विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भवानी, तालुका.– मद्रास इलाख्यांतील, कोइमतूर जिल्ह्यांत हा एक तालुका आहे. क्षेत्रफळ ७१५ चौरस मैल. याच्या पूर्वेस व दक्षिणेस कावेरी व भवानी नद्या आहेत. उत्तर व पश्चिम भागीं बार्गूर नांवाच्या टेंकड्या आहेत. हा तालुका आगगाडीच्या रस्त्यापासून दूर आहे. यांत भवानी नांवाचें एकच मोठें गांव व ६२ खेडीं आहेत. लोकसंख्या (१९२१)१८१२१२. या तालुक्याचा अर्धाअधिक भाग जंगलानें व्यापिला आहे. कंबू, चोलम व रोगी हीं मुख्य पिकें होतात. या जिल्ह्यांत कुरूंदाचा दगड सांपडतो.
गांव.- वरील तालुक्याचें हें मुख्य गांव आहे. लोकसंख्या (१९११)८७१६. येथें भवानीचा व कावेरीचा संगम आहे. येथें संगमेश्वराची यात्रा भरते. या संगमास तेथील लोक फार पवित्र मानितात. येथें कापडाचा व जंगलांत उत्पन्न होणा-या पदार्थांचा मोठा व्यापार चालतो. येथें सतरंज्या चांगल्या तयार करतात. येथें एक जुना किल्ला आहे.