापूर जिल्ह्यांतील धामणगांवचा पाटील असून मोठा भगवदक्त होता. हा जातीचा शूद्र असून त्याचें उपनांव जगताप होतें. त्याची बायको, मुलगा व सून वगैरे सर्व साधुवृत्तीचीं माणसें होतीं. याच्यासंबंधीं कित्येक गोष्टी, चमत्कार, वगैरे भक्तविजयाच्या ५३ व्या अध्ययांत वर्णिलीं आहेत. हा तुकारामाचा समकालीन होता असें महिपतीनें म्हणलें आहे. हल्लीं याचे वंशज धामणगांव येथें आहेत.