विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भाटिया– अथवा भाटे, यांची लोकसंख्या (१९११) ५९००६ असून त्यांत हिंदू, शीख ,जैन यांच्याप्रमाणें मुसुलमानहि (५११२) आहेत; यांची जास्त वस्ती मुंबई इलाख्यांत व त्यांतहि मुख्यत्वें कच्छ काठेवाडांत आहे. हे स्वत:स यादवांतील भाटी या (रजपुत) शाखेचे म्हणवितात. जेसलमीरचा राजा भाजीवंशीय आहे. या वंशांतील बाटगे मुसुलमान पंजाबांत असून त्यांनां भटी म्हणतात बिकोनर शिकारपूर-सिंध-कच्छ-काठेवाड इकडील हिंदू व्यापारी बहुतेक भाटियाच आहेत. यांचें प्राचीन मूळ ठिकाण (ख्रि .पू .६००) रावळपिंडीजवळील गंजीपूर असावें व त्यांना इ.स च्या पहिल्या शतकांत तेथून इंडोसिथियनांनीं आग्नेयीकडे हांकलून दिलें असावें कोणीम्हणतात कीं जेसलमीरच्या वाळवंटांतील भाटनेर हें यांचें मूळगांव होय. कांहीं भाटिया आपल्यास शालिवाहनाचे वंशज मानतात. गिझनीफर महंमूद्दाच्या वेळीं भेडा अथवा भाटिया (झेलमच्या डाव्या तीरीं) येथें भाटियांचें एक राज्य होतें, त्यांनंतरच्या मुसुलमानांच्या स्वा-यांमुळें ते कच्छकडे वळले असावेत (१३५०). सिंधमधील भाटिया कोळी बनलेले असून दारू पितात व मासे खातात काठेवाडमधून मग गुजराथ-मुंबईकडे हे लोक पसरले त्यांच्यांत हलाई (हलाल),कच्छी, दसा, विसा सिंधी असे पोटभेद आहेत. विसा हे दसाच्या मुली करतात पण आपल्या मुली मात्र दसांनां क्वचित देतात. यांचे ८४ नुख (गोत्रें) आहेत हे लोक देखणे, चतुर व्यापारी महत्त्वाकांक्षी काटकसरी पापपुण्याची क्षिति न मानणार असतात यांच्या भाषा गुजराथी व कच्छी हे १६ व्या शतंकांत वैष्णवपंथी व वल्लभानुयायी झाल्यापासून (पंजाब व सिंध सोडून) मद्यमांसास बिलकूल शिवत नाहींत. यांचा मुख्य धंदा व्यापार व दलाली मुंबईत यांच्यापैकीं पुष्कळ लोक स्थानिक झाले आहेत. कांहीं इराण्याच्या आखातावरील बंदरांत, झांझीबार, अरबस्तान, काबूल जावा चीन इकडेहि स्थानिक बनले आहेत. कच्छकडे कांहीं लोक शेतकी करतात. यांच्या बायका कशिदा काढण्यांत फार कुशल असतात. हे आपलीं धार्मिक बंधनें कसोशीनें पळतात. वैष्णवपंथी अथवा वल्लभाचार्यांच्या गादीवरील महंताकडून यांची मुंज होते. कृष्ण व विष्णु या त्यांच्या आवडत्या देवता होत. मूल जन्मल्यावर सहाव्या दिवशीं सटीबरोबर घोड्याची पूजा करतात; सुवेर ४०-४५ दिवस असतो. यांच्यांत मुलींची संख्या थोडी असून बालविवाह रूढ आहे. वराचा बाप वधूच्या बापास हुंडा देतो व मुलीच्या नांवानें (स्त्रीधन) दागिने करून देतो. वाङिनश्चयाची नोंद जातपंचायतीच्या रजिस्टरांत होते व त्याबद्दल वराच्या बापास कांहीं रक्कम द्यावी लागते. लग्नाच्यावेळीं वधुवरांच्या डोक्यांवर खजुरीचीं पानें धरतात; मंत्राक्षताऐवजीं सूतपुतळ्या उपयोगांत आणतात. व वरवधू एकमेकांस ज्वारीचीं कणसें, मिठाई, एक मूठ तीळ देतात. यांचे उपाध्याय पोकर्ण ब्राह्मण आहेत. यांच्यांत पुनर्विवाह व घटस्फोट विहित नाहींत, परंतु अलीकडे हें बंधन शिथिल झालें आहे. मनुष्याच्या अंतकाळीं तोंडांत गंगा घालण्याच्या वेळीं त्याचें जुनें जानवें काढून नवें घालतात. प्रेतास खांदा देणा-यानें प्रथम स्नान करावें लागतें. व्यापाराप्रमाणें सावकारी करण्यांत व जमीन विकत घेण्यांत हे आपला पैसा गुंतवितात यांच्यांत प्राथमिक शिक्षणाचा प्रसार बराच आहे. सांप्रत हे आपल्याला ब्राह्मण व वाणी यांच्याबरोबरचे मानतात. आसमांत व्यापारी मुसुलमानांना सामन्यत्वें भाटिया म्हणतात. मुलींच्या तुटवड्यानें व तिला द्याव्या लागणा-या जबर हुंड्यामुळें हल्लीं गरीब भाटे लोक हरिद्वार-तेहरी इकडील यदुवंशी क्षत्रियांच्या मुली करतात. (कनिंगहॅम टॉडः बाँबे सेन्सस रिपोर्ट १९११; बाँबे गॅझेटियर पु. ९ भा. १; इंडि, अँटि, पु. ५, पृ १६८, सेन्सस ऑफ इंडिया १९९१; इबेटसन; क्रूक; रसेल व हिरालाल)