विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोबीली जमीनदारी– ही जमीनदारी मद्रास इलाख्यांस विजगपट्टम् जिल्ह्यांत आहे. ही पूर्वघाटाच्या पायथ्याशीं असून त्यांत बोबीली तहशील व पालखोंडा तालुका व सालूर तहशिलीचा समावेश होतो. यांत नागावली नदीच्या पाणवट्याचा प्रदेश येतो.
इ ति हा स– सध्यांच्या बोबीलीच्या महाराजाचा मूळ पुरूष पेड्डारायुडु हा होता. या पुरूषास त्याच्या शौर्याबद्दल ही जमीनदारी बक्षीस करण्यांत आली होती. त्यानें या जमीनदारीस बोबिली अथवा राजव्याघ्र असें नांव दिलें. या मिळकतीची सीमा विजयानगरच्या जमीनदारीच्या सीमेस भिडली होती. या दोन घराण्यांमध्यें सारखें तंटे सुरू होतें. १७५६ सालीं बुसीनें या भांडणांचा निकाल करण्यासाठीं विजयानगराच्या ११००० सैन्यासह बोविलीस वेढा दिला. बोबीलीचे लोक इतक्या निकरानें लढले कीं शेवटीं राजघराण्यांत एक म्हातारा व लहान युवराज हीं कायतीं जिवंत उरलीं. पुढें कांहीं दिवसांनीं विजयानगरच्या राजाचा खून झाला व बुसीनें लहान युवराजास म्हणजे चिन्नरंगरावास बोबीलीची जमीनदारी दिली. हें भांडण १७९४ सालपर्यंत चालू होतें. यावर्षीं इंग्रजांनीं विजयानगरच्या जमीनदारीचे तुकडे करूंन चिन्नरंगराव यास त्याच्या वडिलांच्या ताब्यांत असलेला मुलुख दिला व कायमचा धारा ९०००० रूपये ठरविला. जमीनदारीचें उत्पन्न पाच लाखांवर आहे.
त ह शी ल.- क्षेत्रफळ २६८ चौरस मैल. लोकसंख्या(१९२१) १५६९४३. या तहशिलीचें मुख्य गांव बोबीली. येथें जमीनदार राहतात. फ्रेंच सेनापति बुसीनें वेढिलेल्या जुन्या किल्ल्याचे अवशेष येथें अजून दृष्टीस पडतात.