विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भाट– ही जात उत्तरहिंदुस्थान, मध्यप्रांत, व-हाड, मुंबई, बंगाल, आसाम इत्यादि ठिकाणीं आढळून येते. १९११ सालीं या जातीची लोकसंख्या ३६४८६२ होती. भाट हा शब्द संस्कृत भट्ट या शब्दापासून झाला असावा असें दिसतें. ब्राह्मण गतभर्तृका व क्षत्रिय यांच्यापासून भाटांची उत्पति झालेली असावी असें कांहींचें म्हणणें आहे, तर वैश्य पुरूष व क्षत्रिय स्त्री यांच्यापासून भाटांची उत्पत्ति झाली असें कांहींचें मत आहे. या लोकांत निरनिराळ्या शाखा असून जानवें घालण्याचाहि प्रघात आहे व या चालीवरून ते मूळचे ब्रह्मण असावेत असें अनुमान करण्याला जागा आहे. आपल्या आश्रयदात्याचें गुणवर्णन करणें, त्याचय वंशाचा इतिहास लिहिणें, ही त्याचीं मुख्य कामें होत.
इ ति हा स.– पूर्वीं प्रत्येक राजाजवळ एकएक तरी भाट असें व त्याचें काम, राजाची व त्याच्या पूर्वजांची स्तुति गाणें, पूर्वजांचे गुणानुवाद गाऊन राजाच्या अंगीं शौर्य, धैर्य व सद्गुण यांचा प्रादुर्भाव व्हावा एतदर्थ प्रयत्न करणें, लढाईच्या वेळीं वीरसपरिप्लुत कवनें म्हणून राजाच्या व त्याच्या सैन्याच्या अंगांत वीरश्री उत्पन्न करणें इत्यादि असे. अशा प्रसंगीं राजाची क्वचित प्रसंगीं त्याच्यावर इतराजी होण्याचा संभव असे पण त्याला ते भीक घालीत नसत. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा प्रमुख सद्गुण अगर दुर्गुण होता; त्यामुळें राजे लोकहि त्यांनां वचकून असत. स्वामिनिष्टा हा गुण त्याच्या अंगीं प्रमुख्यानें वसत असे. विश्रवासूपणा व प्रामाणिकपणा यांबद्दल त्यांची फार प्रसिद्धि असे पूर्वीं राजे लोकांच्या घरचीं बायकामुलें परगावीं न्यावयाचीं असल्यास त्यांनां भाटाबरोबर पाठविण्याची पद्धत असे. मुत्सद्दीपणांतहि भाटांचा उपयोग होत असे. हल्लीं ज्याप्रमाणें प्रत्येक राज दरबारीं वकील ठेवण्याची चाल आहे, त्याचप्रमाणें पूर्वीं भाट हे वकील असत. यामुळें राजदरबारीं भाटांनां फार मान असे. राजानें आपल्या हातानें विडा देणें यासारखा दुसरा मान कोणताच नाहीं असें रजपूत लोक मानीत. हा मान भाटांस मिळत असे. ब्राह्मणाप्रमाणेंच भाटांमध्येंहि उपनयनादि सर्व संस्कार करण्याची पद्धत असे. उत्तरहिंदुस्थानांत अद्याप ती पद्धत आढळते पण दक्षिणेकडे जीं क्षत्रिय घराणीं आलीं त्यांनीं उपनयानादि संस्कारांचा त्याग केल्यामुळें त्यांच्या पदरच्या भाटांनींहि उपनयनादि संस्कार बंद केले. भाटांचीं मुख्या शस्त्रें कट्यार व भाला हीं होत. वयानें लहान असो अगर मोठा असो प्रत्येक भाटाच्या हातांत भाला व कमरेस कट्यार हीं असायचींच. पूर्वीं भाटांनां राजे लोकांकडून मोठमोठ्या देगण्या व इनामें मिळत असत. त्यामुळें त्यांनां प्रापंचिक काळजी करावी लागत नसे. ब्रिटिशांचा अंमल हिंदुस्थानावर झाल्यापासून राजे लोकांप्रमाणेंच भाटांचीहि दुर्दशा झाली. त्यांतल्यात्यांत ज्या भाटांची इनाम जमीन सरकारनें खालसा केली नाहीं त्यांची स्थिति साधारण: बरी आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं परंतु अशीं थोडीथोडकीं भाट घराणीं वगळल्यास इतर भाटांनां भिक्षा मागून अगर अन्य साधनांनीं आपला उदरनिर्वाह चालविणें भाग पडलें आहे.
चातुर्वर्ण्यव्यवस्थेंत भाटांची क्षत्रियांमध्यें गणना होते. त्यांच्या रहाण्याचा ठिकाणांवरून यांचे रजपूत भाट, गुजराथी भाट, मराठे भाट, असे भेद पडले आहेत. ब्रह्मभाट, भारोट, चारण, वहीवंचे, कंकाळी भाट, मारवाडी भाट, गुजराथी भाट परेदशी भाट इत्यादि यांच्या पोटजाती आहेत. पुर्वींच्या काळीं पोवाडे गाणें व वंशावळीं लिहिणें असे यांचे मुख्य धंदे असत. पण हल्लीं त्यांचा तो धंदा लुप्तपाय झाल्यामुळें ते सावकार, व्यापारी, शेतकरी, वगैरे बनलेले आहेत. ब्रिटिश सत्तेच्या प्रारंभीं भाट लोक तहाच्या अटी बजावण्याबद्दल व कर्जाबद्दल जामीन रहात असत, व वचनभंग केल्यास वचनभंग करणा-याकडून ते त्रागा करून वचन पाळावयाला लावीत असत. जमीनमहसूल व शांतता राखण्याच्या कामींही भाट लोक जामीन घेतले जात असत व त्यांच्या संमतीखेरीज कोणताहि व्यवहार कायदेशीर मानला जात नसे. १८०७ सालीं काठेवाडच्या राजापासून ब्रिटिशांनीं भाट लोकच जामीन घेतले होते. गुन्हेगाराला ताळ्यावर आणण्याकरितां भाट लोक दोन प्रकारचे विधी उपयोगांत आणीत असत ते म्हणजे त्रागा व धरणें हे होत.
वर ज्या भाटांच्या पोटजाती सांगितल्या आहेत त्यांच्यांत एकमेकाशीं अन्नव्यवहार होत नाहीं. लग्रव्यवहार स्वाजातीयामध्येंच होतो, पोटजातीशीं होत नाहीं. जातीसंबंधींच्या कोणत्याहि प्रश्नाचा निकाल पंचामार्फत होतो. धार्मिक बाबतींत अखेरचा निकाल ब्राह्मणांकडून करून घेण्यांत येतो. सर्व भाटांची मिळून अशी एखादी पंचायत नाहीं. कांहीं विशेष प्रसंगीं जातीचे पुढारी बहुजनसमाजास एकत्र जमवून त्या ठिकाणीं सामाजिक सुधारणेची चर्चा करतात, व कांहीं नियम करतात. ज्या ठिकाणीं जातींचीं पुष्कळ घरें आहेत त्या ठिकाणीं त्यांच्यापुरती पंचायत असते.
ब्रह्मभाट खेरीजकरून इतर सर्व भाटांत पुनर्विवाहाची चाल आढळते. तथापि कांहीं कुलीन घराणीं पुनर्विवाहाला विरूद्ध असलेलीं आढळतात. पूर्वीं भाटांमध्यें स्त्रियांनां कडक गोषा असे, पण ती पद्धत आतां पुष्कळच शिथिल झाली आहे. गुजराथेंत ब्रह्मभाटांखेरीज इतर सर्व भाट मांस खातात. इतर ठिकाणचे भट शाकाहारी आहेत. वैष्णव, शैव, परिणामी, रामनंदी, कबीरपंथी, स्वामीनारायण इत्यादि यांचे निरनिराळे धार्मिक पंथ आहेत. काठेवाड्यांतील कांहीं भाट जैनधर्मीहि आढळतात. संयुक्तप्रांतांतील हिंदुधर्मीं भाट वैष्णव अगर शांक्तपंथाचे आहेत. तथापि, विष्णु अगर ‘शक्ति’ यांच्या उपासनेप्रमाणेंच, गौरीपति, बोरबीर महावीर शारदा इत्यादि देवातांचीहि उपासना करण्याची त्यांच्यामध्यें चाल आहे. पूर्व बंगालमधील भाट हे शक्तीचे उपासक आहेत. औदीच, मोढ, अगर श्रीमाळी ब्राह्मण यांच्याकडे भाटांचा उपाथ्येपणा असतो. रजपूत अगर गुजराथी भाटांचा दर्जा मराठा भाटांच्या दर्जापेक्षां श्रेष्ठ समजला जातो. नाशिक जिल्ह्यांत या मराठा भाटांनां ग्रामभाट अशी संज्ञा आहे. हे मराठे, भाट, मराठ्यांच्या उत्कर्षाच्या वेळीं इकडे आले असावे. अलीकडे या लोकांनीं आपला परंपरागत धंदा सोडून दिलेला असून ते व्यापारी अगर मजूर बनले आहेत. खानदेशांत या मराठा भाटांचे परदेशी, मराठे व कुणबी असे तीन पोटभेद आहेत. पुणें जिल्ह्यांत गुजराथी व मराठे भाट आढळतात, व यांच्यांत पाट लावण्याची चाल आढळून येते.
वा ड्म य– पूर्वींच्या काळीं भाटांचें काम स्फूर्तिदायक कवनें करणें व आपल्या यजमानाच्या पूर्वजांची वंशावळ लिहिणें हें असल्यामुळें , भाटांचें वाड्मय बरेंच असलें पाहिजे हें उघड आहे. तथापि तें एकत्र करण्याचा प्रयत्न अद्यापि व्यवस्थित त-हेनें झालेला नाहीं. जे कांहीं पद्यग्रंथ उपलब्ध आहेत त्यांच्यावरून पूर्वींच्या इतिहासाची थोडी फार माहिती मिळतें. अशा प्रकारचे ग्रंथ मिळविण्याचा टॉड, फोर्बस इत्यादिकांनीं प्रयत्न करून त्यांच्या आधारें त्यांनीं अनुक्रमें राजस्तानचा इतिहास व रासमाला हे ग्रंथ लिहिले. पूर्वींच्या भाटांपैकीं प्रख्यात भाट म्हणजे पृथ्वीराजाच्या पदरीं असलेला चंदभाट (पहा) होय. याचें 'पृथ्वीराज रासा' हें काव्य असून त्यांत पृथ्वीराजाचें चरित्र आलें आहे चंदाच्या खालोखाल अकबराच्या पदरीं असलेला गंगभाट हा प्रसिद्ध आहे. हाहि नामांकित भाट होऊन गेला. शिवछत्रपति महाराजांच्या आश्रयाला भूषण नांवाचा भाट होता. व तोहि चांगल्या प्रकारचा भाट म्हणून त्या काळीं प्रसिद्ध होता. याशिवाय बडोदा संस्थानांतील साळबाईचा धीरोभगत, नडियादमधील संदसरचा प्रतिमदास, खेडामधील डाकोरचा थोमन बारोट हेहि प्रसिद्ध भाट होऊन गेले.
(संदर्भग्रंथ – रिस्ले – ट्राइब्स अँड कास्ट्स; कुक ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ दि नॉर्थ वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस अँड औध; विल्सन इंडियन कास्ट्स; इंपीरियल गॅझेटियर. याशिवाय यावल तालुक्यांतील नाहावी येथील अपर प्रायमरी स्कूलचे हेडमास्तर रा .प. कु. ठाकूर यांच्या ‘भाट व त्यांची कविता’ या लिहून आलेल्या लेखाचा आधार घेतला आहे.)