विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भगीरथ- हा सूर्यवंशीय दिलीप राजाचा पुत्र होय. दिलीपानें पूर्वजांच्या उद्धारार्थ गंगाप्राप्तीसाठीं दीर्घ काल तप केलें. पुढें भगीरथानेंहि पित्याप्रमाणेंच तप केलें. त्यामुळें गंगा प्रसन्न झाली. नंतर तिचा स्वर्गांतून खालीं पडण्याचा वेग पृथ्वीस सहन होणार नाहीं म्हणून भगीरथानें शंकरास प्रसन्न करून त्याच्या मस्तकीं गंगापतन करविलें. तेथून पुढें गंगेनें भगीरथाच्या पूर्वजांचा उद्धार केला. तेव्हांपासून तिला भगीरथ म्हणूं लागले. भगीरथ हा मोठा दाताहि होता.