विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भूलिया– हीं उडिया देशांतील विणक-यांची एक जात असून यांची लोकसंख्या सुमारें ३५००० आहे. हे आपणांस पाटणाच्या चौहान राजांचे वंशज म्हणवितात. कोरिया म्हणून कोष्ट्यांचा एक वर्ग आहे. त्यांचे हे संबंधीं असतील. कधीं कधीं हे आपणांस देवांग अथवा देवांगणहि म्हणवितात. नाग व कच्छप अशी गोत्रें यांनीं धारण केलीं आहेत. यांच्यांत एकाच देवककुलांत लग्नें होत नाहींत.