विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीमदेव (१०२६-१०७२)- हा गुजराथचा चालुक्यवंशीय राजा फार पराक्रमी असून त्यानें आसपासच्या पुष्कळ राजांवर वचक बसविला. त्याचा समकालीन माळव्याचा परमारवंशी प्रसिद्ध भोजराजा होता. भोजराजा दानशूर व भीमदेव रणशूर अशी त्या वेळेस प्रसिद्धि होती. अबूच्या पहाडावरील अनेक प्रख्यात जैनमंदिरें, तसेंच पालीठाणा व चंद्रावती येथील सुंदर देवालयें भीमदेवानें बाधिलीं. यानें पंजाबांतील गजनीकर महंमुदाचा अंमल उठविण्यासाठीं इतर राजांबरोबर खटपट केली नाहीं. तेणेंकरून मुसुलमानांचा अंमल हिंदुस्थानांत चिरस्थायी झाला. अजमेरच्या वीसलदेवानें गुजराथेवर स्वारी केली.व वीसलनगर (वीसनगर) शहर वसवून भीमदेवाकडून खंडणी घेतली. भीमदेवानें पुष्कळ वर्षें शांततेनें राज्य केलें त्याच्या ठायीं प्रजावात्सल्य विशेष होतें कर्ण नामक मुलास गादीवर बसवून भीमदेव वानप्रस्थाश्रमी बनला.(मु.रि)