विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भावे, विष्णु अमृत (१८१९-१९०१)- उर्फ विष्णुदास, आद्य महाराष्ट्रनाटककार. यांचे वडील सांगलीकरांच्या पदरीं एक लष्करी अधिकारी होते. विष्णुपंतानां लहानपणापासून गाणें, पदें करणें, भाषणें तयार करणें वगैरेंचा नाद असे. इ. स. १८४२ मध्यें उत्तर कानडांतून भागवत नांवाची मंडळी सांगलीस आल्यावेळीं तिचे दोन तीन नाट्यप्रयोग पाहून व सांगलीकरानीं सांगितल्यावरून यांनीं नाटक बसविण्याची तयारी केली व स. १८४३ मध्यें बरीच मेहनत घेऊन सीतास्वयंवराचा प्रयोग श्री. आप्पासाहेबांपुढें करून दाखविला. यापुढें श्रीमंतानीं चांगला आश्रय दिल्यावरून दहा नाट्यप्रयोग यानीं तयार करूंन ठेविले. यांच्या नाटकांत सूत्रधार, विदूषक, गजानमहाराजांचें स्तवन त्यांचें व सरस्वतीचें आगमन देवांची राक्षसांची व स्त्रियांची कचेरी, राळेच्या उजेडांत तरवारीच्या फेकाफेंकी वगैरे गोष्टी द्दष्टीस पडत. प्रत्येजण काय करतो बोलतो हें सूत्रधारानें पद्यांतून व्यक्त करावयाचें असे. पडदा एकच असे, व एकाच बैठकी वर व देखाव्यांत सारे प्रवेश होते. विदूषक हें पात्र तोंडीं लावणें म्हणून सर्व पात्रांनां उपयोगी पडे.
आप्पासाहेब सांगलीकर वारल्यानंतर (१८५१) भावे यांची मंडळी दौ-यावर निघाली. पुण्यास त्यानां केरो लक्ष्मण छत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर या थोर गृहस्थांनीं चांगली मदत दिली पुढें हीं कंपनी मुंबईस गेली. तेथें डॉ. भाऊ दाजी नाना शंकरशेट यांच्या खटपटीमुळें बरेंच नांव व पैसा यानीं मिळविला. भावे यानीं इ. स.१८६१ पर्यंत नाटकाचा धंदा केला. यांची कंपनी पहिलीच असल्यानें तींत अर्वाचीन सुधारणा मुळींच नव्हत्या म्हटलें तरी चालेल. तथापि संच चांगला असून, गोपाळराव मनोळीकर (सूत्रधार) रघपति फडके (स्त्रीपार्टी) बापू ताके (राक्षस) वगैरे पात्रें नांवाजण्यासारखीं होतीं.
विष्णुदासानीं सुमारें पन्नास आख्यानांवर नाटकांकरितां पद्यरचना केली आहे. यांचे सर्व कथाभाग पौराणिकच असत. हरिश्चंद्राख्यान भरतभेट, वामनावतार चक्रव्यूह प्रल्हाद चरित्र ,बभ्रुवाहन इत्यादि नाटकें त्यानीं रचिलीं होतीं. हरिश्चंद्राख्यान फार प्रेमळ व करूंणरसपूर्ण होतें.
कंपनी सोडल्यावर भावे यानीं कळसूत्री बाहुल्यांचा खेळ तयार केला; त्यांतील लांकडी चित्रें हातानें तयार करून, त्यांकडून रासांत गोफ विणणें, नृत्यभिनय करणें, कसरत करणें वगैरे कामें करवून घेण्याची कलृप्ति यानीं योजिली. ती चांगली सिद्धीस गेली. पुढें त्यानीं सांगलीस एंजिनियरिंग खात्यांत नोकरी धरली. यांचा १९०१ सालीं अंत झाला.
विष्णुपंतांच्या वेळीं मराठी नाटकग्रंथ एकहि नव्हता. तमाशे, लळितें या ग्राम्य प्रकाराखेरीज मध्यम स्थितींतल्या लोकांनां करमणुकीच्या कोणताहि विषय नव्हता. तेव्हां यानींच प्रथम आपल्या समाजांत नाटकरूपानें सभ्य करमणुकीचा प्रकार सुरू केला. पुढें जे नाटककार उदयास आले, त्यांनां भाव्यानींच मार्ग करून दिला तेव्हां महाराष्ट्र भाषेंतील नाट्यशास्त्रांत अग्रस्थानीं बसण्याचा मान यांचाच आहे. (मराठी रंगभूमि, रंगभूमि मासिक १. ८-९)