विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भगंदर (भगेंद्र)- एखादें गळूं होऊन तें फुटून गेलें म्हणजे त्यांतील पोंकळी मिटून जखम भरून येते. पण असें न होतां तींत पोंकळी राहून तिच्या नलिकाकारमार्गें पू, रक्त, लस वाहत राहणें या रोगास भगेंद्र असें म्हणतात. हें प्राय: गुदद्वाराजवळ होतें. याकरितां त्याचेंच वर्णन पुढें अंमळ विस्तारानें दिलें आहे. परंतु गळूं हें कोठेंहि होणें संभवनीय असल्यामुळें डोळा, मुख वगैरे अन्य ठिकाणींहि भगंदर होऊं शकतें. व त्या प्रकारांचाच नामनिर्देश शेवटीं केला जाईल. सर्व प्रकारच्या भगेंद्रांचीं सामान्य कारणें हाडांमध्यें अगर हाडाजवळ गुदद्वाराप्रमाणें एखाद्या श्लेष्मल नलिकाकार मार्गाजवळ गळूं झालें अगर त्या मार्गांत फुटलें अगर त्यांत एखादा आगंतुक पदार्थ शिरून अगर अन्य कारणामुळें गळवाची जखम भरून आली नाहीं म्हणजे त्याच्या पोकळीचा भगेंद्र रोग तयार होतो. भगेंद्र म्हणजे पू वाहणारा मार्ग.
गु द भ गें द्र, कारणें:- वर दिलेल्या कारणांशिवाय क्षय, क्यान्सर या रोगांत हें होण्याची प्रवृत्ति असते. गुदद्वाराच्या भोंवतालच्या प्रदेशांत गळूं होऊन तें बाहेर न फुटलें तर गुदद्वाराच्या आंत जो आंतड्याचा भाग त्यासन्निध असेंल त्यास छिद्र पडून त्यांत तें फुटतें. गुदद्वार वरचेवर मिटत उघडत असल्यामुळें व त्यांतुन रोज मलोत्सर्जन व्हावयाचें असल्यामुळें गळवाची जखम मिटत नाहीं व म्हणून भगेंद्र बनण्यास अनुकूल अशी ही जागा आहे.
प्रकार व लक्षणें:- (१) मुकें अगर मिटलेल्या भगेंद्रांत गुदद्वाराजवळ रोगांचें छिाद्र दिसत नाहीं, पण गुदद्वारांत बोट घातल्यास तें छिद्र बोटाला लागतें; म्हणजे यास आंत तोंड असतें (२) आंतून मुकें भगेंद्र या प्रकारांत भगेंद्राचें छिद्र गुदद्वाराजवळ बहुधां अर्धा इंच अंतरावर वेगळें असतें.(३) आरपार भगेंद्र हा प्रकारचा फार आढळतो तो रोगाच्या नलिकामार्गाच्या वळणाप्रमाणें विविध प्रकारचा व आकाराचा होतो. या भगेंद्र मार्गांत कधीं कधीं आणखी फांटे फुटून उपमार्ग बनतात. या रोगामुळें रोग्यास चैन न पडून गुदद्वाराजवळ एरवीं व मलशुद्धीच्या वेळीं आपोआप व धक्का लागला तर व हालचाल झाल्यास दुखतें. त्या छिद्रांतून पू अगर पुवासारखें पाणी, लस, रक्त अगर मळ सुद्धां (ज्या प्रकाराचें भगेंद्र असेल त्याप्रमाणें ) वाहतो. त्यामुळें मनास निर्मळ न वाटून रोगी चिंतातुर, उदास व खंगलेला
दिसतो. मधून मधून रोगास जोर येऊन ठणका लागतो.
रोगनिदानः- पूर्वीं त्या जागीं गळूं होऊन तें जिरल्याचा वृत्तांत विचारपूस केल्यास कळतो. त्याशिवाय गुदद्वारांत बोट घातल्यानें अगर बाहेर छिद्र असल्यास त्यांत सळई घालून रोग समजतो. गुदद्वार आंखडून लहान होण्याचा रोग (गुदाघातरोग) अगर क्यान्सरादि ग्रंथिरोग गुदांत असहे किंवा काय हेंहि गुदपरीक्षा करून पहावें. हे रोग असल्यास त्यामुळें भगेंद्र होईल. पण अशा वेळीं प्रथम त्या त्या रोगावर शस्त्रोपचार करून शिवाय भगेंद्रावर शस्त्रक्रिया केली पाहिजे, अगर भगेंद्ररोगाचीं हीं कारणें शस्त्रक्रियेनें नाहींशी केलीं तर भगेंद्र आपोआप मिटतें.
उपचारः- यास बहुतेक शस्त्रक्रिया करावी लागतेच. ती करण्यापूर्वीं क्षयरोग फार वाढला असल्यास अगर लघवींतून अलब्यूमिन जात असल्यास शस्त्रक्रिया करूं नये. ती करण्याच्या पूर्व रात्रीं एरंडेल देऊन सकाळीं बस्तीनें गुदद्वार व कोठ धूवून काढून स्वच्छ व निर्मळ करावा. भूल दिल्यानंतर बाह्य छिद्रांतून खोबणीची सळई घालून तिचें टोंक भगेंद्राच्या आंतील छिद्रांत घुसवून गुदांतून तें बाहेर आणून ठेवावें. नंतर लांब चाकूचें टोंक त्या खोबणींत बसवून गुदद्वार व बाह्यछिद्र यांतील सर्व भाग छेदावा व त्यांमुळें गुदद्वाराची एक कडहि छेदली जाते. नंतर भगेंद्रास फांटे फुटले आहेत काय हें नीट शोधून व ते आढळयास याचप्रमाणें त्या खोबणीच्या सळईनें व चाकूनें ते कापावे व त्या सर्वांतील श्लेष्मल त्वचा चाकूच्या बिनधारेच्या बाजूनें अगर खरबडण्याच्या चमच्यासारख्या हत्यारानें खरडावें. म्हणजे ती जखम मिटण्यास व भरून येण्यास मदत होते. नंतर जखमेंत आयडोफार्मचा बोळा बसवून, शौचास ४/५ दिचस हो नये म्हणून गुदांत मॉर्फियाची सोंगटी बसवून जखम बांधावी. रोज थोडा अफूचा अर्क दिल्यानें ४/५ दिवस शौचास होत नाहीं. मग एरंडेल व बस्ती पुन्हां देऊन कोठा साफ करावा. जखम भरून येईपर्यंत ती रोज धूवून पट्टी व आयडोफार्मनें बांधीत जावी.
गुदभगेंद्राशिवाय भगेंद्राचे कांहीं इतर प्रकार पुढें दिले आहेत व ते सर्व शस्त्रक्रियेनें बरे होतात. हा रोग बाह्योपचारानें अगर पोटांतील औषधानें बरा होत नाहीं तथापि पुष्कळ लोक जाहिरातींतील अगर भोंदू वैद्यांच्या थापास भुलून पैसा घालवितात व रोग तसाच बाळगतात.
म ल भ गें द्र- यांत गुदमार्ग ग्रंथि वगैरे रोगानें संकुचित झाल्यामुळें त्याच्या वरील भागांत मळ फार सांठून आंतडें फुटतें व रोग्याच्या सुदैवानें आंतील घाण आंत्रावरणांत शिरून मरणोत्पादक दाह उत्पन्न न झाल्यास स्नायुत्वचेस छिद्र पडतें व त्या वाटें कांहीं मळ बाहेर येतो व कांहीं गुदावाटें येतो.
यो नि मू त्रा श य भ गें द्र व गु द यो नि भ गें द्र.- स्त्रियांमध्ये मूत्राशयाच्या मागील बाजूस योनिमार्ग असतो. प्रसूति होण्यास फार वेळ लागल्यास फार वेळ लागल्यास बहुधा व इजा वगैरे असल्यामुळें तेथें जेव्हां छिद्र पडून त्यांतून लघवी योनिमार्गांत वाहते अगर त्याच कारणामुळें, मूत्राशयाच्या मागें गुदमार्ग असल्यामुळें तेथें जेव्हां छिद्र पडतें तेव्हां त्या छिद्रावाटें मल योनींत जातो. बाळंतपणांत मूलाच्या डोक्याचा दाब त्या जागीं फार वेळ पडल्यानें असें होतें. पुरूषाच्या मूत्राशयास छिद्र पडून मल अगर घाण वायु मूत्रामार्गांत शिरून तेथें छिद्र पडतें त्यास आंत्रमूलाशय भगेंद्र म्हणतात.
ला ला पिं ड न लि का भ गें द्र.- मुखामध्यें तीन पिंडांतून लाळ येते. येथें गळूं होऊन तें आंत फुटल्यास गालावर छिद्र पडून त्यांतून लाळ वाहते.
अ श्रु मा र्ग न लि का भ गें द्र.- डोळ्याच्या कोप-यांत अश्रुंची उत्पत्ति करणारे पिंड अश्रुवाहक नलिकासह आहेत. तेथें गळूं अगर पू होऊन तें फूटून बरें न झाल्यास तेथें छिद्र पडतें व त्यांतून अश्रू म्हणजे डोळ्यांतील पाणी, पुवा सारखें वाहतें.
हे मुख्य प्रचारांतले भगेंद्ररोग असून क्वचित् आढळणारे व अन्य प्रकारचेहि भगेंद्र रोग असतात. त्या सर्वांस एकच इलाज म्हणजे शस्त्रक्रिया हा होय व त्यांतील तत्त्व हें कीं गळूं बरें न होऊन बनलेला पूयमार्ग चिरून खरवडून त्यांतील पूयस्त्रावक श्लेष्मलत्वचा ताज्या जखमेसरखी करावी म्हणजे भगंदराची जखम मिटते. गुदभगेंद्रांत रोगी फार अशक्त अगर शस्त्रक्रियेस कबूल नसल्यास एक मध्यम गौण उपाय आहे तो असा:-रोगाच्या आंतील व बाहेरील छिद्रामध्यें एक तार घालून ठेवावी व दोन चार दिवसांनीं ती घट्ट ओढून बांधावी म्हणजे तिच्या पुढील मार्ग दर वेळीं थोडा थोडा कापला जातो व तारेमागील भगेंद्रमार्ग बरा झालेला असतो अशा रीतीनें सर्व मार्ग भरून येण्याचा संभव असतो.
आ यु र्वे दी य, नि दा नः- गुदाच्या आंत किंवा बाहेर एक किंवा दोन बोटांवर दुष्ट झालेल्या अशा रक्तमांसांत बहुधां अगोदर पुळी होऊन ती फूटून तिचाच जो व्रण होतो त्यास भगंदर असें म्हणतात. हत्ती, घोडा इत्यादिकांवर बसून जाणें, टणक आसनांवर बसणें, उकिडचें फार वेळ बसणें, मुळव्याधीच्या निदानांत सांगितलेल्या अन्नाचें सेवन करणें इत्यादि कारणांनीं भगंदर होतें. भगंदराचा व्रण पाझरत असतो. सर्व प्रकारच्या भगंदरांत त्यांची चिकित्सा न केल्यास योनि, बस्ती, व गुद्द हीं फाटतात. याचे वातजन्य, पित्तजन्य, कफजन्य, वातपित्तजन्य, वातकफजन्य, पित्तकफजन्य, त्रिदोषजन्य, व आंगतुक असे आठ प्रकार आहेत. भगंदरांत होणारे ठणका, दाह, कंड वगैरे विकार व्रणाप्रमाणेंच होतात. एकदोषज तीन व द्विदोषज तीन अशीं सहा भगंदरें असाध्य म्हणून त्याज्य आहेत. तसेंच गुदाच्या प्रवाहिणी वळीपर्यंत गेलेलें व गुदाच्या शिवणीवर झालेलें भगंदरहि असाध्य आहे.
चिकित्सा:- भगंदराच्या जागीं पुळी झाल्याबरोबरच वमन, विरेचन, रक्तस्त्राव, सेचन, वगैरे उपायांनीं तिची अशी काळजीपूर्वक चिकित्सा करावी कीं, जेणेंकरून ती पिकणार नाहीं. पुळी पिकलीच तर रोग्यास स्निग्ध करून व अवगाहस्वेदानें खिन्न करूंन मुळव्याधीच्या शस्त्रक्रियेंत सांगितल्याप्रमाणें त्यास जखडून, भगंदर खालच्या अंगास आहे, वरच्या अंगास आहे, अंतर्मुख आहे किंवा बहिर्मुख आहे तें नीट तपासून पहावें. वैद्यानें अंतर्मुख भगंदरांत एषणी (सळई) घालून त्याची गति कोणीकडे आहे हें नीटपणें तपासून नंतर शस्त्रानें युक्तिपूर्वक तें फोडावें. ज्या भगंदरांत पुष्कळ भोकें आहेत त्यांत गोतार्थ, सर्वतोभद्र, दलालांगल व लांगल या चार प्रकारच्या छेदांपैकीं योग्य वाटेल तो करावा. एका बाजूस शस्त्र घालून केलेला गोतीर्थक छेद होय; ज्यांत चारी बाजूंनीं छेद केलेला असतो तो सर्वतोभद्र; व एका बाजूपुरताच असा अर्ध्या नांगराच्या आकाराचा जो छेद तो अर्धलांगल व दोन्ही बाजूंस सगळ्या नांगराच्या आकाराचा जो छेद तो लांगलछेद होय. स्त्राव होण्याचे सगळे रस्ते डागणीनें साफ डागून काढावे. म्हणजे ते पुन्हां विकृत होत नाहींत. वैद्यानें मधून मधून रोग्याचा कोठा साफ ठेवण्याची तजवीज करावी. त्रिफळेच्या काढ्यांत मांजराचें हाड उगाळून व्रणावर लेप करावा. भगंदराची चिकित्सा व्रणाप्रमाणेंच करावी. धुण्याकरितां व जखम भरून येण्याकरितां व्रणाचींच औषधें करावीं. घोड्यावर बसणें, वायूचा अवरोध, दारू, मैथून, अजीर्णावर जेवण, असात्म्य पदार्थ खाणें व नानाप्रकारचीं साहसें हीं व्रण भरून आल्यानंतर एक वर्षपर्यंत किंवा त्याहिपेक्षां अधिक दिवस वर्ज्य करावीं.