विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भंगी- हिंदुस्थानांतील या लोकांची एकंदर संख्या (१९११) ७४०४८१ आहे. मैला काढण्याच्या धंद्यावरून बनलेला हा वर्ग आहे. तेव्हां साहजिकच त्यांत हिंदु, शीख, मुसुलमान या सर्व धर्मांचे लोक आहेत. यांची सर्वांत जास्त वस्ती संयुक्तप्रांतांत व मुंबई इलाख्यांत आहे. शिवाय चुहरा, हलालखोर व मेहतर या नांवांच्या यांच्या दुस-या जाती आहेत. त्यांची संख्या धरल्यास एकंदर भंग्यांची लोकसंख्या जास्त फुगेल. भंग्यांस अस्पृश्य मानलें जातें. यांनीं आरंभीं मैला उठविण्याचें काम कां पत्करिलें याला पुढील कारणें असावींतः हे प्रतिलोमसंततीचे असावेत, प्राचीन अनार्यांपैकीं असावेत अथवा पतित झालेले असावेत. गुजराथेकडे हे लोक भंगीया या नांवानें ओळखले जातात. तिकडे त्यांचा दुसरा धंदा टोपल्या विणण्याचा व वाटाड्याचा आहे. त्यांच्यांत, चोहाण, चुडासम, दाफदा, जेठवा, वगैरे रजपूत आडनांवें व कुळ्या आढळतात. त्यावरून ते पतित रजपूत असावेत, परंतु हे गोमांस व मुसुलमानांच्या हातचें अन्न खातात. तिकडे माणूस मेल्याबद्दलचें पत्र भंग्याच्याच हातीं पाठवितात. हे चोराचा माग काढण्याचें, पहा-याचें, फांशीं देण्याचें वगैरे कामें करतात. यांचे देव हनुमान, मेलडी, शिकोत्री, गणपति, तुळस, इत्यादि आहेत. हे कबीर, रामानंद व नानकपंथीहि आहेत. यांचे उपाध्याय धेड, गरूड या जातींचे आहेत. यांच्यांत चिको, धिरो, हर्खो वगैरे साधू झाले आहेत. हे हिंदुसण व तीर्थयात्रा करतात. गुजराथेंतील भंग्यांचा श्रावण वद्य नवमी हा मोठा सण असतो. हो ४० दिवसापर्यंतहि सुवरे पाळतात. ब्राह्मणांनां ते पूज्य मानतात. यांच्यांत विधवेला धाकट्या दिराशीं पाट लावतां येतो. गुजराथेंत बिनवारशी भंग्याची इस्टेट जातपंचायतीस मिळतें; इकडे यांची सुतक पाळण्याची चाल ऐच्छिक आहे. हे लोक पाळीव पक्ष्यांचे शोकी आहेत. आग्रा-अयोध्या प्रांतांत यांच्या होला, लालबेगी, बालमिकी, शेखमेहतर, भोसाड, चाजगाडी, माखीयार या मुख्य व इतर पुष्कळ पोटजाती आहेत. शेख व लालबेगी, हे पोटभेद उच्च दर्जाचे आहेत. दक्षिणेंतील यांचे उपाध्याय हुसेनी ब्राह्मण आहेत. यांच्या जातीपंचायती आहेत. त्याच्या मुख्यास शेट्या म्हणतात. नाडियाद (गुजराथ) च्या पंचायतीचा अंमल २४२ गांवांवर चालतो. (बाँबे गॅझेटियर, पु. ९. भा १; पु. ७,१३ व १५; अलोनी- लग्नविधी व सोहळे; सेन्सस रिपोर्ट १९११.)