विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्युनॉस आरीस– अर्जेटिनाची राजधानी व बंदर लोकसंख्या (१९२४) १८११४७५ हें शहर सपाट गवताळ मैदानावर वसविलें आहे. येथील कॅथेड्रल (देऊळ)दक्षिण अमेरिकेंत सर्वांत जुनें व मोठें आहे. निराश्रित मुलांकरितां वीस आश्रम व एक वेड्याचें इस्पितळ, हीं सार्वजनिक खर्चानें चालविलीं आहेत. रोग्यांच्या सुश्रुषेकरितां पंधरा दवाखाने आहेत. येथें सहा स्मशानभूमी आहेत.
कॅसा रोसाडा (सरकारी कोठी), नवीन काँग्रेस मंडप, बोल्सा अथवा सराफी, पाण्याचा सांठा, टांकसाळ वगैरे महत्त्वाच्या इमारती आहेत. उच्च शिक्षणाची सोय विश्वविद्यालय, चार राष्ट्रीय विद्यालयें, तीन नार्मल स्कुलें व कित्येक धंदे शिक्षणाच्या शाळा यांनीं केली आहे. राष्ट्रीय पुस्तकालय, राष्ट्रीय पदार्थसंग्रहालय, प्राणिबाग, प्राण्यांचें संग्रहालय हीं आहेत. लोक गाण्याचे शोकी आहेत. येथें दोन तीन मोठालीं सार्वजनिक स्नानगृहें व कित्येक क्लब आहेत.
ब्युनॉस आरीस सन १६२० पर्यंत असन्शनचें अंकित होतें. ला प्लाटा प्रदेशाचे तीन विभाग झाल्यावर टुकुमानची राजधानी ब्युनॉस आरीस झालीं. ला प्लाटा वसाहतीची वस्ती व व्यापार वाढल्यामुळें ब्युनॉस आरीसचें महत्त्व वाढूं लागलें. परंतु स्पेनला या शहराविषयीं विशेष महत्त्व वाटत नव्हतें. १७७६ सालीं रिओ डि ला प्लाटा प्रांताची व्यवस्था एका व्हाइसरॉयकडे देण्यांत आली व ब्युनॉस आरीस राजधानी बनलें. दोन वर्षांनंतर जुनीं व्यापाराचीं बंधनें मोडुन टाकण्यांत आलीं. नवीन कायद्यानें स्पेनमधील नऊ बंदरें व वसाहतींतील चौवीस बंदरें यांच्याशीं व्यापार करण्यास परवानगी मिळाली.