विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भंडारा, जि ल्हा.- मध्यप्रांत, नागपूर विभागातील एक जिल्हा. नागपूरच्या सपाट प्रदेशाच्या पूर्वभागीं हा जिल्हा असून याचें क्षेत्रफळ ३९६५ चौरस मैल आहे. हा प्रदेश सपाट व मोकळा आहे. मुख्य नदी वैनगंगा आहे. भंडारा या गांवानजीकच्या पहाडांत इमारतीस उपयोगी असा दगड सांपडतो. उंच पहाडांतून साग, लेन्डिया, बिवला, व मोह इत्यादि झाडें होतात. गैखुरी व प्रतापगड पहाडांत गवे आढळतात. जंगलांतून बहुतकरून वाघ चित्ते आढळतात. नागपूर पेक्षां येथील हवा जरा थंड आहे. वार्षिक पाऊस ५५ इंच पडतो.
हा प्रदेश एके काळीं गवळी राजांच्या ताब्यांत होता. याशिवाय ह्या प्रदेशाची माहिती कांहींच उपलब्ध नाहीं. १७ व्या शतकांत ह्या जिल्ह्याच्या उत्तरेकडील प्रदेशाचा देवगड गौंड वंशाच्या राजाच्या राज्यांत समावेश होत असे. अंबागडचा किल्ला सिवनीमधील डोंगरताल इस्टेटीचा गोंड राजा बख्तबुलन्द ह्याच्या पठाण प्रतिनिधीनें बांधिला. ह्या वेळीं पूर्व व दक्षिण भागांतील प्रदेशांत घनदाट जंगल होतें. सध्याच्या चिचगडच्या जमीनदाराजवळ चांद राजाचें अधिकारपत्र आहे. सन १७४३ मध्यें देवगडच्या राजाबरोबर भंडारा नागपूरच्या मराठा राज्याच्या अंमलाखालीं आला. ह्यावर कमविसदाराची देखरेख होती.
तिस-या रघोजीच्या मृत्यूनंतर (१८५३) हा जिल्हा ब्रिटिशांकडे आला. १८६७ सालीं लान्जि व इतर जमीनदा-या भंडारा जिल्ह्यांतून काढून नवीन बालाघाट जिल्ह्यांत घेण्यांत आल्या. तिल्लोटाखैरी येथें कांहीं अवशेष व दगडी खांब आहेत. त्याचप्रमाणें आमगांवनजीक कांहीं मोडकळीस आलेल्या दगडी इमारती आहेत.
लोकसंख्या (१९२१) ७१७७४७. जिल्ह्यांत गावें ४ व खेडीं १६३३ आहेत. शें. ७७ लोक मराठी भाषा बोलतात. शेंकडा ७२ लोक शेतकीवर उपजीविका करतात. जमीनदा-या २८ असून त्यांचें क्षेत्रफळ १४७९ चौरस मैल आहे. पैकीं ९५ चौरस मैल जमीन भोंसले वंशाकडे सारासुटीनें आहे. तांदूळ, ज्वारी, गहूं , चणे, अळशी व कडधान्यें हीं पिकें होतात. ह्या जिल्ह्यांत पाटाच्या पाण्यानें बरीच जमीन भिजते. सरकारी जंगल ५३२ चौरस मैल; पैकीं बहुतेक सर्व राखलेलें आहे. यांत बांबूचीं बनें आहेत. इतर जमीनदा-यांतील जंगल ९४६ चौरस मैल आहे.
तुगसरनजीक मँगनीज धातूची खाण आहे. तिरोड तहशिलींत चांगल्यापैकीं लोखंड सांपडतें. सोनझरी दुधीनदींत रेती धुतली असतां सोनें आढळतें. भंडारा जिल्ह्यांत रेशीमकाठीं कापड विणतात, व्यापाराचीं मुख्य गावें भंडारा, पवनी, मोहरी, अंधार गांव हीं आहेत. येथून तांदूळ मुंबईकडे, नागपूर, व व-हाडांत जातो. गहूं, चणे, उडीद, गळिताचीं धान्यें, सागवान, बिवला व इतर इमारती लांकूड, बांबू व चामडें, मँगनीज हा निर्गत माल असून नागपूर व मुंबई गिरण्यांचें कापड, मातीचें तेल, ताग, समुद्रापासून काढलेलें मीठ, मॉरिशस साखर, गूळ, ज्वरी, व कडधान्यें हा आयात माल आहे. बंगाल नागपूर रेल्वे ह्या जिल्ह्यांतून जाते. शें. २५ लोक साक्षर आहेत.
त ह शी ल.- क्षेत्रफळ १०८८ चौरस मेल. १९११ सालीं लोकसंख्या २३५४४५ होती. भंडारा तहशिलींत भंडारा, पवनी व तुमसर हीं मुख्य शहरें आहेत. सरकारी जंगल २०४ चौरस मैल वजा केलें असतां राहिलेल्या क्षेत्रफळांत शेंकडा ६३ जमीन वहित आहे.
श ह र.- हें वैनगंगा नदीवर वसलेलें असून बंगाल नागपूररेल्वेवरच्या भंडारारोड स्टेशनपासून ७ मैलांवर आहे. लोकसंख्या १९०१ सालीं १४०२३; पण १९११ सालीं याच्या निम्यानें होती. येथें पुरातन काळीं गवळ्यांनीं बांधलेला एक किल्ला आहे. भंडा-यास पितळेचीं भांडीं पुष्कळ होतात. सुती कापडहि विणलें जातें. परंतु अलीकडे याला फारसें महत्व नाही. एक मोठी इंग्रजी शाळा खाजगी रीतीनें चालविली जात असून इतर अनेक शाळा आहेत.