विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भद्रेश्वर- बंगाल, हुगळी जिल्ह्याच्या श्रीरामपूर पोटविभागांतील एक गांव. हें हुगळी नदीच्या तीरानजिक वसलें आहे. लोकसंख्या (१९११) २४३५३. हें गांव या जिल्हृयांतील सर्वांत मोठें तांदूळ विकण्याचें ठिकाण आहे. या गावांत तागाच्या गिरण्या आहेत.
(२) किंवा भद्रावती. हें खेडेंगांव मुंबई इलाख्यांत कच्छच्या आग्नेय दिशेकडे आहे. पुरातनकाळीं भद्रावती हें गांव फार मोठें शहर होतें. यांत जैन लोकांचें एक देवालय व एक महादेवाचें देवालय अशीं दोन देवालयें पाहण्यासारखीं आहेत. या देवालयांचें महत्त्व १२ व्या व तेराव्या शतकांत होतें; पुढें १७ व्या शतकांत मुसुलमान लोकांनीं हें गांव लुटून फस्त केलें व सर्व मूर्ती फोडून टाकल्या.