विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भानुदास- एक महाराष्ट्रीय संत एकनाथस्वामींचा पणजा. हा सूर्याच्या प्रसादानें झाला म्हणून याचें भानुदास हें नांव पडलें. अध्ययन करतांना यांचा बाप याच्यावर रागवला म्हणून हा घराच्या तळघरांत सात दिवस लपून राहिला व तेथें त्याला सूर्यानें दर्शन दिलें अशी आख्यीयका आहे. बापाच्या मरणानंतर त्यानें कापडविक्याचा धंदा सुरू केला पण पुढें तो धंदा सोडून देऊन भगवद्भजनांत सर्व काळ घालविण्यास त्यानें सुरवात केली. त्यामुळें त्यावेळच्या साधुमंडळांत त्याची प्रामुख्यानें गणना होऊं लागली. अनागोंदीच्या किरीटी रामराजानें पंढरीहून पांडुरंगाची मूर्ति आपल्या शहरास नेली. ती भानुदासानें परत आणली; यामुळें त्याची फार ख्याति झाली. भानुदासानें पुष्कळ अभंग रचिले पण ते सर्व प्रकाशित नाहींत. हा शके १३७० त जन्मून १४३५ सालच्या सुमारास समाधिस्थ झाला असें कांहींचें मत आहे. (उदा - पांगारकरकृत एकनाथ -चरित्र पहा)