विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भुसावळ, तालुका.- मुंबई इलाखा. पूर्व खानदेशाचा एक तालुका. यांत एदलाबाद पेट्याचा सामावेश होतो. क्षेत्रफळ ५६० चौरस मैल. लोकसंख्या सव्वा लाख. मुख्य गांवें भुसावळ, बोदवड व वरणगांव हीं आहेत. यांत जंगल नाहीं. यांतून तापी नदी व तिला मिळणा-या नद्या पूर्णा व वाघूर या गेल्या आहेत.
गांव- तालुक्याचें मुख्य गांव. हें एक मोठें रेल्वेजंक्शन आहे. यामुळें यास फार महत्त्व आलें आहे. येथें आगगाडीच्या यंत्राचे कारखाने आहेत. पिण्यासाठीं तापीचें पाणी आणिलें आहे. येथें कापूस दाबण्याच्या व सरकी काढण्याच्या गिरण्या आहेत. म्युनिसिपालिटी १८८२ सालीं स्थापन झालीं. लोकसंख्या सुमारें १८ हजार.