विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भात- भाताच्या मुख्य २० जाती आहेत. हिंदुस्थान ब्रह्मदेश, चीन, ऑस्ट्रेलिया इकडे भात जास्त पिकतें. देवभात नदीकांठीं आपोआप उगवतें, यास लांब कुसें असतात. यांच्या ननोई नत्सब माणिकलाल बरीरधान वगैरे जाती आहेत. हें सिंधूनदीच्या काठचा प्रदेश सुंदरबन, या भागांत जास्त पिकतें. आसामकडे ३००० फूट उंचीवर जो तांदूळ पिकतो, तो बारामास उत्पन्न होतो. डौंग, नत्सब या भाताची पाती बरीच रूंद असते. हें भात सिकीम, खासिया, टेकड्या आसाम ब्रह्मदेश इकडे उत्पन्न होतें. उष्णकटिबंधांत पाणथळ जागीं हलकें भात आपोआप उगवतें, ऊरि, झर, निर्वरी अशीं याचीं नांवें असून याचा रंग तांबडा, पांढरा व काळसर असतो. लागवडीच्या भागांत एक भात लवकर तयार होणारें भात (तांदूळ) तांबड्या रंगाचें व उशिरां येणारें पांढ-या रंगाचें असतें. कोंड्याचाहि रंग तांबूस व पांढरा असतो. कांहीं लोकांचें म्हणणें भात हें धान्य मूळचें चीन देशांतील होय. ख्रि. पू. २८००० या वर्षीं चीन नंग यानें भात पेरल्याचा उल्लेख आढळतो; परंतु कांहींचें म्हणणें भात हें हिंदुस्थानांतीलच पीक आहे. व्रीहि हा संस्कृत शब्द फार जुना आहे. त्याचा अपभ्रंश फारशी बिरिंझी; त्यावरून यूरोपीय भाषेंतील भाताचे वाचक शब्द निघाले; तर कोणी म्हणतात अरीसी या तामिळ शब्दापासून निघाले. ॠग्वेदांत व्रीहि शब्द आढळत नाहीं. तांदूळाचा सर्वांत जुना नमुना स्टीन याला काराडोंग येथें सांपडला ''बॉवर मॅनस्क्रिप्ट'' या नांवाच्या एका ५ व्या शतकांतील हस्तलिखित ग्रंथांत खोकल्यावर भाताच्या लाह्यांच्या उपयोग करण्यात सांगितलें आहे.
भातावरील कोंडा काढण्याचें काम त्रासदायक असतें. इकडून यूरोपांय जाणा-या तांदुळाचें भात पहिल्यानें अर्धवट शिजवून मग उन्हांत वाळवून त्याचा कोंडा काढतात. भाताची पचवै नांवाची दारू काढतात. मनुस्मृतींतील सुरा बहुधां भाताची करीत. याच्या कोड्यापासून रंग व व पेंढ्या पासून कागद होतो. जर्मनींतील व हॉलंडमधील मद्यार्क बहुधां ब्रह्मदेशच्या तांदुळापासून काढतात. भाताच्या पेजेंत थोडा चुना टाकून एक प्रकारचें सीमेंट तयार करतात. साधारण भातांत ओलावा शें. १२.५ तेल २.१ अल्ब्युमिनाइडस ६.३ कारबोहैड्रेट्स ६५.२ वगैरे मुख्य द्रव्यें असतात. मुख्यत्वेंकरून उष्णकटिबंधांत दमट हवेंत जेथें पाऊस फार पडतो तेथें व मध्यम प्रकारच्या उष्ण हवेंत भात पिकतें. मजूर कमी असल्यास कुरीनें पेरणी होते; सर्वसाधारण रीत लावणीची होय. पहिल्या प्रकारांत एकरीं ८०-१२० पौंड बीं व दुस-या प्रकारांत ३०-८० पौंड बीं पुरतें. चांगला हंगाम असल्यास दुस-या प्रकारापासून एकरीं २४०० पौंड उत्पन्न येतें. हिंदुस्थानामध्यें बंगाल्यांतच भात सर्वांत जास्त पेरतात. तेथें आमन (हें डिसेंबरमध्यें कापतात) औस (हें आगस्टमध्यें कापतात) व बोरो (हें मे मध्यें कापतात) असें भाताचे तीन प्रकार आहेत. बंगाल्यांत कोठें कोठें भाताचें पीक पांच वेळ काढतात. डाक्याकडील भागांत भाताचीं रोपें मडक्यांत तयार करतात व मग जुलै अखेर त्यांची लावणी होते. पेरणीचा हंगाम ठिकठिकाणीं वेगळा असतो. रोपें तयार करण्यासाठीं कांहीं ठिकाणीं दलदलीची जमीन तयार करतात. महाराष्ट्रांत दर विध्यास पांच ते बारा मण भात उत्पन्न होतें. संयुक्तप्रांतांत नह, बन्सभट्टी जन्सफल सुम्हार इत्यादि भाताच्या जाती ब-याच आहेत. इकडील पीक पुष्कळसें पाटाया पाण्यावर काढतात. मध्यप्रांतांत कांहीं ठिकाणीं लावणीची पद्धत नाहीं. इकडील भागांत तळीं व पाट बरेच आहेत. त्यांचें पाणी शेतास देतात. पंजाबांत भाताचे ६० प्रकार आहेत. त्यांची लागवड विशिष्ट जागीं होते. इकडील सर्वांत उत्तम तांदूळ झिरी या नावांचा असतो काश्मीरमध्यें पांढरा (उत्तम) व तांबडा (हलका) तांदूळ होतो. मुंबई इलाख्यांतील हें पीक मुख्यत्वें खरीपाचें असून पावसाच्या पाण्यानें वाढतें. रोप तयार होत असतांच विशेषतः खत देतात एरंडीची पेंड मासळी वगैरे खताचे प्रकार आहेत. परेणी बीं फेकून किंवा पाभरीनें करतात. लावणीच्या शेतांत एकरीं २८०० ते ३२०० पौंड पीक निघतें तर साध्या पेरणीच्या शेतांत तें १८०० पौंड निघतें. लागवडीचा खर्च एकरीं ५० ते ५२ रू येतो. मद्रासकडे कन्नी, मकरम व पुंजा नांवाचा तांदूळ बराच पिकतो व पिकेंहि दोन काढतात. दक्षिण कानडांत १३-१४ महिन्यांच्या अवधींत बिले नांवाच्या जमिनींत एका मागून एक तीनदां पिकें काढतात. तंजावरकडील बहुतेक पीक पाटाच्या पाण्यावर होतें. इकडील भागांत कर व विषनम या जाती आहेत. म्हैसूरकडे दोनदां पीक काढतात; बरबट्ट मोलबट्ट, नाटी या इकडील तांदुळाच्या जाती आहेत. इकडे मोड आलेलें बीं (रहू) फेंकून पेरणी करतात; लावणीला लायक होण्याइतकें रोप मोठें होईपर्यंत इतर कडधान्यें वगैरे त्या शेतांत लावून काढून घेतात. कूर्गप्रांतांत दोड्डबट्टा नांवाचें एकच पीक निघतें. उत्तम भातास सण्णाबट्टा व मध्यम भातास केसरी म्हणतात. ब्रह्मदेशांत पिकाचे भौक्कयी, कौक्यीन व मयीन असे तीन प्रकार आहेत. सर्वांत उत्तम भात इरावतीच्या दुआबांत होतें. येथें पिकें तयार करण्याच्या पांच त-हा आहेत. इकडे भाताबरोबरच कापूस अथवा तीळ यांचें पीक काढतात.
हिंदुस्थानांत व ब्रह्मदेशांत भात सडण्याच्या गिरण्या निघाल्या आहेत; त्यांत जास्त संख्या ब्रह्मदेशांत आहे. ब्रह्मदेश व बंगाल इकडे भातापासून पचवै नांवाच्या लक्षावधि रूपायांची दारू तयार करतात. हिंदस्थानांतून परदेशाशीं होणारा तांदुळाचा व्यापार मुख्यत्वें ब्रह्मदेशातूनच होतो. यूरोप, पूर्व आफ्रिका, वेस्ट इंडीज, अशियाखंडाचे इतर देश, दक्षिण अमेरिका या सर्व ठिकाणीं तांदूळ सर्व हिंदुस्थानांतूनच जातो. सयाम, कोचीनचीन व जावा हे देश या बाबतींत हिंदुस्थानास प्रतिस्पर्धी आहेत. तांदुळाच्या पिठाची परदेशीं निर्गंत होते. महाराष्ट्रांत तांदुळाच्या पुढील जाती आहेतः-आंबेमोहोर, बरंगल, कमोद, काळी साळ, किंजळ, कुडा, कुडई, कोळंबा, कोंथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, घुडा, घोटवेल, चिमणसाळ, जिरेसाल, टांकेसाळ, डामरगा तवसाळ, तांबसाळ, दोडका, पटणी बोडकेंभात, राजावळ इत्यादि.
१९२२-२३ सालीं हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांतून पुढें दिलेल्या आंकड्याइतक्या एकर जमिनींत भाताची लागवड झाली होतीः- मद्रास ११२८५९२४, मुंबई ३०५८३८८, बंगाल २१७७३३००; संयुक्तप्रांत ७०१६१४२, पंजाब ९२८७३६; ब्रह्मदेश ११२८७८७३; बिहार-ओरिसा १५३५०१०० व-हाड-मध्यप्रांत ५१४३५८२; आसाम ४६२४०६४, वायव्यसरहद्द २३७८५ व इतर ८५०३२ एकूण ८०५७६९२६ (वॉट-कमर्शिअल प्रॉडक्ट्स)