विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भरिया- भूमिया. व-हाड-मध्यप्रांतांतील एक जात.हे द्रविड वंशाचे असून यांची संख्या सुमारें ५०००० आहे. हे लोक वैगांचे व मुंडांचे पूर्वींचे जातभाई असावे. त्यांचा आणि गोंडांचा बराच संबंध झालेला असावा, तसेंच कोल, चेरो व सिओरी या जबलपूर उर्फ 'दाहल' देशांतील जातींशीं मूलसंबंध असावा असें दिसतें. १०४० ते १०८० सालापर्यंत दाहल देशाचा राजा राजकर्ण हा भरिया जातीचा होता अशी कथा आहे. यांची जातिव्यवस्था फारच अनियंत्रित आहे. यांच्यांत पोटजाती नाहींत. यांची उत्पत्ति फार मिश्र असावी असें यांच्या सध्याच्या राहणीवरून वाटतें व बहुधां यांच्यांत प्रौढविवाह होतात. यांच्यांत प्रेतें दहन करणें व पुरणें या दोन्ही चाली आहेत. हे लोक जादूवर फार विश्वास ठेवतात. बुरादेव, दूल्हादेव, व करूवा (काळा नाग) यांची पूजा करतात. हे वाघेश्वराचीहि पूजा करतात. हे लोक घोड्यास अपवित्र समजतात. हे शेतांत काम करण्याचा किंवा घरगुती नोकरी करण्याचा धंदा करतात.