विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भंडीकुल- भोजराजाच्या सागरताल लेखांत म्हटलें आहे कीं, प्रतिहारी वत्सराजानें भंडीकुलापासून कनोजचें साम्राज्यपद हिसकावून घेतलें. हर्षचरितांत हर्षाचा भंडी नामक एक मामा होता असा एक उल्लेख आहे. वत्सराजानें जेव्हां कनोज जिंकलें तेव्हां इंद्रयुध नांवाचा राजा कनोजच्या गादीवर अधिष्ठित होता. हा इंद्रायुध भंडीकुलांतील होता व हर्षचरितांत उल्लेखिलेला भंडीहि त्याच कुलांतला असावा. हर्षाची आई यशोमती व तिचा भाऊ भंडी हीं मौखरी घराण्याच्या एका उपशाखेंतील एका कुलांतील असावीं. मुख्य मौखरी घराणें कनोजमध्यें राज्य करीत होतें. हर्षाच्या निधनानंतर या उपशाखेंतील कोणीतरी पुरूष कनोजच्या गादीवर बसला असून त्याच्यापासून वर्म घराणें सुरू झालें असावें; त्या वर्माचा पूर्वज भंडी असावा (वैद्य-म. भा; भाग २.)