विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बौधायन- याच्या नांवावर श्रौत, गृह्य व धर्मं अशी तीन सूत्रें आढळतात. बौधायनाचें धर्मसूत्र अगदीं जुन्या वळणाचें आहे. बौधायनाच्या वेळीं आर्यावर्ताच्या विस्ताराची कल्पना फार संकुचित होती. याचें गृह्यसूत्रहि आवस्तंवापेक्षां प्राचीन आहे. हल्लीं बौधायनशाखेचे लोक क्वचित आढळतात. दक्षिणेकडचा सायणाचार्य बौधायन शाखेचा होता.
ज्या कोणास स्वतःचें आध्वर्यव सूत्र नसेल त्यानें ज्यांच्या बरोबर कन्यासंबंध होतो अशा एखाद्या यजुर्वेदी शाखेचें आध्वर्यव सूत्र घेतल्यास तें एका दृष्टीनें योग्य आहे. कोंकणस्थ ॠग्वेद्यांना स्वतःचें आध्वर्यवसूत्र नसल्यामुळें त्यांनीं ज्यांच्याशीं शरीरसंबंध होतो अशा कोंकणस्थ यजुवेद्यांच्या म्हणजे हिरण्यकेशी लोकांच्या सत्याषाढ सूत्राचा परिग्रह करावयास पाहिजे. परंतु सर्व कोंकणस्थ ॠग्वेदी बौधायन याच आध्वर्यवसूत्राचा परिग्रह करतात. अलीकडे मात्र क्वचित कोंकणस्थ ॠग्वेदी आध्वर्यवाकरतां सत्याषाढ सूत्राचा परिग्रह करूं लागलें आहेत.