विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भास्कर राम कोल्हटकर– एक मराठा वॉर. हा नेव-याच्या (जिल्हा रत्नागिरी) रामाजीपंत कोल्हाटकराचा मुलगा .या कोल्हटकर घराण्याच्या माहितीकरितां 'कोन्हेर राम कोल्हटकर' (विभा ११वा) हा लेख पहा. भास्करामास नागपूरकर भोंसल्याच्या पदरीं सरंजाम मिळाला होता. यानें बंगालप्रांतावर स्वा-या करून तिकडे मराठ्यांचा दरारा बसविला व ओरिसा आणि बंगाल्याकडील बराचसा प्रांत मराठी राज्यास जोडला. याच्या स्वा-यांमुळें कलकत्तेकर इंग्रजांनीं कलकत्यास एक किल्ला बांधून मराठा डिच नांवाचा एक खंदक तयार केला. भास्करपंतास शाहूनें भोंसल्याच्या पदरीं लावून दिलें होतें. हा पेशव्यांच्या विरूद्ध वागून रघूजी भोंसल्यास मदत करीत असे. अनीवर्दीखान हा बंगाल, बहार व ओरिसाचा नबाब असल्यानें त्याच्या व पंताच्या नेहमीं लढाया जुंपत. हा मुत्सद्दी नव्हता. केवळ शिपाईगडी होता. त्यामुळें पुढें त्यांचा नाश झाला. अलीबर्दीनें पंतापुढें आपला निभाव लागत नाहीं असें पाहून त्याच्याशीं तहाचें बोलणें लावलें व त्याला विश्वासानें २० माणसांसह भेटीस आपल्या डे-यांत आणून विश्वासघात करून त्याचा खटवा गांवीं खुन केला (१७४४ आक्टोबर) त्यानंतर याच्या खुनाचा वचपा रघूजी भोंसल्यानें काढला (ना.भो. बखर; मरा दरारा; राजवाडे खं. २, ३ पत्रें यादी)