विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भंडारी- ही जात कोंकणपट्टीखेरीज अन्यत्र नाहीं. स. १९२१ च्या खानेसुमारीवरून या जातीची एकंदर लोकसंख्या १७९१०३ असून ती पुढीलप्रमाणें विभागलेली आहेः- मुंबई शहर (३००५८), मुंबई सुबर्ब (१६२०), सुरत जिल्हा (२९४६), ठाणें (१३५३०), कुलाबा(४८८३), रत्नागिरी (८३५५१), कानडा (११६०१), जंजिरा संस्थान (४,३९३), सावंतवाडी संस्थान (२४,५५०), या जातींत हेटकरी, कित्ते उर्फ उपरकरी, शेषवंशी उर्फ शिंदे, गावड, क्रियापाल, आणि देवळी उर्फ बंदे असे सहा पोटभेद आहेत. मोरे, थळे, कालव, भेरले आणि नाईक वगैरे आणखी पांच वर्ग असल्याचें क्वचित ऐकूं येतें; परंतु त्यांचा वरील सहांत समावेश होत असल्यामुळें ते स्वतंत्र वर्ग आहेत असें म्हणतां येत नाहीं. रत्नागिरी जिल्हा व सावंतवाडीचे लोक हेटकरीवर्गाचे असून भंडा-यांत हा वर्ग लोकसंख्येच्या व ''शिवशाहींत'' बजावलेल्या दिव्य कामगिरीच्या दृष्टीनें प्रमुख व विशेष महत्त्वाचा समजतात. कित्ते उर्फ उपरकरी हा सधन वर्ग असल्यामुळें हेटकरी व उपरकरी वर्गांत अलीकडे शरीरसंबंध होऊं लागला आहे. शिंदे, गावड आणि क्रियापाल हे आपणांस शेषवंशीय क्षत्रिय म्हणवितात. शिंदे व गावड यांच्यांतहि क्वचित प्रसंगीं शरीरसंबंध होतो. त्यांच्यापैकीं कांहीं लोक पोर्तुगीजांकडून जुलमानें बाटविले गेले होते. त्यांनां प्रायश्चित वगैरे देऊन व क्रियापालन करण्यास लावून पेशवाईंत फिरून हिंदु करण्यांत आले. तेव्हांपासून ''क्रियापाल'' हा एक नवीन वर्ग स्थापण्यांत आला. देवळी उर्फ वंदे हे लोक भंडारी जातीच्या पुरूषास इतर जातींतील स्त्रियांपासून व कलावंतीण उर्फ भावीण यापासून झालेली संतति आहे. पैठणचे आंध्रभृत्य किंवा शालिवाहन आणि गोमांतक येथील कदंब या दोन राजवंशांशीं भंडारी लोक आपला संबंध मुख्यतः जोडतात. अर्थातच हे स्वतःस क्षत्रिय वर्णाचे समजतात. कदंब कुळीचीं भंडारी घराणीं आपली जन्मभूमि गोमांतक समजतात. अर्वाचीन ग्रामनामावरून प्रचारांत आलेल्या आडनांवाचा विचार करतां असें आढळून येतें कीं, बहुतेक भंडारी कुटुंबें मूळचीं सावंतवाडी, गोमांतक प्रदेशांतीलच असावीं. भंडा-यांमध्यें सर्वसाधारण देवक कदंब वृक्ष हें आहे.
नौकानयन व बरकंदाजी हे भंडारी लोकांचे पंरपरागत धंदे होत. कोंकणचें नौकानयन इतकें प्राचीन आहे कीं, गौतम बुद्धाच्या वेळीं देखील पश्चिम किनारा समुद्रयानांनीं गजबजलेला होता. समुद्रावरील सर्वांत मोठा अधिकारी 'महानायक' या पदवीचा असे. ‘महानायक’ या पदवी अगर अधिकारदर्शक नांवाचें 'मायनाक' हें अलीकडील रूप भंडा-याच्या आडनांवांत सांपडतें. कीर, पांजरी, नामनाईक-नांबनाईक (नौकानाईक), सारंग, तांडेल हीं भंडारी लोकांचीं आडनांवें देखील प्राचीन नौकानयनदृष्ट्या अशींच महत्त्वाचीं आहेत. होकायंत्राचा शोध लागला नव्हता अशा काळीं प्रत्येक तारवावर दूरवर उडून जाणा-या पक्ष्यांचा एक पिंजरा भरून ठेवलेला असे. समुद्रकिनारा सोडून तारवें दूरवर गेलीं, व दोन्हीं बाजूंचे तीर दिसेनासें झालें म्हणजे किनारा शोधून काढण्यासाठीं कीर नांवाचा तारवावरील अधिकारी या पिंज-यांतून दोन दोन तीन तीन पक्षी बाहेर सोडून देई. हे पक्षी आपल्या स्वाभाविक गुणांप्रमाणें किना-याकडे उडून जात. व किनारा बराच दूर असला म्हणजे संध्याकाळपर्यंत आकाशांत भ्रमण करून परत तारवावर येत. या त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गाचें नीट धोरण राखून कीर तारूं हाकरण्याची इशारत देत असे. पांजरी या अधिका-याचें काम, मराठ्यांच्या गलबतावरील डोलकाठीच्या पिंज-यांत उभे राहून शत्रूंच्या जहाजांची टेहळणी करण्याचें असे. सारंग नांवाच्या अधिका-याला वारा कसा व कोणत्या दिशेनें वाहतो, कोठें खडक आहेत, तुफान वगैरे होण्याच्या पूर्व चिन्हांचीं व आकाशांतील नक्षत्रांची पूर्ण माहिती असावी लागे. तांडेल हा इतर खलाशी लोकांवरील मुख्य असे. मराठ्यांच्या लढाऊ जहाजांवरील मुख्य नांवनाईक किंवा नामनाईक नांवाचा असे. जहाजांवर जेवण करणा-यास भंडारी म्हणतात. इतर खलाशी लोकांनांदेखील बहुशः भंडारी नांवानें संबोधितात. अलिबाग व दाभोळकडील एक मुसुलमान जातीचे लोक दालदी (दर्यावर्दी) भंडारी नावानें प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांतील विजयदुर्ग येथील जावकर घराण्याच्या मूळ पुरूषास, त्यानें जावा बेटांत कित्येक सफरी केल्या व तेथें जमीनजुमलाहि संपादिला होता म्हणून 'जावकर' म्हणूं लागले असें सांगतात. तेराव्या शतकांतदेखील. पश्चिमकिना-यावर भंडारी लोक समुद्रावर चांचेगिरी करून परकीय व्यापा-यांनां मनस्वी त्रास देत होते. पोर्तुगीजांनां गोमांतक मिळवून देणारा प्रसिद्ध लुटारू तिमाजी नाईक भंडारी असावा. शिवाजी महाराजानीं आरमार ठेविल्यावर चांचेगिरी करण्याचें सोडून बरेच भंडारी व कोळी लोक महराजांच्या नोकरीस राहिले. शिवाजीचा पहिला समुद्रसेनापति होण्याचा मानहि 'मायनाक' आडनांवाच्या भंडा-यासच मिळाला होता (१६४५ ते १६९०). दर्यासारंग, उदाजी पडवळ व सांवळ्या तांडेल नांवाचे दुसरे समुद्रसेनापतीदेखील भंडारीच होते. आंग्र्याच्या हाताखालील सरदारांत मायाजी भाटकर, इंद्राजी भाटकर, बकाजी नाईक, हरजी भाटकर, सारंग जावकर, तोंडवळकर आणि पांजरी वगैरे भंडारी होते (१६९० ते १७६०). त्याचप्रमाणें धुळपांच्या अधिकाराखालीं दामाजी नाईक कुवेसकर, शिवाजीराव सुर्वे, विठोजी नाईक बांवकर, अनाजी नाईक बोरकर, रायाजी नाईक बोरकर, गणोजी नाईक भाटकर, विठोजी नाईक पनळेकर, गोविंदराम बाबूराव सांळुख्ये व दरजी नाईक पाटील (१७६० ते १७९०) वगैरे सरदार भंडारी ज्ञातीचे होते. करवीर दरबारच्या मालवणच्या सरदारांत दादाजी नाईक तोंडवळकर हे भंडारी सरदार प्रमुख होते (१७८१ ते १७८२). मराठ्यांच्या आरमाराखेरीज पोर्तुगीज, इंग्रज, शिद्दी व सावंत यांच्या आरमारावरसुद्धां भंडारी लोक असत. बापूजी नाईक तोंडवळकर हे सावंतवाडीचे समुद्रसेनापति होते. इ. स. १७३० मध्यें इंग्रजांचा सावंतवाडीकरांशीं तह झाला त्यावेळीं सावंतवाडीकरांतर्फें बापुजी नाईकानें तहावर सही केली होती. तारवें, मचवे चालविण्याचा धंदा दिवसेंदिवस बिनकिफायतशीर होत जाऊन त्यांतच अन्नव्यवहाराच्या बाबतींत जात्यभिमान आड येत असल्यामुळें भंडारी लोकांनां निरूपायानें हा धंदा सोडणें भाग पडलें आणि कोंकणांत दुसरा कसलाच व्यवसाय न मिळाल्यामुळें कांहीं दर्यावर्दी भंडा-यांनीं इ. सनाच्या १७ व्या शतकांत किना-यावरील ताडमाडांचा रस काढण्याचा व्यवसाय प्रथम पत्करला. कारण समुद्र खवळलेला असतांहि डोलकाठीवर चढून शीड सोडण्याचा सराव त्यांनां पूर्वींपासून असल्यामुळें ताडमाडांवर शेवटपर्यंत चढून जाणें त्यांनां साध्य होतें. ताडमाडांच्या रसापासून गूळ तयार करण्याचा धंदा पूर्वीं कोंकणांत होता. आजच्याप्रमाणें तो रस पिण्याकडे किंवा त्याच्यापासून दारू तयार करण्याकडे क्वचितच आणीत असत. हल्लीं या ज्ञातींतील फार तर शेंकडा पांचच लोक ताडीमाडी काढण्याचा व्यवसाय करीत आहेत.
शिवकालीन सैन्यांत सुप्रसिद्ध असलेले हेटकरी भंडारीच होते. हेटकरी पायदळाला शिवालीमहाराज बरेंच महत्त्व देत असत. हे शके १८५० त (सन १६५९) सांवताशीं त्यानें केलेल्या तहांतील पुढील कलमावरून दिसून येतें. ''प्रांत मजकूरचे महाल वगैंरे चालत आहेत, आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजुर पावता करावा. निम्मे राहील त्यांत तीन हजार पायदळ लोक हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळीं हुजुर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी.'' बाजी देशपांड्याच्या हाताखालीं हेटक-यांनीं पुरंदर किल्ला कोणत्या प्रकारें झुंजविला; त्याचप्रमाणें वसईच्या घनघोर युद्धांत त्यानें बजाविलेली दिव्य कामगिरी प्रसिद्धच आहे.
आज वसईच्या किल्याशेजारीं जी हेटकरी आळी वसलेली दिसते ती त्या त्यावेळीं लढाईवर आलेल्या कांहीं भंडारी वीरांनींच वसविली आहे. जंजिरा किल्यामध्यें एका वर्तुळाकार तलावाकांठीं अर्धचंद्राकृती जुना राजवाडा आहे. ज्या वेळीं नबाबसाहेबांचें त्या वाड्यांत वास्तव्य असें त्यावेळीं ८०० भंडारी लोकांचा पहारा त्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडील अर्ध्या भागांत असे. त्यावरून या वाड्याला राजवाडा अगर महाल असें नांव न पडतां हेटकरी बंगला असें नांव मिळालें आहे. व तें नांव अजून चालू आहे. जंजीरा किल्ल्यांत हेटकरी बंगला कोठें आहे म्हणून विचारल्यास हा वाडा दाखविण्यांत येतो.
भंडारी ज्ञातीचा सामाजिक दर्जा मराठा ज्ञातीच्या बरोबरीचा आहे. कांहीं भंडारी कुटुंबें पितृपक्षाच्या वेळीं एखादें दुसरें मराठा कुटुंब जेवणाकरितां बोलावित असतात, आणि कांहीं मराठा कुटुंबें लग्नप्रसंगीं भंडारी लोकांच्या देवांस ''ओटी नारळ'' वगैरे देतात. वेंगुर्लें तालुक्यांत कुणकेरी येथें असलेलें 'नाईक' घराणें मराठा ज्ञातीचें आहे. याच नाईक घराण्याची शिरोडें येथें असलेली शाखा भंडारी ज्ञातीची आहे. शहापूर येथील 'बरडे' या मराठा घराण्याची, शिरोडें येथें असलेली शाखा देखील भंडारी ज्ञातीची समजतात. असोलीचें 'धुरी' घराणें मूळचें भंडारी आहे. परंतु याच घराण्याची आरोली येथील शाखा मात्र मराठा ज्ञातीची आहे. अशी मुळांत एक असलेली परंतु आज दोन जातींत विभागल्या गेलेंल्या ब-याच घराण्यांची माहिती देतां येईल. सातारा जिल्ह्यांत समर्थ रामदासस्वामींची समाधि असलेल्या परळी उर्फ सज्जनगड किल्ल्यानजीक भोंदवडे गांवीं भंडारी लोकांची वस्ती आहे. त्यांचा शरीरसंबंध तिकडील मराठा समाजांत आजतागायत चालू आहे. या सर्व गोष्टींवरून शंभर सवाशें वर्षांपूर्वीं भंडारी-मराठे एकच असावेत. मात्र गावडे, गाबीत, पुजारी वगैरे इतर जातींप्रमाणें भंडारी लोक आपणांस नुसते मराठे म्हणवीत नाहींत. ते आपणांस 'हेटकरी' किंवा 'हेटकरी मराठे' म्हणवितात. भंडा-यांनां गोत्रें आहेत. परंतु लग्नप्रसंगीं देवकाचें विशेष महत्त्व असतें. मौजीबंधन होत नाहीं. पण हल्लीं कांहीं भंडारी मंडळी नारळीपौर्णिमेस श्रावणी मात्र करतात. ज्यांच्या गळ्यांत जानवें नसतें त्यांनां लग्नप्रसंगीं पुरोहिताकडून तें मिळतें. ळाग्नाचे इतर सर्व विधी क्षत्रिय वर्णाप्रमाणें होतात. लाजाहोम सप्तपदी, शिलारोहण वगैरे विधींस लग्नांत विशेष प्राधान्य असतें. ब्राह्मण, शेणवी व खानदानी मराठे यांचयाखेरीज अन्य जातींच्या हातचें भंडारी लोक खात नाहींत. भंडारी ज्ञातीच्या मालकीचीं कोंकणांत बरींच देवालयें आहेत. प्राचीन देवस्थानाच्या बाबतींत भंडारी लोकांचा मान ठिकठिकाणीं आहे. यांचे कांहीं ठिकाणीं प्रमुख गांवकर म्हणून अग्रमान, तर कांहीं ठिकाणीं मानकरी म्हणून हक्क आहेत. कित्येक ठिकाणीं पुजारी, (वृत्तिक) वगैरे हक्क असतात. जातीचा न्याय वगैरे करणा-या केळवें, तारापूर, मिठगांवणें, आचरें, गोमांतक वगैरे ठिकाणीं गाद्या (न्यायपीठें) आहेत. ज्ञातींत ब-याच शिक्षणसंस्था आहेत त्यांपैकीं भंडारी शिक्षण फंड, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, हेटकरी भंडारी मंडळ, रत्नागिरी विद्यावृद्धि फंड, भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण, या प्रमुख असून त्या सर्वांचा फंड ७०००० हजार रूपयांवर आहे. यांतून तीन ते चार हजारांपर्यंत ज्ञातींतील विद्यार्थ्यांस सालीना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. कित्ते-भंडारी रांजणकर परस्पर साहाय्यकारी पतपेढी, मालवण भंडारी परस्परसाहाय्यकारी पतपेढी, हेटकरी भंडारी परस्पर साहाय्यकारी पतपेढी, शिरसेकर ॠणविमोचन फंड, वेंगुर्लें भंडारी पतपेढी,व कोऑपरेटिव्ह स्टोअर, वेंगुर्लें वगैरेसारख्या ७-८ आर्थिक संस्था देखील या ज्ञातींत विद्यमान आहेत. कोंकणांतील शिक्षणांत मागासलेल्या इतर कोणत्याहि ज्ञातीपेक्षां भंडारी ज्ञातींत शिक्षणाचा प्रसार अधिक झालेंला आहे. मुंबई कायदेकौन्सिलांत अँ. सुर्वे व श्री. भोले हे भंडारी ज्ञातीचे गृहस्थ आहेत. (रा. परशुराम भिकाजी वायंगणकर, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, वगैरेकडून आलेल्या माहितीवरून.)