विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भडोच, जिल्हा-. मुंबई इलाख्यांतील उत्तरविभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ १४६७ चौरस मैल. भडोच हा भृगुकच्छ (भृगूचा प्रदेश) या शब्दाचा अपभ्रंश आहे. हा जिल्हा म्हणजे ५४ मैल लांबीचा, सपाट पण पश्चिमेस खंबायतच्या आखाताच्या किना-याकडे किंचित उतरता होत गेलेला प्रदेश आहे. जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण मर्यादेवरून अनुक्रमें वहाणा-या मही (लांबी ३०० मैल) व कीम (लांबी ७० मैल) या नद्यांच्या दरम्यान धाधर व नर्मदा ह्या नद्या या जिल्ह्यांतून वहाज जाऊन खंबायतच्या आखातास मिळतात. बहुतेक सर्व जिल्ह्यांत चांगली सुपीक व लागवड केलेली अशी काळी जमीन आहे. बाभळीच्या झाडांकरितां राखून ठेवलेल्या १६१ एकर ओसाड जागेशिवाय येथें जंगलें नाहींत. लागवड बरीच झालेली असल्यामुळें डुकरें किंवा लांडगे यांशिवाय दुसरीं रानटीं श्वापदें येथें नाहींत.
गुजराथच्या इतर भागांइतकाच हा जिल्हा निरोगी असून समुद्रापासून दूर असलेल्या भागापेक्षां येथील हवा जास्त आनंददायक आहे. उष्णमान डिसेंबरांत ४६० असून मे मध्यें ११२० पर्यंत असतें. सर्व जिल्ह्यांत वार्षिक पाऊस सरासरी ३५ इंच पडतो.
इतिहासः- एके काळीं भडोच जिल्हा मौर्यांच्या रांज्यांत असून, त्या घराण्यांतील प्रसिद्ध राजा चंद्रगुप्त हा शुक्लतीर्थ येथें रहात होता अशी दंतकथा आहे. मौर्यांच्या मागून साहस किंवा पश्चिम क्षत्रप, गुर्जर व रजपूत राजे होऊन गेल्यावर स. १२९८ त हा प्रदेश मुसुलमानांच्या हातांत गेला. पुढें सुमारें पांच शतकें मुसुलमानी अंमल चालू होता. १७ व्या शतकाच्या अखेरीस मराठ्यांनीं भडोचवर दोन वेळां हल्ले केले. स. १७७२ त भडोचच्या नबाबावर स्वारी करूंन इंग्रजांनीं भडोच शहर व १८३ गांवें काबीज केलीं; १७८३ त सालबाईच्या तहानें इंग्रजांनीं भडोचमधील सर्व मुलूख मराठ्यांकडे (कांहीं शिंद्यानां व दुसरा पेशव्यांनां ) दिला होता; पण एकोणीस वर्षांनंतर वसईच्या तहान्वयें इंग्रजांनीं शिंद्याच्या मुलुखावर स्वारी करूंन भडोच शहर पुन्हां काबीज केलें; व १८१८ सालच्या पुण्याच्या तहानें ह्या जिल्ह्यांत तीन तालुक्यांची भर पडली. यानंतरच्या इतिहासांतील मुख्य गोष्टी म्हटल्या म्हणजे कोळी लोकांचें बंड (१८२३), पारशी व मुसुलमान यांच्यामधील दंगा (१८५७), व ततओर लोकांचें बंड या होत.
जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) ३०७७४५. शें. ९३ लोक गुजराथी भाषा बोलतात. शें. ६० शेतकीवर व शें. १६ उद्योग ध्ंद्यावर पोट भरतात.
काळ्या जमिनींत कापूस, ज्वारी, तीळ, तूर, गहूं व तांदूळ आणि हलक्या जमिनींत बाजरी, ज्वारी, कडधान्यें हीं पिकें होतात. नर्मदेकांठीं गाळ सांचून झालेल्या जमिनींत तंबाखू तयार होते. रेशमी व सुती कापडाविषयीं भडोचची पूर्वीं ख्याति होती; पण यंत्राच्या साहाय्यानें कापड निघूं लागल्यापासून हातमागावर कापड विणणारांची संख्या फार कमी झाली आहे. भडोच येथें सूत काढण्याच्या व कापड विणण्याच्या गिरण्या आहेत. आमोद येथें सु-या व हत्यारें होतात. बाह्य दळणवळण, अंकलेश्वर आणि भडोच तालुक्यांतून जाणा-या बाँबे-बरोडा व सेंट्रल इंडिया रेल्वेच्या योगानें होतें. राजपुताना माळवा रेल्वेची एक शाखा अंकलेश्वरापासून नांदोडपर्यंत गेलेंली आहे. काठेवाडांतील लोकांनां येथें जलमार्गानेंहि येतां येतें. साक्षरतेच्या बाबतींत मुंबई इलाख्याच्या २४ जिल्ह्यांमध्यें भडोचचा पहिला नंबर लागतो. शें. २८.३ लोकांनां लिहितां वाचतां येतें.
शहर.- जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें गांव नर्मदेच्या मुखापासून तीस मैलांवर तिच्या उजव्या तीरावर असून बाँबे बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वेचें स्टेशन आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या ४२८९६ होती.
टॉलेमीनें याचें वर्णन दिले आहे. पेरिप्लुसमध्यें, भडोच बंदरांत (बार्यगाझा) बाहेरून येणा-या मालांत मध, पितळ, कथील, शिसें, पोंवळीं, अशुद्ध सोनें, विविध कापड, चिटें, डिंक, सोन्यारूप्याचीं नाणीं, मलमें, सुगंधि द्रव्यें व राजे लोकांच्या उपयोगांचीं निरनिराळीं वाद्यें आणि त्यांच्या जनानखान्यासाठीं तरूण यवनी कन्या व उंची वस्त्रें यांचा निर्देश केलेला असून, बाहेर जाणा-या मालांत हस्तिदंत, मातीचीं भांडी, कापूस, रेशीम, मिरची इत्यादि पदार्थ सांगितले आहेत. हें वर्णन इ. स. २०० च्या सुमाराचें आहे. आठव्या शतकांतील अरब लोकांनीं केलेल्या वर्णनाशीं हें ताडून पाहतां असें दिसतें कीं, त्यावेळीं काठेवाडांत व गुजराथेंत सोन्यारूप्याच्या खाणींचें काम चालत असे. तथापि मुबलक सोनें व रूपें देशांत पैदा होत असूनहि उत्तम सोन्याचीं नाणीं कशीं पाडावीं हें तेथील लोकांस चांगलेसें माहीत नव्हतें. भडोच येथील भाल्यांचे दांडे बाहेर ठिकाणीं फार खपत. महाभारतकालापासून प्रसिद्ध असलेलीं भडोचचीं कापसाचीं वस्त्रें व कापूस हीं अद्यापि तशींच असून त्यांचीहि बाहेरदेशीं रवानगी होत असे.
ह्युएनत्संगाच्या वेळीं भरूकच्छ (वराहमिहिरानें हेंच नांव दिलें आहे) प्रांताचा घेर ४०० मैल असून राजधानी भडोचच होती. जुन्नर, नाशिक, जुनागड येथील शिलालेखांतून जरी भरूकच्छ नांव येतें तरी भागवतादि पुराण ग्रंथांत भृगुकच्छ नांव येतें. बृहत्संहितेंत याचा उल्लेख आहे (१४.१६). भडोच येथें एक राजवंश इ. स. ४३० ते ८०० पर्यंत राज्य करीत होता. त्यांतील सर्व राजांची माहिती आढळ नाहीं. हे चेदी शक वापरीत. यांचें राज्य मही आणि अंबिका या नद्यांच्या मध्यें होतें. हे स्वतंत्र राजे कधींच नसत. ते कोणाचे तरी मांडलिक असत. या कुलांतील पहिला पुरूष दद्द नांवाचा होता, त्याचा पुत्र जयभट उर्फ वीतराग यानें गुजराथ-काठेवाडांत आपला राज्यविस्तार केला. त्याचा पुत्र दुसरा दद्द उर्फ प्रशांतराग; यानें धार्मिक मठ पुष्कळ स्थापिले. या घराण्यांत दद्द व जयभट या नांवांखेरीज दुसरीं नांवें आढळत नाहींत. एका दद्दानें नागराजास जिंकलें होतें व माळव्यावरहि स्वारी केलीं होती. चवथा दद्द हा सूर्यभक्त असून त्यानें वल्लभीच्या दुस-या ध्रुवसेनाला श्रीहर्षविरूद्ध मदत केली होती. भडोच येथें याच्या दरबारीं ध्रुवसेन हा कांहीं दिवस राहिला होता. या ध्रुवसेनाच्या मुलानें भडोचवर स्वारी केली. या सुमारास (६४२-४३) बदामीच्या चालुक्यांनीं भडोचच्या राज्याचा बराचसा दक्षिण भाग काबीज केला होता. पांचव्या दद्दानें वल्लभीकर व बदामीकर राजांवर स्वारी करून आपला प्रांत परत मिळविला. चवथा जयभट हाहि शूर होता. याच्याच वेळीं अरबांनीं अर्धीं गुजराथ हस्तगत केली. पुढें (८००) तिसरा गोविंद राष्ट्रकूट यानें हें भडोचचें राज्य बुडविलें व तें त्यानें आपला भाऊ इंद्र यास दिलें. (कनिंगहॅम-ए. इंडिया; दीक्षित- भा. प्राचीन भू.; वैद्य-म. भा.१; बृ. संहिता; आर्कि. सर्व्हे. पु. ४; इंडि. अँटि. पु. ७, १२, अंक २१०; वि. ज्ञा. वि. १८८८, मार्च-एप्रिल.)
अनहिलवाडच्या -हासानंतर (१३००) हें शहर पुष्कळांच्या हातून गेलें; परंतु स. १५३४ ते ३६ हीं दोन वर्षें सोडून (कारण त्या वर्षीं हुमायूनचा अंमल होता) स. १३९१ ते १५७२ पर्यंत भडोच शहर अहमदाबादच्या मुसुलमान राजांच्या ताब्यांत होतें.
१५३६ व १५४६ या वर्षीं पोर्तुगीज लोकांनीं हें शहर लुटलें. स. १५७३ त अहमदाबादचा शेवटला राजा, तिसरा मुझफरशहा यानें भडोच शहर अकबराच्या हवालीं केलें. दहा वर्षांनंतर मुझफरशहानें हें शहर पुन्हां घेतलें होतें, पण थोड्याच महिन्यांत तें दिल्लीच्या बादशहांच्या हातीं गेलें. स. १६१६ त ब्रिटिश व १६२० त डच वखारी येथें घालण्यांत आल्या. स. १६६० त औरंगझेबाच्या हुकुमानें शहराची तटबंदी जमीनदोस्त करण्यांत आली. व १६७५ आणि १६८६ त मराठ्यांनीं हें शहर लुटून नेलें दुस-या हल्ल्यानंतर औरंगझेबानें पुन्हां तट बांधण्याचा हुकूम देऊन शहराचें नांव सुखाबाद असें ठेविलें. स. १७७१ त इंग्रजांनीं भडोच घेण्याचा प्रयत्न केला पण तो फसला; पण स. १७७२ च्या नोव्हेंबरांत त्यांनीं पुन्हां सैन्य पाठवून शहर हस्तगत केलें. स. १७८३ त हें शहर शिंद्याकडे देण्यांत आलें होतें. पण स. १८०३ त तें पुन्हां ब्रिटिशांनीं घेतलें. या शहरांत एक हायस्कूल, कांहीं दुय्यम शाळा व प्राथमिक शाळा आहेत. येथील म्युनिसिपालिटी १८५२ सालीं स्थापन झाली.
भडोच हें पश्चिम हिंदुस्थानांतील जुन्या बंदरांपैकीं एक आहे. १८ व्या शतकापूर्वीं पश्चिम आशियाच्या बंदराशीं होणा-या व्यापाराचें हें मुख्य ठिकाण होतें. हल्लीं हा सर्व व्यापार मुंबईहून होतो; व भडोचचा व्यापार फक्त दक्षिणेस मुंबई व उत्तरेस मांडवी बंदरापर्यंत चालतो. मोहाचीं फुलें , गहूं व कापूस हे निर्गत व काकवी, तांदूळ, सुपारी, इमारती लांकूड, दगडी कोळसा, लोखंड, व नारळ हे आयात जिन्नस आहेत. पश्चिमेस व उत्तरेस धान्य, सरकी, मोहाचीं फुलें, कौलें, व जळाऊ लांकूड हे जिन्नस जातात, व तिकडून इमारतीकरितां दगड येथें येतो.