विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भवभूति- एक प्रसिद्ध संस्कृत नाटककार. तैत्तिरीय शाखेपैकीं उदुंबर ब्राह्मण जातींत याचा जन्म झाला. याच्या बापाचें नांव नीळकंठ व आईचें नांव जातुकर्णी. याचें मुळचें नांव श्रीकंठ. हा पद्मपूरचा राहणारा होता असें मालतीमाधवावरून समजतें. पद्मपूर हें व-हाडमध्यें असावें असें डॉ. बेलवलकरप्रभृतींचें मत आहे. उज्जयिनी येथें ज्ञाननिधि नांवाच्या गुरूपाशीं त्यानें अनेक शास्त्रांचें अध्ययन केलें. उज्जयिनी येथें असतांना त्याची व तत्कालीन नटांची दोस्ती होती असें महावीरचरित व मालती-माधव यांतील प्रस्तावनेवरून दिसून येतें. अनेक पुराव्यांवरून भवभूति हा सातव्या शतकाच्या उत्तरार्धांत उदयास आला असें सिद्ध झालें आहे. भवभूतीचीं तीन नाटकें उपलब्ध आहेत. याशिवाय त्यानें इतर ग्रंथ लिहिले किंवा नाहीं यासंबंधानें कांहींच निश्चित सांगतां येत नाहीं. हीं तीन नाटकें म्हणजे महावीरचरित, मालती-माधव व उत्तररामचरित हीं होत. महावीर चरितांत रामाच्या पूर्वचरित्राच्या वर्णनापासून तों रावणावधानंतर रामाच्या राज्याभिषेकापर्यंतची कथा आहे. मालती माधवांत एक कपोलकल्पित प्रेमकथा आहे. उत्तररामचरितांत रामाच्या राज्याभिषेकानंतर सीतेचा त्याग व पुनर्मीलनापर्यंतची कथा आली आहे. हीं तिन्हीं नाटकें पूर्वीं धार्मिक उत्सवांच्या प्रसंगीं केलीं जात होतीं असें दिसतें. या तिन्ही नाटकांत बरेंच साम्य आढळून येतें. नाटकांतील नायक हे एकपत्नीरत असतात. अशुद्ध अगर हिणकस प्रेमाचा गंध देखील यांत दिसून येत नाहीं. दयायुक्त शोक (पॅथॉस) हा तिन्ही नाटकांतील प्रधानरस आहे कनिष्ठप्रतीच्या पात्रांच्या तोंडीं शौरसेनी भाषा घातलेली आहे; व ती लांबलचक गद्यांत आहे. कालैक्य, स्थलैक्य यांचा तिन्ही नाटकांत अभाव दिसून येतो. तिन्ही नाटकांत निरनिराळ्या शास्त्रांचे निर्देश केलेले आढळून येतात. महावीरचरितांत राम हा नमुनेदार महावीर दाखविला आहे. त्यांत विशेष लक्ष्यांत ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे रामाचें दैवी स्वरूप वर्णन करण्याचा यांत प्रयत्न करण्यांत आलेला नाहीं ही होय. महावीरचरितांत पात्रांचा स्वभावपरिपोष चांगल्या रीतीनें झालेला आढळून येत नाहीं. त्यांत संयमगुण आढळत नाहीं. नाटकांतील भाषा क्लिष्ट व ओबडघोबड असून, त्यांतील वर्णनेंहि कांहीं स्थळीं लांबलचक व कंटाळवाणीं होतात. मालतीमाधव नाटक महावीरचरितापेक्षां अधिक चांगलें साधलें आहे. तरी त्यांतील कथाभागांत जितका एकसूत्रीपणा असावा तितका आढळून येत नाहीं. तरी पण नाटकांमध्यें निरनिराळे प्रसंग घालण्यांत भवभूतीची कल्पकतां दिसून येते. स्वभावपरिपोषाकडे यांत अधिक लक्ष दिलेलें आढळतें, व त्यांत त्याला यशहि बरेंच आलें आहे. यांतील पाचव्या अंकांतील स्मशानवर्णन, नवव्या अंकांतील वनाचें वर्णन इत्यादि वर्णनें उत्कृष्ट आहेत या नाटकांतील दोष म्हणजे क्लिष्ट भाषा व अतिशयोक्ति होत. उत्तरराम चरति हें पहिल्या दोन्ही नाटकांपेक्षां सरस आहे. यांत भवभूतीनें आपलें नाट्यकौशल्य व्यक्त केलें आहे. तथापि मोठ मोठे समास व लांबलचक वर्णनें यांमुळें सौदर्यहानि बरीच होते. भवभूतीच्या ग्रंथांतील तीन मुख्य दोष म्हणजे क्लिष्ट भाषा, स्वभावचित्र रेखाटतांना आढळणारी अतिशयोक्ति व भावनेची फजील उत्कटता हे होत. पण हे तीन सामान्य दोष सोडून दिल्यास भवभूति हा उच्च दर्जाचा कवि व नाटककार होता असें म्हणतां येतें. मानवी स्वभावाच्या निरनिराळ्या छटा रंगविण्यात त्याचें कौशल्य जागजागीं दिसतें. अलंकार अगर उपमा यांच्या साहाय्यानें एखादी गोष्ट व्यक्त न करतां एज्ञाद्या प्रसंगाचें साधें छायाचित्र देऊन त्यायोगानें प्रेक्षकांचीं मनें आकर्षून घेण्याची कला त्याला उत्तम साधलेली दिसते. तात्पर्य, भवभूति हा कालिदासाच्या खालोखाल उत्कृष्ट प्रकारचा संस्कृत कवि व नाटककार होता यांत शंका नाही.