विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीमदेव भोळा (११७९-१२१५)- हाहि गुजराथच्या चालुक्य वंशांतील एक राजा होय. याची हकीकत विशेषत:चंदभाटाच्या रासाग्रंथांत आढळते. दिल्लीचा पृथ्वीराज चव्हाण हा त्याचा समकालीन होता. त्या वेळेस भीमराजा महाबलाढ्य म्हणून गणला जात असे. त्याचें सैन्य फार मोठें असून सिंध देशापर्यंत त्याचीं जहाजें वावरत असत. अमरकोशकर्ता अमरसिंह त्याच्याच दरबारीं होता. भीमदेव व पृथ्वीराज यांच्यामध्यें इच्छिनीकुमारी नांवाच्या एका राजकन्येमुळें हाडवैर माजलें. ह्या वैरामुळेंच मुसुलमानांस हा देश हस्तगत करतां आला (ज्ञा. को. वि. १७ 'पृथ्वीराज चव्हाण' पहा).
पृथ्वीराजाचा नाश झाल्यानंतर शियाबुद्दीन घोरीचा सरदार कुत्बुद्दिन यानें भीमदेवावर स्वारी केली (११९४), तींत भीमदेवाचा पराभव झाला; परंतु तो ११२५ सालपर्यंत गादीवर होता. त्याच सालीं तो मेला व गुजराथचें राज्य सोळंखी वंशाकडून गेलें; याला भोळा भीम असें म्हणतात.(फोर्बस-रासमाला; मु. रिया.)