विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भिल्ल- भिल्ल हा शब्द द्राविडी भाषेंतील बिल्ला = धनुष्य धारण करणारा या शब्दापासून निघाला आहे. भिल्ल हे द्रविड शाखेचे लोक असून त्यांची प्राचीन काळीं पश्चिम व मध्यहिंदुस्थानांत वस्ती होती; व त्यांच्या ताब्यांत बराचसा डोंगराळ मुलूख असल्याचें इतिहासावरून दिसतें. संस्कृतमधील प्राचीन ग्रंथांत यांचा पुलिंद व निषाद या नांवानें उल्लेख असलेला आढळतो. टॉलिमीनें फिलिटाइ या नांवानें ज्या लोकांचा उल्लेख केला आहे ते लोक भिल्लच असावेत असें वाटतें. राजपुताना, माळवा अगर गुजराथ प्रांतांतील रजपूत संस्थानांत ज्या वेळीं रजपूत राजा राज्यारोहण करतो त्यावेळीं भिल्लांच्या आंगठ्यामधून काढलेल्या रक्ताच्या राजाच्या कपाळावर टिळा लावण्याची चाल आहे. त्यावरून, एकेकाळीं पश्चिम हिंदुस्थानांत भिल्ल लोक सत्ताधारी असावेत असें मानण्याला जागा आहे. आपण महादेवाचे वंशज आहों असें भिल्ल लोक मानतात.
मुसुलमानी सत्तेच्या काळांत भिल्ल लोकांनीं दंगेधोपे केले नाहींत. तथापि मराठेशाहींत मात्र त्यांनीं पुष्कळदां दंगेधोपे माजविण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांनीं त्यांनां सतावून सोडून डोंगराळ मुलुखांचा आश्रय घेण्यास भाग पाडलें. यांनां आपल्या ताब्यांत आणण्याचा प्रयत्न १८१८ सालीं ब्रिटिशांनीं केला पण त्यांत त्यांनां यश आलें नाहीं. तेव्हां भिल्लांशीं नमतें घेऊन ब्रिटिशांनं १८२५ सालीं भिल्ल एजन्सी स्थापन केली. भिल्ल लोकांची एक पलटण तयार करून त्यां चा इतर रानटी जातींनां ताब्यांत आणण्याच्या कामीं ब्रिटिशांनीं पुष्कळ उपयोग करूंन घेतला.
१९११ सालच्या खानेसुमारींत एकंदर भिल्लांची लोकसंख्या सुमारें १६ लाख होती. हल्लीं भिल्लांची वस्ती मुंबई इलाखा (८ लाख), राजपुताना (४ लाख), व मध्य हिंदुस्थान (३ लाख), या भागांतच विशेष आढळून येते. मुंबई इलाख्यांत गुजराथमध्यें व खानदेशामध्यें यांची विशेष वस्ती आढळते. गुजराथ प्रांतांतील भिल्लांत, शुद्ध रक्ताचे भिल्ल व रजपूत रक्त ज्यांच्यांत आहे अशा प्रकारचे भिल्ल असे दोन मुख्य भेद आहेत. याशिवाय या दोन वर्गांच्या पोटजाती पुष्कळच आहेत. खानदेशांतील भिल्लांचे डोंगरांत व अरण्यांत राहणारे भिल्ल, मैदानांत रहाणारे भिल्ल व मिश्रजातीचे भिल्ल असे तीन प्रकार आहेत. भिल्ला, तडवी व निर्धी या तीन मुख्य मिश्रजाती आहेत. मध्यहिंदुस्थानांतील भिल्लांची वस्ती माळवा व नेमाड यांच्यामधील सरहद्दीच्या डोंगराळ प्रदेशांत आढळते. राजपुतान्यांतील भिल्लांची वस्ती मेवाडच्या डोंगराळ मुलुखांत विशेषतः असलेली दिसून येते. हल्लीं भिल्लांचे मुख्य धंदे म्हणजे शेतकी, मजूरी व पहारा हे होत. प्राचीन काळीं या भिल्ल जातींची भिल्ली नांवाची एक स्वतंत्र भाषा अस्तित्वांत होती असें म्हणतात. तथापि ती भाषा हल्लीं लुप्त झालेली असून आज भिल्ल हे आपआपल्या प्रातांतील भाषाच बोलतात. आजचे भिल्ल हे आपआपल्या प्रांतातील भाषाच बोलतात.
आजचे भिल्ल हे अद्यापिहि रानटी स्थितींतलेच आहेत. ते अंगानें धडधाकट पण खुजे आहेत. ते रुंद नाकाचे, काळ्या रंगाचे असून त्यांचें शरीर राकट असतें. सर्व द्रविड शाखेच्या लोकांप्रमाणें ते लांब केंस ठेवतात. चो-या व दरवडे घालण्यांत हे पटाईत असतात. तथापि त्यांचा एकदां विश्वास संपादन केल्यास ते कधींहि दगलबाजी करीत नाहींत. ते अत्यंत धाडसी व शूर असतात. चैनीची त्यांनां फार हौस असते. डोंगरांत राहणारे भिल्ल फक्त कमरेभोवतीं एक वस्त्र गुंडाळतात; व बायका लहंगा वापरतात पण सपाट प्रदेशांतील भिल्ल पागोटें, कोट, वगैरे वापरतात. भिल्लांमध्यें दारूचें व्यसन मोठ्या प्रमाणावर आढळतें. डोंगरी भिल्ल मुसुलमान साधूंचीहि उपासना करतात. यांच्यामध्यें देवळें बांधण्याची चाल नाहीं. खानदेशी भिल्लांच्या यात्रेचें मुख्य ठिकाण म्हटलें म्हणजे हणमंत नाईकाची वाडी होय. पुण्याच्या रस्त्यावर संगमनेरच्या दक्षिणेला कांहीं मैलांवर हें ठिकाण आहे. या ठिकाणीं हणमंत नाईक म्हणून यांचा पुढारी मोंगलांशीं अगर दुस-या एका दंतकथेप्रमाणें पेशव्यांशीं लढतां लढतां पडला, व त्याचें स्मारक म्हणून या ठिकाणीं एक पाषाणस्तंभ उभारलेला आहे. घोडा, वाघ, कुत्रा या प्राण्यांनां ते फार पवित्र मानतात. त्यांतल्या त्यांत घोडा फार पवित्र मानण्यांत येतो. त्यांचें उपाध्यायपण मुख्यतः भगत यांच्याकडे असतें. गुजराथी भिल्ल रावळ, भाट, ढोली यांनां पूज्य मानतात. या लोकांत वैवाहिक नीतिबंधनें फार शिथिल आहेत. आसुर व पैशाची या प्रकारचे विवाहहि या जातींत घडून येतात. एखादा मोठा भिल्ल मेल्यास त्याचें स्मारक म्हणून घोड्यावर बसलेल्या माणसाचा एक दगडी पुतळा देवस्थानांत ठेवण्याची चाल यांच्यांत आढळते. यांच्यांत प्रत्येक टोळीचा एक मुख्य असतो, त्याला नाईक, पाटील अगर गमती असें म्हणतात. याशिवाय प्रत्येक जातीची एक पंचायत असते. नाईकाला व पंचायतीला भिल्ल लोक फार मान देतात. विवाह ठरविणें, जातिविषयक निर्बंध ठरविणें व ते मोडल्यास मोडणा-यांनां शासन करणें इत्यादि कामें या पंचायतीकडे असतात.
(संदर्भग्रंथः-ग्रीयर्सन-लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया; मालकम-मेमॉयर ऑफ सेंट्रल इंडिया; हेंडले-अँन अकाउंट ऑफ मेवार भिलस्; किंकेड-भिल्ल ट्राइब्स ऑफ दि विंध्यन रेंज; इंपीरियल गॅझेटियर)