विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भमो, जिल्हा.- यास ब्रह्मी भाषेंत ''बमो'' असें म्हणतात. हा जिल्हा चीनच्या सरहद्दीस लागून आहे. या जिल्ह्यांतून इरावती नदी वाहात जाते. तिला उजव्या व डाव्या बाजूनें पुष्कळ प्रवाह मिळाले आहेत. या जिल्ह्यांतील ब-याचशा भागावर इरावती नदीच्या गाळाचा थर बसलेला आहे. येथील खडकांत अग्निजन्य खडकांचें प्रमाण बरेंच आहे. येथील वनस्पतींविषयीं व भूगर्भाविषयीं नक्की शास्त्रोक्त माहिती मिळवलेली नाहीं. येथील जंगलांत बांबू व वेत फार आहेत. गवत फार उंच वाढलेलें असतें. हत्ती, वाघ, सांबर हीं जगलांत आणि डुकरें, हरिण व चित्ता हीं सर्वत्र आढळतात. उष्ण्मान ६० ते ८७ च्या दरम्यान असतें. पाऊस सुमारें ७२ इंच पडतो.
इतिहासः- वमो हा मूळचा शान शब्द आहे त्याचा अर्थ त्या भाषेंत ''कुंभाराचें अथवा मातीच्या भांड्यांचें खेडें'' असा होतो. भमोच्या प्राचीन इतिहासांत दंतकथांचा बराच भाग असल्यामुळें खरा इतिहास कळत नाहीं. पूर्वीं हा प्रदेश शान राज्यांत मोडत असे व सध्याच्या या जिल्ह्याच्या सीमा व पूर्वींच्या शान राज्याच्या सीमा जवळ जवळ एकच आहेत. पूर्वीं याची राजधानी संपेनगो येथें होती. तिचे अवशेष अजून भमो गांवच्या उत्तरेस नजरेस पडतात. १६ व्या शतकांत हा मुलुख ब्रह्मी लोकांनीं जिंकून आपल्या ताब्यांत घेतला, पण त्यांची सत्ता येथें नीटपणें स्थापन झाली नव्हती. १८६९ साली येथें इंग्रजसरकारनें आपला रेसिडेंट नेमिला. १८७५ सालीं चीन लोकांची सत्ता यथें पुन्हां स्थापन झाली. १८७५ सालच्या डिसेंबर महिन्यांत इंग्रजांनीं हा जिल्हा आपल्या ताब्यांत घेतला, पण काचीन लोकांचे दंगेधोपे येथें १८८६ सालापासून तों १८९५ सालपर्यंत मधून मधून चालू होते. १८९५ पासून मात्र शंतता नांदूं लागली आहे.
पुराणवस्तुः- तापिंग व इरावती या दोन नद्यांमध्यें जो भाग आहे, त्यांत जुन्या राजधानीचे अवशेष दृष्टीस पडतात. तसेंच या जुन्या राजधानीच्या श्वेकिना गांवीं एक सुंदर देवालय आहे. तें अशोकाच्या वेळचें आहे असें म्हणतात. अशाच प्रकारचीं देवालयें भमोच्या जवळपास आहेत. श्वेगूच्या वरच्या बाजूस इरावती नदीत एक बेट आहे, ते देवळांनीं गजबजलेलें आहे. तेथें एक बुद्धची मूर्ति असून तिची लांबी ६० फूट आहे.
भमो जिल्ह्याची लोकसंख्या १९२१ सालीं ११२९६० होती. भमो हें या जिल्ह्यांत एकच गांव आहे. सखल प्रदेशांत वस्ती दाट आहे. येथील लोक बौद्धधर्माचे अनुयायी आहेत, तरी पण वन्य लोक बरेच आहेत. या जिल्ह्यांत शान, ब्रह्मी, व काचीन भाषा प्रचलित आहेत. शें. ६८ लोक शेतीवर उपजीविका करून राहतात. शेती फक्त नद्यांच्या कांठीं होते. डोंगराळ भागांत काचीन लोक आपल्या शेतीच्या जमिनी वारंवार बदलतात.
येथील जंगल फार मोठें आहे. इरावती नदींत सोनें सांपडतें. घरगुती उपयोगासाठीं येथें कांहीं कापड व रूप्याचें व लोखंडाचें सामान तयार करतात. याखेरीज येथें उद्योगधंदे नाहींत. ब्रह्मदेशाचा चीन देशाशीं जो व्यापार चालतो त्या सर्वांचें केंद्रस्थान भमो आहे. चीन देशांतून कच्चें रेशीम, हरताळ, तट्टें, गाढवें व इतर जनावरें, कातडीं येतात. व सूत, विलायती कापड, कापूस हा माल बाहेर जातो. याशिवाय उत्तरेच्या शान संस्थानाशीं व काचीन लोकांच्या मुलुखाशीं बराच व्यापार चालतो साक्षरतेचें प्रमाण पुरूषांत शें. १२ व बायकांत शें. २॥ आहे. मिशनरी लोकांनीं येथें पुष्कळ शाळा घातल्या आहेत.
पो ट वि भा ग.- याची लोकसंख्या सुमारें ५७५७२ असून क्षेत्रफळ १७२३ चौरस मैल आहे यांत ५९८ खेडीं आहेत. याचा बहुतेक भाग जंगलमय आहे. शेती फक्त नदीकाठीं होते. जमीनमहसूल व इतर वसूल मिळून ८६००० रूपये उत्पन्न आहे.
गांव- हें इरावतीच्या डाव्या तीरावर वसलेलें आहे. याच्या पिछाडीस डोंगर व नाले असल्यामुळें याची वस्ती नदीकांठानें ४ मैल पसरली आहे. हें त्या जिल्ह्याचें मुख्य गांव असल्यामुळें येथें बहुतेक सर्व खात्यांच्या मुख्य कचे-या आहेत. येथें १८८८ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. लोकसंख्या सुमारें दहा हजार. यांत सुमारें दोन हजार हिंदु लोकांचा समावेश होतो. येथील रहिवाशी तांदुळाचा किरकोळ व्यापार करतात. हें गांव चीन देशाशीं चालणा-या व्यापाराचें केंद्रस्थान आहे.