विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भुईमूग (चिनी बदाम)- भुईमुगाचे ताणे जमिनीवर पसरतात. यांस पिवळ्या रंगाचीं फुलें येतात. फुलें सुकलीं म्हणजे वेलास आ-या फुटून त्या जमिनींत जातात व तेथें मोठ्या शेंगा बनतात. ज्या आ-या जमिनीवरच राहतात त्यांच्या शेंगा बनत नाहींत.
भुईमुगाची लागवड हिंदुस्थानांत थोड्याबहुत प्रमाणावर सर्वत्र होतें. तथापि मुंबई, मद्रास व ब्रम्हदेश या ठिकाणीं या पिकाची लागवड विशेष होते. आपल्याकडे भुईमूग खाण्याची चाल फार आहे. व त्याचा उपवासालाहि उपयोग करतात. यावरून भुईमुगाचें पीक मूळचें हिंदुस्थानांतील (भरतखंडांतील) असावें असें वाटण्याचा संभव आहे. परंतु मूळ इतिहास पाहातां हें पीक दक्षिण अमेरिका (पेरू व ब्राझील) खंडांतून चीनमधून हिंदुस्थानांत आलें असावें असा अंदाज आहे. बंगल्याकडे भुईमुगाला अद्यापि चिनई बदाम म्हणतात. हिंदुस्थानांत याची लागवड सुमारें शंभर वर्षांच्या अलीकडीलच असावी.
जाती- १९०१ सालापूर्वीं मुंबई इलाख्यांत भुईमुगाची एकच 'गांवठी' जात होती. त्या सालीं पहिल्यानें धोंडेचेरी नांवाची जात परदेशाहून आणून तिचा प्रसार शेतकीखात्यानें सातारा व पुणें जिल्ह्यांत केला. सन १९०२ सालीं अमेरिकेंतून दोन जाती 'व्हर्जिनिया' व 'स्पॅनिशपीनट' आणि जपानांतून दोन जाती 'मोठा व धाकटा जपान' या आणिल्या त्यांचें पीक पहिल्यानें प्रयोगशाळेंत केलें. या सर्व जातींचें उत्पन्न चांगलें आल्यामुळें यांचा प्रसार स. १९०३ मध्यें शेतकरी लोकांत करण्यांत आला. विलायती भुईमुगाचें उत्पन्न जास्त येऊं लागल्यामुळें शेतकरी लोकांकडून मागणी वाढत चालली म्हणून पुन्हां १९०६ व १९०७ सालीं बीं आणिलें; त्याचा प्रसार करण्यांत आला. हल्लीं या बियांचा प्रसार सातारा, नाशिक, खानदेश अहमदनगर, सोलापूर, बेळगांव ह्या जिल्ह्यांत फार झाला असून त्याची लागवड कोंकण व गुजराथ वगैरे प्रांतांतूनहि होऊं लागली आहे. वर निर्दिष्ट केलेल्या जातींखेरीज हल्लीं हिंदुस्थानांत दुस-या अनेक जाती आल्या आहेत. त्या मोझ्यांबिक, सेनीगॉल, मॉरिशस, ईजिप्शियन, ब्राझील, चिनी वगैरे होत. तथापि फार महत्त्वाच्या म्हणजे गांवठी, मोठा जपान, पांडिचेरी, पीनट, आणि धाकटा जपान ह्या होत. व्हर्जिनिया व मोठा जपान यांमध्यें फारसा फरक नाहीं, त्या एकच आहेत.
या नवीन जाती देशी भुईमुगापेक्षां लवकर तयार होतात, उत्पन्न जास्त येतें, पाणी कमी पुरतें, व त्या हलक्या जमिनींत होतात. त्यांत तेलाचें प्रमाण जास्त असतें. याचीं टरफलें दाण्याच्या मानानें वजनाला कमी भरतात हल्ली गांवठी जात बहुतेक खाण्याकरितां करतात. इतर जाती तेलाकरितां व विक्रीकरितां करतात. 'स्पॅनिश व धाकटा जपान' या हळव्या जाती आहेत. त्यांनां तयार होण्याला साडेतीन महिने लागतात. त्यांचीं रोपें उभीं वाढून शेंगांचे झुपके जमीनींत बुंध्याजवळ येतात. यांची लागण देशावर हलक्या जमिनींत व कोंकणांतील वरकस जमिनींत नुसत्य पावसावर फायदेशीर होते. मोठा जपान व पांडिचेरी यांचा प्रसार देशावर पुष्कळ झाला आहे. यांचे वेल गांवठीप्रमाणेंच जमिनीवर पसरतात. यांस तयार होण्याला सुमारें पांच महिने लागतात. देशीला सहा सात महिने लागतात. या जातींनां पाऊस कमी झाल्यास एकदोनदां पाणी द्यावें लागतें.
ला ग व ड- भईमुगाला हलकी, भुसभुशीत जमीन चांगली. मध्यम काळ्या जमिनींतहि भुईमूग चांगला येतो. जमीन निच-याची असावी. भुईमुगाची फेरपालट सर्व बागाईत पिकांशीं करतात. हळव्या जाती बाजरी, कापूस, जोंधळा, तीळ वगैरेशीं आळीपाळीनें पेरितात, व कोंकणांत यांचा फेरपालट नाचणी व वरीशीं करतात. शेंगा जमिनींत तयार होत असल्यामुळें जमीन नांगरून, कुळवून, ढेंकळें फोडून तयार करावी. हळव्या जाती बहुतकरून बिनखतानें करतात. परंतु गरव्या जातींनां दर एकरीं सुमारें दहा पंधरा गाड्या शेणखत द्यावें लागतें. बियाण्याकरितां दाणे काढणें ते पेरण्यापूर्वीं दोन तीन दिवस शेंगा फोडून काढावे; व जून महिन्यांत पावसानें जमीन भिजून वाफसा झाल्यावर पाभरीनें किंवा हातानें नांगरामागें दाणे टोंचून लावावें. देशी जातीच्या मानानें हळव्या जातीचें बीं जास्त लागतें. देशी व गरव्या जातीचें बीं दर एकरीं ८०-१०० पौंडपर्यंत लागत असून हळव्याचें १२५-१५० पौंडपर्यंत लागतें. हळव्या जातीचे वेल पसरत नाहींत; तीं रोपें उभीं वाढतात म्हणून बीं दाट पेरावें लागतें. दोन ओळींमध्यें अंतर सुमारें नऊ इंच असावें. गरव्या जातींत अंतर अनुक्रमें एक फूट व नऊ इंच ठेवावें. शेतांत तण माजूं देऊं नये. फुलें येण्यापूर्वीं सुमारें दोन खुरपण्या द्याव्या. ज्या ठिकाणीं पावसावर अवलंबून राहातां येत नाहीं तेथें पेरणी झाल्याबरोबर शेतांत वाफे अगर लांब वाफोळ्या करून ठेवाव्या म्हणजे पाणी देण्यास अडचण पडणार नाहीं. पेरणी झाल्यावर सुमारें एक आठवडाभर कावळे व इतर पाखरांपासून पिकाची राखण केली पाहिजे. पीक तयार झालें म्हणजे डुकरें व कोल्हे यांच्या पासून त्याचा बचाव करावा लागतो. जमीन भुसभुशीत असल्यास पीक तयार झालें म्हणजे हळव्या जाती उपटून काढतां येतात. खानदेशांत या जातीला 'उपट्या भुईमूग' म्हणून नांव पडलें आहे. पण जमीन कठिण असल्यास हें पीक नांगरानें, कुळवानें अगर कुदळीनें खणून काढावें लागतें. हीं कामें करण्यापूर्वीं वेल कापून काढावे. वेल कापल्यावर शेंगा हातानें काढाव्या लागतात, व कांहीं जमिनींत राहिल्यास त्या माणसें लावून वेंचाव्या लागतात. या पिकांत खंदणीचें व वेंचणीचें काम विशेषेंकरून गरव्या जातींत फार खर्चाचें असतें.
कों क णां ती ल ला ग व ड- कोंकणांत पाऊस फार पडत असल्यामुळें जमीन निच-याची पसंत करावी. ती चांगली भुसभुसीत असल्यास पावसाळा सुरू होण्यापूर्वीं दाणे ओळींत लावून लागण करावी. हळव्या जाती दीड फुटाच्या अंतरानें लावाव्या व गरव्या दोन फुटांवर लावाव्या. दर एकरी सरासरी उत्पन्नाचें मान जातीप्रमाणें बदलतें. हळव्या जातींत वाळलेल्या शेंगा दर एकरीं सरासरी ८००-१२०० पौंडपर्यंत होत असून गरव्या १५०० ते २५०० पौंडपर्यंत येतात.
उ प यो ग- शेंगांचे दाणे खतात. त्यांचें तेल काढतात. तेलाचा जाळण्यास व खाण्याच्या पदार्थांत पुष्कळ उपयोग होतो. पेंड गुरांनां सर्वोत्कृष्ट असून तिचा खताकडेहि उपयोग होतो. हल्लीं पेंडींत गव्हाचें पीठ मिसळून त्याचे पाव व बिस्किटें तयार करण्याचे प्रयोग सुरू आहेत. याचा पाला व देंठ यांचा चारा गुरांनां फार पौष्टिक आहे. भुईमुगाचें तेल बहुतेक रंगहित असून त्याचा ऑलिव्ह तेलाच्या ऐवजीं चांगला उपयोग होतो. विलायती नवीन जातीच्या दाण्यांचें तेल लवकर घट्ट होतें व त्याला थोडा खंवट वास येऊं लागतो. हिंदुस्थानांतून विशेषतः फ्रान्स देशांत भुईमूग फार जातो. तिकडे या तेलाचे मार्गारिन करतात. याशिवाय साबण व मेणबत्त्या करण्याकडे याचा फार उपयोग होतो. भुईमुगांत पौष्टिक पदार्थ असल्यामुळें हल्लीं भुईमुगाच्या पिठांत सोडियम् कार्बोनेट व गोठलेलें दूध मिसळून एक न्यूट्रोझ नांवाचें अन्न तयार करतात. सोडियम् कार्बोनेट एक भाग, भुईमुगाचें पीठ ९४ भाग व गोठलेलें दूध पांच भाग हे तिन्ही घटक एके ठिकाणीं करूंन केलेलें अन्न फारच शक्ति आणणारें आहे.
व्या पा र- हिंदुस्थानांतील बाजारांत दोन प्रकारचे भुईमूग असतात. एक मद्रासी व दुसरा मुंबई प्रांतांतील शेंगा व दाणे दोन्हीहि हिंदुस्थानांतून निर्गत होतात. शेंगांच्या तीनचतुर्थांशाइतकें त्यांतील दाण्यांचें वजन असतें. शेंगदाण्यास जागाहि शेंगांच्या निम्मी पुरते. म्हणून येथील व्यापारी परदेशीं शेंगदाणाच पाठवितात. मोठ्या दाण्यास मागणी फार असते. देशांतल्या देशांत शेंगांचा खप परदेशी खपापेक्षां किती तरी अधिक आहे. आसमांत कलकत्ता व बिहार ओरिसा प्रांतांतून शेंगांचा पुरवठा होतो. बंगाल व बिहार ओरिसा यांनां कलकत्ता व मद्रास येथून; पंजाबास मुंबई, मध्यप्रांत, राजपुताना व कराची येथून; सिंध प्रांतांत कराचीहून आणि मध्यप्रांतात मुंबई, मद्रास व कलकत्ता येथून शेंगांचा पुरवठा होत असतो. भुइमुगास बाहेरची मागणी पुष्कळ असून ती बहुधां मद्रासहूनच पुरविली जाते.
इसवी सन १९१९-२३ या चार वर्षांत अनुक्रमें १११७३५, १०४०१५, २३५१९१ व २७७३८४ टन शेंग बाहेरदेशीं गेली व तिची किंमतही अनुक्रमें ४२३, २८५, ६२६ व ७५७ लाख रूपये आली. शेगांचा मुख्य खप फ्रान्समध्येंच होतो. ऑस्ट्रिया, हंगेरी, ईजिप्त, सिलोन वगैरे देशांतहि येथून शेंग जात असते. वरील देशांची मागणी मद्रास व मुंबई प्रांतच पुरवितात. १९२२-२३ सालीं मद्रासहून २२४६२९ टन शेंग व मुंबईहून ४२६२८ टन शेंग परदेशीं गेली.