विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भडभुंजा- यांची संख्या (१९११) ३२१८३३ आहे. धान्य भाजणारा (भ्राजक) तो भडभुंजा असें म्हणतात. मध्यप्रांतांत व उत्तरेकडे यांची संख्या जास्त आहे. कहार बाप व शुद्र यांच्यापासून यांची उत्पति झाली असें इलियट म्हणतो. ते आपणांस कन्यकुब्ज ब्राह्मणांचे वंशज व कैया नांवाच्या कायस्थाचे भाईबंद म्हणवितात आणि भोपाळकडील कायस्थ तर यांच्या हातचें खातात. सकसेना, श्रीवास्तव, झिनवार, भटियार, अशा यांच्या पोटजाती आहेत. हे लग्न वगैरे विधी ब्राह्मणांकडून करवितात. लग्नांत नवरदेव स्त्रीचा पोषाख करून नवरीच्या मांडवांत नाचतो. विधवा धकट्या दिराबरोबर पाट लावितात. वरानें पाट लावण्यापूर्वीं एका काठीशीं किंवा कानांतल्या बाळीशीं लग्न करावें लागतें व्यभिचार केलेल्या कुमारीचें लग्न तिच्या स्वजातीय जाराबरोबर झाल्यास तें पाटाप्रमाणें होतें. यांच्यांत भाजण्याचें काम बायकांकडे असतें. त्यामुळें कांहीं म्हणी बनल्या आहेत असें रसेल म्हणतो (उदा.- भाड झोंकणें, भाडमें डालो, भडभुंजेकी लडकी और केसरका टिकला). नाशिकाकडे भुजारी म्हणून एक भडभुंज्यांचा वर्ग आहे. (रसेल आणि हिरालाल; से. रिपोर्ट; रोझ-ग्लॉसरी, पु २; क्रुक; ट्राईब्ज अँड कास्ट्स, पु.२)