विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बौद, सं स्था न.– ओरिसांतील खंडणी देणा-या संस्थानांपैकीं अगदीं पश्चिमेकडील संस्थान क्षेत्रफळ १२६४ चौ. मै. याच्या सीमा उत्तरेस महानदी; पूर्वेंस दरूपळ; दक्षिणेस खोडमाळ; पश्चिमेस पाटणा व सोनपूर हें ओरिसांतील सर्वांत जुनें संस्थान आहे. हें एक ब्राह्मणानें प्रथम स्थापिलें होतें असें म्हणतात, परंतु त्याला संतान नसल्यामुळें त्यानें केओंझरच्या राजाच्या पुतण्यास दत्तक घेतलें. यालाच हल्लींच्या वंशाचा मूळपुरूष समजतात. येथें एकंदर ४५ संस्थानधिपती होऊन त्यांनीं १४०० वर्षे राज्य केलें, अथमलिक हें कित्येंक शतकें बौद संस्थानकडे होतें; परंतु आतां स्वतंत्र आहे. ८०० चौरस मैलांच्या प्रदेशास खोंडमाळ म्हणतात हा प्रथम बौदकडे होता, पंरतु तो संस्थानिकानें १८३५ सालीं इंग्रजांनां देऊन टाकला, कारण त्याला खोंड लोकांवर ताबा ठेवितां येईना व त्यांचें नरबळी देण्याचें कार्य बंदहि करतां येईना; संस्थानचें एकंदर उत्पन्न ६४००० रूपये आहे, व ८०० रू. खंडणी इंग्रजांस मिळतें. १९२१ सालीं लोकसंख्या १२४४११ होती. खेड्यांची संख्या १०७० गौर, खोंड, पाण, सुधे, चास या येथील मुख्य जाती आहेत. जमीन सुपीक आहे; विहिरी वगैरे पाण्याच्या सोई पुष्कळ आहेत. तांदूळ व गळिताची धान्यें येथें उत्पन्न होऊन बोटींतून महानदीमधून बाहेर पाठविलीं जातात.
श ह र.- संस्थानचें मुख्य ठाणें, हें महानदीच्या उत्तरतीरावर आहे. येथें पुष्कळ जुनीं देवालयें आहेत. पैकीं फार महत्वाचीं अशीं पुढें दिली आहेत; नवग्रहाचें देऊळ हें तांबड्या दगडांचें बांधलेलें असून त्यावर फार नक्षी काढली आहे; हें नवव्या शतकापासून अस्तित्वांत आहे; शिवाचीं तीन देवळें असून त्यांतहि नक्षीचें काम फार सुंदर आहे.