विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भर्तृहरि- चिनी प्रवाशी इत्सिंग म्हणतो कीं, भर्तृहरि हा काशिकाकार जयादित्याचा समकालीन असून तो एक सुप्रसिद्ध कवि व व्याकरणपंडित होता. त्याचा मृत्यु इ. स. ६५० च्या सुमारास झाला. हाच भर्तृहरि उज्जनीचा राजा होता कीं काय व विक्रमाचा भाऊ होता कीं नाहीं व वैराग्यादि शतकत्रयाचा कर्ता आहे कीं काय याबद्दल वाद आहे. पातंजलमहाभाष्यावरील वाक्यपदीय टीकाकार जो भर्तृहरि त्याच्याचबद्दलची माहिती इत्सिंग देतो. गणरत्नमहोदधिकार म्हणतो कीं भर्तृहरिमहाभाष्य टीका फक्त तीन पादच आहे, पूर्ण नाहीं. यांत व्याकरणाच्या चंद्रसंप्रदायाचा व बैजी, सौभव, हर्यक्ष या न्यायशास्त्रयांचा उल्लेख आहे. वाक्यपदीय हिचें दुसरें नांव हरिकारिका होय असें कैय्यट म्हणतो. कोलब्रूकच्या मतें हा क्षीरस्वमीचा पुत्र होय. परंतु या क्षीरस्वामीचा (जयापीडाचा गुरू) काल इ. स. ८०३ च्या सुमारास येतो. भट्टीकाव्य, राहट काव्य हींहि याच्या नांवावर मोडतात. र्भृहरीचा व्याकरणगुरू वसुरात नांवाचा होता असें म्हणतात.
कांहींच्या मतें (दंतकथांवरून) भर्तृहरि हा विक्रमसंवत् चालू करणा-या विक्रमादित्याचा वडील भाऊ असून त्याच्या पूर्वीं तो उज्जनीच्या राजा होता (ख्रिस्तपूर्व ५७). भर्तृहरि विद्वान् व योगी होता. याला विक्रमाशिवाय, सुभटवीर्य व मैनावती अशीं भावंडें होतीं. याचा बाप वीरसेन गंधर्व होता. नाथलीलामृतांत, जंबूनगरच्या राजाच्या मुलीचा मुलगा हा भर्तृहरि होता असें म्हणून पुढील माहिती दिली आहे. भर्तृहरीची बायको पद्माक्षी नांवाची तिचा संबंध अश्वशाळेवरील एका अधिका-याशीं होता राजास एका योग्यानें अमृत फळ दिलें, त्यानें तें राणीस दिलें व तिनें आपल्या जारास दिलें, त्यानें तें एका वेश्यास दिलें व तिनें तें पुन्हां राजास दिलें. तेव्हां भर्तृहरिस राणीचें कर्म समजून येऊन, त्यानेंच तें फळ भक्षण केलें व विक्रमास गादीवर बसवून अरण्यवास पत्करला. या प्रसंगाला अनुसरून 'यां चिंतयामि...मांच॥' हा श्लोक आहे. यावेळीं त्यानें वैराग्यशतक केलें; व तत्पूर्वीं शृंगार आणि नीतिशतक हीं रचिलीं. पुढें पद्मक्षीनें अग्निकाष्ठें भक्षण केलीं; एका चर्पटीनाथानें भर्तृहरीस उपदेश केला, व भर्तृहरि हा नवनाथांपैकीं एक नाथ बनला. याच्या एका पिंगळा राणीनें हा मेल्याची खोटी बातमी ऐकतांच प्राण सोडल्याची एक गोष्ट आढळते.
अब्राहाम रॉजर या डच मिशन-यानें लीडन येथें सन १६५१ त याचें एक चरित्र प्रसिद्ध केलें आहे. त्याचा सारांश असा- याच्या बापाचें नांव चंद्रगुप्तनारायण; हा ब्राह्मण असून त्याला चार वर्णांच्या बायका होत्या; त्याला ब्राह्मणीपासून वररूचि, क्षत्रियेपासून विक्रम, वैश्येपासून भट्टी व शूद्रेपासून भर्तृहरि हे पुत्र झाले. भट्टी हा विक्रमाचा मंत्री होता. भर्तृहरि प्रथम फार विषयलंपट असून त्याच्या ३०० बायका होत्या. याच्या बापाला मरणाच्या वेळीं याला पाहून दुःख झालें, त्याबरोबर यानें संन्यास घेतला, त्यामुळें बापाला आनंद होऊन त्यानें याला चिरंजीवित्वाचा वर दिला. (अमेरिकन ओरि. शोसो. जर्नल. पु २५. उत्तरार्ध; बेलवलकर- सिस्टिम्स ऑफ संस्कृत ग्रामर; गणरत्नमहोदधि; कीलहॉर्न-महाभाष्य- प्रस्तावना; अर्वाचीन कोश; मॅक्समुल्लर-इंडिया; इंडि. अँटि. १८७६ पृ.२४५).