विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भिलसा, जिल्हा.- मध्यहिंदुस्थान, ग्वाल्हेर संस्थानांतील हा जिल्हा आहे. क्षेत्रफळ १६२५ चौरस मैल. या जिल्ह्यांत भिलसा, ग्यारसपूर, उदयपूर उदयगिरी व बारो येथें पुरातनकाळच्या वस्तू सांपडतात अकबराच्या कारकीर्दींत माळव्याच्या सुभ्याचा हा एक भाग असे. लोकसंख्या सुमारें एक लाख. यांत भिलसा व बासोडा असे दोन परगणे आहेत. माळव्याच्या पठारावर जो या जिल्ह्याचा भाग आहे, त्यांतून बटवा व तिला मिळणारे दुसरे प्रवाह वहात गेले आहेत.
गांव (भेलसा).- जिल्ह्याचें मुख्य गांव. हें जी. आय. पी. रेल्वेचें एक स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारें सात हजार. येथील इमारती मुसुलमानी धर्तीच्या आहेत. एकंदर गांवाच्या देखाव्यावरून असें दिसतें कीं, येथील वैभव लयास गेलें आहे. येथील लोहगंज खडकावर मोठ्या इमारती आहेत. येथील बोद्ध स्तूप फार प्रेक्षणीय आहेत. हे सर्व स्तूप ख्रिस्तपूर्व तिस-या शतकापासून पहिल्या शतकापर्यंतचे आहेत. भिलसाच्या वायव्येस बटवा व भश नद्यांमध्यें प्राचीन बेसनगरचें स्थान आहे. हें अशोकाच्या वेळचें असावें असें वाटतें. येथें जुन्या काळाचीं नाणीं सांपडतात. यासच पुर्वींचें चौयगिरी शहर अथवा म्हेसनगर असें म्हणतात. रूक्मांगद राजानें आपली बायको टाकली व तो एका विश्व नांवाच्या अप्सरेबरोबर राहिला म्हणून या गांवास वेसन नगर म्हणतात अशी आख्यायिका आहे.
येथें भैलेषा (सूर्या) चें देऊळ आहे. त्यावरून या गांवास भेलसा असें नांव पडलें असावें. पुराणांत या गांवाचा भद्रावती म्हणून उल्लेख केलेला आढळतो. जैन लोक या गांवास भदालपूर असें म्हणतात. सितलनाथ हा त्यांच्यांतील साधु पुरूष येथें जन्मला अशी त्यांची समजूत आहे.
इतिहासः- अशोकाच्या वेळीं भेलसा अगर प्राचीन बेसनगर हें मोठें गांव होतें. विदिशा व भेलसा हीं एकच असा कांहींचा तर्क आहे. हा खरा असेल तर ह्या गांवीं अग्नि मित्र राजाची राजधानी होती. अल्बेरूणीनें महाबलिस्थान म्हणून याचा उल्लेख केलेला आहे. १२३५ सालीं अल्तमश बादशहानें हें लुटलें. १२९० सालीं अल्लाउद्दीनानें हें गांव जिंकिलें. १६६२ सालीं तें औरंगझेबाच्या ताब्यांत गेलें. पुढें भोपाळच्या नबाबाकडून पेशव्यांनीं आपल्या ताब्यांत घेतलें. १७७५ मध्यें हें शिंद्यांच्या राज्यांत मोडूं लागलें.