विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भितरी- संयुक्तप्रांत, गाझीपूर जिल्हा. सैदपूर तहशिलींतील खेडें. येथें स्कंदगुप्त राजाच्या वेळचा (इ. स. ३३५) एक २८ ॥ फूट उंचीचा स्तंभ व त्यावर, 'आपल्या देशास हूण अनार्यांच्या हातून सोडविल्याचा' स्कंदाचाच एक शिलालेख व दुसरे शिलालेख सांपडले आहेत. यांवरून गुप्तघराण्याची ९ पिढ्यांची माहिती समजते. या स्तंभावर एक विष्णूची मूर्ति कोरली होती ती नाहींशी झाली आहे. शिलालेख फ्लाटनें छापला आहे. येथें कुमारगुप्ताची (५३५) एक राजमुद्राहि सांपडली आहे. (कनिंगहॅम- आर्कि रिपोर्ट, पु. १; गुप्त इन्स्किप्शन्स, नं. १३; जर्नल रॉ. ए. सो. (१९०७) पृ. ९७६. )