विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्राहुइ- बोलनघाटाजवळून अरबी समुद्रावरील माँझ भूशिरापर्यंत असणा-या ब्राहुइ म्हणतात. त्यांची उत्पत्ति मानवजातिशास्त्राला अद्यापि दुर्बोध आहे. ते द्रविड आहेत असें कोणी तज्ज्ञ म्हणतात तर कोणी ते सिथियन अथवा तार्तर असावे असेंहि प्रतिपादितात. बहुधां ते द्रविड जातीचे असून पुष्कळ वर्षांपूर्वीं आपल्या देशांतून येथें आले असावे. त्यांच्यावर अरब संस्कृतीचा बराच परिणाम झालेला दिसतो. प्राचीन काळापासून त्यांच्या हातीं बलुचिस्तानची बरीच सत्ता आहे. ब्राहुइ लोक भटकणारे असून ते बक-याच्या कातड्यानें मढविलेल्या तंबूंत राहतात. ते सुनी पंथाचे मुसुलमान आहेत. ते ठेंगणे परंतु बळकट असून त्यांचे चेहरे रूंद व ओबडधोबड असतात. ते काळसर पिंगट रंगाचे असून त्यांच्या केंसांचा रंग पिंगट असतो. ते विश्वासू व शंत स्वभावाचे आहेत. कांहीं ब्राहुइ लोक मुंबईच्या लष्करांत नोकर आहेत. ब्राहुइ भाषा ही द्रविडभाषावंशांतील असून ही भाषा बोलणारे सुमारें ५० हजार लोक आहेत. सध्या ब्राहुइ भाषेवर बलुचिस्तानांतील इतर भाषांचे बरेच परिणाम झाल्यानें ती शुद्ध राहिलेली नाहीं.