विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भरतकाम- कापडावर नक्षी-कशिदा काढण्याच्या कलेला किंवा कांहीं आकृती काढून त्या दो-यांनीं किंवा तारांनीं भरण्याच्या कामाला (उदा० जीगचें काम) भरतकाम म्हणतां येईल. हीं कला शिवण्याच्या कलेइतकीच प्राचीन आहे. वैदिक वाङ्मयांत कशिदा काढलेलें वस्त्र या अर्थीं 'पेशस्' हा शब्द येतो (ॠ. २. ३, ६; ४. ३६, ७; ७. ३४, ११; ४२, १. वाज. सं. १९. ८२; ८९; २०. ४०. ऐत. ब्रा. ३. १० इत्यादि ). पेशस् शब्दाचा अर्थ निरनिराळे टीकाकार निरनिराळा करतात; पण मॅकडोनल्ड आणि कीथ यांच्या मतें नर्तकी वापरीत असलेलें कशिद्याचें वस्त्र असाच या शब्दाचा अर्थ होतो. मेग्यास्थेनीस आणि एरियन यांनीं सुद्धां भारतीयांनां अशा वस्त्रांची आवड असल्याचें नमूद केलेलें आहे. अशीं भरतकाम केलेलीं वस्त्रें तयार करण्याचा वैदिक काळीं बायकांचा एक उघड धंदाच होता असें 'पेशस्-कारी' (कशिदा काढणारी) या यजुर्वेदांतील पुरूषमेधाच्या बलींच्या यादींत आढळणा-या नांवावरून सिद्ध हाते (वेदिक इंडेक्स, २, पृ. २२.). आजसुद्धां काश्मीरच्या वेलबुट्टीच्या शाली फार प्रख्यात आहेत. या शाली काढण्याला सुरवात फार प्राचीन काळीं झालेली आहे. भरतकामाचे उत्कृष्ट नमुने हिंदुस्थानांत सर्वत्र आढळतात.
चीन देश हा रेशमी किड्यांचा मायदेश असल्यानें त्या ठिकाणीं विणकला फार पूर्वीं प्रगत झालीं असणें स्वाभाविक आहे. त्या ठिकाणीं सर्वसाधारणपणें रेशमी भुईवर रेशमीच वेलबुट्टी काढतात. अंगावर घेण्याचीं वस्त्रें, रूमाल, पडदे, निशाणें वगैरे जिन्नसांवर कशिदा असतो. मनुष्याच्या दर्ज्याप्रमाणें त्याच्या झग्यावरील कशिदा असतो. नैसर्गिक देखावे, हवेल्या, राक्षस, सर्प, पक्षी, प्राणी, लाक्षणिक चिन्हें व विशेषतः फुलें हे भरतकामाचे विषय म्हणतां येतील. जपानी कशिदा वरील चिनी कशिद्याप्रमाणेंच असतो. फरक इतकाच कीं, जपानी भरतकाम विशेष चित्रमय व विलक्षण काल्पनिक असून त्याची वीण सैल असते. पुष्कळ वेळां कशिद्यावरून रंगाचा कुंचलाहि फिरवितात. नैसर्गिक देखावे जास्त काळजीपूर्वक व खुलवून काढण्याची पद्धत जपानांत उघड दिसून येते. देवळांतील मोठ्या पडद्यावर विशेष मेहनतीनें कशिदा काढलेला असतो.
सुसा येथें पहिल्या डारायस (ख्रि. पू. ५२१-४८५) याच्या राजवाड्याचे जे अवशेष सांपडले आहेत त्यांवरून प्राचीन इराणी लोकांच्या विणकलेची कांहीं कल्पना येईल. आजहि इराणांत प्रार्थनेच्या किंवा स्नानाच्या वेळच्या गालिच्यांवरून फारकरून उत्कृष्ट कशिदा काढलेला दिसतो त्याचप्रमाणें उपवस्त्रें, पडदे, टेबलावरील वस्त्रें, दरवाजांतील पडदे हेहि नक्षीदार असतांत. ही नक्षी विशेषतः फुलवेलांची असतें. कधी कधीं शिकारीचे देखावेहि भरलेले आढळतात. केरमनच्या कशिद्याच्या शाली प्रख्यात आहेतच. रेश्त, इस्पाहान यासारख्या ठिकाणीं उत्तम नक्षीचे रूमाल व पडदे होतात.
तुर्कस्तानांत, विशेषतः बुखा-यास प्राचीन काळापासून अत्युत्कृष्ट भरतकाम होत आलेलें आहे. कांहीं कशिदा उठावदार फुलबुट्टीचा, तर कांहीं आंकड्याप्रमाणें किंवा करवतीच्या दांत्यांप्रमाणें रेखांकित असतो. या कशिद्याला बहुधां भडक रंगाचें रेशीम वापरतात. सुती भुईवर बहुतेक तांबडी नक्षी दिसून येते. उत्तर आफ्रिकेंत मोरोक्को व अल्जेरिया हे देश या कामीं नांव घेण्यासारखे आहेत. मोरोक्कोचा कशिदा बहुधां भूमितींतील आकृतीचा तर अल्जेरियाचा फुलबुट्टीचा असतो. प्राचीन ईजिप्तमधील कशिद्याचें नमुने उपलब्ध आहेत. १९०३ सालीं थेबेस येथें चवथ्या तेथमॉसिस (ख्रि. पू. १५ वें शतक) याच्या थडग्यांत जो भरतकामाचा नमुना आढळला आहे तो अतिशय महत्त्वाचा व सर्वांत जुना असा आहे (तो सध्यां केरोम्युझियममध्यें आहे.). हा सर्व सुती असून, निळ्या, तांबड्या, हिरव्या व काळ्या रंगांचा त्यावर कशिदा आहे. या नमुन्यांच्या एका तुकड्यावर (एकंदर तीन तुकडे सांपडले आहेत) कमळें व पापीरस पुष्पांची मांडणी केलेली आहे.
भरतकामांत ग्रीक लोक किती पुढारलेले होते याची त्यांच्या अवशिष्ट वाङ्मयावरून कायती कल्पना येते. दर पांच वर्षांनीं अथीना देवतेची मूर्ति झांकण्याकरितां जें 'पेप्लॉस' वस्त्र तयार करीत असत त्यावर देवदानवांमधील लढायांचीं चित्रें काढलेलीं असत. व हीं चित्रें बहुतेक कशिद्याचीं असत असें डॉ. ज एच्. मिडलटन म्हणतो. क्रिमियांतील कांहीं थडग्यांतून ग्रीकांच्या प्राचीन भरतकामाचे अवशेष सांपडले आहेत. प्राचीन रोमन कलेसंबंधीं माहिती प्लिनीनें दिलेली आहे (नॅच. हिस्टरी ८.). पर्ग्याममचा राजा दुसरा अटालस (ख्रिस्वपूर्व १५९-१३८) यानें जीगच्या कलेचें संशोधन केलें व त्याच्या नांवावरून सोन्याची नक्षी (जीग) केलेल्या वस्त्रांनां 'अटालिक' वस्त्रें असें नांव पडलें. प्लिनी अशीहि माहिती देतो कीं बाबिलोन हें भरतकामाचें केंद्रस्थान होतें. रोमन भरतकामाचे प्राचीन नमुने रोमच्या आसपास सांपडत नसून ईजिप्तमध्यें थडग्यांत ममीभोंवतीं गुंडाळलेले आढळतात. माणसांच्या आकृती, प्राणी, पक्षी, भूमितीविषयक नक्षी, भांडीं, फळें, वेली, फुलें इत्यादि वस्तू या रोमन कशिद्यांत अंतर्भूत होत. बायबलमधील प्रसंगहि क्वचित काढलेले आहेत.
जस्टिनियनच्या काळापासून पुढें कांहीं शतकेंपर्यंत यूरोपच्या इतर काळाबरोबर हीहि कला बायझान्टाईन साम्राज्याच्या तडाक्यांत सांपडली. तेथें तिला एक विशिष्ट व प्रगति खुंटविणारें वळण मिळालें. हें वळण स. १२०४ त जेव्हां कॉन्स्टांटिनोपल लॅटिन अमलाखालीं आलें तेव्हांपासून मंदावत चाललें. पण अद्यापहि माऊंट अँथोससारख्या कांहीं भागांत जीव धरून आहे. या बिझान्शियन वळणाचा नमुना म्हणजे रोम येथें सेंटपीटर देवालयांत ठेविलेला तिस-या लिओचा 'डॅल्मॅटिक' अंगरखा होय. यावर पुढील बाजूस जगाचा न्यायाधीश म्हणून ख्रिस्त सिंहासनावर विराजमान झाला आहे व मागें ख्रिस्ताचे रूपांतरप्रसंग काढिले आहेत (काल सुमारें १२ वें शतक).
यूरोपांतील कलांचें केंद्रस्थान हा बिझान्टाईनचा मान यानंतर सिसिलींतील पालेर्मो शहराकडे गेला. सिसिली नॉर्मन राजांच्या अमलाखालीं असतांना या कलेचें वळण बरेचसें पौरस्त्त्य होतें. पण पालेर्मोचें वर्चस्व फार दिवस टिकलें नाहीं. १२ व्या शतकाच्या अखेरीस निरनिराळ्या राष्ट्रांचीं निरनिराळीं वळणें पडत गेलीं. मध्ययुगांत या कलेला बराच जोर चढला व तिचें कार्य विशेषतः धार्मिक होतें.
इंग्लंडमध्यें ही कला फार दिवसांपासूनची असून सर्व दर्जाचे लोक फावल्यावेळीं सुया घेऊन विणीत बसत. इंग्लंडवर नॉर्मन लोकांनीं मिळविलेल्या विजयाचें कथानक एका २३० हून अधिक फूट लांब असलेल्या सुती पडद्यावर लोंकरीच्या निरनिराळ्या रंगांत कशिद्याप्रमाणें काढलेलें आहे. त्याला 'बेयू टॅपेस्ट्रो' म्हणतात (काळ ११ वें शतक). सोनें, चांदी यांसारख्या धातूमध्यें केलेलें जुनें भरतकामहि आढळतें. १३ व्या शतकांतील इंग्लिश कला सर्व पश्चिम यूरोपांत प्रख्यात होती. १४ व्या व १५ व्या शतकांतील देवस्थानविषयक भरतकामाचे नमुने चांगले आढळत असून ट्यूडर राजांच्या कारकीर्दींत बड्या लोकांचे कपडे उत्कृष्ट कशिदा. काढले असत असें निश्चित होतें. सुती कापडावर काळ्या रेशमाचा कशिदा एलिझाबेथच्या वेळीं लोकांच्या आवडीचा होता. त्याला 'कृष्ण कला' (ब्लॅक वर्क) असें नांव होतें. कॅनव्हाससारख्या जाळीदार कापडावर रेशीम व लोंकर भरण्याची कलाहि त्या काळीं लोकप्रिय होती. १७ व्या व १८ व्या शतकांतील भरतकाम पुष्कळ वेळां सदभिरूचीला सोडून असलें तरी कमी दर्जाचें नव्हतें.
इतर सर्व ललितकलांप्रमाणें फ्रान्समध्यें ही कलाहि डौलदार व सुंदर अशीच मूळापासून होती. येथील बहुतेक नक्षी फुलबुट्टीची असून पोषाख, देवस्थानांतील वस्त्रें, पडदे, तसेंच खुर्च्यांच्या गांद्या व पाठी यांवर ती काढलेली दिसे. १५ व्या शतकांत बर्गंडीच्या ड्यूकांच्या कारकीर्दींत नेदर्लंडमध्यें ही कला उत्कर्षास चढली. रंगीत चित्रांवरून हुबेहुब भरतकाम करण्यांत येत असे. नेदर्लंडचें भरतकाम सर्व जगांत अतिशय सुरेख म्हणून प्रख्यात असे. १६ व्या शतकाच्या अखेरीस डच लोकांनीं ईस्ट इंडिज पादाक्रांत केल्यामुळें हॉलंडच्या या कलेवर बराच परिणाम झाल्यावांचून राहिला नाहीं. कारण त्यावेळीं पूर्वेकडून हॉलंडमध्यें भरत कामाच्या जिन्नसा येण्याला सुरवात झाली. इटलींत १४ व्या शतकापर्यंत नांव घेण्यासारखें भरतकाम नव्हतेंच पण त्या शतकांत तें फारच उत्कृष्ट तयार होऊं लागलें.
स्पेनद्वीपकल्पांत ८ व्या शतकापासून १५ व्या शतकाच्या अखेरपर्यंत अरबांचें वर्चस्व असल्यानें त्या कालांतील कलाहि बव्हंशीं अरबी म्हणतां येईल. १५ व्या व १६ व्या शतकांत तीवर इटालियन वर्चस्व दिसूं लागलें. पुढें आशियाखंडांतील पोर्तुगीजांच्या वसाहतीमुळें या कलेला तिकडील पाणी लागलें. भरतखंडामध्यें तयार होणा-या मोठमोठ्या भरतकामाच्या जिन्नसांवर पौरस्त्य फुलबुट्टीमध्यें यूरोपीय व्यक्ती, नावा व लष्करी चिन्हें पाहण्यास मिळूं लागलीं. व याच्या उलट पोर्तुगॉलमध्यें १६ व्या व १७ व्या शतकांत तयार झालेल्या भरतकामांत पौरस्त्य छटा विलसूं लागली.
१२ व्या व १३ व्या शतकांतील जर्मनीचें भरतकाम बिझान्शियम वळणाचें असें. मध्ययुगांतील कामाचा एक नमुना म्हणजे सैल सुती भुईवर पांढ-या सुती दो-यानें विणणें किंवा रफूकाम करणें यासारखें होय. कशिद्याचा विषय समजून सांगण्याकरितां विणलेले लेख ज्यावर आहेत अशी लांबच्यालांब नक्षीचीं गुंडाळी तयार करण्याचें वैशिष्ट्य विशेषेंकरून एकट्या जर्मनींतच आढळून येतें. १५ व्या शतकांत कोलोनच्या आसपासचें भरतकाम विशेष सुंदर होतें. यापुढें जर्मन कशिद्याच्या कामांत उठावदार फुलबुट्टी आढळून येते. मोठीं कशिद्याचीं कामें लोंकरी कापडावर लोंकरीनें तयार केलेलीं आहेत. डेन्मार्क, स्कॅन्डिनेव्हिया, आईसलंड वगैरे उत्तरेकडील राष्ट्रांतील ही कला दक्षिणेकडच्या कलेपेक्षां बरीच अर्वाचीन आहे. (बार्बर-सम ड्राइंग्स ऑफ एन्शंट एम्ब्राइडरी; मिसेस ख्रिस्ती- एम्ब्राइडरी अँड टॅपेस्ट्री वीव्हिंग; केंड्रिक-इंग्लिश एम्ब्राइडरी; लेडी अलफोर्ड-नीडलवर्क अँज आर्ट; कोल-''सम अँस्पेक्ट्स ऑफ एन्शंट अँड मॉडर्न एम्ब्राइडरी; (ज. ओ. सोसायटी ऑफ आर्टस पु. ३).)