विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भागवतधर्म- हिंदुस्थानामध्यें प्राचीन काळापासून ज्या अनेक धार्मिक चळवळी अस्तित्वांत आल्या व त्यांमुळें जे अनेक धार्मिक पंथ व उपपंथ निर्माण झाले त्यांमध्यें भागवतधर्म हा एक महत्त्वाचा धर्मपंथ होय. हा पंथ अस्तित्वांत केव्हां व कां आला यासंबंधीं मतभेद आहेत. तथापि कांहीं झालें तरी ख्रिस्तशिक सुरू होण्यापूर्वीं या पंथाची तत्त्वें हिदुस्थानांत पूर्णपणें रूजलेलीं होतीं यांत शंका नाहीं. हिदुस्थानांतील अगदीं पहिली धार्मिक चळवळ वेदकाळीं झाली असें म्हणावयास हरकत नाहीं. तत्कालीन म्हणजे प्राचीन वैदिक धर्माचें स्वरूप मुख्यत: यज्ञमय म्हणजे कर्मप्रधान होतें. वेदसंहिता व ब्राह्मणें यांच्यामध्यें प्राधान्येंकरून यज्ञयागादि कर्मपर धर्मच प्रतिपादिलेला आहे. या कर्मपर धर्माचें कांहीं काळ स्तोम माजल्यानंतर या कर्मपर धर्माविरूद्ध दुसरी एक धार्मिक चळवळ सुरू झाली केवळ यज्ञयागादि बाह्य साधनांनीं परमेश्वराचें ज्ञान होणें शक्य नाहीं, अशी कल्पना प्रादुर्भूत झालीं व या कल्पनेमधून अखेरीस औपनिषदिक ज्ञानाचा प्रादुर्भाव झाला. परमेश्वराच्या स्वरूपाचें ज्ञान करून घेऊन तदद्वारा परमेश्वरप्राप्ति करून घेतली. पाहिजे असें मत प्रतिपादिलें जाऊ लागलें. उपनिषदांतील या ज्ञानमार्गांतूनच सांख्यांचा पंथ अस्तित्वांत आला. पण याहि पुढें उपनिषदकाळींच, ज्ञानोत्तर कर्मसंन्यास करणें इष्ट अगर ज्ञानोत्तर निष्काम कर्म चालू ठेवणें इष्ट अशा प्रकारचे दोन पक्ष निर्माण झालें होतें असें दिसतें पण उपनिषदांमध्यें वर्णिलेलें परमेश्वरस्वरूप व तें प्राप्त करून घेण्यासाठीं प्रतिपादिलेला ज्ञानमार्ग हीं सर्वसाधारण लोकांना आटोक्याबाहेरचीं होतीं. अर्थात सर्वसाधारण लोकांनां निर्गुण ब्रह्माचें आकलन होणें ही शक्य गोष्ट नव्हती. यासाठीं निर्गुण व अचिंत्य अशा परब्रह्माचें सगुण प्रतीक डोळ्यापुढें ठेवून ब्रह्मोपासना केल्यानें ब्रह्मप्राप्ति होऊं शकते अशा प्रकारची कल्पना छांदोग्यादि उपनिषदांतून प्रकट होऊं लागली व अखेरीस सगुण प्रतीकामधून मानवरूपधारी प्रतीक उपासनेस घेण्यास सुरवात झाल्यानंतर त्यांतून भक्तिमार्ग निघाला (भक्तिमार्ग पहा) या भक्तिमार्गांतूनच भागवतधर्माचा उदय झाला. भागवत धर्माच प्रारंभीचा सविस्तर इतिहास ‘बुद्धोत्तर जग’ विभागांत ( प्र. ६ वें ) दिला आहे तो पहावा.
भागवतधर्माचा उदय औषनिादिक ज्ञानमार्गानंतर व बुद्धधर्माचा उदयापूर्वीं झाला असें म्हणवयास हरकत नाहीं. भागवत हें नांव या नवीन धर्माला मागाहून पडलें आसावें असें वाटतें. त्याच्या पूर्वीं त्याला प्रथमत: एकांतिक, नारायण, पांचरात्र, सात्वत इत्यादि नांवें रूढ होतीं. महाभारताच्या शांतिपर्वाच्या नारायणीय प्रकरणांत एकांतिक धर्माच्या उत्पत्तीची कथा आली आहे. हें नारायणीय आख्यान बुद्धोत्तर जग (पृ. ११४ पासून पुढें) या विभागांत स्वंतत्र दिलें आहे. परब्रह्माचे अवतार जे नर व नारायण नामक दोन ॠषीत्यांनीं हा एकांतिक धर्म मूळारंभीं प्रवृत्त केला असें त्यांत वर्णन असून त्यावरूनच या एकांतिक धर्माला नारायणीय धर्म, असें नांव पडलें. हाच एकांतिक उर्फ नारायणीय धर्म श्रीमदगवद्गीतेंत वर्णिला आहे अशी आख्यायिका आहे. या धर्माचा, ज्या सात्वत ज्ञातींत श्रीकृष्ण जन्मास आले त्या ज्ञातीतं प्रसार झालेला होता व हाच धर्म श्रीकृष्णानीं अर्जुनाला सांगितला अशी पौराणिक कथा आहे. पुढें भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे नरनारायणाचे अवतार होत अशा बुद्धीनें वासुदेव श्रीकृष्णानें सांगितलेल्या या धर्माला भागवत हें नांव पडलें असावें. तात्पर्य, एकांतिक, नारायणीय अगर सात्वत या नावांनें संबोधल्या जाणा-या धर्माला श्रीकृष्णाच्या काळानंतर भागवत हें नांव रूढ झालें. श्रीकृष्णानें या धर्माचा मुख्यात: प्रसार केला व त्यावरून भागवत धर्म हा श्रीकृष्णाच्या काळीं म्हणजे ख्रिस्तपूर्व १४०० वर्षांच्या सुमारास उदयास आला असें म्हणावयास हरकत नाहीं.
पण हल्लींचा भागवतधर्म व मूळचा भागवतधर्म हें अगदीं एक नाहींत. मूळच्या भागवतधर्माचीं मूलभूत तत्त्वें हल्लींच्या भागवतधर्मामध्यें जरी दृष्टीस पडतात तरी मूळच्या भागवतधर्माचें संप्रदायीकरण होतांना त्यावर बरींच संस्करणें घडून आलेलीं दिसतात. श्रीकृष्णानें जो एकांतिक धर्म अर्जुनाल सांगितल्याची कथा आहे त्यांत भागवत संप्रदायांतील व्यूहतत्त्वांचा उल्लेख नाहीं. अशाच प्रकारचे इतरहि फेरफार आढळून येतात.
भागवतधर्माच्या इतिहासाचे स्थूलमानानें चार भाग पडतात पहिल्या भागांत अगर अवस्थेमध्यें भागवतधर्म हा सुटसुटीत एकेश्वरी भक्तीचें प्रतिपादन करणारा होता भागवत धर्मापूर्वीं जे सांख्य, योगप्रभृति ज्ञानाचे अनेक पंथ होते त्यांतील चांगलीं तत्त्वें तेवढीं या धर्मानें आपल्या तत्त्वज्ञानांत समाविष्ट केलीं. सांख्यांच्या नास्तिकवादाचा यानें अंगीकार केला नाहीं, तर प्रथमापासूनच हा पंथ ईश्वरवादी होता. दुस-या अवस्थेंत ब्राह्मणधर्माची व भागवतधर्माची एकवाक्यता झाली. ही एकवाक्यता होतांना परस्परांमध्यें तत्त्वांची देवघेव होणें आवश्यक होतें. व त्याला अनुसरून भागवत धर्मानें आपली एकेश्वरी तत्त्वाची कल्पना अजीबाद सोडून न देतां इतर देव ईश्वराचे अवतार आहेत असें ठरवून अनेकश्वरी मताचा पुरस्कार केला. उलटपक्षीं ब्राह्मण धर्मानें क्षत्रिय विभूतीची देवांमध्यें गणना करण्यास सुरवात केली. अशा रीतीनें भागवतधर्म हा ब्राह्मणधर्माशीं एकवाक्यता करून कित्येक शतकें हिदुस्थानांत प्रसार पावत होता. आठव्या शतकांत शंकराचार्यांनीं अद्वैतमताची स्थापना करून ब्राह्मणधर्मावर व भागवतधर्मावर हल्ले चढविले. त्यामुळें कांहीं काळपर्यंत उतरती कळा लागली. तथापि शंकराचार्यांच्यामागून थोडक्याच काळानंतर पुन्हां भागवतधर्मानें पुनरूज्जीवन केलें. या पुनरूज्जीवित भागवतधर्माचें तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणें होतें या जगाचा उत्पादक परमश्वर एकच असून त्याला भागवत, नारायण अगर वासुदेव अशीं नांवें आहेत. हा अनंत, अविनाशी, अत्युच्च असा आहे. हा प्रकृति अगर अव्यक्तापासून सर्व जग निर्माण करतो. जीवात्मे परमेश्वराचे अंश आहेत. या परपुरूषानेंच ब्रह्मा, शिवा, इत्यादि देव निर्माण केले आहेत. भक्तांचें संरक्षण करण्याकरतां हा अवतार घेतो. अशा अबतारांत राम व कृष्ण हे त्याचे अवतार प्रमुख आहेत वासुदेव, संकर्षण प्रद्युन्न व अनिरूद्ध हे त्याचे चार व्यूह आहेत मोक्ष प्राप्तीचें भक्त हेच केवळ साधन होय. ही भक्ति वासुदेवाची अगर त्याच्या अवतारांचीच केली पाहिजे. निष्काम कर्में केल्यानें चित्तशुद्धि होऊन मनुष्याच्या अंत:करणात भक्तीचा उदय होतो, व त्यायोगाने मोक्षप्राति होत. जीवाचे बद्ध, मुमुक्षु, केवल व मुक्त असे चार प्रकार आहेत. मुक्त जीव हें पार्थिव शरीर टाकून लिंगशरीर धारण करतो. नंतर त्याच्या लिंगशरीराचा नाश होऊन त्याचें परमानुभूतांत रूपांतर होतें. नंतर तो अनुक्रमें अनिरूद्ध, प्रद्युम्न, संकर्षण व शेवटीं वासुदेवामध्यें विलीन होतो. तथापि जीव हा वासुदेव होत नसून त्याची कला या नात्यानें तो वासुदेवाजवळ नित्य रहातो.
या पुनरूज्जीवित भागवतधर्मामध्यें मुख्यत:चार पोटभेद झाले ते म्हणजे: रामानुजाचा श्रीसंप्रदाय, मध्याचार्यांचा ब्रह्मसंप्रदाय, विष्णुस्वामीचा रूद्रसंप्रदाय, निबादित्याचा सनकादिक संप्रदाय होत. हे चोरी संप्रदाय शकराचार्यांच्या मायावादाचें खंडण करणारे आहेत, व या चारी संप्रदायांच्या मतें भगवंत हा सगुण असून जीवात्मे हे त्याचे अंश आहेत. भागवत धर्मामध्यें गुरूला फारच महत्त्व दिलेलें आढळतें. भक्तमालमध्यें या धर्माचे विशेष भक्ति, भक्त, भगवंत व गुरू असे सांगितले आहेत. प्रत्येक भागवतधर्मीयाला गुरूकडून दीक्षा घ्यावी लागते. या दीक्षेचे निरनिराळे मंत्र असून ते दीक्षा घेणा-याला गुप्तपणें सांगण्यांत येतात.
दक्षिणेकडे ज्याप्रमाणें रामानुज, व मध्य यांनीं भागवत धर्माचें पुनरूज्वीवन केलें त्याप्रमाणें रामानंद, कबीर, वल्लम, चैतन्य इत्यादिकांनीं उत्तर हिदुस्थानांत व नामदेव व तुकाराम यांनीं महाराष्ट्रांत भागवतधर्माचा जीर्णोंद्धार केला.
भागवतधर्माच्या उत्तरकालीन इतिहासावर ख्रिस्ती धर्माचा परिणाम झाला आहे असें कांहीं पाश्वात्त्य पंडितांनीं प्रतिपादन केलें आहे. पूर्वीं वेबर नांवाच्या एका विद्वानानें नारायणीयोपाख्यानामध्यें नादर श्वेतद्वीपाद गेल्यानंतर तेथें भगवतांनीं त्याला एकांतिक धर्माचा उपदेश केला अशी जी कथा आहे तीवरून श्वेतद्वीपाहून म्हणजे हिंदुस्थानाबाहेरून म्हणजे ख्रिस्ती धर्मांतून हें भक्तीचें तत्त्व भागवतधर्मांत आलेले आहे असें प्रतिपादन केलें होतें पण हें मत अजीबात खोटें आहे असें सिद्ध करणारा भरपूर पुरावा सापडला आहे. तरी पण मूळ भागवतधर्मावर नाहीं तरी अर्वाचीन भागवतधर्मावर तर ख्रिस्ती धर्माचा परिणाम झाला असावा असें कांहीं पाश्वात्त्य विद्वानांनीं प्रतिपादन करण्यास सुरवात केली आहे. पण यांतहि विशेष तथ्य दिसत नाहीं. त्याचप्रमाणें उत्तर हिदुस्थानांत भागवत धर्माचा प्रसा ज्यावेळीं जोरांत चालू होता त्यावेळीं ब-याचशा मुसुलमानांनीं या भागवत धर्माचा अंगीकर केला व त्यामुळें मुसुलमानांतील शफीपंथाचाहि भागवतधर्मावर परिणाम घडून ओला असावा असेंहि कांहीं विद्वानांचें म्हणणें आहे. यांत थोडेसें तथ्य असणें संभवनीय वाटतें तथापि अद्यापि त्याचा पूर्ण विचार झालेला नसल्यानें त्यासंबंधीं निश्चित सांगतां येणें कठिण आहे.
भागवतधर्मावर अनेक ग्रंथ झाले आहेत. त्यांपैकीं मुख्य ग्रंथ म्हणजे भगवद्गीता, शांतिपर्वांतील नारायणीयोपाख्यान, पंचरात्रसंहिता, सात्वतसंहिता, शांडिल्यसूत्रें, भागवतपुराण, नारदपंचरात्र, नारदसूत्रें, रामानुजाचार्यादिकांचे ग्रंथ हे होत. रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादींनीं जरी भागवत धर्माचें पुनरूज्जीवन केलें तथापि भागवतधर्माचा आपल्या विशिष्टाद्वैती अगर द्वैती संप्रदायाशीं मेळ घालण्याचा त्यांचा सांप्रदायिक आग्रह दिसून येत असल्यामुळें भागवतधर्माचें खरें स्वरूप यात दिसून येत नाहीं. भागवतपुराण रामानुजार्यांच्या बरेंच पूर्वींचें आहे. हा ग्रंथ भागवतधर्मावरील प्रमाणग्रंथ मानला जातो. नरदपंचरात्र हा भागवताहून कमी योग्यतेचा ग्रंथ आहे नारदसूत्रें व शांडिसूत्रें हीं भक्तिपर असून भागवताची भक्तीची कल्पना यांत स्पष्टपणें प्रतिबिंबित होतें. नारायणीयोपाख्यान व भगवदगीता हे भागवतधर्माचे महत्त्वाचे ग्रंथ होत. पण अर्वाचीन भागवतधर्मापेक्षां, मूळ भागवतधर्माची कल्पना काय होती हें समजण्यालाच हे दोन ग्रंथ उपयोगी आहेत. याशिवाय हरिवंश, स्कंदोपनिषद्, हरिलीला, भागवत भावार्थदीपिका इत्यादि ग्रंथहि आहेत.