विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भरतपूर, संस्थान.- हें राजपुतान्यांतील पूर्वेकडील संस्थान आहे. येथील जमीन नदींतून वाहून आलेल्या गाळाची झाली आहे. येथील प्रदेश बहुतेक सपाट आहे व झाडीहि बरीच आहे. मुख्य नद्या बाणगंगा, गंभीर, काकंद व रूपरेल या होत. पावसाळा संपल्यावर यांचे प्रवाह कोरडे पडतात. बयाना व वेरटेंकड्यांत वाघ व चित्ते आढळतात. पावसाळ्यांतील कांहीं महिने सोडून येथील हवा निरोगी व कोरडी असते. पाऊस २४ इंच पडतो.
इतिहासः- प्राचीन काळीं तोमर वंशाचे रजपूत दिल्लीवर राज्य करीत होते. त्यांच्या ताब्यांत या संस्थानचा उत्तर भाग होता. दक्षिण भागावर जादोन रजपुतांचें राज्य होतें. १२ व्या शतकांत हा प्रदेश महंमद घोरीनें जिंकून घेतला. पुढें ५ शतकें हा मुलूख दिल्लीच्या राजांच्या ताब्यांत होता. मोंगलांच्या वेळीं हा प्रदेश आग्र्याच्या सुभ्यांत मोडत असे. सध्यांचे भरतपूरचे संस्थानिक आपणांस सिमसिनवारच्या जाटांचे वंशज म्हणवितात. या जाटांचा मूळ पुरूष मदनपाल नांवाचा रजपूत होता. मदनपालच्या वंशांत बालचंद नांवाचा एक पुरूष होऊन गेला. त्याला जाट राखेपासून विजय व सिजय नांवाचे दोन मुलगे झाले. यांनां रजपूत जातींत घेईनात तेव्हां त्यांनीं सिनसिनीचे जाट हें नांव धारण केलें. सिनसिनी हें त्यांचें वडिलोपार्जित गांव होतें. हल्लींचे भरतपूरचे संस्थानिक यांचे वंशज होत. औरंगझेब बादशहानें सिनसिनीवर आपली फौज पाठविली.सिनसिनीच्या हल्ल्यांत ब्रिज मारला गेला. या वेळीं या घराण्यांतील एका मनुष्य सिनसिनीपासून १२ मैलांवर असलेल्या थून नांवाच्या गांवीं गेला व तेथें त्यानें ४० खेडीं काबीज केलीं.
पुरामन हा ब्रिजाचा ७ वा मुलगा होता. त्यानें सिनसिनीच्या व थूनच्या जाटांचें धुरीणत्व पत्करिलें व तेथें किल्ले बांधिले. यानें खेमकरण जाटाची मैत्री संपादून इतकी बंडाळी मांडली कीं दिल्लीस येण्याचा रस्ता बंद झाला. १७१४ सालीं फरूकशियर बादशहानें यांची बंडाळी बंद पडून दिल्लीचा रस्ता खुला व्हावा म्हणून यास कांहीं जहांगीर दिली पण देणगीचा कांहींएक उपयोग झाला नाहीं. १७१८ सालीं जयपूरच्या सवाई जयसिंगास या लोकांचें पारिपत्य करण्यासाठीं थून व सिनसिनीवर पाठविण्यांत आलें पण इतक्यांत दिल्लीस सय्यदबंधूंचें प्राबल्य वाढल्यामुळें हें काम अर्धवट राहिलें. याच्या मागून पुरामनचा मुलगा मोखमसिंग हा गादीवर बसला. पण याच्या चुलत भावानें सवाई जयसिंगाच्या मदतीनें मोखमसिंगास पदच्युत केलें व आपण दिगचा राजा हें नांव धारण केलें. वदनसिंगानें आपलें राज्य आपल्या मुलाच्या म्हणजे सुरजगल्लच्या स्वधीन केलें. याच्या कारकीर्दींत जाटांच्या उत्कर्षाची परमावधि झालीं. १७३३ सालीं यानें भरतपूर घेतलें, १७५३ सालीं दिल्ली लुटली व १७६१ सालीं आग्रा व मथुरा प्रांत काबीजं केले. १७६३ सालीं मोंगलांच्या टोळीनें सुरजमल्लास शिकार करतांना ठार केलें.
सुरजचा मुलगा मारेक-यांच्या हातून १७६८ सालीं आग्रा येथें मारला गेला. याच्या मृत्यूपासून जाटांच्या उतरत्या कलेस आरंभ झाला. यांच्या घराण्यांतील पुरूषांत दुही माजली. त्याचा फायदा मराठे व अलवारचा राजा या दोघांनीं घेतला. अलवारच्या उत्तर परगण्यांतून जाट लोकांस हांकलून लावलें. १७७१ सालीं मराठ्यांनीं यमुनेच्या पूर्वेस असलेला जाटांचा मुलुख घेतला. नजीफखानानें सन १७७४ सालीं आग्रा व १७७६ सालीं दिग आपल्या ताब्यांत घेतली. रणजितसिंग १७७६ सालीं जटांचा राजा झाला. या वेळीं जाटांच्या उतरत्या कलेची परमावधी झाली होती. सुरजमल्लाची बायको राणी किशोर ही जिंवत होती. तिच्या विनंतीवरून नजीफखानानें १० जिल्हे परत दिले. शिखांनीं १७८० सालीं भरतपूरचा मुलूख बळकाविला; त्या वेळीं राणी किशोरनें पुन्हां विनंति केली. तेव्हां शिखांनीं भरतपूरचा मुलूख परत दिला.
रणजितसिंगानें शिंद्यांची मैत्री संपादिली म्हणून त्यास ३ जिल्हे बहाल करण्यांत आले. १९ व्या शतकांत मराठे व इंग्रज यांमध्यें झगड्यास सुरवात झाली. त्यांत भरतपूरच्या रणजितसिंग राजानें तह करून इंग्रजांची बाजू घेऊन प्रथम इंग्रजांस मदत केली म्हणून त्यास ५ जिल्हे बक्षीस देण्यांत आले. १८०४ सालीं होळकर व इंग्रज यांमध्यें लढाई सुरू झाली तींत भरतपूरच्या रणजितसिंगानें होळकरास मदत केली. या लढाईंत होळकरांचा व रणजितसिंगाचा पराभव झाला व त्यास दिलेला मुलूख इंग्रजांनीं परत घेतला. या लढाईचा शेवट १८०५ सालीं भरतपूरच्या वेढ्याच्या वेळीं झाला. रणजितसिंग इंग्रजांस शरण गेला. रणजितसिंग १८०५ सालीं मरण पावला. याचे दोन मुलगे अनुक्रमानें रणधीरसिंग (१८०५-२३) व बलदेवसिंग (१८२३ ते २५) त्याच्या पाठीमागून गादीवर बसले. बलदेवसिंग १८२५ सालीं मरण पावला. त्यावेळीं त्याचा मुलगा बलवंतसिंग हा अगदीं लहान होता. त्यास त्याच्या चुलतभावानें कैदेंत टाकून राज्य बळकाविलें व त्यानें आपल्या हक्काचें संरक्षण करण्यासाठीं लढाईची तयारी केली. तेव्हां इंग्रजांनीं १८२६ सालीं २० हजार सैन्यानिशीं भरतपूरास वेढा देऊन त्याचा तट दारूनें उडवून दिला. दुर्जनसिंगास कैद करून अलाहाबादेस ठेविलें. त्यावेळीं भरतपूरच्या खजिन्यांतील ४८१०००० रूपये सैन्यांत वांटून देण्यांत आलें व बलवंतसिंगास गादीवर बसविण्यांत आलें. बलवंतसिंग १८५३ सालीं मरण पावला. त्याच्या मागून त्याचा मुलगा यशवंतसिंग भरतपूरचा महाराजा झाला. यास १८७७ सालीं जी. सी. एस. आय्. ही पदवी मिळाली व १८९० सालीं १९ तोफांच्या सलामीचा मान मिळाला. याच्या कारकीर्दींत या संस्थानांत आगगाडी सुरू करण्यांत आली. याचा नातू किशनसिंग सध्यां भरतपूरच्या गादीवर आहे.
बयाना, कामन व रूपबास हीं प्राचीन प्रेक्षणीय स्थळें संस्थानांत आहेत. संस्थानची लोकसंख्या (१९२१) ४९६४३७. या संस्थानांत ७ मोठीं गांवें आहेत. त्यांपैकीं भरतपूर, दिग व कामन हीं मुख्य होत. एकंदर लोकसंख्येंत शेंकडा ८१ हिंदु आहेत. ब्रिज व मेवाती या दोन भाषा सध्यां चालू आहेत. चांभारकाम, कुंभारकाम, सूत काढणें व विणणें वगैरे उद्योगधंदे आहे. सर्व राजपुतान्यांतील जमिनीपेक्षां येथील जमीन चांगली आहे. शिवाय पाऊसहि येथें बरा पडतो. मुख्य पिकें बाजरी, जोंधळा, हरभरा, गहूं, राब, व थोडा कापूस. दक्षिणेंतील टेंकड्यांत तांबें व लोखंड सांपडतें. येथें जाडें भरडें कापड, बांगड्या, लोखंडाच्या थाळ्या, व मातीचीं भांडीं तयार होतात. हस्तिदंताच्या फण्या अथवा चंदनाच्या चौ-या चांगल्या तयार करतात. निर्गत माल धान्यें, कापूस, तूप, दगड व आयात माल कापड, धातू, तांदूळ, गूळ, मीठ वगैरे आहे. प्रत्येक जिल्ह्यावर एक डेप्युटी कलेक्टर असतो. त्याकडे वसुलांचें काम सोंपविलें असतें. जिल्ह्याच्या न्यायाधिशास नाझीम असें म्हणतात. तहशिलीवर तहशिलदार असतो. तहशिलदारास दिवाणी व फौजदारी अधिकारी दिलेले असतांत. खालसांतील कायदेकानु येथें अमलांत आहेत. उत्पन्न ३२ लाख व खर्च ३१ लाख आहे. येथें खालसांतील नाणीं चालतात. साक्षरतेचें प्रमाण शेंकडा २.८ आहे.
श ह र.- हें शहर राजपुताना-आग्रा या आगगाडीच्या रस्त्यावर आहे. हें आग्र्यापासून ३४ मैलांवर आहे. लोकसंख्या ३४०००. या शहरास १८०५ सालीं इंग्रजांनीं वेढा दिला होता. येथें चौ-या चांगल्या होतात. हें शहर भरत राजानें वसविलें असें म्हणतात. येथें एक हायस्कूल व दवाखाना आहे. येथें म्युनिसिपालिटी असून येथील किल्ला हिंदुस्थानच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे.