विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भागीरथी– हिमालयांतील गंगेच्या मुख्य उगमास व मुर्शिदाबाद जिल्ह्यांतून जो एक गंगेस फांटा फुटतो त्यास भागिरथी हें नांव दिलें आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यांतून हा फांटा उत्तर अक्षांश २५० ३५’ पूर्व रेखांश ८८०५’ यांवरून निघून वरद्वान व नडिया जिल्ह्यांतून वाहात जाऊन पुढें तो जालंग नदीस मिळतो. यासच पुढें हुगळीं हें नांव दिलें आहे. भगीरथीस हिंदु लोक फार पवित्र मानितात.
भागीरथीचा प्रवाह वरचेवर बदलत गेला आहे. प्राचीन काळी तिच्या कांठीं गौर, पंडुआ, राजमहल व नवद्वीप हीं गांवें होतीं. अगदीं पूर्वींच्या या नदीच्या पात्रास सरस्वती असें म्हणत असत व ती सातगांवांवरून पुढें पश्विमेकडे वाहात गेली होती. १६ व्या शतकांत मोठमोठीं गलबतें या नदींतून चालत असत. पण गाळानें ती बुजल्यामुळें पोर्तुगीज लोकांनीं १६३७ सालीं हुगळीं हें आपलें व्यापाराचें बंदर व ठाणें केलें. भागीरथीचा प्रवाह गाळ सांचून बुजल्यासारखा झाला आहे. सरकारानें गाळ काढून जहाजासाठीं हा प्रवाह खुला करण्यासाठीं पुष्कळ प्रयत्न केले, पण त्यांत फारसें यश आलें नाहीं. आणखी नवीन योजना सुरू आहेत. ह्या नदीच्या कांठचीं मुख्य शहरें मुर्शिदाबाद, जिआगंज, जंगीपूर, बरहामपूर, काटवा व नवद्वीप हीं होत.