विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भागवतपुराण– भारतीय पुराणवाड्मयांतील अत्यंत प्रसिद्ध पुराण हें होय. 'भग्वत्' (विष्णु) याच्य भागवतपंथातील जे असंख्य लोक यांच्या आचारविचारांवर आजहि फार परिणाम करणारें असें पुराण हेंच. मुख्य या पुराणाच्या हस्त लिखित व छापील प्रती शेंकडों आहेत आणि शिवाय त्या संबंध पुराणावर टीकाग्रंथ किंवा त्यांतील कांहीं भागावर स्पष्टीकरणार्थ लेख असेहि पुष्कळ आहेत यावरून या भागवतपुराणाचा केवढा मोठा संप्रदाय व लौकिक हिदुस्थानांत आहे याची साक्ष पटते. या महत्त्वामुळेंच यूरोपांतहि प्रथम याच पुराणाचें भाषान्तर होऊन प्रसिद्ध झालें. (पॅरिस १८४०-४७).
यांतील विषयहि पुष्कळसे विष्णुपुराणांतल्यासारखेच आहेत इतकेंच नव्हे तर दोहोंत बरेंच शब्दसाम्य आहे, यावरून नि:संय तें विष्णुपुराणाच्या आधारानें रचिलेलें असावें असें विटरनिट्झ अनुमान करतो.
व्यासकृत अठरा पुराणांतलेंच हें आहे कीं नाहीं, याबद्दल अनेक वेळां संशय व्यक्त झालेला आहे, आणि मुळ अठरा पुरणांपैकीं 'भागवतपुराण’ तें हेंच कीं शैवपंथाचें 'देवीभागवत’ या प्रश्नाचा उहापोह करणारे बरेच निबंध लिहिलेले आढळतात. याच्याबरोबरच दुसरा प्रश्र म्हणजे भागवतपुराणाचा कर्ता वेथ्याकरणी बोपदेव हाच आहे कीं काय? यासंबंधीं कोलब्रुक ननाफ आणि विलसन या विद्वानांनीं असें ठरविलें आहे कीं, बोपदेवच या पुरणाचा कर्ता आणि त्यावरूनच हें पुराण १३ व्या शतकांतील असलें पाहिजे; पण हें मत जरा घाईनें बनविलेलें दिसतें. अलीकडे यासंबंधीं जे अधिक शोध झाले आहेत त्यांवरून बोपदेव हा भागवत पुराणाचा कर्ता नसावा असें बहुतेकांशीं सिद्ध झालें आहे.
का ल नि र्ण य– १२ व्या शतकांतील भागवतपंथाशीं निकट संबंध असलेला रामानुज यानेंहि भागवतपुरणाचा बिलकुल आधार न घेतां फक्त विष्णुपुराणांतीलच उतारे दिले आहेत. यावरून रामानुजानंतर भागवत पुराण झालें असावें असे तर्क कित्येकानीं काढलेले आहेत. अल्बेरूणी नामक प्रवाशानें १०३० सालीं हिंदुस्तानासंबंधीं जो ग्रंथ लिहिला त्यामध्यें त्यानें जी पुराणांची यादी दिली आहे, तींत भागवतपुराणाचें नांव आलें आहे. अर्थात अल्बेरूणीपूर्वीं हें पुराण आस्तत्वांत होतें असें सिद्ध होतें.
यावरून फर्कुहरनें भागवतपुराण हें १० व्या शतकाच्या आंतबाहेर झालें असावें असा निष्कर्ष काढला आहे. पण याच्याहि पुढें जाऊन भागवतादर्शाचे कर्तें श्री. कोल्हटकर यांनीं अनेक प्रमाणें देऊन भागवतपुराण हें इसवी सनाच्या पुर्वीं होतें असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित मूळ भागवतपुराण त्या काळीं अस्तित्वांत असेल तथापि त्यानंतर त्याच्यावर बरींच संस्करणें होऊन आजचें भागवत हें ९-१० व्या शतकांत तयार झालें असल्याचा संभव आहे.
या पुरणांत एकंदर बारा स्कंध आहेत, व सुमारें अठरा हजार श्लोक आहेत. यांतील विश्वोत्पत्तीच्या कथा एकंदरींनें विष्णुपुराणांतल्यासारख्याच आहेत; परंतु कांहीं मनोरंजक भाग जरा निराळा आहे. यांत विष्णूच्या अवतारांचें, विशेषत: वराहअवताराचें सविस्तर वर्णन केलेलें आहे.
संख्याशास्त्रकर्ता कपिल हा विष्णूचा अवतार होय असें या पुरणांत म्हटलें आहे, आणि तिस-या स्कंधाच्या शेवटीं योगावरील एक मोठें निरूपण त्याचें स्वत:चें म्हणून दिलें आहें.
विष्णूमाहात्म्यवर्णनात्मक अशा पुष्कळ कथा यांत सांगितल्या आहेत. त्यांपैकीं ध्रुव, प्र-हाद वगैरेंच्या कथा पूर्वीं विष्णुपुराणांत आलेल्याच आहेत. महाभारताशींहि यांतील ब-याच भागाचें साम्य आहे. आणि भगवद्गीतेंतले कांहीं श्लोकहि जसेच्या तसेच दिलेले आहेत. शांकुतल आख्यानहि फार जुनें थोडक्यांत दिलें आहे. याचा दशमस्कंध फार प्रसिद्ध व फार वाचनांत आहे. त्यांत कृष्णकथा दिली असून हरिवंश व विष्णुपुराण यांतल्यापेक्षां ती येथें फार विस्तारानें वर्णिली आहे. विशेषत: गोपीक्रीडावर्णन यांत फार विस्तृत आहे. हरिवंश आणि विष्णुपुराणांत जरी गोपगोपींच्या सहवासांतलें कृष्णाचें बालपण व तारूण्य वर्णिले आहे तरी तेथें कृष्णाच्या पुढील आयुष्याचें वर्णनहि त्यांत दिलें आहे. पण भागवतांत कृष्णाच्या मोठेपणाची विस्तृत हकीकत आढळून येत नाहीं. राधेचें नांव यांत आढळत नाहीं. तथापि कृष्णाची आवडती अशी या गोपीमधील एक गोपी असल्याचें मात्र यांत वर्णन आढळतें. हिंदुस्थानांतील सर्व भाषांत भागवताचें भाषांतर झालें असून सर्व हिंदु लोकांत तें प्रिय आहे. एकादशस्कंधांत यादवसंहार व कृष्णमृत्यूबद्दल वर्णन आहे; व शेवटल्या स्कंधांत कलियुग व जगाचा लय यांबद्दल ठराविक भविष्य कथन केलें आहे.
भागवताची खरी योग्यता, त्यांत भक्तीचें जें अत्युत्कृष्ट वर्णन आलेलें आहे त्यामुळें आहे. त्यांतील कांहीं कांहीं भाग उत्कृष्ट वाड्मयांत मोडण्याजोगा आहे. भक्तीमार्ग ज्या वेळीं भरभराटींत होता. त्या वेळीं हा ग्रंथ झाला असावा असें दिसतें. विष्णुपुराण अगर हरिवंश यांच्यापेक्षां यामध्यें कृष्ण व गोप गोपी यांमधील शृंगाररसाचें पुष्कळच वर्णन आलें आहे. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुराणाचा कल द्वैतापेक्षां अद्वैताकडेच दिसून येतो ही होय.