विभाग आठरावा : बडोदें ते मूर  

ब्रॅडफोर्ड- इंग्लंडमधील एक बरो. १९२१ सालीं येथील लोकसंख्या २८५९७९ होती. मिडलंड व नॉर्थ ईस्टर्न रेल्वे आणि ग्रेट नॉर्दर्न व लँकशॉयर, यार्कशायर रेल्वेचें हे केंद्र आहे. १६ व्या शतकांत प्रस्थापित झालेंल्या प्राथमिक शाळेला दुस-या चार्लसनें १६६३ सालीं सनद दिली. येथें एक धंदे शिक्षणाचें विश्वविद्यालय असून धार्मिक संस्था पुष्कळ आहेत. वाफेच्या शक्तीनें चालणा-या मागाचा शोधक डॉक्टर एडमंड कार्टराइट याच्या स्मरणार्थ लीस्टर रमणबागेंत बांधलेल्या दिवाणखान्यांत चित्रांच्या दालनांशिवाय एक पदार्थसंग्रहालय आहे. शिल्पकलेचे व लोखंडाचे कारखाने येथें आहेत. लोकरीच्या कापडाच्या व्यापाराचें हे केंद्र आहे.

ब्रॅडफोर्ड, (ऑन अँव्हान)– इंग्लडांत वेस्टबरोमधील एक बरो व बाजारपेठ असून येथें होलीट्रिनिटीप्रार्थना मंदिरांत कांहीं स्मारके आहे.. ८व्या शतकांत सेंट अल्ढेल्म ह्यानें सेंट लॉरेन्स सॅक्सन प्रार्थनामंदिर बांधलें. येथें रबराचे, दारू तयार करण्याचे व लोखंडाचे कारखाने आहेत. एके काळीं हें कापडाच्या व्यापाराचें केंद्रस्थान होतें.