विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भागवत, राजाराम (शास्त्री) रामकृष्ण (१८५१ -१९०८)- क-हाडे ब्राह्मण; यांचा जन्म राजापुर तालुक्यांत केळशी गांवीं व शिक्षण मुंबईस झालें; हे १८६७ सालीं प्रवेशपरीक्षा पास झाले नंतर तीन वर्षें मेडिकल कॉलेजांत घालविलीं, पण पुढें तो क्रम सोडुन संस्कृताचा अभ्यास केला; १८७७ सालीं यानीं मनी स्कुलांत शिक्षकांची नोकरी पत्करली, व पुढें सेंटझेवियरमध्यें शास्त्राच्या जागीं यांची नेमणूक झाली. सेंटझेवियरमध्यें कॉलेजांत यांची बढती होऊन तेथें शेवटपर्यंत हे संस्कृतचे प्रोफेसर होते; १८८४ सालीं 'बाँबे हाय स्कुल' नावांची संस्था निघाली, तिच्या संस्थापकांपैकीं हे एक होते;१८८६ सालीं यानीं 'मराठा हायस्कुल' नांवाची एक शाळा काढली व ती थोड्याच वर्षांत लौकिकाला अणिली; शेवटचीं पांचसात वर्षें यांना युनिव्हर्सिर्टींत संस्कृतचे परीक्षक नेमिलें होतें; १९०२ सालीं हे विल्सन फॉयलॉलॉजिकल लेक्चरर होते; हे कट्टे सुधारक व स्पष्टवक्ते होतें; व अपृश्य जातींच्या उन्नतीविषयीं यानां मोठी कळकळ वाटे.
यांचे किरकोळ लेख व ग्रंथ अनेक आहेत. यांच्या विद्वत्तेविषयीं पुष्कळ लोकांची खात्री होती. तथापि यानीं विक्षिप्त म्हणून कीर्ति संपादन केली होती, ती स्वतंत्र विचार, लोकांस अप्रिय अशा मतांचें प्रतिपादन, मतांची चंचलता आणि संशोधनाची अपूर्णता इतक्या गुणसमुच्चायामुळें झाली होती, तथापि यांच्या लेखांत महत्त्वाचा भाग पुष्कळ होता. यांची हिदुस्थानच्या इतिहासासंबंधानें जीं कांहीं मतें होतीं तीं येणें प्रमाणें:-(१) महाराष्ट्रांतील लोकांपैकीं बहुतेक लोक मूळचे येथीलच; उत्तर हिदुस्थानांतून आलेले नव्हेत. महार, कुणबी, मराठे, कोळी, प्रभु, ब्राह्मण, हे एक वंशांतील व एकाच जातीचे लोक होत. (२) महाराष्ट्रांतील दैवतें, चालीरीती हीं मूळचीं स्थानिक होत. यांचेंच संस्कृतकिरण ब्राह्मणांनीं केलें. ३) ब्राह्मण म्हणजे ''ब्रह्म'' नांवाचा पूर्वीं एक देश होता तेथील लोक.(४) वेदांतील, देव, दानव, गंधर्व, आद्रि, पणि, असुर, नाग, हीं सर्व राष्ट्रें होतीं. इंद्र ही ऐतिहासिक व्यक्ति अगर ऐतिहासिक राष्ट्रांतील पदवी होती. ५) म्लेच्छ म्हणजे मोम्लोच, असुर म्हणजे असिरिया देश, तायर ही सुरांची वसाहत, पणी म्हणजे फिनिशियन इत्यादि. यांच्या मतांचें विवेचन निरनिराळ्या विषयांवर लिहितांना आलेंच आहे.