विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रूसेल्स- बेल्जमची राजधानी. विल्यम दि सायलेंट याच्या राजवाड्यांत प्रख्यात वाचनालय असून आधुनिक चित्रांचें एक प्रदर्शनहि आहे. सेंट गुडूलचें प्रार्थनामंदिर सुळकेदार असून तें गॉथिक गृहशिल्पकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. ग्रँडपॅलेस हा फार मोठा इतिहासप्रसिद्ध चौक आहे.
१८ व्या शतकांतील मुख्य इमारती म्हटल्या म्हणजे राजवाडा आणि पॅले दि ला नेशन ह्या होत. रू दि ला रेजेनसमध्यें उत्कृष्ट चित्रांचा संग्रह आहे. या शहराची फारच झपाट्यानें वाढ होत आहे. ब्रूसेल्स येथें आतां गोदी बांधण्यांत आली आहे. ब्रूसेल्स हें नुसतें राजधानीचेंच शहर आहे असें नाहीं, तर येथें इतरहि उद्योगधंदे बरेच चालतात. टेप, सतरंज्या, पडदे, लांकडी सामान, गाड्या इत्यादि वस्तू येथें होतात. परंतु या शहरांत सुखवस्तू लोकांचा भरणा फार आहे. येथें सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. बेलजियन लोक गानलुब्ध असल्यामुळें येथें मोठमोठ्या गायनशाला व नाटकगृहें आहेत. फुटबॉल हा या देशांतील लोकांचा आवडता खेळ होय. लोकसंख्या (१९२३) ७८७०६०. येथें एक विश्वविद्यालय आहे.
सतराव्या शतकांत ब्रूसेल्स हें अत्यंत सुंदर, अतिविशाल, आणि सुरेख बांधलेलें यूरोपांतील शहर अशी या शहराची ख्याती होती. अजूनसुद्धां जुन्या स्पॅनिश धर्तीच्या इमारतींकडे पाहिलें म्हणजे मध्ययुगांतील या शहराच्या अप्रतिम सौंदर्याची कल्पना होते. या शहरानजीक एक मोठा बाग आहे. तो इहलोकीचें नंदनवनच होय.