विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीम- (१) विदर्भ देशाधिपति एक राजा व नल पत्नी दमयंतीचा पिता. (२) पांडवांपैकीं दुसरा. भीम हा कुंतीस वायूपासून प्राप्त झाला. यास दहा हजार हत्तीचें बल होतें. यानें आपल्या अंगाच्या शक्तीनें दुष्टांनां ब-याच वेळां शासन केलें आहे. यानें बकासुर, हिडिंब, जरासंध, कीचक वगैरे मोठ्या वीरांनाहि ठार मारिलें. भारतीय युद्धांत दुर्योधनादि धृतराष्ट्रपुत्रांस यानेंच मारिलें. हा बलरामाचा शिष्य होता. यास द्रौपदीपासून श्रुतसेन व हिडिंबेपासून घटोत्कच असें पुत्र झाले. याच्या ध्वजावर सिंह असून रथाचे घोडे अस्वली रंगाचे असत. याच्या धनुष्याचें नांव वायव्य व शंखाचें नांव पौंड्र असे. याचें मुख्य आयुध म्हणजे गदा होय.