विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्राँझ (पंचलोह)– तांबें व पितळ यांचें निरनिराळ्या प्रमाणांत मिश्रण होऊन बनलेली मिश्र धातु. व्हेनिस येथील सेंट मार्कच्या लायब्ररींत असलेल्या, अकराव्या शतकाच्या सुमारच्या ग्रीक लेखांत या धातूंतील प्रमाण १ पौंड तांब्यास २ औंस कथील असें दिलें आहे. नुसत्या तांब्यापेक्षा कथील मिश्रित ताबें लवकर वितळतें यामुळें ओतीव कामाकरितां ही धातु उपयोगी पडते, शिवाय तांब्यापेक्षां ती अधिक कठिण व कमी धनवर्धनीय आहे. १६ भाग तांबें व १ भाग कथील यांच्या मिश्रणानें मऊ ब्राँझ (गनमेटल) व कथिलाचें प्रमाण दुप्पट केलें असतां कठिण ब्राँझ मिळतें. ७ भाग तांबें व एक भाग कथिल मिळून झालेंली ब्राँझ कठिण, ठिसूळ व नादोत्पादक असून त्याला पाणी देऊन चांगलीं धार आणतां येते. घंटेच्या धातूंत कथिलाच्या एका भागाबरोबर तांब्याचे तीन ते पांच भाग असतात. ब्रिटिश व फ्रेंच नाण्याकरितां वापरलेल्या ब्राँझ धातूंत तांबें शें. ९५, कथिल शें. ४ व जस्त शें १ असतें. यांत्रिक आवणाकरितां वापरलेल्या मिश्र धातूंत जस्ताचें थोडेंसें प्रमाण असतें, कारण त्यामुळें धातूचा कठिणपणा वाढतो. बाँझ धातु एकजीव करण्याकरितां स्फुरिताचा उपयोग केलेंला असल्यास, तिच्या गुणधर्मांत सुधारणा होऊन ती जास्त मजूबत होतें. अशा धातूला स्फुरब्राँझ म्हणतात व तिचा उपयोग पंपाचे दट्टे, पंपाचे पडदे वगैरे कामाकडे होतो. तांबें व अल्युमिनियम यांच्या मिश्रणाला अल्युमिनियम ब्राँझ म्हणतात. ही धातु मजबूत असून गंजत नाहीं. तींत सिलिकॉनचें थोडेंसें प्रमाण असल्यास, तिची तन्य शाक्ति जास्त वाढते.
प्राचीन काळच्या ब्राँझ धातूंत तांब्याच्या जोडीला जस्त, कथील, शिसें, यांपैकीं एक किंवा अधिक धातू असून, त्यांचें प्रमाण वेळोवेळीं कारण पडेल त्याप्रमाणें बदलत गेलें आहे. ख्रि. पू. ४०० वर्षांपर्यंत ग्रीक नाणीं तांबें व कथिल यांच्या मिश्रणाचीं असत, परंतु त्यानंतर ते शिशचाहि उपयोग करूं लागलें असावेत असें दिसतें. ब्राँझ धातूच्या उपयोगाकरितां ''धातुकाम'' पहा.