प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर         

भूस्तरशास्त्र– भूस्तरशास्त्र म्हणजे पृथ्वीच्या गोलाचा सुरवातीपासून आतांपर्यंतचा इतिहास. पृथ्वी सूर्यमालिकेंतील एक स्वतंत्र ग्रह झाल्यापासून ती कोणत्या स्थित्यांतरांतून हल्लींच्या स्थितीला आलेली आहे, तिची प्रथम स्थिति काय होती, नंतर हवा, पाणी, जमीन इत्यादि भाग कसे झाले, पृथ्वीच्या उदारांतील स्थिति आज काय आहे, पृथ्वीवरील महासागर  व खंडे  यांमध्यें कोणते बदल होऊन हल्लींचे महासागर व खंडें तयार झालीं, वगैरे सर्व हकीकत या इतिहासांत येते आणि त्याचप्रमाणें वनस्पती व प्राणी पृथ्वीवर केव्हांपासून आले व त्यांच्यांत कोणतीं स्थित्यंतरें होऊन आजच्या वनस्पती व प्राणी तयार झाले याचीहि हकीकत येते. या सर्व हकीकतीलाच पृथ्वीचा आधिभौतिक इतिहास किंवा भूस्तरशास्त्र  म्हणतात. हें शास्त्र इतर शास्त्रांच्या मानानें नवीन आहे. कारण इतर शास्त्रांची बरीच प्रगति झाल्याखेरीज या शास्त्राचा पाया व्यवस्थित रीतीनें बसणें शक्य नव्हतें. पृथ्वीची उत्पत्ति कशी झाली हें समजण्याला जोतिष शास्त्राची मदत पाहिजे, खनिज पदार्थ व खडक यांचें पृथक्करण होण्याला रसायनशास्त्र आणि प्राणी व वनस्पती यांचें वर्गीकरण करण्यास प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र या सर्वांची मदत पाहिजे; तेव्हां या शास्त्रांची प्रगति होईपर्यंत भूस्तरशास्त्र शास्त्र या स्थितीला पोहोंचणें शक्य नव्हतें. आतां भूस्तरशास्त्रहि इतर शास्त्रांनां फार महत्त्वाची मदत करूं शकतें. खनिज पदार्थ कोठें सापंडतात, हल्लींच्या वनस्पती व प्राणी यांचे पूर्वज कोण होते वगैरे माहिती भूस्तरशास्त्रामुळेंच झालेली आहे.

भूतरशास्त्राचा विशेष संबंध म्हणजे पृथ्वीवरील खडकाशीं होय. खडक हें मूळचा पृथ्वीगोल थंड होऊन झालेले आहेत किंवा ज्वालामुखींतून बाहेर आलेले आहेत अथवा पाण्याच्या योगानें तयार झालेले आहेत, खडकांचें पृथक्करण केल्यास कोणकोणते पदार्थ त्यांत आहेत, त्यांत मूळचे कोणते ,जुने कोणते, नवीन कोणते, त्यांचा अनुक्रम काय, याचा विचार करून त्यांचें कालमान ठरविणें हें सर्व भूस्तरशास्त्राचेंच काम आहे. पाण्याच्या योगानें जे खडक तयार झालेले असतात. त्यामध्यें ज्या ठिकाणाहून हा खडकाचा भाग पाण्यानें वाहून आणलेला असतो त्या ठिकाणच्या त्या वेळच्या प्राण्यांचे व वनस्पतींचे भाग वहात येऊन बसतात. व नंतर ते अश्मीभूत होतात. आतांपर्यंतच्या अभ्यासावरून असें कळलें आहे कीं प्रत्येक काळांत कांहीं विशिष्ट  प्राणी व वनस्पती होऊन गेल्या; तेव्हां अश्तीभूत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे भाग खडकांचा कालनिर्णय करण्यास फार उपयोगी पडतात, व त्यांच्यामुळें निरनिराळ्या देशांतील किंवा खंडातील समकालीन खडक शोधून काढण्यास सोपें जातें. हल्लीं कोणते प्राणी व वनस्पती जमिनीवर, गोड्या पाण्यांत, खा-या पाण्यांत त्याचप्रमाणें उतळ व खोल पाण्यांत राहतात हें माहीत असल्यामुळें  पूर्वींच्या प्राण्यांचा व वनस्पतींचा अभ्यास करून निरनिराळे खडक झाले ते कोणत्या स्थितींत झाले हें कळणें सुलभ झालें आहे. पुर्वींच्या कोणत्या स्थितींत पृथ्वीवर काय फेरफार झाले असतील व त्या स्थितींत कोणते प्राणी व कोणत्या वनस्पती राहणें शक्य होतें याची नीट कल्पना येण्यास हल्लीं निरनिराळें फरक पृथ्वीवर कसे होतात, त्यांचीं कारणें काय व त्या फरकांचा परिणाम प्राणी व वनस्पतींवर काय होतो हें समजून घेतलें पाहिजे. कारण पूर्वींचीं कारणें व हल्लींचीं कारणें यामध्यें फरक होण्याचा संभव नाहीं, फक्त पूर्वींच्या कारणांचा जोर किंवा प्रगति यांमध्यें फरक झाला असेल. एवढें लक्षांत  ठेवलें म्हणजे हल्लीं पृथ्वीवर कोणत्या व कशा त-हेच्या घडामोडी होत आहेत हें समजून घेऊनच पूर्वीं घडून आलेल्या गोष्टीबद्दल अजमास काढणें रास्त होईल.

भूस्तरशास्त्रात जो पृथ्वीचा इतिहास दिला असतो तो पृथ्वीच्या कवचांतील खडकांत त्याविषयीं जो पुरावा मिळतो त्यावरून दिलेला असतो. सर्व ठिकाणीं सर्वच खडक व्यवस्थित रीतीनें व अनुक्रमानेंच सांपडतात किंवा त्यांतील अश्मीभूत पदार्थ सर्वच धड स्थितींत सांपडतातच असें नसल्यामुळें जसा पौराणिक काळचा इतिहास जुळविणें कठिण आहे तसेंच हा पृथ्वीचा इतिहास तयार करण्याचें काम कठिण आहे.

या कठिण व विस्तृत विषयाची नीट मांडणी करण्यास त्याचे प्रथमत: व्यवस्थित भाग पडून प्रत्येक भागाची निराळी मांडणी करणें जरूर आहे. ते भाग खालीलप्रमाणें आहते. १) प्रगतीचा इतिहास:– पहिल्या भागांत भूस्तरशास्त्राची ऐतिहासिक माहिती, त्याची वाढ, आजची स्थिती व त्या विषयाची वाढ घडवून आणून तींत प्रगति करण्यास कोणी मदत केली याची हकीकत येते. २) पार्थिव विश्वशास्त्र (कॉस्मिकल जिऑलजी) यांत पृथ्वीची उत्पत्ति तिचा सूर्याशीं व सूर्यमालिकेंतील इतर ग्रहांशीं  संबंध वगैरे माहिती येते. ३) घटनाशास्त्र (जिऑनॉसी) पृथ्वी कोणत्या पदार्थांची झालेली आहे, तिची हवा- पाणी हीं दोन वेष्टणें व त्याखालील खडकमय कवच, त्याचप्रमाणें पृथ्वीच्या उदरांत काय आहे यासंबंधाच्या कल्पना व विशेषत: पृथ्वीच्या कवच्यांत असणारे खनिज पदार्थ व खडक यांची सविस्तर माहिती या भागांत येते ४) भूस्तर – इतिहासांतर्गत गतिशास्त्र (डायनामिकल जिऑलॉजी) पृथ्वीच्या पाठीवर हल्लीं कोणत्या घडामोडी होत आहेत याची माहिती देऊन पूर्वींच्या काळीं खडक तयार कसे झाले, त्यांच्यांत पुढें बदल कसा झाला, समुद्राच्या ठिकाणीं जमीन आणि जमिनीच्या ठिकाणीं समुद्र हे फरक कसे होतात इत्यादि गोष्टींचा उल्लेख या भागांत येतो.

प्र ग ती चा इ ति हा स, व्याख्या:- पृथ्वीची उत्पत्ति ती प्रथमपासून आतापर्यंत कोणकोणत्या स्थितींतून गेली आहे व तिची हल्लींची स्थिति काय आहे त्याचप्रमाणें आतांपर्यंत पृथ्वीवर कोणत्या वनस्पती व कोणते प्राणी होऊन लयास गेले व त्यांच्यापैकीं हल्लीं कोणते अस्तित्वांत आहेत या सर्व गोष्टींचा समावेश भूतरशास्त्रात होतो. पृथ्वीचें कवच, त्यांतील खडक, खनिज द्रव्यें व अश्मीभूत पदार्थ (फॉसिल) यांच्या अभ्यासानेंच वरील माहिती मिळविलेली आहे.

मूळकल्पना:- शास्त्र या दृष्टीनें भूस्तराचा अभ्यास अठराव्या शतकाच्या शेवटीं सुरू झाला. फार प्राचीन काळीं, ज्वालामुखी पर्वत, धरणीकंप, ऊन पाण्याचे झरे, नद्याचे पूर इत्यादि गोष्टी लोकांच्या नजरेस येऊन त्यांच्यासंबंधीं माहिती गोळा करण्यास सुरवात झाली असली पाहिजे. समुद्र व नद्या यांच्या कांठीं सांपडणा-या दगडांवरून किंवा खणतांना व नांगरतांना दिसणा-या खडकांवरून निरनिराळ्या त-हेचे दगड असतात अशी कल्पना आली असली पाहिजे. त्याचप्रमाणें कांहीं अश्मीभूत हाडांचे मोठाले सांपळे जमीन खणतांना सांपडल्यामुळें पूर्वीं एके वेळीं राक्षसी प्राणी होऊन गेले व पृथ्वीवर ब-याच प्रकारचे प्राणी होऊन गेल्या असल्या पाहिजेत असें वाटणें साहजिक आहे. या सर्व कारणांमुळें फार प्राचीन काळीं सुद्धां पृथ्वी, वनस्पती व प्राणी यांच्या उत्पत्तीसंबंधानें लोकांनीं आपापले तर्क लिहून ठेवलेले आहेत.

ग्रीक व रोमन लोकांच्या कल्पना:– इसवी सनापूर्वीं ५०० वर्षें ग्रीसमध्यें पायथॅगोरसनें नद्यांच्यामुळें  कांहीं ठिकाणची जमीन वाहून जाऊन दुस-या ठिकाणीं उंचवटे तयार होतात व पृथ्वीच्या पोटांत पुष्कळ उष्णता आहे असें लिहून ठेवलें आहे. हिरोडोटस व अँरिस्टॉटल यांनां अश्मीभूत मासे माहीत होतें असें दिसतें. स्ट्रेबो (इ. स. पूर्वीं २० वर्षें) यानें असें लिहून ठेवलें आहे कीं, ज्वालामुखी पर्वतातून अश्मरस बाहेर पडत असतांना धरणीकंपाचे धक्के कमी होतात. प्लिनीनें खनिज द्रव्यें पैलूदार असतात असें दाखविलें. समुद्रशिंपा डोंगरावर सांपडतात म्हणून समुद्राचा तळ उचलला जाऊन पाण्याबाहेर येतो व जमिनीचा भाग समुद्राखालीं जातो ही कल्पना त्या वेळच्या लोकांनां होती. जीवनकलहाच्या चढाओढीसंबंधानेंहि त्या लोकांनीं विचार केला होता. खाणींतून सोनें, तांबें, शिसें, लोखंड काढण्यासंबंधाची माहिती तर बरीच जुनी आहे. इंग्लंडमधील कोळशाच्या खाणींचा शोध प्रथमतः रोमन लोकांनींच लावला.

दहा ते बारा शतकांतील अरबीं व इराणी लोकांच्या कल्पना:- इसवी सनाच्या दहाव्या शतकांत अरबस्तानांतील अंव्हिसेन्ना वगैरे विद्वानांनीं खनिज पदार्थांचें वर्गीकरण व उत्पत्ति यांवर बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे. १२ व्या शतकाच्या सुमारास इराणांतील कवी व ज्योतिषी ओमर खय्याम यानें जुन्या हिंदी व इराणी लोकांनीं काढलेल्या नकाशावरून समुद्र मागें पुढें कोठें सरकला याबद्दल आणि मध्य आशियातील क्षार झरे व दलदली यांची माहिती लिहिलेली आहे. परंतु त्यानें लिहिलेली माहिती कुराणांत लिहिलेल्या कांहीं गोष्टीविरूद्ध असल्यामुळें त्याला आपल्या चुका कबूल करण्यास सागितले म्हणून तो समर्कंदहून निघून गेला.

१५ व्या शतकाची माहिती:- ब्रिटनमध्यें १५ व्या शतकापर्यंत या   विषयासंबंधीं मुळींच कांहीं प्रगति झाली नाहीं असें म्हटलें तरी चालेल (धर्मोपदेशक वगैरे लोकांच्या मठांतून अश्मीभूत पदार्थांच्या माळा करीत असत यावरून हें पदार्थ गोळा करणें व त्याचा उपयोग करणें हें चालू होतें.) 'फॉंसिल' हा शब्द प्रथमत: विशिष्ट आकाराच्या कोणत्याहि खनिज पदार्थाला लावीत असत. परंतु १५ व्या शतकापासून हा शब्द प्रस्तरीभूत वनस्पती व प्राणी किंवा त्यांचे भाग यांनांच फक्त लावूं लागले.

१५ व्या शतकानंतरची माहिती:- १५ व १६ व्या शतकांत छापण्याची कला अवगत झाल्यामुळें सर्व बाबतींत लोकांची प्रगति होत होती. तरी भूस्तरशास्त्राच्या बाबतींत ग्रीक व रोमन लोकांच्यापेक्षां अधिक माहिती झालेली नव्हती. 'अश्मीभूत पदार्थ' हे कांहीं दैवी चमत्कार आहेत असें कित्येकांनां वाटे तर कांहींजण हे नोव्हाच्या पुरांत वाहून आलेल्या प्राण्यांचे भाग असावेत असें म्हणत. सोळाव्या शतकांत जार्ज अँग्रिकोलानें खनिज पदार्थांची बरींच माहिती गोळा करूंन 'डि री मेटॅलिका' नावाचें पुस्तक लिहिलें. याच पुस्तकांत त्यानें खनिज पदार्थ शोधण्याच्या दैवी यष्टीचें वर्णन दिलें आहे. याच सुमाराला स्वित्झर्लंडमधील कोनार्ड जेन्सर फ्रान्समधील बरनार्ड पॅलिसी यांनीं अश्मीभूत पदार्थासंबंधीं वर्णनात्मक माहिती लिहिलेली आहे. निरनिराळ्या खडकांच्या थरांचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यांत जार्ज ओवेन याला बरीच वरची जागा दिली पाहिजे. १५७० या सालांत त्यानें पेंब्रोकशायरची माहिती लिहिली; तींत कर्बयुक्त चुनखडी (कारबॉनिफेरस लाइम स्टोन) व शेजारच्या कोळशांच्या थरा (कोलमेझर) ची माहिती नमूद केलेली आहे.

सतराव्या शतकांत डेनमार्कमधील स्टेनो, इंग्लंडमधील जॉन ऑब्रे, मार्टिन लिस्टर, राबर्ट ड्यूक, राबर्ट प्लॉट, जॉन बुडवर्ड वगैरे मंडळींनीं खनिज पदार्थ, अश्मीभूत पदार्थ, खडक दाखविलेले देशांचे नकाशे इत्यादि गोष्टींची जमवाजमव करून शोध चालू ठेवले होते. १६९५ सालीं जॉन वुडवर्डनें 'पृथ्वीचा नैसर्गिक इतिहास' नावाचें पुस्तक प्रसिद्ध केलें. त्यांत फार बारकाईनें माहिती गोळा करून लिहून ठेविलेली आहे. दगडांतून अश्मीभूत प्राणी व वनस्पती सांपडतात यासंबंधानें त्याची फार चमत्कारिक कल्पना होती. तो असें म्हणतो कीं बायबलमध्यें महाप्रलय सांगितला आहे त्यावेळीं पृथ्वीच्या कवचाचे तुकडे होऊन पाण्यांत मिसळले गेले व नंतर त्यांचे थर खालीं बसले, त्यामुळें निरनिराळ्या प्राण्यांचे व वनस्पतींचे भाग अश्मीभूत झालेले दृष्टीस पडतात. यानेंच आपल्या नावाची एक प्रोफेसरशिप् केंब्रिज विश्वविद्यालयांत स्थापिली व येथेंच आपल्या जवळचा वस्तुसंग्रह ठेवला.

गणितशास्त्रज्ञ लिब्नीट्झनें १६८० सालीं जलोत्पन्न व अग्नुत्पन्न खडकांचें वर्णन प्रसिद्ध केलें. तो म्हणतो अग्न्युत्पन्न खडक पृथ्वीवरील खडकरस थंड होऊन झाले व पृथ्वी थंड होऊं लागली असतां वाफा थंड होऊन त्यांचा एक मोठा महासागरच झाला, त्यानंतर कवचांत भेगा पडून पृथ्वीच्या उदरांत पाणी शिरलें व तेथें जे थर झाले ते जलोत्पन्न खडक होत. टॉमस् बर्नेट व विल्यम व्हिटस्टोन वगैरे लोकांनीं पृथ्वीच्या उत्पत्तीवर पुस्तकें लिहिलीं परंतु तीं केवळ कल्पनातरंगांनीं भरलेलीं असल्यमुळें त्यांचें आतां महत्त्व उरलेलें नाहीं.

अठराव्या शतकांत इंग्लंडमध्यें जॉन स्ट्रॅची, बर्लिनमध्यें लेहमन, व्हेनिसमध्यें आर्डुइनो यांनीं पुष्कळ खडक, खनिज पदार्थ आणि अश्मीभूत पदार्थांचें वर्णन लिहून ठेविलें आहे. आर्डुइनोनें ट्रॅप ज्वालामुखींतून निघालेला असला पाहिजे असें म्हटलें आहे. स्वीडनमधील कार्ल लीनीयसनें खनिज द्रव्यें व अश्मीभूत पदार्थांचें वर्गीकरण केलें. गेटार्डनें (१७१५-१७८६) फ्रान्समधील खनिज पदार्थ व खडक यांचा नकाशा व त्याचप्रमाणें पश्चिम यूरोपचा खडक व खनिज पदार्थ दाखविणारा नकाशा तयार केला. विल्यम स्टकेली आणि जॉन मिचेल वगैरे लोकांनीं धरणीकंपावर निबंध प्रसिद्ध केले. जे. ए . डी न्यूक (१७२७-१८१७) ह्यानें भूस्तरशास्त्रावर मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला.

अठराव्या शतकाच्या शेवटीं शेवटीं दगडांच्या खाणींतून निघालेले अश्मीभूत पदार्थ गोळा करण्याचा लोकांनां फार नाद लागला होता. कोणी केवळ शोभेकरितां, कोणी व्यापाराकरितां व कोणी त्यांचा अभ्यास करण्याकरितां गोळा करीत. फ्रान्समधील मेस्ट्रिचजवळील सेंट पीटर डोंगरावर खणीत असतांना एका विशाल डोक्याच्या कवटीचा भाग आढळला, त्यावेळीं शेजारच्या किल्ल्यांत हाफमन हा वैद्यकीचें काम करीत असे, त्यास ही माहिती सांगितली व त्याला असल्या गोष्टींचा नाद असल्यामुळें  त्यानें मोठ्या प्रयासानें तो सांगाडा बाहेर काढला. या सांगाड्याचें महत्त्व लोकांनां इतकें वाटलें कीं जमिनीच्या मालकानें हाफमनवर फिर्याद लावून तो मिळविला. हल्लीं हा सांगाडा पॅरिसमध्यें आहे. हा मोसॅसॉरस जातीचा पाण्यांत पोहतां येणारा व सरसपटणारा प्राणी आहे. याची लांबीं सरासरीनें २५ फूट आहे.

१७७२ सालीं पॅलास नांवाच्या गृहस्थाला सैबेरियामध्यें लेना नदीच्या आसपास बर्फाच्छादित वाळूंत एका गेंड्याचें शव सांपडलें. त्याच्या अंगावर केंस होतें. १८०३ सालीं लेना नदीच्या कांठीं बर्फात एका विशाल हत्तीचें शव सांपडले. ह्याच्या अंगावरहि केंस होते व त्याचें मांस बर्फामुळें जसेंच्या तसेंच राहीलें होतें.

१७९० सालापर्यंत भूस्तरशास्त्रासंबंधीं कल्पनायुगच होतें असें म्हटलें तरी चालेल. कारण या शास्त्राचा खरा पाया १७९० ते १८३० सालापर्येंत वर्नर, हटन, विल्यम स्मिथसारख्यांनीं घातला व लॅमार्क आणि कुव्हिए यांनीं तो मजबूत केला.

बर्नर (१७४९-१८१७) हा एका खाणी तपासणाराच मुलगा होता म्हणून लहानपणापासून त्याला खनिज पदार्थ व खडकांचे तुकडे गोळा करण्याचा नाद होता. तो पुढे प्रीबर्गमध्यें खनिखोदनविद्येचा अध्यापक झाला. त्यानें आपल्या आवडत्या विषयावर पुष्कळ ग्रंथ लिहिले आहेत परंतु त्यानें ज्ञानाचा प्रसार विशेषतः विद्यार्थी तयार करून केला. मुळचे ग्रनाइट, नीस, मायका स्लेट इत्यादि खडकांची माहिती नीट रीतीनें मांडली. तसेंच सांक्रमिक (ट्रँझिशन) खडक आहेत व त्यांवर निरनिराळे अश्मीभूत पदार्थ असलेले खडकांचे थर आहेत, ते निरनिराळ्या काळीं तयार झालेले आहेत व म्हणून त्या प्रत्येकाला त्यानें रचना (फॉर्मेशन) हे नांव दिलें. त्याच्या एकंदर कामांत एक दोन दोष होते. त्याला एकावर एक थर ज्या पद्धतीनें आढळले त्या पद्धतीनें सर्व पृथ्वीवर असेच असले पाहिजेत हें गृहीत धरून त्यानें पृथ्वीवरील थरांची उपपत्ति लाविली. त्याचें असेंहि मत होतें कीं मूळ खडक (प्रिमिटिव्ह रॉक) खेरीज वरचे सर्व खडक ट्रॅप सकट जलोत्पन्न आहेत आणि म्हणूनच त्याच्या मताच्या लोकांनां 'नेप्चुनिस्ट' (वरूणभक्त) असें नांव पडलें. त्याची दुसरी चूक म्हणजे पृथ्वीच्या पोटांतील कोळशाचे थर जळावयास लागून ज्वालामुखी होतात ही त्याची कल्पना. परंतु खनिजशास्त्र मात्र त्यानें बरेंच नांवारूपास आणिलें.

जेम्स हटन् (१७२६-१७९७) यानें सन १७८५ मध्यें एडिवरोच्या रॉयल सोसायटीकडे 'पृथ्वी व तिच्या जमिनीची उत्पत्ति व विलय' या विषयावर एक निबंध लिहून पाठविला. खडकाचे जे थर पाण्याखालीं तयार झाले ते कठिण कशानें झाले, मूळचे थर सपाट असून ते नंतर ढाळल्यासारखे तिरपे, वाकडे वगैरे कशानें झाले या प्रश्नांचा त्यानें उहापोह केला व असें दाखविण्याचा प्रयत्न केला कीं पृथ्वीच्या आंतील उष्णतेमुळेंच या सर्व गोष्टी घडून येतात. या सिद्धांतामुळें त्याच्या मताच्या लोकांनां व्हल्कॅनिस्टस् किंवा प्लुटोनिस्टस् (अग्निभक्त) असें म्हणत. त्यानें असें सिद्ध करून दाखविलें कीं ट्रॅप व व्हिनस्टोन हे एकाच कारणानें झालेले आहेत; फरक एवढाच कीं ट्रॅप एकदम वर आला व व्हिनस्टोन मूळ दगडांतच शिरून तेथें व थांबला. जमीन नद्यांच्या योगानें वाहून जाते हेंहि त्यानें दाखवून दिलें. वर्नरपंथ व हटनपंथ यांमध्यें बरेच दिवस वादविवाद चालू होता पण शेवटीं बहुतेक लोक हटनपंथाकडे आले.

विल्यम स्मिथ (१७६९-१८३९) याला लहानपणापासून निरनिराळ्या मातींचा व खडकांच्या थरांचा अभ्यास करण्याचा नाद होता. मोठेपणीं इंग्लंडमधील निरनिराळ्या थरांचा फार बारकाईनें अभ्यास करून प्रत्येक थरांत कांहीं विशिष्ट अश्मीभूत पदार्थ असतात असें त्यानें दाखवून दिलें. बेंजामिन रिचर्डसनकडे तो एका वेळीं गेला असतां त्यानें अश्मीभूत पदार्थांचा संग्रह पाहिला व त्यांतील अश्मीभूत पदार्थ कोणत्या थरांत सांपडतात हें त्यानें सांगितलें. तें ऐकून रिचर्डसनला फार आश्चर्य वाटलें व त्यानें ही हकीकत टाऊनशेंडला सांगितली व त्यालाहि तसेंच आश्चर्य वाटलें. नंतर स्मिथच्या माहितीवरून निरनिराळ्या थरांतील अश्मीभूत पदार्थांची याद प्रसिद्ध करून ती इंग्लंड व इतर यूरोपमधील देशांत पाठविली परंतु या शोधाचें महत्त्व लोकांच्या लक्षांत येण्यास कांही वर्षें लागलीं. १८१५ सालीं स्मिथनें इंग्लंड, वेल्स व स्कॉटलंडच्या कांहीं भागाचे मोठाले नकाशे तयार करून त्यावर खडकांचे थर दाखविले. त्यानें इंग्लंडमधील खडक कोणाच्या अनुक्रमानें तयार झाले याची एक याद १८९९ सालीं व दुरूस्त केलेली याद १८१७ सालीं प्रसिद्ध केली. ही याद एक दोन ठिकाणाखेरीज अगदीं बरोबर आहे. स्मिथला इंग्लंडच्या भूस्तरशास्त्राचा जनक समजतात.यानें द्वितीय प्रस्तरा (सेकंडरी स्ट्रेटा) चे भाग निश्चत केले.

१८ व्या शतकाच्या शेवटीं फ्रान्समध्यें अश्मीभूत सेंद्रिय पदार्थांच्या अभ्यासाला जें विशेष महत्त्व आलें होतें तें लॅमार्क व कुव्हिए यांच्या कामामुळेंच आलें असें म्हटलें तरी चालेल. लॅमार्क (१७४४-१८२९) यानें 'फॉसिल' हा शब्द अश्मीभूत सेंद्रिय पदार्थाखेरीज इतरांना लावावयाचा नाहीं असा प्रघात पाडला. हा अश्मीभूत अपृष्ठवंशी प्राणिद्यास्त्राचा कर्ता म्हणण्याइतकी त्यानें त्या विषयाची संगतवार माहिती मिळविली. तो सेंद्रियवर्गाच्या विकासाचा पुरस्कर्ता होता. कुव्हियरनें (१७६९-१८३२) अश्मीभूत संपृष्ठवंशी प्राणिशास्त्राची माहिती एका ठिकाणीं करून त्याला व्यवस्थित स्वरूप दिलें. यानेंच प्रथमतः भूस्तरशास्त्र, विश्वरचनाशास्त्रांत गुरफटण्याचा संभव होता त्याने त्यांतून सोडविलें. ज्याप्रमाणें स्मिथनें द्वितीयप्रस्तरांचे (सेकंडरी स्ट्रेटांचे) भाग निश्चित केलें त्याप्रमाणें कुव्हियर व अलेक्झांडर ब्रॉन गिआर (१७७०-१८४७) यांनीं तृतीयप्रस्तरांचे (टरसिचर स्ट्रेटांचे) भाग निश्चित केले.

एकोणीसाच्या शतकाच्या सुरवातीला रसायशास्त्रवेत्ते व खनिजद्रवशास्त्रवेत्ते यांनां भूस्तरशास्त्राचें महत्व कळावयास लागल्यामुळें त्यांच्यापैकीं कांहीं जणांनीं लंडनमध्यें भूस्तरशास्त्रसंस्था (जिऑलॅजिक सोसायटी ऑफ लंडन) १८०७ सालीं स्थापन केली. तिचे १३ सभासद होते. १८०८ सालीं संस्थेचे उद्देश प्रसिद्ध केले. त्यांत असें म्हटलें आहे कीं भूस्तरशास्त्रेवतेत्तांनां एकमेकांची ओळख करूंन देणें, त्यांनां काम करण्यास उत्तेजन देणें, पारिभाषिक शब्द ठरविणें इत्यादि या संस्थेचे उद्देश आहेत. पारकिनसकडे अश्मीभूत प्राणिशास्त्र फिलिप्सकडे खडकांच्या थराची माहिती आणि ग्रीनोकडे सर्वसाधारण भूस्तरशास असे विषय असत. १८२५ सालपर्यंत या संस्थेस भूस्तरशास्त्रांत प्रवीण असलेले कॉनिबेयर, बकलंड, सेजनिक, लायल व मर्चिसनसारखे लोक येऊन मिळाले.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला भूस्तरशास्त्राविषयाचा विश्वविद्यालयांत शिरकाव झाला. डॉ.जॉन किड ऑक्सफोर्ड मध्यें १८०५ ते १८१० पर्यंत रसायनशास्त्राचा अध्यापक होता. त्याला भूस्तरशास्त्राची आवड असल्यामुळें  त्यानें त्या विषयावर व्याख्यानें देऊन बकलंड, कॉनियबेयरसारखे लोक तयार केले. केंब्रिजमध्यें हेन्स्लो व सेजबिक आणि एडिंबरोमध्यें राबर्ट जेमसन यांनीं भूस्तरशास्त्राला बरेंच महत्व आणिलें. अशाच त-हेनें काम फ्रान्समध्यें अलेक्झांडर ब्रॉनिआर इटलींत ग्रीस लॅक इत्यादी लोकांनीं केलें.

भूस्तरशास्त्राच्या द्दष्टीनें खडक दाखविणारे देशांचे नकाशे या वेळेपर्यंत फारच थोडे तयार होते. १८०९ सालीं अमेरिकेंतील संयुक्त संस्थानाचा जो मिसिलिपी नदीच्या पूर्वेकडील भाग आहे त्याचा एक नकाशा अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीनें प्रसिद्ध केला. तो विल्यम मॅक्लूरनें तयार केला होता. हें काम फार कठीण होतें. परंतु कोणत्याहि अडचणीला न जुमानतां सर्व देश फिरून खडकांचें बारकाईनें निरीक्षण करून हें काम त्यानें पार पाडलें. या नकाशांत प्राथमिक (प्रिमिटिव्ह), सांक्रमिक (ट्रँझिशन), द्वितीय (सेकंडरी) आणि जलोत्पन्न (अँल्युव्हियल) प्रस्तरन निरनिराळ्या रंगांनीं दाखविले आहेत. आयर्लंडचा अशा त-हेचा पहिला नकाशा ग्रिफिथनें १८१५ सालीं काढला व १८३८ सालीं तोच पूर्ण करून प्रसिद्ध केला. अश्मीभूत सेंद्रिय पदार्थांचा शोध इंग्लंडमध्यें जेम्स सावरबी व त्याचा मुलगा जेम्स दि कार्ला सावरबी, जर्मनींत बॅरनव्हान स्क्लाथील, गोल्ड फुज व काऊंट मन्सूर व इटलींत ब्रोची या लोकांनीं चालू ठेविले होते. त्याच प्रमाणें खाणी वगैरे खणतांना ज्या कांहीं गोष्टी द्दष्टीस पडत त्या वरच्यावर प्रसिद्ध होत असत. इंग्लंडमध्यें वोलॅस्टॉन (१७६६-१८२८) हा मोठा खनिजपदार्थशास्त्रज्ञ होऊन गेला. यानें स्फटिकांचे कोन मोजण्याकरितां गोनिआमिटर शोधून काढिला. जर्मनींत त्या वेळेचा सर्वांत मोठा भूस्तरशास्त्रज्ञ लिओपोर्ल्ड व्हान बुक् (१७४४- १८५३) यानें जर्मनीचा नाकाशा तयार केला. त्यानें याशिवाय स्कँडिनेव्हिया, इटली वगैरे देश हिंडून पुष्कळ माहिती मिळविली. त्यानें ज्वालामुखीसंबंधींच्या  माहितींत पुष्कळ भर टाकली. त्यानें कॅनेरी बेटावर जें पुस्तक लिहिलें आहे तें तर या बाबतीत विशेष महत्वाचें आहे.

जलप्रलय व भूगर्भशास्त्रः- इसवी सन १८२३ मध्यें वर्कलंडनें महाजलप्रलयावर (या प्रलयासंबंधीं बायबलमध्यें कांहीं विधानें केलेलीं आहेत) एक पुस्तक प्रसिद्ध केलें त्यांत त्यानें असें म्हटलें होतें की, जागजागीं सांपडणारी वाळू, रेती आणि गुहा द-यांतून सांपडणारे अश्मीभूत सेंद्रिय पदार्थ यांवरून एकेकालीं सर्व जग महाजलप्रलयानें व्याप्त झालें असावें. या त्याच्या म्हणण्यावर जॉन किडनें टीका केली, व पुढें बकलंड व त्याचप्रमाणें सेजविक या दोघांनींहि आपलें मूळ मत बदललें व ते असें म्हणूं लागलें कीं पूर्वीं कधीहि महाप्रलय झाला नाहीं असें नाहीं परंतु मोझेसनें सांगितल्यासारखा सर्व जगभर प्रलय झाल्याबद्दल भूस्तरशास्त्रद्दष्ट्या कांहीं आधार किंवा पुरावा नाहीं. सुराजनें बायबलमध्यें सांगितलेल्या महाप्रलयासंबधानें विस्तृत माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांत खालील हकीकत आहेः- हा जलप्रलय लोअर युफ्रेटीस भागांत झाला. त्यावेळीं सर्व मेसोपोटेमियाचीं मैदानें पाण्याखालीं बुडून जाऊन अत्यंत नुकसान झालें असलें पाहिजे. यांचें मुख्य कारण इराण्याच्या आखातांत किंवा त्याच्या दक्षिणेच्या बाजूस प्रथमतः धरणीकंपाचे लहान धक्के व नंतर एखादा भयंकर रीतीनें हादरून सोडणारा धक्का बसला असावा व याच्ययोगानें एखादें मोठें वादळ सुटून इराणच्या आखातांतींल पाणी मेसपोटेमियांत पसरलें असावें. हा प्रलय मेसोपिटोमियाच्या फारसा बाहेर गेला नसावा. कारण या वेळच्या इतर देशांच्या इतिहासांत कोठें आधार नाहीं. तेव्हां जगभर महाजलप्रलय झाला होता. असें म्हणतां येणार नाहीं.

स. १८३० पासून १८३३ पर्यंत चार्लस् लायलनें (१७९७-१८७५ ) भूस्तरशास्त्राचीं मूलतत्वें यावर तीन भाग प्रसिद्ध केले. त्यांत हल्लीं ज्या ज्या कारणामुळें पृथ्वीच्या पृष्ठावर फेरबदल होतात त्याच कारणानें पूर्वींच्या काळींहि पृथ्वीच्या पृष्ठावर फरक झाले असले पाहिजेत असें दाखवून सर्व गोष्टी कशा घडल्या हें समजावून सांगितलें आहे. हें तत्त्व १८२२ सालीं जर्मनींत व्हॉन हानें स्पष्ट सिद्ध करून दाखविलें होतें व त्याच्याहि पूर्वीं हटननें याच तत्त्वाचा पुरस्कार केला होता. लायलचें पुस्तक प्रसिद्ध झाल्यानें हें तत्त्व विशेष रीतीनें लोकांच्या पुढें आलें. वरील पुस्तकाचा जेव्हां पहिला भाग प्रसिद्ध झाला, त्यावेळीं त्यावर कडक टीका झालीं. कॉनिवेअर व सेजविक् यांचें म्हणणें असें पडलें कीं, हल्लींचींच कारणें पूर्वीं अस्तित्वांत असतील परंतु त्यांचा जोर किंवा गति हल्लींइतकीच असेल असें म्हणतां येत नाहीं. लायलनें १८३३ सालीं जेव्हां तिसरा भाग लिहिला तेव्हां त्यांत हल्लींचीं कारणें किंवा शक्ति सदा सर्वकाळीं हल्लींच्याच जोरानें किंवा गतीनें चालत असतील असें माझें म्हणणें नाहीं असें लिहिलें. अजून सुद्धां पृथ्वीपृष्ठांत फेरफार घडवून आणणा-या शक्ती पूर्वीं हल्लींच्याच गतीनें काम करीत होत्या किंवा नाहीं याबद्दल थोडा मतभेद आहे. लायलनें पृथ्वीवर वनस्पती व प्राणी यांचा कशा त-हेनें विस्तार होत गेला, पोटजाती कशा होतात, जुने प्राणी व वनस्पती कशा लय पावतात, वगैरेंविषयीं सुद्धां आपलीं मतें लिहून ठेविलीं आहेत. त्यानें खडकांच्या थरांचा अभ्यास करून-विशेषतः इंग्लंडमधील खडकांचा-त्यांचा अनुक्रम लाविला. लायलनें कार्बानिफेरस थरांच्या प्राचीन सर्व खडकांनां-मग त्यांनां थर असोत किंवा नसोत-प्राथमिक (प्रायमरी) खडक अशी संज्ञा दिली. सांक्रमिक (ट्रँझिशन) खडकांसंबंधीं तो म्हणतो कीं हे मूळचे अग्न्युत्पन्न खडक व अश्मीभूत पदार्थ ज्यांत आहेत असे खडक यांच्यामध्यें असतात. कांहीं देशांत या खडकांतून सुद्धां अश्मीभूत पदार्थ सांपडतात तरी त्यांचें सांक्रमिक नांव कायम ठेवून ते त्यांच्या खनिज द्रव्यावरून ओळखण्यास कांहींच हरकत नाहीं.

जेम्स डाना (१८१३-१८९५) हा संशोधक लायलसारखाच मोठा भूस्तरशास्त्रज्ञ होऊन गेला. हा अमेरिकेंत येल कॉलेजमध्यें भूस्तरशास्त्राचा व खनिजशास्त्राचा अध्यापक होता. त्यानें स. १८६३ मध्यें भूस्तरशास्त्रावर - विशेषतः अमेरिकेसंबंधाचा - एक ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याची चवथी आवृत्ति १८९५ सालीं त्याच्या ८२ व्या वर्षी निघाली. डाना हा मोठा भूस्तरशास्त्रज्ञ तर होताच पण त्याहिपेक्षां त्याची खनिजद्रव्यशास्त्रज्ञ ग्रंथ विख्यात आहे. तो प्रथमतः १८३७ सालीं प्रसिद्ध झाला व त्याच्या १८९२ पर्यंत ६ आवृत्त्या निघाल्या. त्याच्या उतारवयांत त्याला त्याच्या मुलाचें बरेंच साहाय्य झालें. हा ग्रंथ खनिजशास्त्रावर प्रमाण मानला जातो.

देशांची पहाणी व नकाशेः- भूस्तरशास्त्रदृष्ट्या जमिनीची थोडीशी पहाणी होऊन लहान लहान नकाशे ब-याच देशांत १८०० च्या सुमारास निघाले होते. परंतु जेव्हां मोजणी होऊन स्थलवर्णनात्मक मोठाले नकाशे तयार झाले तेव्हां निरनिराळ्या खडकांच्या सीमा, स्तरच्युती, खनिज द्रव्यें वगैरे नीट रीतीनें दाखवितां येऊं लागलीं. यामुळें जमिनीचे उभे छेद तयार केल्यामुळें या शास्त्राची प्रगति होण्यास पुष्कळ मदत झाली. १९ व्या शतकाच्या सुरवातीला जेव्हां त्रिकोणमितभूमापन ब्रिटनमध्यें सुरू झालें तेव्हां कर्नल कोल्बी हा त्याचा मुख्य अधिकारी होता. त्याला भूस्तरशास्त्राची आवड असल्यामुळें तो १८१४ सालीं लंडनमधील भूस्तरशास्त्रसंस्थेचा सभासद झ्ज्ञाला. त्यानें खडक कोठें बदलतील तें लिहून ठेवण्यास हाताखालील लोकांनां सांगितलें व मॅक्यूलॉकला आपल्या खात्यांतील भूस्तरशास्त्रज्ञ नेमला. मॅक्यूलॉकनें स्कॉटलंडचा नकाशा तयार केला. तो पुढें १८३५ मध्यें छापिला. पोट्रलॉकला १८२४ मध्यें आयर्लंडची मोजणी करण्यांकरितां नेमलें त्यालाहि भूस्तरशास्त्राची आवड असल्यामुळें थोड्या दिवसांत इतर भूमापनाबरोबर तेथें भूस्तर शास्त्राची सांगड जोडली गेली. इंग्लंडमध्यें डी ला बेच स्वतः डारसेट व डेव्हनचा नकाशा तयार करीत होता. त्याचें काम पाहून कर्नल कोल्बीनें त्याला सरकारी रीत्या नकाशे काढण्यास नेमलें. स. १८३५ मध्यें लायल भूस्तरशास्त्रसंस्थेचा अध्यक्ष होता. त्यानें बकलंड व सेजविक यांच्या मदतीनें भूस्तरशास्त्रदृष्टया व्यवस्थित पाहणी करणें किती महत्त्वाचें आहे हें लोकांच्या निदर्शनास आणिलें, त्यामुळें भूस्तरशास्त्रखातें निघून त्यावर डी ला बेच याला डायरेक्टर नेमिले.

हिंदुस्थानांत १८१८ मध्येंच त्रिकोणमित मापनखात्यांत एक भूस्तरशास्त्रज्ञ नेमिला होता. या खात्याचा पहिला अहवाल १८४९ सालीं बाहेर पडला परंतु १८५१ सालीं टॉमस ओल्डहॅमला डायरेक्टर नेमीपर्यंत त्या खात्याला व्यवस्थित स्वरूप आलें नव्हतें.

ऑस्ट्रिया- हंगेरींत भूस्तरशास्त्रखातें १८४९ सालीं निघालें व त्या देशाचा नकाशा १८६७ ते ७१ च्या दरम्यान प्रसिद्ध झाला. कांहीं देशांत सरकारी खातीं निघण्यापूर्वींच त्या देशाचे नकाशे लोकांनीं तयार केले होते. फ्रान्सचा नकाशा ब्रोचां डी व्हिलिय याच्या देखरेखीखालीं एली डी बोमां आणि डुफ्रेनी यांनीं तयार केलेला प्रख्यात नकाशा अशाच त-हेचा होता. जर्मनींत सुद्धां हिनरिच व्हॉन डेचेननें १८६९ सालीं जर्मनीचा नकाशा केला व व्हॉन गुंवेलनें बव्हेरियाचा नकाशा तयार केला, त्यानंतर तेथें भूशस्तरास्त्रखातें निघालें. रशियांत वेळोवेळीं नकाशे प्रसिद्ध झाले आहेत. १८४१ सालीं जनरल व्हॉन हेलमरसननें यूरोपांतील रशियाचा नकाशा तयार केला. स. १८४५ मध्यें मर्चिसन, डि व्हर्न्यूइल आणि व्हॉन केसरलिंग यांनीं यूरोपांतील रशिया व उरल पर्वताचें भूवर्णन छापिलें. त्यांत पुष्कळ नकाशे प्रसिद्ध केले.

नॉर्वे व स्वीडन देशांत स १८५८ मध्यें, स्वित्झर्लंडांत १८५९ मध्यें, फिन्लंडांत १८६५ सालीं व इटलींत १८६८ सालीं, भूस्तरशास्त्रखातीं सुरू झालीं. अमेरिकेंत मात्र १८२४ सालीं व व्यवस्थित रीतीनें हे काम सुरू झालें होतें; त्याचप्रमाणें जपानांत काम सुरू झालेल्याला बरींच वर्षें झालीं. साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांतहि भूस्तरपहाणीचें काम चालू आहे.

खडकांच्या थरांचा अनुक्रमः- १८३३ सालीं लायलच्या पुस्तकाचा तिसरा भाग बाहेर पडला. तोंपर्यंत कारबॉनिफेरस थरांच्या खालच्या खडकांचें वर्गीकरण कोणत्याच देशांत केलेलें नव्हतें. हें वर्गीकरणाचें काम सेजविक आणि मर्चिसन यांनीं केलें. या दोघांनीं इंग्लंड व वेल्स यांच्या दरम्यान १८३१ मध्यें हें काम सुरू केलें. सेज्विकनें कारनार व्हॉनच्या डोंगरी भागांत सुरवात करून तो मेरिओनेथ, माँटगॉमेरी व डेनबायपर्यंत आला. मर्चिसननें हिअरफर्डशायर व रॅडनॉरशायरच्या दरम्यान सुरवात केली व कारमॅरथेनपर्यंत तो आला. सेजविक व मर्चिसन यांनीं १८३५ त केंब्रियन व सायल्युरियन हीं दोन नांवें प्रघातांत आणिलीं. प्रथमतः या दोघांच्या संमतीनें असें ठरलें होतें कीं, वरच्या केंब्रियनमधील खडक खालच्या सायल्युरियनच्या खालीं असतात. परंतु पुढें कांहीं दिवसांनीं असें आढळून आलें कीं, सेदविकच्या वरच्या केंब्रियनमधील व मर्चिसनच्या खालच्या सायल्युरियनमधील कांहीं अश्मीभूत प्राणी अगदीं सारखे आहेत. तेव्हां प्रत्येक जण आपापलें नांव कायम करूं लागला व शेवटीं लॅपवनें या दोन्ही वादांच्या थरांनां आर्डोव्हिशियन हें नांव देऊन हा वाद मिटविला. प्री-केंब्रियन (केंब्रियनच्या पूर्वींचा) थरांत जरी कांहीं अश्मीभूत सेंद्रिय भाग सांपडतात तरी स्पष्ट अश्मीभूत सेंद्रिय पदार्थ केंब्रियनच्या तळाशीं येईपर्यंत सांपडत नाहींत.

क्रॉनिवेअर, बकलंड आणि लायल यांनीं जुना तांबडा वालुका प्रस्तर (ओल्ड रेड सँडस्टोन) कारबॉनिफेरसच्या खालचा आहे व तो कारबॉनिफेरसपासून अलग आहे असें ठरविलें होतें. मर्चिसननें १८३९ मध्यें असें लिहिलें कीं, जुन्या तांबड्या वालुका प्रस्तराचा मोठा विस्तार असल्यानें त्याचा एक निराळच भाग करावा. १८३६ मध्यें सेजविक व मर्चिसन यांनीं डेव्हनशायरमध्यें कारबॉनिफेरसच्या खालच्या खडकांमध्यें बारकाईनें तपास केला. त्यांत त्यांनां जुन्या तांबड्या वालुकाप्रस्तरांत सांपडणारे अश्मीभूत पदार्थ सांपडले त्यावरून ते खडक जुन्या तांबड्या वालुकाप्रस्तराच्याच वेळचे असले पाहिजेत असें त्यांनीं ठरविलें व त्यावेळच्या सर्व खडकांच्या डेव्होनियन असा भाग केला. कारबॉनिफेरस हें नांव ज्या थरांतून कोळसा सांपडतो त्या थरांच्या भागाला दिलेलें आहे. कारबानिफेरसच्या वरच्या खडकांच्या भागाला मर्चिसननें १८४१ त रशियांतील जुन्या परमिया राज्यावरून पर्मीयन असें नांव दिलें, कारण त्याला पर्मशेजारीं या भागाचे विशिष्ट असें अश्मीभूत पदार्थ सांपडले. पर्मीयनच्या वर जर्मनींतील बंटर, म्युस्चेलकाल्क व क्यूपर हे तीन थर आहेत. त्या तिन्हीं थरांनां १८३४ त फ्रीडरिच व्हॉन अल्बटी यानें ट्रायास असें नांव दिलें व हें नांव सर्वत्र उपयोगांत आलें. ट्रायासिकच्या वरच्या भागाला ज्युरॅसिक असें नांव दिलेलें आहे. ज्युरॅसिकच्या वर फ्रान्समध्यें चॉक (खडू) चे थर असल्यामुळें त्या भागाला फिटननें क्रिटेशियस हें नांव दिलें.

पूर्वीं टरशिअरी भागालाच केनीझोइक ही संज्ञा जॉन फिलिपनें दिली होती परंतु हल्लीं क्वाटरनरी भाग टरशिअरीपासून निराळा काढल्यामुळें हे दोन्ही भाग केनोझोइकमध्येंच येतात. टरशिअरी भागाचे खालपासून ईओसीन, ऑलिगोसीन, मायोसीन व फ्लायोसीन असे अनुक्रमें चार उपभाग आहेत. पूर्वीं १८२९ त लायल व देशायेज यांनीं ईओसीन, मायोसीन व फ्लायोसीन असें तीनच उपभाग केले होते. व त्यांतील मोलस्का जातीच्या अश्मीभूत प्राण्यांपैकीं हल्लीं जिवंत असणा-यांच्या प्रमाणावरून ती कोणता उपभाग हें ठरवीत असत, परंतु ही पद्धत बरोबर नाहीं असें स. १९०३ त डॉलनें दाखवून दिलें. ऑलिगोसीन हें नांव १८५४ त बेरिचनें इओसीनच्या वरच्या व मायोसीनच्या खालच्या थरांनां दिलें. फ्लायोसीनच्यावर असलेल्या खडकांनां प्लीस्टोसीन हें नांव लायलनें १८३९ सालीं दिलें. हल्ली प्लीस्टोसीन व सध्यां चालू असलेले खडकांचे थर हे सर्वच क्वाटरनरी किंवा पोस्ट टरशिअरी या भागांत येतात. पृथ्वीच्या पाठीवर विशेषतः यूरोप, आशिया व अमेरिकेच्या उत्तर भागांत जागजागीं सांठलेले दगड दिसतात, त्याचें कारण काय असावें हें कोणाला सांगतां येत नसे. कित्येकजण ते जलप्रलयामध्यें सांठलेले असावेत असेंहि म्हणत. हॉल, कॉनिबेअर, लायल, मर्चिसन वगैरे लोकांनीं घांसून रेघा उठलेले, खळगे पडलेले असे मोठाले खडक मूळ जागेपासून फार दूरवर नेलेलें पाहिले असल्याचें लिहून ठेवलेलें आहे. हे अशा त-हेचे दगड कोणत्या कारणानें सांठलें गेले हें प्रथमतः आगासिझनें शोधून काढलें. त्यानें स्वित्झर्लंडमधील हिमनद्यांचा तीन वर्षें अभ्यास केल्यावर हे जागजागीं सांठलेले दगड तपासले, तेव्हां हे दगड हिमनद्यांमुळें आलेले असावेत अशी त्याची खात्री झाली व पूर्वीं यूरोप, आशिया व अमेरिकेच्या उत्तर भागांत हल्लीं ग्रीनलंडमध्यें आहेत अशा त-हेच्या हिमनद्या असून त्यांच्याचमुळें हे जागजागीं सांठलेले दगड आले असावेत असें त्यानें सिद्ध केलें. ह्या त्याच्या म्हणण्याला सर ए. गीकीनें १८६३ त 'स्कॉटलंडमधील हिमनद्यांचा चमत्कार' (फिनॉमिना ऑफ दि ग्लेशिअल ड्रिफ्ट ऑफ स्कॉटलंड) या निबंधानें व प्रोफेसर जेम्स गीकी यानें १८७४ त लिहिलेल्या हिमयुग (दि ग्रेट आइस एज) या पुस्तकानें पुष्टीच मिळाली. हा आगासिझचा शोध भूस्तरशास्त्रांत फार महत्त्वाचा आहे.

अश्मीभूत पदार्थः- अश्मीभूत सेंद्रिय पदार्थांचा अभ्यास १९ व्या शतकाच्या पूर्वीं बरींच वर्षें सुरू झालेंला होता व १८३०-३२ पर्यंत या विषयासंबंधाची ऐतिहासिक माहिती यापूर्वींच दिलेली आहे तेव्हां या विषयामध्यें १९ व्या शतकांत जी भर पडली तिचीच, थोडक्यांत माहिती खाली दिली आहे.

अश्मीभूत सेंद्रिय पदार्थांच्या अभ्यासाला पॅलीआँटालाजी ही संज्ञा प्रथमतः १८३४ त फिशर डि वाल्डहीम व डी ब्लेनव्हिल यांनीं उपयोगांत आणिली. फ्रान्समध्यें आलसाईड डी ऑरबिग्नी (१८०२-१८५७) नांवाचा या शास्त्रांतील बिख्यात मनुष्य होऊन गेला. यानें स. १८४० पासून १८५७ पर्यंत फ्रान्समधील क्रिटेशियस व ज्यूरॅसिक अश्मीभूत पदार्थांवर आठ भाग प्रसिद्ध केले. इंग्लंडमध्यें ओवेननें (१८०४-१८९२) विशेषतः अश्मीभूत सरपटणारे प्राणी, पक्षी व सस्तन प्राणी यांच्या बाबतींत शोधाचें काम करून स. १८६० त पॅलीऑन्टालाजी नांवाचें पुस्तक छापिलें. जर्मनींत झिटेल (१८३९-१९०४) यानें स. १८९३ त ४ भागांत या विषयांवर प्रमाण मानतां येईल असें मोठें पुस्तक लिहिलें. अमेरिकेंत जेम्स हाल (१८११-१८८८) यानेंहि अशाच त-हेची मोठी कामगिरी केली.

ब्रिटनमध्यें पॅलीऑन्टालाजिकल सोसायटी स. १८४५ सांत स्थापली गेली. निरनिराळ्या देशांत अश्मीभूत पदार्थांवर जें काम झालें तें प्रसिद्ध झाल्यामुळें त्यांची तुलना होऊन कोणत्या भागांत कोणते अश्मीभूत पदार्थ असतात यावर बराच प्रकाश पडला. स. १८३१ त सेज्विकनें असें दाखवून दिलें कीं ज्या पाण्यांत खडकांचे थर तयार होतात तें पाणी खोल किंवा उथळ असेल त्या मानानें त्या पाण्यांतील वनस्पती व प्राणी बदलतील. या कारणानें समकालीन समुद्रांत वेगळ्या त-हेची वनस्पति व प्राणी सांपडणें सहाजिक आहे. ही स्थिति जरी खरी आहे तरी सुद्धां प्रत्येक काळांत कांहीं वनस्पती व प्राणी हे सर्व ठिकाणीं सांपडतात व त्यामुळेंच ह्या वनस्पती व प्राणी त्या काळच्या दर्शक होतात. तेव्हां खडकांचा कालानुक्रम ठरविण्यास त्यांचाच उपयोग विशेष होतो. हल्लीं खडकांचा अभ्यास दोन त-हांनीं करतात. त्यांच्यांत सांपडणा-या अश्मीभूत पदार्थांवरून त्यांचा कालनिर्णय करतात व त्यांच्यांतील खनिज पदार्थ व त्यांची रचना यावरून ते तयार होत असतांना भोंवतालची काय परिस्थिति होती व ते खोल पाण्यांत किंवा उथळ पाण्यांत तयार झाले वगैरे गोष्टींचा निर्णय करतात. खडकांचें कालानुक्रमाप्रमाणें एक कोष्टक विल्यम स्मिथनें प्रसिद्ध केलें होतें; त्यानंतर जीं पुष्कळ कोष्टकें प्रसिद्ध झालीं त्यांत यूजीन रेनेव्हियचें विशेष महत्त्वाचें आहे. परंतु कोणतेंहि कोष्टक पूर्ण त-हेनें सर्व देशांनां लागू पडणार नाहीं हें ध्यानांत ठेवलें पाहिजे.

प्राण्यांचा कालानुक्रमः- अश्मीभूत प्राण्यांच्या अभ्यासानें प्राण्यांचा कालानुक्रम ठरविलेला आहे. सर्वांत खालीं असलेल्या आर्कियन (जुन्या) खडकांत प्राण्यांच्या अस्तित्वाचा कांहींच पुरावा नाहीं. ग्रॅफाइट, टर्च व चुन्याचे दगड सांपडतात येवढ्यावरूनच त्यावेळीं सेंद्रिय पदार्थ होतें अशी अटकळ बांधणें शक्य आहे. परंतु वरच्या आर्कियन किंवा प्रीकेंव्रियन खडकांत मात्र प्राण्यांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. प्राण्यांचा पूर्ण अनुक्रम सांपडणें फार कठिण आहे, कारण कांहीं प्राण्यांचा कोणत्याहि त-हेचा अवशेष मागें न रहातां ते नाहींसें होणें साहजिक आहे. केंब्रियनमध्यें जेलिफिश होते याचा पुरावा १८९८ सालीं सी. डी. वाल्काटनें दाखविला. स्वीडनमधील आर्डोव्हिशियन खडकांत प्रोटोसायमेक्स नांवाचा जो किडा सांपडतो त्यापूर्वीं किड्यांचा अवशेष कोठें सांपडत नाहीं. सायल्यूरियनच्या काळांत झुरळें व कारबानिफेरसच्या काळांत ड्रेगनफ्लाय होते.

पाठीचा कणा असलेले प्राणी कणा नसलेल्या प्राण्यांच्या मागाहून आले. आगनाथा हे माशासारखे दिसणारे प्राणी कणा असलेल्या प्राण्यांत प्रथम झालेले असावेत. कणा नसलेल्या व असलेल्या प्राण्यांच्या मधील प्राणी सांपडलेले नाहींत. आगनाथा आर्डोव्हिशियनमध्यें सांपडल्याचा पुरावा आहे. सायल्यूरियनमध्यें पहिल्यानें मासे आहे. डेव्होनियनमध्यें इतके मासे सांपडतात कीं, त्याला 'मत्स्ययुग' च म्हणतात. परमियनला 'कच्छयुग', ज्यूरॅसिकला 'सरपटणा-या प्राण्यांचें युग,' टरशिअरीला 'सस्तर प्राणी व पक्षि युग,' व क्वाटरनरीला 'मनुष्ययुग' म्हणतात.

वनस्पतींचा कालानुक्रमः- अश्मीभूत वनस्पतींचा अभ्यास प्रथमतः फ्रान्समध्यें ब्रानगिआर्टनें, जर्मनींत स्टर्नबर्गनें व ब्रिटनमध्यें टिंडले व हटनें सुरू केला. सर्वांत जुन्या ज्या वनस्पतींच्या अवशेषाचा शोध लागतो व शेवाळाच्या जातीच्या होत्या. ए-हेनबर्ग (१७९५-१८७६) यानें प्रथमतः निरनिराळ्या खडकांतील सूक्ष्म सेंद्रिय पदार्थांचा अभ्यास केला त्यांत त्यानें डायटोमॅसी प्रकारच्या शेवाळाचा शोध लावला. आर्डोव्हिशियन व सायल्युरियन खडकांत लिकोपाड वनस्पती होत्या असें त्यानें लिहून ठेवलेलें आहे डेव्हानियन व लोअर कारबोनेशियसमध्यें पाण्यातील व जमिनीवरच्या वनस्पतींचे अवशेष सांपडतात, त्यांत लायकोपाड, हार्सटेल आणि अगदीं सुरवातीला असणारें फर्न तसेंच कॉर्डिएटस नांवाचे झांड हें विशेष महत्त्वाचें आहे. कारबानिफेरसच्या काळाला अँक्रोजेनयुग म्हणतात. व ह्या जातींचीं झाडें प्रमुख आहेत. पर्मियनमध्यें ग्लोसेप्टेरीज ट्रायासिकपासून क्रिटेशियस पर्यंत कांहीं विशेष महत्त्वाच्या प्राण्यांच्या अश्मीभूत अवशेषासंबंधीं माहिती दिली आहे. अर्जेंटाईन रिपब्लिकमध्यें टरशिअरी व क्वाटरनरी काळांतील खडकांत सस्तर प्राण्यांत राक्षसी मेगॅथेरियम व ग्लिप्टोडॉना सांपडले. हिंदुस्थानांतील शिवालिक डोंगरांत १८३१ सालीं जिराफच्या जातीचा शिवाथेरियम, फार मोठें कांसव वगैरे प्राण्यांचे अवशेष सांपडले. १८६० सालीं अडमिरल स्प्रॅटनें माल्टा बेटांत ठेंगणा हत्ती व छोट्या गेंड्याचीं हाडें खणून काढिलीं. अमेरिकेंतहि धिप्पाड प्राण्यांच्या शरीराचे भाग पुष्कळ ठिकाणीं खणून काढले. त्यांत ज्युरॅसिक काळांतील वनस्पत्याहारी ८० फूट लांब आहे. दांत नसलेल्या उडणा-या व सरपटत जाणा-या प्राण्यांचे पंख २० फूट लांब आहेत. बेल्जममध्यें १८३३-३४ सालीं म्यूजच्या खो-यांत लीजनजीक खणलेल्या गुहांत अस्वल, हत्ती व गेंडा यांच्या हाडाबरोबर माणसाचींहि हाडें सांपडलीं. माणसाचें अस्तित्व पृथ्वीवर केव्हां सुरू झालें हें कळण्यास त्याच्या हाडापेक्षां त्यानें तयार केलेलीं दगडीं हत्यारें वगैरे जास्त उपयोगी पडतात. १८५७ सालीं सर जॉन इव्हॅन्सनें असें दाखवून दिले कीं, १७९७ सालीं जॉन फ्रियरनें सफोकमध्यें सांपडलेल्या दगडी हत्यारांची चित्रें काढून त्यावर पुराणसंशोधनसंस्थेपुढें एक निबंध वाचला होता. सॉम नदीच्या कांठीं आमीन्स व अबेव्हीय या गांवानजीकच्या वाळूंत सांपडलेल्या गारेच्या हत्यारांचें वर्णन १८४९ सालीं बोच डी परथीज यानें प्रसिद्ध केलें. परथीजजवळचा संग्रह १८५८ सालीं पालकोनरनें पहिला तेव्हां त्यानें प्रेस्टविचला तो संग्रह पाहण्यास सांगितलें. १८५९ सालीं प्रेस्टविचनें हा संग्रह पाहिला व त्याचप्रमाणें ज्या ठिकाणीं हीं हत्यारें सांपडलीं त्या स्थलांचा तपास करून हीं पूर्वकालीन माणसांचींच असलीं पाहिजेत अशी खात्री त्यानें करून घेतली. त्याच वेळेपासून असल्या हत्यारांच्या शोधाला खरी सुरवात झाली. गोळा केलेल्या पुराव्यावरून पृथ्वीवर मनुष्य केव्हां अस्तित्वांत आला त्या वर्षांची गणति सांगतां येणार नाहीं. परंतु तो फ्लीस्टोसीन किंवा फ्लायोसीन काळांतच प्रथमतः अस्तित्वांत आला असावा असें वाटतें.

सर्वांत जुने व रूपांतर पावलेले खडकः- पृथ्वीच्या कवचांतील सर्वांत खालीं असलेले जे खडक आहेत त्यांत ग्रॅनाइट, नीस, शिस्ट वगैरे मुख्य आहेत; त्यांचें मूळ स्वरूप बदललें आहे. हें बदलण्याचें कारण काय याबद्दल प्रथमतः भूगर्भशास्त्रवेत्त्यांत बराच वाद होता परंतु आतां सर्वांनुमतें असें ठरलें आहे कीं, खडकांचें रूपांतर पृथ्वीच्या कवच्याची जी हालचाल होते तीमुळें किंवा खालून खडकांचा उष्ण रस मध्येंच जागजागीं शिरल्यामुळें होतें. सेजविकनें १८३५ सालीं असें सिद्ध केलें कीं मूळच्या शेतखडकावर फार जोराचा दाब बसून कळपे निघतील अशा त-हेच्या पाट्यांचा खडक तयार झाला. पृथ्वीवरील कवचाचा कांहीं भाग उचलला जाऊन जेव्हां पर्वंत तयार होऊं लागतात त्यावेळीं उत्पन्न होणा-या दाबामुळें कळपेदार नीस किंवा शिस्ट जातीचे खडक मूळ खडकाचें रूपांतर होऊन होतात.

पा र्थि व वि श्व शा स्त्र, (कॉस्मिकल जिऑलजी).- यूरोपखंडांत भूस्तरशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरवात झालीं त्यावेळीं पृथ्वीच्या व जगाच्या उत्पत्तीबद्दलचे विचार ग्रथित करणें अवश्य समजलें जात असे, इतकेंच नाहीं तर उत्पत्तीसंबंधींच्या केवळ कल्पना होत्या, तरी त्यांनां याविषयीं विशेष महत्त्व दिलें जात असे. पुढें हटन व त्याच्याच सारख्या मताचे लोक असें म्हणू लागले कीं, पृथ्वीवरील खउकांच्या व त्यांतील अश्मीभूत प्राणी व वनस्पती यांच्या अभ्यासानें पृथ्वीची सुरवात कशी झाली व तिचा अंत कसा होईल याबद्दल कल्पना येण्यासारखी माहिती मिळण्याचा संभव नसल्यामुळें भूस्तरशास्त्रांत वरील विवेचनाचा अंतर्भाव करूं नये. याचा परिणाम असा झाला कीं पृथ्वीच्या उत्पत्तीचा भूस्तरशास्त्राशीं बिलकुल संबंध नाहीं व त्याचा उल्लेख सुद्धां भूस्तरशास्त्रांत करण्याचें कारण नाहीं असें वाटण्यापर्यंत मजल येऊन पोहोंचली. पहिला पंथ एका टोंकास तर दुसरा अजीबात दुस-या टोंकाला गेला परंतु शेवटीं हीं दोन्हीहि टोंकें सोडून हल्लीं त्याच्यामधली स्थिति स्वीकारली जाते. सध्यां पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधाच्या वादविवादाला भूस्तरशास्त्रांत फारसें महत्त्व देत नाहींत परंतु ज्योतिष किंवा इतर शास्त्रें यांनीं पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल शोध लावून जी मतें प्रस्थापित केलीं आहेत तीं देण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीला अनुसरूनच पुढें पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दलची थोडक्यांत माहिती दिली आहे.

कांट व लाप्लास यांनीं दिलेल्या उपपत्तीप्रमाणें अगदीं प्रथमतः सूर्यमालिकेंतील सर्वांत दूरचा ग्रह आहे, त्याच्या कक्षेपर्यंत सूर्याचा विस्तार होता व तो प्रज्वलित वायुमय असावा. नंतर हा वायुमय गोल थंडावूं लागून त्याच्या अगदीं बाहेरच्या बाजूस वलयाकार भाग मूळ गोलापासून अलग झाला व या वलयाचीं शकलें होऊन तीं इतक्या जोरानें एका ठिकाणीं झालीं कीं, त्यापासून उत्पन्न होणा-या उष्णतेनें एक नवीनच वायुमय व अति उष्ण गोल तयार झाला व तो आपल्याभोंवतीं व मूळ गोलाभोंवतीं आपल्या कक्षेंत फिरूं लागला. याचप्रमाणें सूर्यमालिकेंतील सर्व ग्रह झाले व हल्लींचा सूर्य मूळच्या गोलांपैकीं राहिलेला प्रज्वलित भाग आहे. प्रत्येक ग्रह थंड होऊन हल्लींची त्यांचीं स्थिति त्यांनां आलेली आहे. ग्रहांची उष्णता कमी होऊं लागून त्यांच्यातूनहि कांहीं ठिकाणीं वलयें निघून पुढें त्यांचे चंद्र झाले. हे चंद्र ज्या ग्रहांपासून झालें त्यांच्याभोंवतीं सध्यां ते फिरत आहेत. आपल्या पृथ्वीभोंवतीं फिरणारा चंद्रहि याचप्रमाणें झाला असला पाहिजे. खालीं दिलेल्या प्रमाणांवरून वरील उपपत्ति बरोबर असावी असें वाटतें. (१) दुर्बीण, स्पेक्ट्रास्कोप यांच्या साहाय्यानें सूर्य व इतर तारे यांच्यावर, पृथ्वीवर सांपडणारे पदार्थ आहेत असा शोध लागलेला आहे व पृथ्वीवर ज्या धातू सांपडतात त्या सूर्यावर वायुरूपांत आहेत असें सिद्ध झालेलें आहे. (२) सूर्यमालिकेंत पृथ्वीच्या बाहेर असलेल्या ग्रहांचें गुरूत्वमापन पृथ्वीपेक्षां कमी व जे पृथ्वी व सूर्य यांच्या दरम्यान आहेत त्यांचें गुरूत्वमापन पृथ्वीपेक्षां जास्त आहे. (३) पृथ्वी प्रथमतः वायुरूप असून नंतर हल्लींची स्थिति तिला प्राप्त झालेली असावी व मध्यें तिचा वरचा भाग मऊ स्थितींत असतांना ध्रुवापाशीं ती चपटी झाली असावी. (४) पृथ्वीच्या उदरांत अजून इतकी उष्णता आहे कीं त्या उष्णतेंत कोणताहि पदार्थ-खडक वगैरे सुद्धां-पातळ किंवा वायुमय राहूं शकेल. (५) पूर्वीं चंद्र हल्लींपेक्षां पृथ्वीच्या पुष्कळ जवळ होता व आतां तो २४००० मैल दूर गेला आहे व पूर्वीं तो पृथ्वीच्या जवळ असल्यामुळें पृथ्वीवर त्याचा जितका परिणाम होत असेल तितका हल्लीं होत नाहीं कांहीं जणांच्या मतें वरील प्रमाणावरून तेजोमेघोपपत्ति सिद्ध होतें असें म्हणणें बरोबर नाहीं. परंतु एकंदरींत यापेक्षां अधिक सोपपत्तिक उपपत्ति नसल्यामुळें हीच प्रमाण धरली आहे.

कवचें:- पृथ्वीचीं तीन कवचें आहेत. सर्वांत बाहेरचें कवच वायुमय असून त्याचें विशिष्टगुरूत्व सर्वांत कमी आहे. मधलें कवच पाण्याचें असून त्याचें विशिष्टगुरूत्व हवेपेक्षां जास्त व खडकापेक्षां कमी आहे. खडकाचा भाग अगदीं सपाट नसल्यामुळें एकचतुर्थांश भूपृष्ठ पाण्यावर आहे, नाहीं तर पाण्याचें वेष्टण सर्व पृथ्वीवर असतें. पृथ्वीच्या पृष्ठावरील खडकांचें सर्वसाधारण विशिष्टगुरूत्व २.५ म्हणजे हवेच्या व पाण्याच्यापेक्षां जास्त आहे परंतु सर्व पृथ्वीचें विशिष्टगुरूत्व साडेपांच आहे; म्हणजे पृथ्वीच्या उदरांत जसजसें खोल जावें तसतसें अधिक विशिष्टगुरूत्वाचे पदार्थ असले पाहिजेत. हवा, पाणी व जमीन अशीं तीन कवचें आहेत म्हणून सांगितलेंच आहे. त्याचा अर्थ हीं तिन्हीं अगदीं तुटक व भिन्न आहेत असें नाहीं कारण हवेंत पाण्याचा अंश, मातीचे व क्षारांचे कण आणि सूक्ष्म जंतू असतात; पाण्यांत हवा व क्षार पदार्थ विरघळलेले असतात आणि त्याचप्रमाणें खडकांत वायु व पाणी शोषून घेतलेले सांपडतात. तिन्ही कवचांची सर्वसाधारण माहिती भूपृष्ठवर्णनांत दिलेली आहे, म्हणून भूस्तरशास्त्राला महत्त्वाची व तेथें न दिलेली माहितीच येथें दिली आहे.

हवेचें कवचः- पृथ्वीच्या तीन कवचांपैकीं सर्वांत बाहेरचें कवच हवेचें आहे. यामध्यें साधारणतः शेंकडा ७९ भाग नत्र (नायट्रोजन), २१ भाग प्राण (ऑक्सिजन), ७.०४ भाग कर्बद्विप्राणिद (कार्बन डाय-ऑक्साईड) आणि अचेष्ट (आरगन), न्यून (निआन) यासारख्या वायूंचे थोडथोडे अंश असतात, त्याचप्रमाणें शेंकडा १.४ भाग पाण्याची वाफ असते. पृथ्वीवरील घनपदार्थांचे बारीक कणहि नेहमीं हवेंत सांपडतात. हवेंतील वायूंची नेहमीं हालचाल चालू असल्यामुळें त्याचा पाण्यावर व खडकावर भूस्तरशास्त्रदृष्ट्या पुष्कळ परिणाम होतो. या परिणामासंबंधींची माहिती पुढें दिलेली आहे. हवेचा थर पृथ्वीभोंवतीं असल्यामुळें दिवसां सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून जो ताप झाला असता तो होत नाहीं व रात्रींच्या वेळीं प्रखर थंडी पडली असती तीहि पडत नाहीं.

पाण्याचें कवचः- हवेच्या खालीं पृथ्वीवर पाण्याचें कवच आहे. खडकाचें कवच सपाट नसल्यामुळें कांहीं भाग पाण्यावर आला आहे. परंतु पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्यानेंच व्यापिलेला आहे. सर्व उपसागर व समुद्र एकमेकांत जोडले गेले असल्यामुळें एकच मोठीं समुद्रसपाटी झालेली आहे.

समुद्रसपाटीः- जमिनीचा पृष्ठभाग उंच सखल आहे परंतु समुद्राचा पृष्ठभाग सपाट आहे. जमिनीवरील उंच सखल भाग व समुद्राची खोली समुद्राच्या पृष्ठभागापासून मोजतात, म्हणजे कोणताहि भाग उंच किंवा खोल किती आहे हें सांगावयाचें झाल्यास तो समुद्रसपाटीपासून किती उंच किंवा खोल आहे हें सांगतात म्हणून समुद्रसपाटी म्हणजे काय याचा नीट कल्पना येणें जरूर आहे. समुद्राचा पृष्ठभाग दिसतो तितका सपाट नाहीं. पृथ्वी वाटोळी असल्यामुळें समुद्राचा पृष्ठभाग पृथ्वीच्या पृष्ठभागाप्रमाणें वांकलेला आहे. त्याचप्रमाणें समुद्राचा पृष्ठभाग सर्व ठिकाणीं पृथ्वीच्या मध्यपासून समांतरहि नाहीं. ज्याप्रमाणें पृथ्वीच्या मध्यबिंदूकडे सर्व पदार्थ ओढले जातात त्याचप्रमाणें जमिनीच्या मोठ्या भागाकडेहि ओढले जातात. या कारणामुळें जमिनीशेजारीं विशेषतः डोंगराच्या बाजूवर समुद्राचा पृष्ठभाग उंच झालेला असतो म्हणजे तो समुद्रपृष्ठाचा भाग इतर भागापेक्षां पृथ्वीच्या मध्यापासून दूर असतो. हिंदुस्थानांत कराची शेजारीं असलेला समुद्रपृष्ठभाग लंकेशेजारी असलेल्या समुद्रपृष्ठापेक्षां ३०० फूट उंच म्हणजे पृथ्वीच्या मध्यापासून दूर आहे, आणि याचें कारण कराचीच्या बाजूला हिमालय पर्वताच्या आकर्षणाचा जो परिणाम होतो तो लंकेकडे होत नाहीं हें होय. याशिवाय आणखी कित्येक कारणें आहेत कीं त्यामुळें समुद्रसपाटी पृथ्वीच्या मध्यबिंदूपासून सर्व ठिकाणीं व सर्व काळीं समांतर रहात नाहीं; त्यापैकीं कांहीं महत्त्वाचीं कारणें येथें दिलीं आहेत.

कांही ठिकाणीं समुद्राचा तळ खालीं खचतो व त्यामुळें समुद्रसपाटी खालीं जाते. उत्तर व दक्षिण ध्रुवाकडे नेहमीं बर्फाचे डोंगर असतात. कित्येक वेळां समुद्रांतील पाणी ध्रुवाकडे गेल्यावर नेहमींप्रमाणें परत न येतां घट्ट होऊन तेथेंच राहते व समुद्रपृष्ठभाग खालीं जातो तर कित्येक वेळां जितकें पाणी ध्रुवाकडे जातें त्यापेक्षां पुष्कळच पाणी बर्फ वितळून समुद्रांत येतें व त्यामुळें समुद्रपृष्ठभागाची उंची वाढते. नद्या, नाले यांच्या योगानें जमिनीवरून वाहून नेलेली वाळू व गाळ समुद्रांत सांठून त्यांचे मोठाले थर होतात व त्यायोगानें समुद्राचा पृष्ठभाग सहाजिकच उंच होतो. वर सांगितलेल्या कारणांचे एकमेकांवर विरोधी परिणाम होतात व जे होतात ते बहुतेक जमिनीच्या हालचालीनें होतात म्हणून व समुद्रपृष्ठासारखें उंची मोजण्यास मोठ्या प्रमाणावर दुसरें सोयीचें साधन नसल्यामुळें समुद्रसपाटीपासून उंची व खोली मोजतात.

खडकाचें कवचः- पृथ्वीवर खडकाचें एक घट्ट व कठिण कवच असून त्याच्या आंत खडकाचा पातळ रस आहे व हे दोन्ही भाग निरनिराळे आहेत अशी पूर्वीं समजूत असे. वरील कठिण कवच दहा, पंधरा किंवा वीस मैल जाडीचें असावें अशी कल्पना होती. हल्लीं आंतील भाग पूर्ण पातळ व वरील भाग त्यापासून अगदीं तुटक अशी समजूत नाहीं. वरील भाग खालच्या भागांत न कळेल अशा त-हेनें बदलला जातो तेव्हां वरील भाग निराळा समजणें रास्त नाहीं. परंतु सोयीसाठीं पृथ्वीवरील थंड व घट्ट असे जे खडकाचे थर आहेत, व ज्यासंबंधाची माहिती मिळविणें मनुष्याला शक्य आहे त्या सर्व थरांनां पृथ्वीच्या खडकांचें कवच अशी संज्ञा हल्लीं प्रचारांत आहे. भूस्तरशास्त्रांत या कवचांतील खडक, व त्यांची घडामोड वगैरे विषयांचाच विशेषतः विचार केला असतो व ती माहिती पुढें दिली आहे. परंतु या कवचाच्या खालीं पृथ्वीच्या उदरांत कशा त-हेचे पदार्थ आहेत व ते कोणत्या स्थितींत आहेत हेंहि समजणें जरूर आहे. म्हणून त्यासंबंधीं शास्त्रीय लोकाचें काय म्हणणें आहे याचा थोडक्यांत विचार करूं.

पृथ्वीचें विशिष्टगुरूत्व ५.५ आहे व कवचांतील खडकांचें सर्वसाधारण विशिष्टगुरूत्व २.५ आहे; यावरून पृथ्वीच्या उदरांत जास्त विशिष्टगुरूत्वाचे पदार्थ असले पाहिजेत किंवा जे पदार्थ वरच्या कवचांत आहेत तेच आंत असून फक्त ते फार दाबाखालीं असल्यामुळें त्यांचें विशिष्टगुरूत्व जास्त झालें असलें पाहिजे. सूर्याच्या हल्लींच्या स्थितीवरून व सूर्य मालिकेंतील ग्रहांच्या विशिष्टगुरूत्वांत दिसून येणारे फरक यावरून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थांपेक्षां पृथ्वीच्या उदरांतील पदार्थ जास्त विशिष्टगुरूत्वाचे असावेत असेंच बरोबर दिसतें. सूर्यमालिकेंतील सर्वांत बाहेरच्या ग्रहांचें विशिष्टगुरूत्व कमी आहे व अगदीं सूर्याच्या जवळ असलेल्या ग्रहांचें विशिष्टगुरूत्व जास्त आहे, तेव्हां पृथ्वीवर सुद्धां आंतील पदार्थ बाहेरच्या व वरच्या पदार्थांपेक्षां जड असणेंच जास्त संभवनीय आहे. त्याचप्रमाणें पृथ्वी एकेवेळीं वायुरूप असून नंतर द्रवरूप होऊन तिला हल्लींची स्थिति आली आहे हें जर खरें असेल तर हलक्या व जड पदार्थांचे थर वर सांगितल्याप्रमाणेंच झालें पाहिजेत. हल्लीं पृथ्वीच्या उदरांत द्रव पदार्थ असल्यास निरनिराळ्या ज्या हालचाली होतात त्यामध्यें सुद्धां हलके पदार्थ वर येणें व जड पदार्थ पृथ्वीच्या मध्यबिंदूकडे जाणें याच क्रिया चालू असल्या पाहिजेत. निरनिराळ्या विशिष्टगुरूत्वाचे पदार्थ पृथ्वीच्या उदरांत असल्यामुळें त्याचा परिणाम पृथ्वीच्या पृष्ठावरहि दृष्टीस पडतो. उत्तरगोलार्धापेक्षां दक्षिणगोलार्धांत जड पदार्थ जास्त असल्यामुळें त्या गोलार्धांत पाणी ओढलें जाऊन तो भाग बहुतेक जलाच्छादित आहे. आर्चडिकन प्रॅट यानें एका ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं पॅसिफिक महासागराचा तळ व पृथ्वीचा मध्यबिंदु यांच्यामध्यें असेंच कांहीं जड पदार्थ असले पाहिजेत कीं त्यामुळें या महसागराचें पाणी दुसरीकडे वाहून जात नाहीं. त्याचप्रमाणें जेथें मोठाले पर्यत आहेत त्यांच्या खालीं हलक्या पदार्थांचाच सांठा विशेष असला पाहिजे. वरील विवेचनावरून पृथ्वीच्या उदरांतील पदार्थांचा व पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मांडणीचा कसा संबंध आहे हें सहज लक्षांत येईल.

पृथ्वीच्या उदरांतील उष्णता:- पृथ्वीच्या उदरांत फार उष्णता आहे यासंबंधाचीं पुष्कळ प्रमाणें दाखवितां येतील. पृथ्वीवर जे ज्वालामुखी आहेत त्यांच्या तोंडांतून कढत वाफा व खडकांचा रस येतो. पृथ्वीवर ज्वालामुखी पुष्कळ ठिकाणीं असतात व पूर्वकाळीं ज्वालामुखीमुळें झालेले खडक लक्षांत घेतल्यास त्यांचा संबंध स्थानिक नसून सर्व पृथ्वीवर आहे व त्यांच्या योगें दृष्टोत्पत्तीस येणारी उष्णता ती पृथ्वीची अंगभूत उष्णता आहे असेंच म्हटलें पाहिजे.

कढत पाण्याचे झरे शतकेंच्या शतकें पृथ्वीवर कित्येक ठिकाणीं आहेत; त्यांपैकीं कांहीं चालू असलेल्या किंवा सुप्त ज्वालामुखीशेजारीं आहेत परंतु इतर ज्वालामुखीपासून पुष्कळ अंतरावर आहेत. या झ-यांचें पाणी खोल जाऊन वर येण्यापूर्वीं पृथ्वीच्या उष्णतेनें तापतें.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर खणून खोल गेल्यावर पृष्ठापेक्षां जास्त व कित्येक वेळां कमी उष्णता होत गेल्याचें आढळतें. परंतु ६०-८० फुटांपेक्षां खोल गेल्यास जसजसें खोल जावें तसतशी जास्त जास्त उष्णता होत जात आहे असेंच नेहमीं आढळून येतें. साधारणतः हवेंतील उष्णतेचें फेरफार जितक्या खोल जाऊं शकतात त्याच्या पलीकडे प्रत्येक ५०-६० फूट खालीला १० अंश उष्णता वाढते. लार्ड केल्व्हीननें असा हिशोब केला आहे कीं, पहिल्या एक लक्ष फूट खोलीपर्यंत दर ५१ फुटांनां एक डिग्री उष्णता वाढेल व पुढें आठ लक्ष फुटांपर्यंत दर २५५० फुटांनां एक डिग्री व त्यानंतर फार थोड्या प्रमाणांत उष्णता वाढत जाईल.

पृथ्वीच्या उदरांतील पदार्थ कोणत्या स्थितींत आहेत यासंबंधानें पुष्कळ निरनिराळ्या कल्पना आहेत; त्यांपैकीं खालील तीन महत्त्वाच्या असल्यामुळें त्यांचाच फक्त विचार केला आहे. (१) पृथ्वीच्या उदरांत द्रवस्थितींत सर्व पदार्थ असून त्यावंर घन पदार्थांचा एक पातळ थर आहे. (२) कांहीं किरकोळ भाग खेरीजकरून पृथ्वीच्या पृष्ठापासून मध्यापर्यंत घनच आहे. (३) अगदीं वर घन पदार्थांचा थर, त्याच्या खालीं द्रवपदार्थांचा थर व त्याच्याहि खालीं मध्याजवळ वायूचा भाग आहे. हे तिन्ही भाग अगदीं तुटक नसून एक स्थिति संपून दुसरी स्थिति कोठें सुरू होतें हें लक्षांत न येईल इतक्या त-हेनें ते एकमेकांत मिसळलेले असले पाहिजेत.

पृथ्वीच्या आंत पदार्थ द्रव स्थितींत आहेत असें ज्या संशोधकांचें म्हणणें आहे त्यांची भर खालील प्रमाणावर आहे. जसजसें पृथ्वीच्या मध्याकडे जावें तसतशी उष्णता वाढत जाते. वीस मैल खोलीवर १७६० अंश व ५० मैल खोलीवर ४६०० उष्णता आहे. इतकी उष्णता असतांनां कोणतेही पदार्थ घन स्थितींत राहूं शकणार नाहींत. सध्यां जो पृथ्वीवरील ज्वालामुखींतून खडकाचा रस बाहेर येतो त्याचें पृथक्करण केल्यास सर्व ठिकाणच्या रसांत पुष्कळ साम्य आहे असें आढळतें. अशा त-हेचा रस पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांत आज लाखों वर्षें बाहेर येत असल्यामुळें त्याचें मूळ पृथ्वीच्या उदरांतील रसच असला पाहिजे असें वाटतें. पृथ्वीवर धरणीकंपाचे धक्के वरच्यावर बसतात याचें कारण वरील कवच फार जाड नाहीं हेंच असण्याचा संभव आहे. जमीन कित्येक ठिकाणीं उचलली जाते व दुस-या बाजूस खचते असले प्रकार सुद्धां, पृथ्वीच्या उदरांतील पदार्थ द्रव स्थितींत आहेत असें समजल्याखेरीज नीट समजत नाहींत.

भूस्तरशास्त्रवेत्त्यांच्या दृष्टीनें वरील सिद्धांत बरोबर आहे परंतु कांहीं पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ म्हणूं लागले कीं, पृथ्वी आंतपर्यंत घनच आहे, व त्यांचें म्हणणें बरोबर आहे असें कित्येक भूस्तरशास्त्रज्ञानाहि वाटूं लागलें होतें. कांहीं जणांनीं या दोन्ही मतांचा मध्य काढून असें प्रतिपादन केलें कीं, कवचाची उष्णता कमी असल्यामुळें तें घन आहे व पृथ्वीचा मध्य जरी अति उष्ण आहे तरी तो फार दाबाखालीं असल्यामुळें घन राहिला आहे व दोन भागांच्या मध्ये एक द्रव पदार्थांचा पट्टा आहे; कारण तेथें पदार्थ पातळ असण्याइतकी उष्णता आहे व द्रवांनां घन करण्याइतका दाबहि नाहीं. परंतु हल्लीं उपलब्ध असलेल्या माहितीवरून फिशरनें असें दाखविलें आहे कीं साधारणतः २० ते २५ मैलांचें पृथ्वीचें कवच घन आहे व त्याच्या खालीं पृथ्वीचा भाग द्रव स्थितींतच आहे.

ज्या पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांचें पृथ्वी सर्वच घन आहे असें मत आहें त्याचें म्हणणें असें आहे कीं, पृथ्वीच्या आंतील भाग द्रवस्थितींत असल्यास हल्लीं जें संपातचलन व अक्षचलन चालू आहे तें त्याच प्रमाणांत असणें शक्य नाहीं. ते असेंहि म्हणतात कीं पृथ्वी बहुतेक सर्व घनस्थितींत नसल्यास सूर्याच्या व चंद्राच्या आकर्षणानें पृथ्वी रबरासारखी ओढली जाऊन तिचा आकार वरचेवर बदलेल. याशिवाय त्यांचें असेंहि म्हणणें आहे कीं, खडकाचा रस घट्ट झाला तर घन झालेल्या तुकड्यांचें विशिष्ट गुरूत्वरसापेक्षा जास्त असल्यामुळें ते रसाच्या बुडाशीं जातील व याप्रमाणें सर्व भाग घन झाल्याखेरीज पृष्ठभाग घन होणें शक्य नाहीं. परंतु यामध्यें अशीं एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं पृथ्वीच्या पृष्ठभागाकडील भाग मध्यभागांतील पदार्थांपेक्षां विशिष्टगुरूत्वांत फारच कमी असल्यामुळें घन झाल्यावर सुद्धां तो खालील रसापेक्षां हलका असल्यानें त्यावर तरंगत राहिला आहे.

तिसरी कल्पना अशी कीं घनपदार्थांच्या कवचाखालीं खडकाचा रस आहे व त्याच्याहि खालीं म्हणजे पृथ्वीच्या मध्यबिंदूजवळ सर्व पदार्थ वायुरूपांत आहेत. २५ मैलपर्यंत घन पदार्थ आहेत. त्याच्या खालीं उष्णता १२०० अंश असल्यामुळें त्या ठिकाणीं खडकांचा रस होतो. तेच १८६ मैल खोलीवर इतकी उष्णता वाढते कीं, त्या ठिकाणीं वायुरूपांतच सर्व पदार्थ असले पाहिजेत. पृथ्वीवरील नेहमींच्या वायूंत व या वायूंत फारच फरक आहे. पृथ्वीच्या मध्यबिंदूजवळील वायु अति उष्णता व दाबाखालीं असल्यानें त्यांच्यांत घन पदार्थांचेच गुणधर्म येतात.

सर्व मुद्दयांचा विचार केल्यास भूस्तरशास्त्रेवत्यांचीच कल्पना बरोबर दिसते. ती कल्पना खरी धरली तरच ज्वालामुखी, धरणीकंप व खडकांचे पृथ्वीच्या कवचाच्या हालचालीनें होणारे पातळ कडपे यांचा समाधानकारक खुलासा करतां येतो.

पृ थ्वी चें घ ट ना शा स्त्र (जिऑनॉसी).- पृथ्वीच्या वयोमानाचा विचार भूस्तरशास्त्रदृष्ट्या व आधिभौतिकशास्त्रदृष्ट्या करतां येण्यासारख्या आहे, म्हणून या दोन्ही शास्त्रांच्या अनुयायांनीं दिलेलीं प्रमाणें खालीं थोडक्यांत दिलीं आहेत. भूस्तरशास्त्रदृष्ट्या विचार करण्यास दोन त-हेचीं प्रमाणें आहेतः पहिल्या त-हेच्या प्रमाणांत पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर जे एकसारखे बदल होत असतात व पूर्वीं होत होते यांच्या हिशोबावरून पृथ्वीचें वयोमान काढतां येण्यासारखें आहे. पाऊस, नद्या नाले वगैरेंच्या योगें डोंगर, उंचवटे व सपाट जमीन यांवरील भाग वाहून नेले जातात. व त्यांचे थर सरोवरांत किंवा समुद्रांत सांठविले जातात. दरवर्षीं पृथ्वीवरील किती भाग वाहून जातो व आतांपर्यंत समुद्रांत किंवा इतर ठिकाणीं किती थर तयार झालेले आहेत याचा हिशोब केल्यास पृथ्वीच्या वयोमानाचा अंदाज काढतां येण्यासारखा आहे. दुस-या त-हेच्या प्रमाणांत पृथ्वीवर प्रथमतः सजीव पदार्थांची उत्पति झाल्यापासून त्यांच्यांत निरनिराळे फरक होऊन आज जे प्राणी व ज्या वनस्पती दिसत आहेत त्यांची हल्लींची स्थिति येण्यास किती वर्षें लागलीं असतील याचा विचार करून पृथ्वीचें वयोमान ठरवितां येईल. वरील प्रमाणाविरूद्ध एक मोठा आक्षेप येण्यासारखा आहे व तसा पुष्कळांनीं आणलेलाहि आहे. तो आक्षेप असा आहे कीं, हल्लीं ज्या प्रमाणांत पृथ्वीच्या पृष्ठभागावर फेरबदल होत आहेत किंवा प्राणी व वनस्पतींमध्यें फरक पडत आहेत त्याच प्रमाणांत ते पूर्वीं होत असतील असें जें आपण गृहीत करून हिशेब करतों तसें गृहीत धरणें रास्त होणार नाहीं. कारण पूर्वीं पृथ्वीच्या ज्या शक्ती होत्या त्या आतां थोड्याफार मंद झालेल्या आहेत व म्हणूनच पूर्वींच्या काळीं हल्लींपेक्षां पृथ्वीपृष्ठावर बरेच झपाट्यानें फरक होत असले पाहिजेत. हें म्हणणें जरी सयुक्तिक आहे तरी त्याचा पाया कल्पनेवरच उभारलेला आहे परंतु पृथ्वीवर जे खडकांचे थर आहेत व अश्मीभूत झालेले प्राणी आणि वनस्पती आहेत त्यांचा बारीक रीतीनें अभ्यास केल्यास असेंच दिसून येतें कीं निदान पृथ्वीवरील कवच तयार होऊन त्यावर नद्या, नाले यांचे परिणाम होऊं लागल्यापासून व विशेषतः सजीव पदार्थांची उत्पत्ति झाल्यापासून पृथ्वीवरील होणा-या फेरफारांच्या प्रमाणांत फारसा फरक पडलेला नाहीं. विशेषतः अश्मीभूत प्राणी आणि वनस्पती यांच्या वरच्या कवच्यावरून पूर्वीं पृथ्वीवरील पंचमहाभूतें हल्लींपेक्षां जास्त जोरानें किंवा वेगानें आपापलीं कामें करीत होतीं असें मुळींच म्हणतां येणार नाहीं.

पृथ्वीवरील जलजन्य खडकांचे थर व अस्तित्वांत येऊन गेलेले प्राणी व वनस्पती यापैकीं कोणत्याहि दृष्टीनें विचार केल्यास एकंदर पुष्कळ हजार वर्षें लोटलीं असलीं पाहिजेत असें वाटतें. प्राण्यांची व वनस्पतीची जी वंशपरंपरा झाली तिला एकंदर तीन कोटी वर्षें लागलीं असावींत असेंहि कित्येकांचें म्हणणें आहे, परंतु बहुतेक जणांचें-विशेषतः डार्विनसारख्यांचें-म्हणणें आहे कीं, तीन कोटींपेक्षां अधिक वर्षें एकंदर विकासाला लागलीं असावींत. भूस्तरशास्त्रज्ञांनीं खडकांच्या थरावरून पृथ्वीचें वयोमान दहा कोटी वर्षें आहे असें ठरविलें आहे व अश्मीभूत-पदार्थ-शास्त्रज्ञांच्या मतें अधिक वर्षांची जरूर दिसल्यास पृथ्वीचें वयोमान जास्त धरल्यास भूस्तरशास्त्रज्ञांची त्याला कोणतीच हरकत येणार नाहीं. डब्लिनमधील प्रो. जॉली यानें समुद्राच्या पाण्यांतील मिठाच्या प्रमाणावरून पृथ्वीचें वयोमान काढलें आहे. त्यानें पृथ्वीवरील एकंदर समुद्राचें पाणी, दरवर्षीं नद्या वगैरे मार्गानें वाहून जाणा-या मिठाचें वजन व समुद्राच्या पाण्यांत दरवर्षीं मिठाचें वाढणारें प्रमाण या सर्व गोष्टींचा हिशोब करून पृथ्वीचें वयोमान नऊ ते दहा कोटी असावें असें काढलें. या हिशेबाविरूद्ध आक्षेप घेण्यासारखे आहेत. कारण हल्लींच्या प्रमाणांतच मीठ नेहमीं वाहून नेलें जात असावें असेंच म्हणतां येणार नाहीं. त्याचप्रमाणें मूळ कांहीं मीठ समुद्राच्या पाण्यांत असेलच किंवा कांहीं ठिकाणीं समुद्राचा भाग कोरडा होऊन मिठाचे थरच्या थर बाहेर आलेले आहेत या सर्वांचा विचार केल्यास वरील हिशेब अगदीं बरोबर ठरणार नाहीं. परंतु या पद्धतीनें भूस्तरशास्त्रज्ञांनीं काढलेलें वयोमानच निघालें ही आश्चर्यांची गोष्ट आहे.

अधिकभौतिकशास्त्रज्ञांनीं पृथ्वीच्या आंतील उष्णता व तिचें कमी होण्याचें प्रमाण, पृथ्वीच्या दैनंदिन गतींत होणारा फरक आणि सूर्याच्या उष्णतेचा उगम वगैरे गोष्टींचा विचार करून त्यांनीं पृथ्वीचें वयोमान तीन, चार कोटी वर्षें असावें असें मत काढलें होतें परंतु अलीकडे प्रोफेसर पेरी वगैरे गृहस्थानीं असें दाखवून दिलें आहे कीं, अश्मीभूतपदार्थशास्त्रज्ञांच्या मतानें जितकें अधिक वयोमान पृथ्वीचें असावें असें वाटत असेल तितकें धरण्यास आधिभौतिकशास्त्रदृष्ट्या कोणताच आक्षेप घेतां येणार नाहीं.

सर्व गोष्टींचा विचार करून भूस्तरशास्त्रज्ञांनीं असें अनुमान काढलें आहे कीं सरासरीनें सजीव पदार्थांची पृथ्वीवर प्रथम उत्पत्ति झाल्यापासून आजपर्यंत १० कोटी वर्षें झालीं असावीं.

भू स्त र शा स्त्रां त र्ग त ग ति शा स्त्र- (डायनामिकल जिआलॉजी).- पृथ्वीचा इतिहास नीटपणें समजण्याकरितां पृथ्वीवर आजपर्यंत निरनिराळ्या शक्ती किती वेगानें, कोणत्या त-हेनें व कोणत्या स्थितींत पृथ्वीवर फरक घडवून आणीत असत यांचें आकलन होण्याकरितां आज पृथ्वीवर कोणत्या शक्ती आहेत व त्यांचें काम कशा प्रकारें चाललें आहे हें समजून घेणें आवश्यक आहे. भूस्तरगतिशास्त्रांत या शक्तींचीच हकीकत दिलेली असते. पृथ्वीवर हल्लीं अस्तित्वांत असलेल्या शक्तींची माहिती, त्यांचा खडक व खनिज पदार्थांवर होणा-या परिणामासंबंधीं झालेले प्रयोग, त्याच प्रमाणें या शक्तींच्या मुळें खडक तयार कसे होतात व विलयास कसे जातात, समुद्र व जमीन यांच्या हद्दींत फेरफार कसे होतात आणि पृथ्वीवरील एकंदर घडामोडी अशा होतात या सर्व गोष्टींचा अंतर्भाव भूस्तरगति-शास्त्रांत होतो. हल्लीं ज्या शक्ती पृथ्वीवर आहेत त्याच पूर्वींहि असल्या पाहिजेत परंतु त्यांच्या कार्यशक्तीचा वेग पूर्वींचाच असेल असें खात्रीपूर्वक जरी सांगतां येत नाहीं तरी बहुतेक सरासरीनें तितकाच वेग असावा असें गृहींत धरण्यास हरकत नाहीं.

निरनिराळ्या शक्तींचा अभ्यास करतांना त्यांचें वर्गीकरण करणें अवश्य आहे. हें वर्गीकरण केव्हांहि सोयीकरितां केलेलें असतें व म्हणूनच त्यांची हकीकत निराळी दिली असली तरी त्यांचा एकमेकांशीं संबंध नाहीं, असें समजतां कामा नये. निरनिराळ्या शक्ती एकमेकीला मदत करतात इतकेंच नव्हे तर अशा मदतीशिवाय त्यांचीं कामें होणेंच शक्य नाहीं. शक्तीचें मुख्य वर्गीकरण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणा-या शक्ती व पृथ्वीच्या उदरांतील शक्ती असें होय. पृष्ठभागावरील आणखी वर्गीकरण केल्यास त्यांत तीन शक्तींचा विशेषतः समावेश होतो व त्या तीन शक्ती म्हणजे हवा, पाणी व जीवन. पृथ्वीच्या उदरांतीलहि शक्तींचे तीन भाग केल्यास ज्वालामुखी, धरणीकंप व पृथ्वीच्या कवचाची हालचाल अशा त्या तीन शक्ती आहेत. प्रथमतः पृथ्वीच्या पृष्ठभागावरील शक्तींचा विचार करून नंतर उदरांतील शक्तींकडे वळूं.

भूपृष्ठरचना:- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील शक्तींचीं कामें प्रत्यक्ष आपल्या दृष्टीसमोर रोज चाललेलीं असतात, तीं बारकाईनें पाहिल्यास व मापल्यास त्यांचा खडक तयार करण्याच्या कामीं, खडक रक्षणाच्या कामीं किंवा त्यांचा विलय करण्याच्या कामीं कोणत्या प्रकारें व कोणत्या प्रमाणांत उपयोग होतो हें सहज समजण्यासारखें आहे. भूपृष्ठावर तीन शक्ती आहेत; त्या हवा, पाणी व सजीव पदार्थ होत. हवा पाण्याशिवाय, पाणी हवेशिवाय आणि सजीव पदार्थ हवा व पाणी यांच्या मदतीशिवाय आपापलीं कामें करूं शकणार नाहींत हें पुढील वर्णनावरून सहज कळून येईल. परंतु प्रत्येकीचें काम नीट समजावें म्हणून प्रत्येक शक्ति निरनिराळी घेऊन तिच्या कार्याचें वर्णन दिलें आहे. या शक्तींचीं कार्यें तीन प्रकारचीं असतांतः - (१) विलयकारक (डिस्ट्रक्टिव्ह), (२) संरक्षक, (३) व उत्पादक, ही रासायकिन फरक होऊन किंवा प्रत्येक शक्तीमधील हालचाल करण्याच्या सामर्थ्यामुळें घडून येतात.

हवा:- हवेंतील वायू, त्यांचें प्रमाण वगैरे माहिती भूपृष्ठवर्णनांत दिली असल्यामुळें येथें देण्याची जरूर नाहीं. व म्हणूनच हवेच्या शक्तीच्या पृथ्वीपृष्ठावरील पदार्थांवर काय परिणाम होतो, त्यामुळें खडक विलयास जाणें, उत्पन्न होणें किंवा त्यांचें संरक्षण होणें हीं भूस्तरशास्त्राचीं कामें कशीं होतात या संबंधाचीची माहिती पुढें दिली आहे.

उष्णतेनें होणारे परिणाम सूर्याच्या उष्णतेचेच असतात, तरी अप्रत्यक्ष रीतीनें ते हवेंमुळेंच घडून येतात व म्हणूनच त्यांचा विचार या ठिकाणीं केला आहे. सूर्याचे किरण खडकावर पडले म्हणजे वरचा भाग तापतो आणि त्यांतील कण आकारानें वाढून एकमेकांवर दाबले जातात. खालच्या थरांत उष्णता न गेल्यानें तेथें मात्र कांहीं फरक हात नाहीं. रात्रीच्या वेळीं किंवा थंडी पडली असतांना वरच्या भागांतील कण आकारानें लहान होऊन त्या भागांत भेगा पडतात व असें वरचेवर होऊन खडकाच्या वरचा भाग ठिसूळ होऊन त्याचे तुकडे तुकडे होतात. हेच तुकडे पुढें बारीक होऊन त्यांचे लहान कण बनतात व वरचा सबंध थर शेवटीं वा-यानें भरून गेला म्हणजे त्या खालील भाग असाच पिष्टमय होतो. ही कृति तो खडक सर्व नाहींसा होईपर्यंत चालू राहते. खडकावर उष्णतेचा किंवा थंडीचा इतका परिणाम होत असेल असें सकृतदर्शनीं वाटत नाहीं परंतु तापलेल्या कांचेवर पाण्याचे थेंब पडले असतां किंवा कढत पाणी कांचेच्या पेल्यामध्यें घातलें असतां तिला एकदम तडा जातो हें सर्वांनां माहीत आहेच. याच तत्त्वाचा उपयोग खडक फोडण्याकरितां सुद्धां करतात. प्रथमतः कचरा किंवा सर्पण जाळून खडक तापवितात. व त्यावर एकदम पाणी ओततात व असें केल्यानें खडक पुष्कळ ठिकाणीं तडकतो व नंतर त्याच्या लहान शिला खणून काढतात. सृष्टीमध्यें रोज असल्या गोष्टी आपोआप घडून येत असतात व त्या सर्वांचा परिणाम खडकांचा भुगा होण्याकडे होतो. साहारा किंवा अशाच कोरड्या प्रदेशांत दिवसा खडक अतिशय तापतात व रात्रीं एकदम थंडी पडून उष्णता फार खालीं जाऊ लागली कीं खडकांनां पडणारा ताण फार होऊन खडक भराभर तडकतात व लहान तुकड्यापासून तो १०० ते २०० पौंड वजनाच्या खडप्यापर्यंत निरनिराळ्या आकाराचे तुकडे निसटून दूर होतात. २४ तासांत जास्तींत जास्त उष्णता व थंडी यांतील अंतर जितकें जास्त तितका खडकावर होणारा परिणाम जास्त असतो. खडकावर मातीचा किंवा वाळूचा थर असला तर खडक फारसे भंगत नाहींत, परंतु ते उघडे असल्यास त्यांवर हवेंतील उष्णमानाचा परिणाम होतो. त्याचप्रमाणें खडकांत जितक्या जास्त प्रकारचे खनिज पदार्थ तितका उष्णतेचा जास्त परिणाम होतो.

वीजेचे परिणाम खडकावर नेहमींच होतात असें नाहीं परंतु वीज खडकावर पडल्यास खडकांचे तुकडे होतात. तेव्हां हवेच्या अप्रत्यक्ष परिणामांत विजेच्या परिणामाचा अंतर्भाव करतात. हवेंतील वायूंची हालचाल होऊन जे वारे सुटतात त्यांचा खडकांचा विलय करण्यांत पुष्कळ उपयोग होतो. वारा सुटला कीं, माती, रेती व धूळ इकडून तिकडे नेहमीं झपाट्यानें नेली जाते. वारा अति मंद असला तरी सुद्धां धूळ उडणें चालू असतें. घरांतील सामान झाडून २-३ तास झाले नाहींत तोंच त्यावर पातळसा धुळीचा थर तयार होतो असा सर्वांचा अनुभव आहे. वारे सर्व ठिकाणीं व सर्व वेळीं असल्यामुळें खडकांचें झालेलें पिष्ट वाहून नेऊन खडकाचा नवीन भाग पिष्ट होण्याकरितां उघडा करावयाचा हें कार्य सदोदित चालू असतें. कोरड्या हवेंत विशेषतः जेथें बारीक वाळू असते अशा ठिकाणीं हा परिणाम स्पष्टपणें दृष्टीस पडतो. ईजिप्तमध्यें सरासरीनें शंभर वर्षांत चार इंच मातीचा थर वा-यानें वाहून नेला जातो. उत्तर चिनांत भोंवतालची माती वा-यानें निघून गेल्यामुळें मोठ्या तटबंदी स्थलांचे पाये बाहेर दिसूं लागले आहेत. सिंध, मारवाड वगैरे प्रांतांत वाळू किती लवकर वा-यानें हलविली जाते हें वरवर पहाणाराला स्पष्ट दिसून येतें.

वादळें:- वादळें सुटल्यास वा-याचा परिणाम विशेष जोराचा होतो. पुष्कळ वाळू मोठमोठाल्या खड्यांसकट एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणीं नेली जाते. व ही वाळू ज्या दगडावर आपटते किंवा ज्या दगडाला घांसून जाते ते खडक घांसले जातात व झिजतात. पुष्कळ वेळां वादळांत घरावरील छपरें, पत्रे उडून जातात; भिंती ढांसळतात, झाडें मुळांसह उपटून पडतात असें आपण पहातों. त्याच वादळामुळें मोठाल्या खड्यांची वाळूं तर उडतेच परंतु याशिवाय मोठाले कडपे उंच डोंगरावरून खालीं द-यांत फेंकून दिले जातात. व या सर्वांचा परिणाम खडकांचें पिष्ट करण्याकडेच होतो.

वा-याचें संरक्षक कार्यः- वा-यानें वाहून नेलेली वाळू कोठें तरी जाऊन सांठलीच पाहिजे. सिंध, मारवाड वगैरे प्रांतांत रेल्वेच्या कडेच्या हद्दीचे दगड, रेल्वेचीं स्टेशनें व त्याचप्रमाणें इतर जागा वरच्यावर वाळू न काढल्यास तिच्याखालीं बुजून जातील. व अशा त-हेनें वाळू व मातीखालीं बुजून गेलेलीं जुनी ओसाड खेडीं शहरें पृथ्वीवर पुष्कळ दृष्टीस पडतात.

वा-याचें उत्पादक कार्य:- पुष्कळ वेळां वाळूचे किंवा मातीचे मोठाले ढीग होऊन त्यांच्या टेंकड्या बनतात. व कित्येक वेळां पुष्कळशा लहान टेंकड्या तयार होऊन त्या एका विशिष्ट दिशेनें सावकाश सरकत जातात. चीन देशांत मृत्तिकामय ढीग सांपडतात; त्यांची उंची १००० हजार फूटपर्यंत असतें. हे ढीग वा-यामुळेंच झाले असावेत असा तर्क आहे. अशाच त-हेचे ढीग मध्यआशियांत, मध्ययूरोपांत व अमेरिकेंतहि आहेत व ते सर्व वा-यामुळेंच बनले आहेत असें समजतात.

सँडड्यूनः- समुद्रकांठीं किंवा मोठाल्या सरोवराभोंवतीं जी वाळू असतें त्या वाळूचे ढीग होऊन वा-यानें हे ढीग लाटाप्रमाणें एकसारखे एका दिशेला सरकतात. वाळूच्या टेंकड्या समुद्रकांठीं वाळू पुष्कळ असते म्हणून होतात त्याचप्रमाणें वालुकामय रणांत अशाच वाळूच्या टेंकड्या होतात. साहारा, अरबस्तान आणि राजपुताना यांसारख्या प्रदेशांत यांचा प्रसार बराच झालेला आढळतो व या वाळूच्या लाटा थोडथोड्या अंतरावर असलेल्या दिसतात व बारकाईनें पाहिल्यास त्या एकसारख्या सरकत असतात असेंहि दिसून येतें. वाळूच्या टेंकड्यांची उंची साधारणतः १० ते १५ फूट असते परंतु कित्येक टेंकड्या ३०० फूटपर्यंत उंचीच्या असतात वाळूच्या अलग टेंकड्या न होतां कित्येक वेळां रांगा तयार होतात. या रांगांनां व टेंकड्यांनां पुष्कळ वेळां निरनिराळे आकारहि येतात. वर सांगितल्याप्रमाणें वाळूच्या टेंकड्या किंवा रांगा एका दिशेनें एकसारख्या सरकत असतात व नेहमीं त्या समुद्रकांठाकडून जमिनीवरील प्रदेशावर पसरत जातात. त्यामुळें सुपीक जमिनी, खेडीं वगैरे वाळूमध्यें बुजून जाण्याचा संभव असतो. १८०४ पासून १८२७ पर्यंत आशियांतील पाईन झाडांचें एक संबंध रानच्यारान वाळूच्या टेंकड्या येऊन त्यांनीं भरून गेलें व त्यांतील सर्व झाडें वाळूंत बुजलीं. अशा त-हेनें नुकसान होऊं नये म्हणून फ्रान्स व हॉलंडमध्यें वाळूच्या टेंकड्यांवर कांहीं विशिष्ट प्रकारच्या वनस्पती लावतात. या वनस्पतींचीं मुळें खोल जातात व पुष्कळशीं पसरतात, त्यामुळें वाळू वा-यानें पुढें न सरकतां जागच्या जागींच राहाते.

तरंग:- पाण्याचा लाटा येऊन गेल्या म्हणजे वाळूवर जसे तरंग उमटतात तसेच तरंग वालुकामय प्रदेशांत व समुद्राकांठी वा-यामुळें तयार होतात. या तरंगांचा आकार लहान असला तरी त्यांचें क्षेत्र पुष्कळ मोठें असूं शकतें.

रक्ताचा पाऊस:- उष्णकटिबंधांत रेती व धूळ पुष्कळ वेळां अगदीं कोरडी असते व विशेषतः अवर्षण असल्यास नेहमींची ओलाव्याचीं ठिकाणें सुद्धां कोरडीं होतात. वारे सुटले म्हणजे अशा ठिकाणची धूळ वाहून फार दूरवर तर नेली जातेच पण त्याशिवाय अगदीं बारीक कण असतात ते आकाशांत उंच नेले जातात. कित्येक वेळां आकाशांत धुळीचा दाट थर होऊन बरेच दिवस राहातो. अशा स्थितींत पाऊस पडल्यास तो धुळीच्या थरांतून खालीं येतांना त्याचें पाणी गढूळ व लाल होतें व पाण्याचा लाल रंगामुळें या पावसाला 'रक्ताचा पाऊस' म्हणतात.

बीं वाहून नेणें:- वाळू व धूळ इकडून तिकडे नेण्याच्या कामाखेरीज झाडांचें बीं व लहान सूक्ष्म प्राण्यांच्या बीजपेशी वाहून नेण्याचें कामहि वाराच करतो. बीं व बींजपेशी अशा त-हेनें पुष्कळ वेळां कित्येक मैलपर्यंत नेलीं जातात. नद्या, तलाव, व समुद्र मध्यें आल्यामुळें ज्या झाडांचा व प्राण्यांचा प्रसार कांहीं देशांत साहजिक झाला नसता त्यांचा प्रसार अशा त-हेनें होतो.

क्षार:- हवेमध्यें वाफ जरी असली तरी पाणी ज्या ठिकाणीं असेल तेथून तें वाफेच्या रूपानें एकसारखें हवेंत जात असतें. हवेंतील उष्णता वाढल्यास किंवा वारे सुटल्यास हें बाष्पीभवन अधिकच जोरानें सुरू होतें. जमिनीवर याचा परिणाम असा होतो कीं, वरचें पाणी निघून गेलें कीं, आंतील पाणी वर येतें व तेंहि निघून जातें व अशा त-हेनें जमिनींतील पाण्याला एकसारखी ओढ लागून पुष्कळ पाणी नाहींसें होतें. ज्या वेळीं जमिनीच्या आंतील पाणी वर येतें त्यावेळीं त्या पाण्यांत विरघळलेले क्षार वर येतात आणि पाण्याची वाफ होऊन गेली म्हणजे हे क्षार जमिनीवरच सांठतात व त्यांचे पातळ थर होतात. हे थर कालव्यांच्या आसपास बरेच वेळां दृष्टीस पडतात. कालव्याचें पाणी प्रथमतः जमिनींत मुरतें व नंतर थोडथोडें जमिनींतील सूक्ष्म नलिकांतून वर येतें. कालव्याच्या मुबलक पाण्यांत जमिनींतील क्षार विरघळले जातात आणि पाण्याबरोबर वर आल्यावर त्यांचा जमिनीवर थर होतो. क्षारांच्या थरामुळें नापीक झालेल्या जमिनी हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. पुणें जिल्ह्यांत बारामतीजवळील जमीन अशाच त-हेनें नापीक झाल्याचें अलीकडील उदाहरण आहे. उत्तरहिंदुस्थानांत तर अशीं पुष्कळच उदाहरणें सांपडतील.

वा-याच्यामुळें सरोवरें व समुद्र यांच्यांत पाण्याच्या लाटा उत्पन्न होऊन पाणी खळबळलें जातें. या लाटांच्या तडाख्यानें जहाजें वगैरे फुटल्याचीं उदाहरणें सर्वांनां माहीत आहेत. परंतु या लाटा खडकावर आदळून खडक सुद्धां फोडतात.

हवेंतील वायूंच्यामुळें खडकावर रासायनिक परणिाम होतात; हे हवापाणी वगैरेंचे सारखेच असल्यामुळें पाणी या सदराखालीं दिले आहेत. पाणी, नद्या व नाले यांच्यामुळें भूपृष्ठावर होणारे फरक 'पाणी' आणि 'नद्यानाले' या लेखांत दिले आहेत.

सरोवरें:- सरोवरासंबंधीं सर्वसाधारण माहिती भूपृष्ठवर्णनांत दिलेली आहे, तेव्हां या ठिकाणीं फक्त त्यांच्या अस्तित्वांमुळें काय परिणाम होतात ते दिले आहेत. ज्या ठिकाणीं मोठालीं सरोवरें असतात त्या ठिकाणच्या उन्हाळ्यांतील उष्णतेचें  मान फार चढत नाहीं व थंडीत थंडीचें प्रमाणहि फार चढत नाहीं. हवेंत कडक थंडी किंवा उष्णमान होऊं देण्याच्या कामीं या पाण्याच्या सांठ्याचा उपयोग होतो. तळीं किंवा सरोवरें साधारणतः सखल जागीं असल्यानें आसपासच्या प्रांतांतील नद्या, नाले, ओढे, हे या सरोवरांतच येऊन मिळतात. कांहीं नद्यांचा उगम सरोवरांतून होतो तर कांहीं नद्या एका बाजूनें सरोवरांत शिरून दुस-या बाजूनें बाहेर पडतात. आंत येणा-या नद्यांच्याबरोबर गाळ, वाळू, दगड, वनस्पतींचे भाग व मृत जनावरांचे सांगाडे वाहून येतात; परंतु बाहेर पडणा-या नद्यांबरोबर कोणतेच पदार्थ वहात जात नाहींत. कितीहि गढूळ पाण्याची नदी सरोवरांत शिरली तरी बाहेर पडतांना तिचें पाणी अगदीं स्वच्छ असतें. यामुळें सरोवर हें एक मोठें सांठवणीचें ठिकाण होऊन बसतें.

या सांठलेल्या गाळांत व वाळूंत वनस्पतीचें व प्राण्यांचे सांगाडे येऊन पुरले जातात, त्यामुळें या सांठ्याचें भूस्तरशास्त्रदृष्ट्या फार महत्त्व आहे. कारण पृथ्वीचा इतिहास समजण्याकरितां कोणत्या ठिकाणीं कोणत्या काळांत कशा प्रकारच्या वनस्पती किंवा कोणत्या त-हेचे प्राणी असत हें समजणें अवश्य आहे. एखादें जुनें भरून बुजून गेलेलें सरोवर खणूं लागल्यास वरच्या थरांत सांपडणारे सागांडे अगदीं शेवटीं आल्यामुळें ते खालीं सांपडणा-या सांगाड्यापेक्षां जुने असणारच. अशा दृष्टीनें सर्व थरांतील सांगाडे किंवा अश्मीभूत वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास केल्याच त्यांची वंशपरंपरा कळते व त्यांच्या शरीररचनेवरून त्या वेळचें हवापाणी कसें होतें व हे जीव कोणत्या स्थितींत रहात असत हेंहि कळतें. सरोवरें हीं याप्रमाणें पृथ्वीच्या इतिहासांतील कांहीं पृष्ठें होत असल्यानें त्यांचें महत्त्व फार आहे.

तळ्यांत किंवा सरोवरांत निरनिराळ्या ठिकाणचें पाणी येत असल्यानें पुष्कळ प्रकारचे क्षार पाण्यांत विरघळलेल्या स्थितींत येतात परंतु सरोवरांत त्यांचे एकमेकांवर रासायनिक परिणाम होऊन नवीन क्षार तयार होतात. त्यांपैकीं कांहीं क्षार पाण्यांत न विरघळणारे असल्यानें त्यांचा थर सरोवराच्या तळाशीं सांठतो. कित्येक क्षार सरोवराचें पाणी आटूं लागलें म्हणजे तळावर साठूं लागतात. क्षार सांठण्याची क्रिया विशेषतः ज्या तळ्यांतून बाहेर पाणी वाहून जाण्यास मार्ग नसतो त्या तळ्यांत जास्त दृष्टोत्पत्तीस येते. कारण अशा तळ्यांत क्षारासह पाणी येतें आणि तें पाणी वाफेच्या रूपानेंच फक्त जात असल्यानें क्षार तसेच शिल्लक राहातात. यामुळें दरवर्षी क्षारांचें प्रमाण वाढत जाऊन शेवटीं त्यांचें प्रमाण इतकें वाढतें कीं, क्षार पाण्यांत विरघळलेल्या स्थितींत राहूं शकत नाहींत. अशा प्रकारें निरनिराळ्या प्रकारच्या क्षारांचे थर तयार होतात व तळीं भरून गेलीं म्हणजे हे क्षार खणून काढतां येतात. हल्लीं शेंदेलोण वगैरे क्षार अशाच त-हेनें सांठवलेल्या थरांतून खणून काढतात.

सागर:- महासागर, सागर, उपसागर व समुद्र या सर्वांचे भूस्तरशास्त्रदृष्ट्या सारखेच परिणाम असल्यामुळें ते सर्व सागर या मथळ्याखालीं घेतले आहेत. भरती, ओहोटी, सर्व प्रकारचे प्रवाह, लाटा, समुद्रांतील बर्फ व क्षार व पाणी या सर्वांच्या योगानें भूस्तरशास्त्रदृष्ट्या पुष्कळ काम चाललेलें असतें. सरोवराप्रमाणें समुद्राच्या अस्तित्वाचा आसपासच्या हवेच्या उष्णतेवर परिणाम होतो व समुद्र मोठा असल्यानें हा परिणाम फार मोठ्या भागावर होतो. समुद्रामुळें अति कडक थंडी व अति कडक उष्णता यांवर परिणाम होऊन त्यांचा कडकपणा थोडा तरी कमी होतो. समुद्राच्या तळांत व किना-यावर असलेल्या खडकावर समुद्राच्या पाण्याची रासायनिक क्रिया होते. ही रासायनिक क्रिया इतर पाण्याप्रमाणेंच होत असल्यानें तिची हकीकत येथें देण्याचें प्रयोजन नाहीं. पावसाच्या वगैरे पाण्याची रासायनिक क्रिया होते त्याच त-हेची रासायनिक क्रिया समुद्राच्या पाण्याची होत असते. पाण्याच्या शक्तीनें होणा-या ज्या क्रिया आहेत त्यांचे निरनिराळे भाग करणें अवश्य आहे. पहिल्या प्रकारांत खडक खणणें, उकरणें, झिजविणें वगैरे क्रिया येतात. दुस-या प्रकारांत खणलेले व झिजविलेले पदार्थ वाहून नेण्याची क्रिया येते व तिस-या प्रकारांत पदार्थ सांठवून ठेवण्याची क्रिया येते.

उकरण्याची व झिजविण्याची क्रिया:- खडक उकरणें व झिजविणें या पहिल्या प्रकारांतील क्रिया, ज्या ठिकाणीं पाण्याचा जोर जास्त त्या ठिकाणीं जास्त जोरांत होतात. ज्या ठिकाणीं समुद्र अति खोल असतो व कोणत्याहि प्रकारचे प्रवाह नसतात त्या ठिकाणीं ही क्रिया मुळींच होत नाहीं. ज्या ठिकाणीं समुद्रांत वाहाणा-या प्रवाहामुळें वाळू वगैरे ढकलली जाते त्या ठिकाणींच समुद्राचा तळ झिजवण्याचा संभव आहे. प्रवाहानें किंवा लाटांच्या जोरानें समुद्रतळावर जर प्रयोग होत नसला तर त्या ठिकाणीं अगदीं बारीक गाळ सांठलेला आढळतो. साधारणतः अशा गाळाची सर्वांत वरची हद्द व समुद्रलाटा जेथपर्यंत किना-यावर जाऊन आदळतात त्याच्या पुढें शंभर-दोनशें फूट येवढ्या भागांतच ही पहिली क्रिया चालू असते, इतर ठिकाणीं तिचा परिणाम फारच थोडा होतो. लाटांच्या आदळण्यानें मोठमोठाले खडक उलटून पडतात व एकमेकांवर आदळतात. स्टीव्हनसन नांवाच्या गृहस्थानें शेटलंड बेटांच्या आसपास घडून आलेल्या गोष्टी नोंदल्या आहेत, त्यांत तो असें म्हणतों कीं एकदां साडेनऊ टनांचा खडक समुद्रांत ६० फूट उंचीवरून ओढला गेला. त्याचप्रमाणें सहा टनांपासून साडेतेरा टनांपर्यंत वजनाचे खडक अगदीं खणून काढल्यासारखे तोडले गेलेले व आठ टनांचे दगड ढकलून नेले गेलेले त्यानें नोंदले आहेत; प्लायमाऊथला सुद्धां कित्येक टन वजनाचे दगड लाटांच्या जोरानें हालल्याचीं उदाहरणें आहेत.

किना-यावर लाटा आदळूं लागल्या म्हणजे खडकांचा भुगा होऊं लागतो. लाटांचें पाणी खडकांतील भेगांत शिरतें, त्यावेळीं त्याचा जोर इतका असतो कीं कित्येक वेळां त्याचा दाब दर चौरस फुटाला तीन टनांपर्यंत असतो. म्हणून भेगा मोठ्या होऊन खडक अगदीं खिळखिळे होतात. लाटा खडकाकडे येऊं लागल्या कीं त्यांच्यापुढें हवा ढकलली जात व लाटा खडकावर येऊन आदळल्या कीं हवा खडकांतील भेगांत शिरते व तेथून बाहेर पडण्यास तिला सांपडलें नाहीं तर तिचा भार खडकावर बसतो, त्याचप्रमाणें पाणी परत समुद्राकडे जाऊं लागलें कीं भेगांतील हवा जोरानें ओढल्यासारखी बाहेर येतें. या योगानें खडक खिळखिळीत होऊन बाहेर ओढले जातात. लाटांचें पाणी किती जोरानें खडकावर येतें हें वर सांगितलेंच आहे. परंतु या पाण्याबरोबर दगड, वाळू वगैरे खडकावर आदळली जाते, त्यावेळीं यंत्राच्या साहाय्यानें मोठाले घण चालविण्यासारखे तडाखे खडकावर बसतात व खडक विदीर्ण होऊन त्यांचा भुगा होऊं लागतो.

वाहून नेण्याची क्रिया:- समुद्राच्या पाण्याची दुसरी क्रिया म्हणजे दगड, वाळू, गाळ वगैरे जिन्नस वाहून नेणें. वाहून नेण्याची क्रिया दगडांचा आकार, जडपणा व पाण्याचा जोर यांवर अवलंबून असते. जितके दगड जास्त वाटोळे व हलके आणि जितका पाण्याचा जोर जास्त तितक्या दूरवर जिन्नस वाहून नेला जातो. लाटांच्या तडाक्यानें निघालेले कळपे व भुगा समुद्रांत दूरवर नेले जातात. गाळानें भरलेली नदी जोरानें समुद्रांत शिरल्यानंतर २०० ते ३०० मैलपर्यंत गाळ नेला जातो. लाटा व नद्यांप्रमाणेंच समुद्रांत असलेले प्रवाह या बाबतींत पुष्कळ काम करतात. गाळ त्यांच्या ओघांत सांपडला कीं, त्याला कित्येक मैलच्या मैल आपल्याबरोबर ते नेतात.

सांठविण्याची क्रिया- भूपृष्ठावरील वाहून नेलेले पदार्थ शेवटीं समुद्रांत आले पाहिजेत असें पूर्वीं सांगितलें आहे. समुद्रांत जे पदार्थ वाहून येतात त्यांचे मुख्य भागः - (१) सेंद्रिय पदार्थ व (२) निरिंद्रिय पदार्थ असे करतां येतात. सेंद्रिय पदार्थांची हकीकत पुढील एका भागांत दिलेली आहे व या भागांत फक्त निरिंद्रिय पदार्थांचाच विचार करावयाचा आहे. निरिंद्रिय पदार्थ रासायनिक फरक होऊन तरी तयार होतात किंवा पाण्यानें इकडून तिकडे वाहून नेल्यानें सांठले जातात. समुद्रामध्यें निरनिराळ्या ठिकाणाहून पाणी आल्यानें पुष्कळ त-हेचे क्षार त्या ठिकाणीं येतात व त्यांच्यांत रासायनिक फरक होऊन न विरघळणा-या पदार्थांचे थर खालीं बसतात. समुद्राचे कांहीं भाग तुटक-तळ्यासारखे होतात त्या ठिकाणीं पाणीं आटून क्षारांचे थर खालीं बसतात. अशा प्रकारें सांठलेले पदार्थ रासायनिक क्रियेमुळें झाले असें म्हणतात.

केवळ वाहून आलेल्या पदार्थांचे जे थर तयार होतात त्यांतहि दोन प्रकार आहेत. जमिनीवरून वाहून आलेल्या पदार्थांचे पहिल्या प्रकारचे थर समुद्रकिना-यापाशीं सांठतात. दुस-या प्रकारचे थर समुद्रांतील पदार्थांचेच असतात व ते किना-यापासून पुष्कळ दूर खोल पाण्यांत तयार झालेले असतात. समुद्रकिना-यापाशीं, नद्यांतून वाहून आलेले व लाटांच्या तडाक्यानें फुटलेले दगड, वाळू वगैरे पदार्थ असतात. त्यांपैकीं जे जड व आकारानें मोठे असतात, ते जमिनीच्या बाजूला; लहान असलेले त्याच्यापुढें समुद्राच्या पाण्यांत; अगदीं बारीक कण समुद्रांत अगदीं खोल पाण्यांत याप्रमाणें त्यांची मांडणी होते. खडकांच्या तुकड्यांखेरीज समुद्राच्या लाटांबरोबर झाडांच्या फांद्या व शेवाळें किना-यावर येऊन पडतें आणि कित्येक वेळां शेवाळें व वाळू यांचे एकमेकांवर थर सांचतात.

खोल व शांत पाणी असेल अशा ठिकाणीं जे पदार्थ सांठविले जातात त्यांत खडकांचे बारीक व सूक्ष्म कण, समुद्रांत वास करणा-या लहान मोठ्या वनस्पतींचे व प्राण्यांचे सांगाडे किंवा कवचें वगैरे पदार्थ असतात. मँगॅनीजसारख्या खनिज पदार्थांचे लहान-मोठे खडे तयार होणें किंवा मँगॅनीजचे थर इतर पदार्थांवर बसणें अशा त-हेचीं कामेंहि समुद्रांतील खोल पाण्यांत होत असतात. झीओलाईट व मेटिओराइटचे कण, ज्वालामुखीची बारीक राख हे पदार्थ सुद्धां समुद्रतळावर सांठलेले सांपडतात.

बर्फ:- पाणी थंड होऊन गोठलें म्हणजे आकारानें वाढतें व त्या स्थितींत भूस्तरशास्त्रदृष्ट्या त्याच्याकडून पुढें दिलेलीं पुष्कळ कामें होतात.

कडक थंडीचा परिणाम:- शंभर घनफूट पाणी थिजलें म्हणजे १०९ घनफूट बर्फ होतो. आकार वाढण्याचा जागा नसल्यास पाण्याचा दाब वाढतो. हा दाब प्रत्येक चौरस फुटावर १३८ टन इतका किंवा एक मैल उंचीच्या बर्फाचा थर घातला असतां जो दाब पडेल तितका असतो. खडक, माती वगैरे सर्व पदार्थांत थोडा तरी पाण्याचा अंश असतोच. खडकांत शेंकडा एकपासून चिकण ओलसर मातींत २५ भाग पर्यंत पाणी असतें. कडक थंडी पडून उष्णमान शून्य अंशापर्यंत गेलें म्हणजे पाणी गोठतें व खडक फुटूं लागून त्यावर मोठाल्या भेगा पडतात. शेवटीं या भेगा वाढत जाऊन खडकांचा चुराडा होतो. ज्या डोंगरांत अशी थंडी पडते तेथें कित्येक भाग अगदीं विदारून जातात. मातींतील बारीक कण चरकांत दाबून काढल्यासारखे होतात. कडक थंडीचा झाडांवर व प्राण्यांवरहि परिणाम होऊन पुष्कळांचा अंत होतो.

गोठलेल्या नद्या व सरोवरें:- शीतकटिबंधांत कडक थंडी पडली म्हणजे नद्या व तळीं यांचें पाणी गोठून पृष्ठभागावर दोन तीन फूट जाडीचा बर्फाचा थर होतो. पाणी थंड होऊं लागलें कीं जड होऊं लागतें व जड झालेलें पाणी खालीं जाऊन हलकें पाणी पृष्ठभागीं येतें व असें ४ अंश उष्णमानापर्यंत चालतें. ४ अंशाच्या पुढें पाणी हलकें होऊं लागतें त्यामुळें तें खालीं न जातां वरच राहून त्याचा बर्फ होतो. एकदां वर बर्फ झाला कीं, आंतील उष्णता कायम राहाते. यामुळें बर्फाखालीं ४ अंश उष्णतेचें पाणी असतें व त्यांत मासे वगैरे प्राणी जिवंत राहूं शकतात. पाणी थिजून बर्फ होऊं लागलें कीं, त्याचा आकार वाढूं लागतो, परंतु शून्य अंशाच्या खालीं उष्णता जाऊं लागली कीं, बर्फ आकसून त्याचा आकार लहान होतो. प्रथमतः बर्फ होऊं लागलें कीं, त्याचा आकार वाढल्यामुळें नदीच्या किंवा सरोवराच्या कांठावरील दगड, माती वगैरे पदार्थ वर ढकलले जातात किंवा कांठावरील खडकावर दाब बसून ते फुटतात. बर्फाचा आकार कडक थंडीमुळें लहान झाल्यास त्यावर भेगा पडून खालचें पाणी भेगांत शिरून गोठतें. पुन्हां शून्य अंश उष्णता होऊं लागली कीं, बर्फाचा आकार वाढतो व पूर्वीं वर ढकललेले दगड व माती अधिकच वर ढकललीं जातात. बर्फ वितळून पाणी झालें म्हणजे हे पदार्थ पाण्याकडून फार दूर नेले गेलेले दिसतात.

गारा:- गारा नेहमीं पडत नाहींत, परंतु त्या पडल्या म्हणजे पुष्कळ वेळां नुकसान करतात. प्रत्यक्ष खडकावर त्यांचा फारसा परिणाम होत नाहीं. झाडावरील फळें, लहान झाडें, पक्ष्यांची घरटीं व कोंकरासारखीं मैदानांत सांपडलेलीं लहान जनावरें यांचें फार नुकसान होतें.

हिमः- शीतकटिबंधांत व ज्या डोंगरांचीं शिखरें हिमरेषेवर गेलीं आहेत त्या शिखरांवर बर्फ पडतें. हिमरेषा निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या उंचीवर असतें. ध्रुवापाशीं ही रेषा जमिनीच्याच उंचीवर असते व जसजसें ध्रुवापासून दूर जावें तसतशी ती उंच जाऊं लागते. आल्पसमध्यें ती ८५०० फूट उंच आहे व हिमालयावर तिची उंची १९००० फूट आहे.

बर्फ जर नुसतें खडकावर वगैरे बेतानें सांठून त्याचा थर झाला तर त्यापासून कोणत्याहि त-हेनें खडकावर नाशकारक असा परिणाम न होतां उलट खडकाचें रक्षणच केलें जातें. पिकांची रोपें लहान असतांना त्यांवर बर्फ पडल्यास त्याच्या खालीं उष्णता राहून रोपांचें कडक थंडीपासून रक्षण होतें. हीं रक्षणाचीं कामें नुकसानीच्या मानानें फारच कमी आहेत. झाडावर बर्फ साठूं लागलें म्हणजे तें इतकें सांठतें कीं, त्याच्या वजनानें फांद्या किंवा सबंध झाडें मोडून पडतात. डोंगराच्या उतरणीवर बर्फ सांठल्यास तें हलकें हलकें खालीं सरकूं लागतें. सरकतांना मोठाले दगड, कडपे वगैरे सहज खालीं ढकलले जातात व एक मोठा बर्फाचा लोंढा होऊन खालीं द-यांतील शेतें, बागा व घरेंदारें यांचें नुकसान होतें. थंडी संपून उन्हाळा सुरू झाला कीं हें बर्फ वितळून नदी ओढ्यांनां एकदम पूर येतात व त्यामुळेंहि पुष्कळ नुकसान होतें.

हिमनद्या:- हिमनद्यांचीं उत्पत्ति, त्यांचा वेग, लांबीं, रुंदी वगैरे वर्णन भूपृष्ठवर्णनांत दिलें आहे, नद्यांप्रमाणें हिमनद्यांचेहि तीन प्रकारचें कार्य असतें:- (१) मोकळे असलेले दगड, माती वगैरे वाहून नेणें, (२) आपलें पात्र खणून व खरडून काढणें आणि (३) वाहून नेलेले पदार्थ दुसरीकडे सांठविणें.

हिमनदी फार सावकाश वहाते. ती डोंगरांतून खालीं उतरतांना किंवा दरींतून वहात असतांना तींतील बर्फावर डोंगरांतील कोसळून आलेले दगड, पावसानें वाहून आणलेले पदार्थ व वा-यानें आलेली धूळ व माती यांचे ढीक सांठतात व ते हलके हलके वाहून नेले जातात. मोठाले दगड बर्फांत गडप होतात, पुन्हां वर येतात. वाळू बहुतेक बर्फाच्या बुडाशीं जाते व इतर कित्येक पदार्थ बर्फावर तरंगत राहतात. नदीप्रमाणें हिमनदी सुद्धां उंचावरील पदार्थ सखल भागाकडे नेते. नदीचें पाणी नेहमींच उताराच्या बाजूला जातें परंतु हिमनदींतील बर्फ घट्ट नसून तें उंच पर्वतावरील बर्फाच्या भारानें ढकललें जात असल्यानें मध्यें लहानसहान उंचवटे व टेंकड्या आल्यास त्यांवर बर्फाचा लोट चढतो व त्याच्या बरोबर त्यावर असलेले दगड वगैरे डोंगरावर चढविले जातात. प्राचीन काळीं आल्प्स पर्वतावरून वाहाणा-या हिमनद्यांबरोबर ज्यूरा पर्वतावर मोठाले दगड अशा त-हेनें गेल्याचीं उदाहरणें आहेत. हिमनदीच्या दोन्ही बाजूंवरच साधारणतः ढीग सांठतात त्यामुळें दोन हिमनद्यांचा संगम झाल्यास तीन ढीग होतात, कारण दोन नद्या मिळतात त्या ठिकाणीं दोन ढिगांचा एक मधला ढीग होतो. जितक्या ढिगांच्या रांगा दिसतात. त्यांतून एक वजा केल्यास किती हिमनद्या एके ठिकाणीं मिळाल्या हें सांगतां येतें.

हिमनद्या जे पदार्थ वाहून नेत असतात तेच त्यांनां त्यांचे कांठ व तळ खरडण्यास उपयोगी पडतात. बर्फ घट्ट असून सावकाश सरकत असल्यानें बर्फांतील खडे कडेच्या व तळावरील खडकांवर फार जोरानें घांसले जातात. हिमनद्यांचा बर्फ वितळल्यावर त्यांच्या तळावर प्रवाहाच्या दिशेनें उठलेले ओरखडे दिसतात. खालच्या खडकावरील इतर खडबडीतपणा नाहींसा होतो, व कित्येक ठिकाणीं मोठाले खड्डे पडतात. नद्यांप्रमाणें हिमनद्यांचा कोठेंहि वेग कमी झाल्यास वहात जात असलेले पदार्थ खालीं पडतांत. डोंगरांतून खालीं आल्यावर द-यांत किंवा सपाट मैदानावर सर्व त-हेची दगडमाती हिमनद्या आणून पसरतात. ज्या ठिकाणीं बर्फ वितळून पाणी होतें त्या ठिकाणीं बहुतेक सर्वच मोठाले दगड खालीं बसतात व पाण्याबरोबर बारीक वाळू वगैरे वहात जाते. नद्यांच्या मानानें हिमनद्यांची संख्या फार कमी आहे व हिमनद्या फक्त शतीकटिबंधांतच असतात, तरी देखील त्यांचें काम मोठ्या प्रमाणांत नेहमीं चालू असतें, त्यामुळें त्या भूपृष्ठावर बरेच फेरफार घडवून आणतात.

ध्रुवाच्या आसपास बर्फाच्छादित प्रदेश असतात; तेथून मोठ्या डोंगराच्या आकाराचे बर्फाचे तुकडे निसटून समुद्रांत वाहूं लागतात. व ते जेव्हां उष्ण प्रदेशांत येतात त्यावेळीं ते वितळून त्यांच्याबरोबर मूळ ठिकाणचे दगड वगैरे आलेले असतात ते समुद्रतळावर पडतात. या त-हेनें सुद्धां बर्फ आपलें काम करीत असतें व हें काम सुद्धां भूस्तरशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचें आहे.

पाण्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्यांचें वर्णन थोडक्यांत दिलें आहे. त्यावरून असें कळून येईल कीं, जमीन एकसारखी धुपली जाऊन तिची सर्वसाधरण उंची कमी होत आहे व समुद्रामध्यें दगड, माती, वाळू वगैरे पदार्थ सांठून त्याचा तळ भरून येत आहे. त्याचप्रमाणें जमिनीचा एखादा भाग समुद्रसपाटीच्या खालीं गेल्यास तेथें पाणी शिरून समुद्र होईल व ज्या ठिकाणीं समुद्र भरून निघतो त्या ठिकाणीं कोरडी जमीन होईल. अशा त-हेचे फरक झाल्याचीं उदाहरणें पृथ्वीच्या इतिहासांत पुष्कळ आहेत. परंतु जीं मोठालीं खडें आहेत किंवा जे जमिनीचें मोठाले विस्तार आहेत ते पूर्वीं कधीं समुद्रतळीं नव्हते व जे फार खोल उपसागर आहेत तेथील भाग कधींहि पाण्याच्या वर नव्हता. जमीन व समुद्र यांमध्यें जी अदलाबदल झालेली आहे ती उथळ समुद्र व समुद्रकांठाजवळील प्रदेश यांतच झालेली आहे.

सजीव पदार्थ - वनस्पती व प्राणीः- भूपृष्ठावर जे आतांपर्यंत फेरफार झालेले आहेत त्यांत सजीव पदार्थांचें काम बरेंच आहे. हवेंतील कर्बद्विप्राणिद (कार्बन डाय ऑक्साइड) झाडें शोषून घेतात व कांहीं कारणानें झाडे जमिनींत पुरलीं गेल्यास त्यांचा कोळसा तयार होतो. याप्रमाणें हवेंतील कर्बपासून दगडी कोळसा होऊनच कोळशाच्या खाणी तयार झाल्या. कोळसा जळून किंवा अन्य मार्गानें हाच कर्ब पुन्हा कर्बद्विप्राणिद (कार्बन डाय ऑक्साइड) रूपानें हवेंत जातो. झाडें जमिनींतून पुष्कळ त-हेचे खनिज पदार्थ शोषून घेतात व प्राणी जेव्हां वनस्पती खातात तेव्हां हे खनिज पदार्थ प्राण्यांच्या शरीरांत जातात व प्राणी मेले म्हणजे पुन्हां ते जमिनींत मिसळले जातात . याप्रमाणें पदार्थांच्या फे-या होत असतात परंतु विषयाच्या सोयीकरितां झाडांच्या व प्राण्यांच्या कार्याची हकीकत निरनिराळी दिली आहे.

वनस्पती:- वनस्पतींचीं (१) विनाशक, (२) संरक्षक व (३) उत्पादक अशीं तीन त-हेचीं कार्यें असतात. खडकांच्या वर लहान शेवाळ्यासारख्या वनस्पती उगवल्या म्हणजे खडक ओलसर होऊन त्यांचे कण सुटे होतात. ती वनस्पती मेल्यावर किंवा त्यांचे भाग कुजून खडकांच्या सान्निध्याला असल्यास खडकांच्या खनिज पदार्थांवर त्यांची रासायनिक क्रिया होते. या क्रियेंत विशेषतः खनिज पदार्थांतील प्राणवायु कमी होतो व त्यामुळें गंधकित (सल्फेट) असतात ते गंधकादि (सल्फाइड) होतात. तांब्याच्या व चांदीच्या अशोधित धातूपासून वनस्पतिजन्य पदार्थांमुळें तांबें व चांदी तयार झाल्याचीं पुष्कळ उदाहरणें सांपडतात. वनस्पती कुजुं लागल्या म्हणजे त्यांपासून जीं अम्लें तयार होतात त्यांमुळें तर पुष्कळ खनिज पदार्थांवर रासायनिक क्रिया होऊन ते पदार्थ विरघळतात व खडक अगदीं पोखरून निघतो. ज्या जमिनींत हीं अम्लें तयार होतात त्या जमिनींत सुद्धां पुष्कळ फेरबदल होतो. बॅक्टीरिआ या सूक्ष्म वनस्पतीच आहेत त्यांच्या योगानें खडकांवर रासायनिक क्रिया होण्यास मदत होतें. त्यांच्यामुळें सेंद्रिय नत्रा (नैट्रोजन) पासून नत्रस (नैट्रस) व नत्राम्लें (नैट्रिक) तयार होतात. ह्या अम्लांमुळें खडकांतील खनिज पदार्थांपासून नत्रितें (नैट्रेट्स) तयार होतात.

विनाशक क्रिया:- वनस्पती व मोठालीं झाडें आपल्या मुळांच्या साहाय्यानें खडकांचा विनाश करूं शकतात. झाडांचीं मुळें खडकांच्या भेगांतून शिरून त्या भेगा मोठ्या करतात व आस्ते आस्ते आंत शिरून त्या भेगा मोठ्या करतात व आस्ते आस्ते आंत शिरून आपल्या कार्याचें क्षेत्र वाढवितात. मुळें पन्नास फूट किंवा अधिकच लांब गेल्याचीं उदाहरणें पुष्कळ सांपडतात. पिंपळ वगैरे झाडांची मुळें लांबपर्यंत गेलेलीं नेहमींच दृष्टीस पडतात. खडकांच्या भेगांत मुळें शिरल्यानें आंत पाण्याचा व हवेंतील वायूचा शिरकाव होऊन त्यांचा व मुळापासून उत्पन्न होणा-या अम्लांचा खडकावर परिणाम होतो. याशिवाय झाडांच्या अस्तित्वानें पाऊस ओढला जाऊन त्याचा खडक उकलण्याच्या कामीं उपयोग होतो. कांहीं प्रकारचीं झाडें मेलेल्या वनस्पतींवर व प्राण्यांवर उपजीविका करून त्यांचा नाश करतात.

संरक्षकक्रिया:- ज्या खडकावर किंवा जमिनीवर वनस्पती उगवतात तेथील बारीक कण वा-यानें किंवा पावसानें सहजगत्या नेले जात नाहींत. कांहीं वनस्पतींचीं मुळें अशा त-हेनें पसरतात कीं, माती किंवा खडकांचे मोकळे कण एका ठिकाणीं बांधले जातात. कित्येक ठिकाणीं वाळू व मातीचे ढीग वा-यानें ढकलले जाऊन नुकसान होण्याचा संभव असतो, अशा ठिकाणीं मुळें पसरणा-या वनस्पतींची मुद्दाम लागवड करतात. कित्येक लोक पटांगणें धुवून जाऊं नयेत म्हणून त्यांवर हरळी लावितात. समुद्रांत उगवणा-या वनस्पतींचाहि वाळू वाहूं न देण्याच्या कामीं उपयोग होतो. ज्या ठिकाणीं झाडांचीं दाट अरण्यें असतात त्या ठिकाणची माती फारशी वाहून जात नाहीं, कारण ती जागजागीं आडली जाते.

उत्पादकक्रिया:- भूपृष्ठावर जे खडक आहेत त्यांपैकीं कित्येकांची उत्पत्ति वनस्पतींच्या मदतीनें झाली आहे व कित्येक थर तर वनस्पतीच पुरल्या गेल्यामुळें झाले आहेत. समुद्रांत असणा-या वनस्पतींच्या अंगीं पाण्यांतील क्षारांपैकीं चुना (लाइम), मग्न(मॅग्नेशिया), सिंधु (सोडा) वगैरे पदार्थ शोषून घेण्याची शक्ति असते. कित्येक वनस्पती इतका खटकर्बित (कॅल्शियम कार्बोनेट) शोषून घेतात कीं त्यांच्यांत शेंकडा ८० भाग तोच असतो. या त-हेच्या वनस्पती मेल्या म्हणजे त्यांच्यांतील सेंद्रिय भाग निघून जातो व खालीं निरिंद्रिय पदार्थ राहतात. या निरिंद्रिय पदार्थांचे थर होऊन पुढें खडक बनतात. समुद्रांतील वनस्पतींप्रमाणें सरोवरें व तळीं यांतील पुष्कळ वनस्पती निरिंद्रिय पदार्थांचे थर करतात व त्यांपासून चुनखडीसारखे खडक तयार होतात.

शीत व समशीतोष्ण कटिबंधांत पुष्कळ ठिकाणीं डबक्यासारखें सांठलेलें पाणी असतें तेथें किंवा दलदल आहे अशा ठिकाणीं जी झाडें उगवतात तीं मेलीं म्हणजे कुजूं लागतात किंवा मातीखालीं पुरलीं जातात. त्याचप्रमाणें दलदलीच्या ठिकाणीं वनस्पती एका बाजूनें नवीन फांद्या बाहेर टाकीत असतात व दुस-या बाजूस त्या कुजूं लागलेल्या असतात. या ठिकाणीं सेंद्रिय पदार्थांचा पुष्कळ मोठा सांठा होतो. यूरोप व उत्तर अमेरिकेचे हजारों चौरस मैल असल्या पदार्थांनीं व्यापिलेले आहेत. आयर्लंडचा एकसप्तमांश भाग कुजत असलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या दलदलीनें व्यापिला आहे. हीं ठिकाणें वाळलीं म्हणजे तेथून ठोकळे खणून काढून त्यांचा जाळणाला उपयोग करतात. त्याच त-हेचे सेंद्रिय पदार्थांचे सांठे मातीखालीं व वाळूखालीं पुरून खोल गेल्यास कोळसा तयार होतो व हल्लीं अस्तित्वांत असलेल्या कोळशाच्या खाणी अशाच त-हेनें पूर्वीं झाल्या असल्या पाहिजेत.

समुद्रकांठीं किंवा नदीच्या तोंडाशीं सेंद्रिय पदार्थ सांठतात व त्या ठिकाणीं दलदलींत उगवणा-या वनस्पतींची वाढ होते. अशा ठिकाणीं समुद्रास जाऊन मिळणारें पाणी गाळल्यासारखें स्वच्छ होऊन जातें व माती व गाळ सेंद्रिय पदार्थांत सांठून राहतो, अशा त-हेनें बरेच मोठे घट्ट थर होतात. कांहीं सूक्ष्म वनस्पती सिलीका व खटकर्बितें (कॅल्शिअम कार्बोनेट) समुद्राच्या पाण्यांतून घेतात व मरणानंतर समुद्रकांठावर किंवा समुद्रतळाशीं साठून खडकांचे थर तयार करतात.

प्राणीः- वनस्पतींप्रमाणें प्राण्यांचाहि (१) विनाशक, (२) रक्षक व (३) उत्पादक. अशा तीन क्रिया असतात. प्राण्यांच्या विनाशक क्रिया आपल्यासभोंवार दृष्टि फेंकली असतांना सहज लक्षांत येण्यासारख्या आहेत. डार्विननें एका ठिकाणीं असें पाहिलें आहे कीं पंधरा वर्षांत गांडुळांनीं मातीचा तीन इंचांचा थर खालून भूपृष्ठभागांवर आणला. भुंग्यांचीं वारूळें, उंदीर, घुशी, खेंकडे वगैरेंचीं बिळें, कसरीचें कुरतडणें, टोळांची पिकावरची व झाडपाल्यावरची धाड हीं सर्व प्राण्यांच्या विनाशक क्रियांचीं उदाहरणें आहेत. प्राण्यांची संरक्षक अशी फारशी क्रिया नाहीं परंतु उत्पादक क्रियेचीं बरीच उदाहरणें आहेत. समुद्रांतील क्षारांपैकीं खटकर्बित (कॅलशियम कार्बोनेट) व सिलिका वगैरे द्रव्यें शोषून घेऊन पुष्कळ सूक्ष्म प्राणी आपलीं शरीरें तयार करतात व हे प्राणी मेले म्हणजे त्यांचीं शरीरें समुद्रतळाशीं जातात व त्या ठिकाणीं तीं इतकीं सांठतात कीं त्यांचे खडू किंवा चुनखडीसारखे खडक तयार होतात. पोंवळ्यांचे प्राणी समुद्रक्षारापासून आपलीं शरीरें तयार करतात. हे प्राणी खोल पाणी नसून उष्णता बरीच आहे व पाण्यांतील प्रवाह ज्या ठिकाणीं येत आहे अशा ठिकाणीं वाढतात. हे प्राणी जसे खोल पाण्यांत वाढत नाहींत त्याप्रमाणें पाण्याच्या वरहि वाढत नाहींत परंतु यांनीं केलेलीं घरें व त्यांचीं शरीरें एकमेकांस चिकटलेलीं राहून त्यांचा थर होतो व त्या ठिकाणीं समुद्रतळ जर कवचाच्या हालचालीनें उचलला गेला तर तो थर पाण्याच्या वर येतो. अशा त-हेनें पुष्कळ थर वर येऊन पोंवळ्यांची मोठालीं बेटें अस्तित्वांत आलेलीं आहेत. कित्येक ठिकाणीं अशा बेटांवर झाडें मुबलक उगवलेलीं आढळतात.

अटलांटिक वगैरे महासागरांच्या तळांतील गाळ काढून तपासल्यास त्यांतील पुष्कळ भाग सूक्ष्म प्राण्यांच्या शरीरांचा आहे असें आढळतें. अशा त-हेची उत्पादक क्रिया प्राण्यांच्यामुळें मोठ्या प्रमाणावर होत असते. पुष्कळ वेळां चुनखडीच्या दगडांत वाटोळे लहान-मोठे खडे सांपडतात. हे सुद्धां पूर्वींच्या मृतप्राण्यांच्या कांहीं भागांचें अंश असतात. जुन्या मृतप्राण्यांच्या शरीरापासून व विष्टेपासून तयार झालेली खनिज खतें पेरू वगैरे देशांत सांपडतात. हीं खतें प्राण्यांच्या उत्पादकक्रियेचींच उदाहरणें होत.

मुनुष्य:- मनुष्याच्या कित्येक क्रिया भूस्तरशास्त्रदृष्ट्या बरेच वेळां महत्त्वाच्या असतात. झाडी तोडणें, जमिनींतील पाण्याचा निचरा करणें वगैरे गोष्टींचा हवेवर परिणाम होतो. बोगदे पाडणें, खाणी खणणें यांचा खडकावर परिणाम होतो. दोन समुद्र एकमेकांस जोडणें, वनस्पती व पाणी एका प्रदेशांतून दुस-या प्रदेशांत नेणें हीं सर्व मनुष्यक्रियेचीं उदाहरणें आहेत.

ज्वालामुखीच्या क्रिया 'ज्वालामुखी' या लेखांत पहा.

धरणीकंप अथवा भूकंपः- नुकतेच जे शास्त्रीय शोध होऊन, जीं नाजूक उपकरणें व यंत्रें तयार केलेलीं आहेत त्यांवरून असें दिसतें कीं आपल्या खालील जमीन सतत हालत असते. पृथ्वी फार स्थिर आहे ही जी पूर्वींची कल्पना ती नष्ट होऊन, पृथ्वी नेहमीं थोड्याबहुत प्रमाणांत सारखी हालत असते असें दिसून येतें. हवेच्या उष्णमानांतील फरक, हवेच्या दाबांतील फरक, पावसाची सर, पक्षी चालला असतां त्याच्या पायाचा आवाज, तसेच मोठमोठ्या प्राण्यांच्या हालचाली वगैरे सर्व कारणांनीं पृथ्वीचा पृष्ठभाग खालीवर हालतो व ही अगदीं सूक्ष्म हालचाल मायक्रोफोन नामक यंत्रानें ऐकूं येतें व ग्यालव्हानोमीटर यंत्रानें स्पष्ट दिसूं शकते.

भूकंप अथवा धरणीकंप हा शब्द पृथ्वीच्या अंतर्भागांत होणा-या आघाताला लावतां येतो, नंतर त्या आघातामुळें अत्यंत सूक्ष्म अगर अतिशय मोठी अशी हालचाल पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्पन्न होते. पहिल्या त-हेच्या हालचालीपासून कांही एक परिणाम होत नसून दुस-या त-हेच्या हालचालीपासून भयंकर त-हेचें नुकसान-घरेंदारें जमीनदोस्त होणें, खडक खालीवर होणें, व मनुष्यहानीहि होणें वगैरे प्रकार होऊं शकतात.

खाणींतील अपघातानें होणारे स्फोट अगर सुरुंग वगैरे लावल्यामुळें होणारे स्फोट ह्यांच्यामुळें जसे भूपृष्ठावर लहान मोठे धक्के बसून हालचाल होते तशाच त-हेचे परिणाम भूकंपापासूनहि होतात. पृथ्वीच्या घन थरांमधून जणू कांहीं लाटा निघून त्या दूरवर जाऊन पोंहचतात. ह्या घन थरांतून जाणा-या लाटांशिवय हवेंतून व पाण्यांतूनहि भूकंपाच्या लाटा जातात. जमिनीवर उत्पन्न होणा-या भूकंपापेक्षां समुद्रांतच जास्त भूकंप उत्पन्न होतात.

भूकंपाच्या वेळीं होणारी भूपृष्ठाची हालचाल:- भूकंप होतो तेव्हांपासून भूपृष्ठाच्या वर-खालीं व मागें -पुढें अशा ज्या हालचाली होतात त्यांबद्दल लोकांची जी साधारण समजूत असते, ती अतिशयोक्तीची असते. अतिशय नाजूक अगर सूक्ष्म अशा यंत्रांच्या योगानें असें आढळून आलें आहे कीं, लहानसहान भूकंपाच्या वेळीं पृथ्वीची मागेंपुढें हालचाल अतिशय थोडी असते एका मिलिमीटरचा लहानसा भाग (हिस्सा) ह्यापेक्षां ही हालचाल जास्त नसते, व तीन किंवा चार मिलिमीटरपेक्षां सहसा जास्त होत नाहीं. जेव्हां ही हालचाल १० मिलिमीटरइतकी होते तेव्हां तिच्यापासून धोका असण्याचा संभव असतो. व जेव्हां २० मिलिमीटरच्या वर ही हालचाल होतें तेव्हां गिरण्यांच्या चिमण्या पडतात व इतर त-हेनें नुकसान होतें.

१८९४ सालीं जपानांतील टोकिओ येथें झालेल्या अतिशय मोठ्या धरणीकंपाच्या वेळीं पृथ्वीची हालचाल ६३ मिलिमीटर म्हणजे सुमारें २॥ इंचांइतकी होती व तीच १८९१ सालीं ९-१२ इंचांपर्यंत होती. भूपृष्ठांची खालींवर होणारी हालचालहि अगदीं सूक्ष्म असते. १८९४ सालीं ही हालचाल फक्त १० मिलिमीटर म्हणजे अर्ध्या इंचापेक्षांहि कमी इतकी होती.

भूकंपाच्या लाटांचा वेग:- पृथ्वीच्या निरनिराळ्या प्रकारच्या थरांतून जाणा-या भूकंपाच्या लाटांचा वेग मोजण्याकरितां पुष्कळ प्रयोग झालेले आहेत. मॅलेट यास असें आढळून आलें कीं, बंदुकीच्या दारूचा जो स्फोट होतो त्याचा धक्का वाळूच्या थरांतून एका सेकंदांत ८२५ फूट, ह्या वेगानें जातो. शिस्ट, स्लेट व क्वार्टझाइट ह्यांच्या थरांतून १८०८ फूट भुसभुशीत ग्रॅनाइटमधून १३०६ फूट व घट्टशा ग्रॅनाइटमधून १६६४ फूट वेगानें जातो. जनरल अँबट यास असें आढळून आलें कीं, हा वेग एका सेकंदांत १२४० फुटांपासून ८८०० फुटांपर्यंत कमीजास्त होऊं शकतो. भूकंपाचे धक्के निरनिराळ्या जागीं बसण्याच्या वेळासंबंधीं जी माहिती जमविली आहे. तीवरूनहि हा वेग कसा बदलतो तें सहज लक्षांत येतें. इ. स. १८५७ च्या कालेब्रियन भूकंपाच्या धक्क्याचा वेग सरासरी ७८९ फूट होता. व्हायजे येथील १८५५ च्या भूकंपाचा वेग उत्तरेकडे २८६१ फूट होता तर दक्षिणेकडे १३९८ फूटच होता. मार्च १८७३ मधील इटलींतील धरणकंपाचे धक्के १६४० ते ४१०१ फुटांपर्यंतच्या निरनिराळ्या वेगांनीं निरनिराळ्या दिशांनीं जात होते. जपानांतील १८९१ सालच्या डिसेंबर ९ व ११ च्या धरणीकंपाचे धक्के एका सेकंदांत सुमारें १|| मैल वेगानें जात होते.

प्रो. मिलने यानें पुष्कळ काळपर्यंत निरीक्षक करून असें अनुमान काढलें कीं, धरणीकंपाच्या धक्क्यांचा वेग शेकडों फुटांपासून हजारों फुटांपर्यंत असूं शकतो व धक्का जितका जास्त जोराचा असेल तितका वेगहि अधिक असतो.

भूकंपाची कालमर्यादा:- धरणीकंप होत असतांनां बसणारे धक्के व तसेच दोन धक्क्यांच्या मधील अंतर हीं दोन्हीहि अनियमित असतात. कधीं कधीं सर्व धरणीकंप फक्त कांहीं सेकंदपर्यंतच अस्तित्वांत असतो. कॅरेकस शहरी झालेल्या भूकंपाच्या वेळीं तेथील सुंदर देवालयें व १०,००० लोक ह्या सर्वांचा अर्ध्या मिनिटांत नाश झाला; लिस्बन शहर पांच मिनिटांत जमीनदोस्त झालें. टोकिओ येथें १८८५ ते १८९१ पर्यंत झालेल्या २५० भूकंपाची जी माहिती नमूद केली आहे तीवरून ह्या भूकंपांची सरासरी कालमर्यादा ११८ सेकंद इतकी येते. त्यांपैकीं ७ भूकंप जरा मोकळे होते व त्यांची सरासरी कालमर्यादा ६ मिनिटें व १३ सेकंद इतकी होती. कांहीं ठिकाणीं भूकंपाचे लहान मोठें धक्के पुष्कळ दिवस, आठवडे अगर महिनेपर्यंतहि बसत असतात. १७८३ सालच्या कॅलेब्रियन भूकंपाचे धक्के पुढें चार वर्षेंपर्यंत बसत होतें.

आवृत्ति:- दोन भूकंपांच्या मध्यंतरीं जाणारा काल निरनिराळ्या प्रदेशांत निरनिराळा असतो. कांहीं प्रदेशांत वारंवार भूकंप होतात. जपान देश हा एक अशा त-हेचें उदाहरण आहे. इ. स. १८८५ ते १८९०  ह्या काळांत तेथें जे धक्के बसले त्यांची सरासरी एका वर्षांस ६० इतकी येते. व १८९० च्या आक्टोबर महिन्यांत जो भयंकर भूकंप झाला त्यानंतर पहिल्या १० दिवसांत ११३२ धक्के बसले. व नंतरच्या २ वर्षांच्या अवधींत ३३६४ धक्के बसले.

नियतकालिकपणा:- चंद्राचा व भूकंपाचा कांहीं संबंध आहे कीं काय हें पहाण्याचे जे प्रयत्न झाले त्यांवरून असा संबंध असल्याचें दिसून येत नाहीं; शुद्धपक्षांत व कृष्णपक्षांत सारखेच धरणीकंप होतात. परंतु ॠतुमानाचा मात्र धरणीकंपाशीं संबंध दिसतो. आतांपर्यंतच्या अनुभवावरून असें आढळून आलें आहे कीं, उष्णकालापेक्षां थंडीच्या दिवसांत भूकंपाचे धक्के अधिक बसतात.

भूपृष्ठाच्या निरनिराळ्या जातींच्या थरांचा भूकंपावर होणारा परिणामः -भूकंपाची लाट केंद्रस्थानापासून निघून भूपृष्ठाच्या घन थरांतून जाते व त्या थराच्या प्रकाराप्रमाणें तिचा परिणाम कमीअधिक असा होतो. कांहीं थरांतून ह्या लाटा कमी वेगानें जातात तर कांहीं थरांतून जास्त वेगानें जातात. कित्येक ठिकाणीं त्यांची दिशा बदलली जाते. खडकांतील भेगा, त्यांचे सांधे अगर जोड वगैरे कारणांनीं ह्या लाटांच्या दिशांत, वेगांत अगर परिणामांत फरक होतात. एखाद्या शहरांत भूकंपाचा धक्का बसला असतां निरनिराळ्या भागांत निरनिराळे परिणाम झालेले आढळतात. वालुकामय भुसभुशीत अशा भूपृष्ठावर असलेल्या इमारती जमीनदोस्त झालेल्या दिसतात, तर कठिण खडक असलेल्या थरावरील इमारती तशाच चांगल्या स्थितींत राहिलेल्या आढळतात.

भूकंपाचा विस्तात:- भूकंपाचे धक्के कधीं कधीं थोड्याशा प्रदेशांपुरतेच मर्यादित असतात तर कधीं कधीं त्यांचा विस्तार फार दूरवर पोहोंचतो. परंतु भूकंपमापक यंत्राच्या साहाय्यानें अत्यंत सूक्ष्म हालचाल पुष्कळ अंतरावरहि कळूं शकते. १७५५ सालीं लिस्बन शहरीं झालेल्या भूकंपाचा धक्का सर्व पोर्तुगाल देशाच्या किना-यावर बसून दक्षिणेस उत्तर आफ्रिकेपर्यंत व उत्तरेस स्कँडिनेव्हियापर्यंत जाऊन उत्तर आफ्रिकेपर्यंत व उत्तरेस स्कँडिनेव्हियापर्यंत जाऊन पोहोंचला, इतकेंच नव्हे तर पश्चिमेस उत्तर अमेरिकेंतहि हा धक्का बसला. हंबोल्ट याच्या मतें ह्या भूकंपाचा विस्तार यूरोपखंडाहूनहि जास्त असावा. दक्षिण अमेरिकेंतील भूकंप फार लांबवर जाऊन पोहोंचतात. परंतु वर सांगितल्याप्रमाणें प्रत्यक्ष धक्का जरी बसला नाहीं तरी भूकंपाच्या धक्क्यामुळें उत्पन्न झालेली अत्यंत सूक्ष्म हालचालहि भूकंपमापक यंत्राच्या सहाय्यानें कळूं शकते. इ. स. १८९७ मध्यें हिंदुस्थानांत आसामांत जो मोठा भूकंप झाला तो भूकंपमापक यंत्रानें एडिंबरो येथें ५००० मैल अंतरावर कळूं शकला.

भूकंपाच्या उगमस्थानाची खोलीः- मॅलेट या शास्त्रज्ञानें भूकंपाच्या उगमस्थानासंबंधीं जे शोध लावले आहेत त्यांवरून असें दिसतें कीं, हें उगमस्थान फार खोल नसतें. भूपृष्ठाच्या वरील थरामध्यें ह्याचा कोठें तरी उगम होतो. जास्तींत जात ३० मैलांपेक्षां हें स्थान खोल नसावें. १८५७ सालच्या कॅलेब्रियन भूकंपाचें उगमस्थान ५ मैल खोल असावें. १८७२ सालच्या मध्ययूरोपांतील भूकंपाचें उगमस्थान ९०६ मैल खोल असावें.

भूकंपाचे उगमस्थान:- बहुतेक भूकंप समुद्रतळापासून उगम पावतात असें अनुमान आहे. विशेषतः भूप्रदेशाच्या किना-यालगत असणारा समुद्र जेव्हां अतिशय खोल असतो तेव्हां त्या ठिकाणीं भूकंपाचा उगम होतो असें दिसतें. जपानच्या पूर्वेकडील किना-यागत असलेला समुद्र एकदम फारच खोल (सुमारें २४,००० फूट) आहे. आणि ह्या रेषेंतूनच नेहमीं जपानमध्यें होणारे भूकंप उगम पावतात. व हे भूकंप एका बिंदूपासून न निघतां, त्यांचा उगम लांब रेषेंत असतो. दुसरी अशाच त-हेची कमजोर रेषा म्हणजे दक्षिण अमेरिकेंतील पश्चिम किना-यालगतची होय. व ह्याहि ठिकाणीं किना-यालगतच अतिशय खोल समुद्र आहे. भूप्रदेशांत जे धरणीकंप होतात ते बहुतकरून पर्वतांच्या रांगा असलेल्या ठिकाणीं जास्त प्रमाणांत होतात. व विशेषतः जे नवीन पर्वत आहेत त्यांच्या आसपास ते अधिक होतात. तथापि ज्वालामुखीपर्वतांचा व भूकंपांचा कांहीं एक संबंध नाहीं, मात्र एकेकाळीं तशी समजूत होती. यूरोपखंडांत अत्यंत नाशकारक असे जे भूकंप झाले ते ज्वालामुखी नसलेल्या प्रदेशांत झाले.

क्षेत्रः- भूपृष्ठाचा असा मोठासा क्वचित भाग असेल कीं, ज्या ठिकाणीं भूकंप कधींच झाला नाहीं तरी पण कांहीं प्रदेशांत भूकंप वारंवार होतात तर कांहीं प्रदेशांत क्वचित होतात.

पूर्वपश्चिम असणारा असा एक लांबवर प्रदेशाचा पट्टा मध्ययूरोपांतून निघून मध्यआशियांतील पर्वतांच्या रांगांपर्यंत जाऊन पोहोचतो. ह्यांत भूमध्यसमुद्र, काळासमुद्र, कास्पियन व आरल समुद्र ह्या सर्वांचा समावेश होतो. ह्या सर्व प्रदेशांत भूकंपाचे धक्के वारंवार बसतात. ह्याच्या दक्षिणोत्तर मर्यादा म्हणजे आल्प्सपर्वत व उत्तर आफ्रिकेंतील डोंगरांच्या रांगा ह्या होत. त्याचप्रमाणें दक्षिण अमेरिकेचा पश्चिमेकडील किना-याचा भाग व जपानचा पूर्व किनारा हे प्रदेश भूकंपाचीं माहेरघरेंच होत. ह्या सर्व ठिकाणीं अतिशय खोल समुद्र व लगत उंच पर्वत असलेले आढळतात ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे.

भूकंपाचीं कारणें:- मागें सांगितल्याप्रमाणें भूकंपाचें कारण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून धक्का बसल्यामुळें लाटा उत्पन्न होतात व त्या सर्व दिशांनीं पसरत जातात. व ज्या ज्या ठिकाणीं ह्या लाटा पोहोंचतात त्या त्या ठिकाणीं पृथ्वीचा पृष्ठभाग वरखालीं अगर पुढेंमागें हलूं लागतो. परंतु अशा त-हेचा धक्का बसण्यास अगर उत्पन्न होण्यास पुढील कारणें असावींत. (१) भूपृष्ठाच्या अंतर्भागांत कांहीं पोकळ द-या असूं शकतात व ह्यांच्यावरील झांकण - भूपृष्ठाचा भाग - एकाएकीं ढांसळल्यामुळें वरीलप्रमाणें धक्का बसून लाटा उत्पन्न होऊं शकतात, (२) किंवा कांहीं ठिकाणीं ज्वालामुखीचा स्फोट झाल्यामुळेंहि धक्का बसून भूकंप होऊं शकेल.

भूपृष्ठांतील कांहीं त-हेचे खडक पाण्यांत विद्राव्य आहेत. व पावसाच्या रूपानें पडणारें पाणी झिरपून कांहीं ठिकाणीं आंतील खडक विरघळून मोठमोठ्या बोगद्यासारख्या अगर द-यांसारख्या पोकळ जागा निर्माण होत असाव्यात, व कालांतरानें आधार सुटल्यामुळें वरील खडक ढांसळून मोठा धक्का बसण्याचा संभव आहे. परंतु अशा त-हेनें उत्पन्न होणारी हालचाल फारच मर्यादित असते. तिचा परिणाम फार लांबवर जाऊं शकत नाहीं. तसेंच पूर्वीं एकदां जी कल्पना होती कीं, बहुतेक भूकंपाचें कारण ज्वालामुखीचे स्फोट हेंच असावें, ती कल्पना अलीकडे उपलब्ध झालेल्या माहितीवरून खरी नाहीं असें आढळून आलें आहे. कारण बहुतेक मोठमोठे भूकंप ज्वालामुखींपासून दूरवर असणा-या प्रदेशांतच झालेले आहेत. ज्वालामुखीपासून होणारे भूकंप लहानसहान असून मर्यादित स्वरूपाचे असतात.

भूकंपाच्या कारणासंबंधीं आतां बहुतेक शास्त्रज्ञांचें ऐकमत्य झालें आहे. पृथ्वीचें कवच थंड होत असल्यामुळें तें आकुंचन पावत असतें, व त्या आकुंचनामुळेंच मुख्यतः भुकंपाचे उद्भव होतात असें अनुमान काढलें आहे.

डॉ. होर्बस् ह्यानें यूरोपांतील भूकंपाचें पूर्ण अध्ययन करून असें अनुमान काढलें आहे कीं, जरी लहानसहान मर्यादित स्वरूपाचे भूकंप आंतील पोकळींत खडक ढांसळून अगर ज्वालामुखीचे स्फोट होऊन होत असलें तरी मोठाल्या भूकंपाचें मुख्य कारण म्हणजे भूपृष्ठावर तयार झालेले मोठाले डोंगर होत व त्यानें भूकंपाच्या लाटांचा व मोठमोठ्या डोंगरांच्या रेषांचा अगर दिशांचा असलेला निकट संबंध स्पष्टपणें नजरेस आणला. त्याचप्रमाणें आतां असें आढळून आलें आहे कीं फक्त मोठमोठ्या पर्वतांच्या योगानेंच भूकंप निर्माण होतात असें नाहीं तर भूपृष्ठावर ज्या ज्या ठिकाणीं अधिक दाब अगर ताण बसलेला असेल त्या ठिकाणीं भूकंपाचा संभव आहेच. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणें उंच पर्वतामुळें खालील भूपृष्ठावर ताण उत्पन्न होतो त्याचप्रमाणें अत्यंत खोल असलेल्या भागांतहि असाच ताण बसतो. विशेषतः जमिनीला लागून ज्या ठिकाणीं एकदम खोल समुद्र असतो त्या ठिकाणीं ह्या अतिशय खोलीमुळें जवळपासच्या भूपृष्ठावर एक प्रकारचा दाब अगर ताण बसल्याप्रमाणें होतो व म्हणून अशा ठिकाणींहि भूकंप वरचेवर होतात.

सर्व भूपृष्ठासंबंधीं विचार केला म्हणजे असें आढळून येईल कीं, उंच पर्वतांचीं शिखरें अगर अत्यंत खोल द-या अगर समुद्राचा तळ हीं एकाच प्रकारच्या लाटेनें भूपृष्ठावर उत्पन्न झालीं आहेत, व म्हणून त्यांच्यामुळें भूपृष्ठावर सारखाच ताण बसण्याचा संभव आहे. तसेंच असें आढळून येईल कीं जे अत्यंत जुने असे डोंगर अगर खोल समुद्र आहेत त्या ठिकाणीं हा ताण इतका आतां उरलेला नाहीं. कालांतरानें त्यांत घडामोडी होऊन ते भाग आतां स्थिर झालेले आहेत. परंतु जे पर्वत अगर समुद्रतळ नुकतेच तयार झालेले आहेत. त्यांनां स्थिर स्थितींत येण्यास अद्याप सवड सांपडलेलीं नाहीं म्हणून त्यांच्यामुळें जवळपासच्या भूपृष्ठावर ताण पडून भूपृष्ठ ढांसळत असावेत व त्यामुळें धक्के बसून भूकंप निर्माण होत असावेत. विशेषतः खडकांच्या रचनेंत जर कमीपणा अगर दोष मूलतःच असला तर त्या ठिकाणीं हटकून वरील प्रमाणें ढांसळून भयंकर धक्का बसतो. सन १८९१ सालीं झालेला जपान देशांतील भूकंप कमकुवत असलेल्या खडकांच्या रचनेमुळें वरील खडक ढांसळूनच झाला. व शिवाय खालपासून वर भूपृष्ठापर्यंत एक मोठी भेग निर्माण झालीं व ही सुमारें ४० मैल लांबींची होती.

भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणम:- कधीं कधीं भूकंपाची लाट दूरवर जाऊनहि भूपृष्ठावर त्याचा कांहीं एक परिणाम होत नाहीं. परंतु बहुतकरून भुसभुशीत जमिनी टेंकड्यांपासून एकदम दूर झालेल्या दिसतात व ह्या दोहोंच्या मध्यें लहान मोठ्या भेगा उत्पन्न होतात. उतरणीवर सुटे असलेले दगड ढांसळून खालील द-यांत पडतात. ह्यामुळें मूळच्या पाणी वहाणा-या प्रवाहांत फरक कमी होतात. कांहीं ठिकाणीं खडक फुटून त्याची भुकटी होते. भूपृष्ठावर उत्पन्न होणा-या भेगा कधीं कधीं फार मोठाल्या असतात; त्या केव्हां केव्हां २००  फूट खोल व कांहीं मैल लांबहि असतात. हिंदुस्थानांत जो धरणीकंप झाला त्यावेळीं काल्हर नदीला समांतर अशी भेग १०० मैल लांबपर्यंत उत्पन्न झाली.

कांही ठिकाणीं वर्तुलाकार खड्डे अगर खळगे भूकंपामुळें उत्पन्न होतात व कांहीं ठिकाणीं त्यांतून पाणी वर येतें. स. १८९७ च्या हिंदुस्थानांतील भूकंपामुळें सपाट केलेली शेतीची जमीन उंचसखल अशी झाली व तिच्या सपाटींतील फरक २।३ फुटांइतका होता.

कांहीं ठिकाणीं भूपृष्ठाचा भाग सर्व बाजूंनीं दाबला गेल्यामुळें आकुंचन पावलेला आढळतो. १८९१ सालीं झालेल्या जपानमधील भूकंपानें एका नदीच्या पात्राची रुंदी शेंकडा २ भाग कमी झाली व पुलाच्या कमानीमधील अंतर कमी झालेलें आढळलें.

(२) भूपृष्ठावरील पाण्यावर होणारे परिणाम:- भूकंपामुळें झ-यांवर फार परिणाम होतो. कांहीं झरे मोठे होतात तर कांहीं लहान होतात. कांहींतील पाणी गढूळ होतें तर कांहींच्या पाण्याचें उष्णमान वाढतें. तसेंच कांहीं झरे नाहींसे होतात. नद्या व ओढे ह्यांचे प्रवाह लहान अगर मोठे होतात, कधीं कधीं त्यांच्या दिशा बदलून ते निराळ्याच दिशांनीं वाहूं लागतात. परंतु सर्वांत जास्त परिणाम म्हणजे सरोवरास होतो. भूकंप होण्याच्या अगोदरपासूनच सरोवरांतील पाण्यांत लाटा उत्पन्न होऊन अगदीं तुफान होतें. ह्याचें मुख्य कारण भूपृष्ठामधून भूकंपाच्या धक्क्याची जी लाट पसरत जाते तिच्यामुळें सरोवराचा तळहि हालतो.

ही भूगर्भांतील हालचाल फार जोराची असल्यास सरोवरें कायमचीं कोरडीं झालेलींहि आढळतात. कधीं कधीं भूकंपानंतर नवीन सरोवरेंहि अस्तित्वांत येतात. अशा नवीन सरोवराच्या उत्पत्तीचीं कारणें म्हणजे (१) भूपृष्ठाच्या हालचालीमुळें भूपृष्ठ कायमचा खालीं होऊन खळगा उतपन्न होणें, (२) अगर एखादी भेग नदीच्या प्रवाहांत उत्पन्न झाल्यामुळें खालील बाजूस धबधबा व वरील बाजूस सरोवर उत्पन्न होतें. (३) परंतु बरेच वेळां खडकांचे मोठमोठे भाग कोसळून एखादा प्रवाह अडल्यामुळेंहि सरोवरें उत्पन्न होतात पाण्याबरोबर पाण्यांतील प्राण्यांच्यावर अनिष्ट परिणाम होतात. माशांचा संहार होऊन प्रवाहांतील मासे नाहींसे होतात.

भूकंपाचे समुद्रावर होणारे परिणाम:- भूकंपाचा उगम जेव्हां समुद्रांत होतो त्यावेळीं ह्या भूकंपाच्या धक्क्याच्या लाटांबरोबर समुद्रांतहि मोठमोठ्या लाटा उत्पन्न होऊन वादळें होतात व या लाटा किना-याजवळ पोहोंचल्या म्हणजे जमिनीवर लांबवर आंत पसरून भयंकर नाश करतात. मोठमोठ्या धरणीकंपाच्या वेळीं ह्या समुद्रांतील वादळामुळेंच जास्त हानि झालेली आहे. १५ जून १८९६ च्या भूकंपाच्या वेळीं जपानच्या ७० मैल किना-यावर अशा त-हेच्या लाटा आंतील प्रदेशांत पसरून तीस हजार रहिवाशी प्राणास मुकले. भूकंपामुळें समुद्राचा तळ पुष्कळ ठिकाणीं उंच सखल होतो, असें आढळून आलें आहे.

पृष्ठभागाच्या सपाटीतींल कायमचे परिणाम:- भूकंपानंतर पुष्कळ ठिकाणीं पृष्ठभाग वर आलेला अगर खालीं गेलेला आढळतो. १८२२ सालच्या भूकंपामुळें चिली देशाचा किनारा ३ ते ४ फूट वर आलेला आढळला. पाण्यांत असलेला भाग आंतील पदार्थांसह वर आलेला आढळला. सन १७६२ मधील बंगालच्या भूकंपामुळें चितागांगजवळील किना-याचा ६० चौरस मैल प्रदेश समुद्राखालीं गेला.

पृथ्वीच्या कवचाची वर व खालीं होणारी हालचाल:- भूकंपामुळें सूक्ष्म प्रमाणांत होण-या हालचालीशिवाय, सर्व पृथ्वीचा पृष्ठभाग पुष्कळ ठिकाणीं अगदीं नकळत थोडथोडा वर येत असतो अगर खालीं जात असतो. सेल्सीअम ह्या शास्त्रज्ञानें अठराव्या शतकाच्या आरंभीं बाल्टिक समुद्राचा किनारा हळू हळू वर येत आहे हें प्रत्यक्ष पाहून समुद्राचा तळ खालीं जात असावा असें प्रतिपादन केलें. त्यावेळीं त्याच्या विरूद्धच सर्व शास्त्रज्ञांनीं आपलीं मतें दिलीं. परंतु एकोणिसाव्या शतकांतील भूस्तरशास्त्रवेत्त्यांनीं  पृथ्वीचा पृष्ठभाग हळू हळू वर येत आहे व खालीं जात आहे हें तत्त्व मान्य केलें. लिओपोल्ड व्हॉन बक ह्यानें पूर्ण शोध करून असें मत दिलें कीं, स्कँडिनेव्हिया हा प्रांत हळू हळू वर येत आहे. हीं हालचाल इतकी सूक्ष्म असते कीं, कित्येक पिढ्यांनांहि ती समजून येणार नाहीं. अचल अशा एखाद्या ठिकाणाहून जर पृथ्वीच्या पृष्ठभागाची पहाणी केली असेल तरच त्यांत होणारा फरक कळण्याचा संभव आहे. क्वचित प्रसंगीं नद्या, ओढे यांच्या प्रवाहाच्या दिशा बदलल्यामुळें भूपृष्ठाची झालेली हालचाल कळून येते.

भूपृष्ठाच्या मानानें समुद्राचा पृष्ठभाग वर येत (वाढत) आहे अगर खालीं जात आहे अशी साधारण कल्पना आहे, व त्याचीं कारणें पुढें लिहिल्याप्रमाणें आहेतः - (१) समुद्राचा तळ खालीं जात असावा, (२) पृथ्वीच्या अंतर्भागांतील पदार्थांच्या विशिष्ठगुरूत्वाचा बिंदु एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणीं बदलत असेंल व (३) उत्तर अगर दक्षिणध्रुवावरील बर्फ जास्त झाल्यास अगर कमी झाल्यास समुद्रसपाटींत कांहीं ठिकाणीं खालीं जात असेल तर कांहीं ठिकाणीं वर येत असेल. वरील सर्व कारणें विचारांत घेतलीं तरी समुद्राच्या सपाटींत फरक होत आहे असें मानण्यास चांगलासा पुरावा सांपडत नाहीं.

आतांपर्यंत उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून असें दिसतें कीं, पृथ्वीच्या घनपृष्ठभागाच्या सपाटींत फरकत होत आहे, व समुद्रापेक्षां पृष्ठभागच कांहीं ठिकाणीं वर येतो तर कांहीं ठिकाणीं खाली जातो. अगदीं अलीकडे पृथ्वीच्या निरनिराळ्या ठिकाणीं केलेल्या सूक्ष्म निरीक्षणावरून व मोजमापावरून वरील विधानांस भरपूर पुरावा मिळतो.

पहिलें उदाहरण म्हणजे बोथनियाचें आखात हें होय. येथें पुष्कळ भूस्तरशास्त्रवेत्त्यांनीं पूर्णपणें निरीक्षण करून असें शोधून काढलें आहे कीं, १८२० ते १८७० ह्या काळांत स्वीडनचा पश्चिम किनारा ३० सेंटिमीटर वर आला आहे. म्हणजे सुमारें एका शतकांत तो २ फूट उंच होतो. पूर्वेकडील किनारा ह्याच्यापेक्षां जरा कमी प्रमाणांत वर येत आहे. सैबिरियाच्या किना-याजवळहि जमिनीचा भाग अद्यापिहि वर येत आहे. व त्यामानानें समुद्र खालीं गेलेला दिसतो. पृथ्वीच्या घनपृष्ठाच्या सपाटींत फरक होत आहे, ह्याला उत्तम उदाहरण म्हणजे जपान देशाचा किनारा होय. ह्या देशाचा पूर्व व दक्षिण किनारा हळू हळू हल्लीं वर येत आहे व ह्यास पुरावा म्हणजे तेथील बंदरें उथळ झालीं आहेत व जे खडक समुद्राच्या पाण्यांत नेहेमीं असत, ते वर आलेले आहेत. ओहोटीच्या वेळीं जो किनारा पूर्वीं उघडा पडत असे, त्यापेक्षां हल्लीं जास्त किनारा उघडा राहातो, तसेंच पूर्वीं मच्छीमारी लोकांनां ठराविक खोलीच्या पाण्याकरतां समुद्रकिना-यापासून जितकें आंत जावें लागत असे त्यापेक्षां आता पुष्कळ दूरवर जावें लागतें. पूर्वीं जहाजें ज्या खांबांनां बांधीत असत त्या ठिकाणाहून समुद्र सध्यां १८० फूअ दूर गेलेला आहे; समुद्रांतील शंख, शिंपा वगैरे असलेले कडे भरतीच्या पाण्याच्या हद्दीच्या वर गेलेले हल्लीं आढळतात. शिवाय समुद्राच्या लाटांनीं खडकांत कोरलेल्या गुहा व वाळवंटें वर गेलेलीं आढळतात. वरील निरनिराळ्या पुराव्यावरून मि. मिलने ह्या शास्त्रज्ञानें असें अनुमान बांधलें आहे कीं, जपानचा पूर्व किनारा सरासरीनें दरसाल एक इंच वर येत असावा, व उलटपक्षीं पश्चिम किनारा थोडथोडा खालीं जात असावा. गवताळ जमिनींचा व भातजमिनींचा वालुकामय समुद्रकिनारा झालेला आढळतो, खडक पाण्यांत बुडालेले दिसतात, इमारती समुद्राच्या जवळ आल्या आहेत व कांहीं ठिकाणीं तर समुद्र इतक्या झपाट्यानें वर येतोसा दिसतो कीं, तेथील रहिवाशीं तो प्रदेश सोडून जाण्याच्या विचारांत आहेत. वरील ठिकाणीं ५ ते १६ वर्षांत एक फूट भूपृष्ठ खालीं जात असावें. उत्तर अमेरिका व वेस्ट इंडियन आयलंडस् ह्या ठिकाणींहि भूपृष्ठभाग वर येत आहे.

भूपृष्ठ वर येणें:- भूपृष्ठाचा भाग वर येत आहे ह्यासंबंधीं पुरावा जमवीत असतांनां खालील गोष्टी लक्षांत ठेवल्या पाहिजेतः (१) समुद्र मागें हटत आहे असें आढळून येणें, ही गोष्ट वादळाच्या  वेळीं समुद्रांतील वाळू, चिखल वगैरे पदार्थ किना-यावर येऊन पडल्यामुळें तो उंच होतो व म्हणून समुद्र मागें हटलासा दिसतो. (२) वादळाच्या वेळीं कांहीं ठिकाणीं समुद्रांतील वाळू वगैरे पदार्थ भरतीच्या येणा-या जागेपलीकडेहि कधीं कधीं फेंकले जातात म्हणून एवढ्यावरूनच समुद्राची सपाटी खालीं गेली आहे असें म्हणतां येत नाहीं. प्रत्यक्ष जमीन वर येत आहे असें मानण्यास भूस्तरशास्त्रज्ञांच्या मतें पुढील पुरावे योग्य आहेत.

(१) समुद्रांतील प्राण्यांचे अवशेष:- नेहमीं समुद्रांत रहाणा-या प्राण्यांचे अवशेष भरतीच्या जागेच्या वर पुष्कळ वेळां आढळतात. मात्र एखाद दुस-या खडकांतच जर असे अवशेष सांपडले तर ते पुराव्यास ग्राह्या नाहींत, तर अशा खडकांची ओळच्याओळ आढळली पाहिजे. किंवा ज्या खडकांत असे प्राणी राहातात ते खडक, त्यांवरील त्या प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणांसह भरतीच्या जागेच्या वर आलेले दिसले पाहिजेत. ह्या त-हेच्या पुराव्यावरून स्कँडिनेव्हिया, जपान वगैरे देशांचे किनारे वर आल्याचें सिद्ध होतें. नेपल्सच्या उपसागरांतील जुपीटरच्या देवळाच्या खांबावर समुद्रांतील प्राण्याच्या खाणाखुणा आहेत, ह्यावरून असें दिसतें कीं, तेथील जमीन एकदां खालीं गेली असावी व पुन्हां सुमारें २० फूट वर आली असावी. कोरल नांवाच्या प्राण्यांनीं तयार केलेले पोंवळ्यांचे खडक पुष्कळ ठिकाणीं सारखे वर येतांना आढळतात व ही उंची २-४ पासून शेंकडों फुटांपर्यंत आढळते. ह्याचीं उदाहरणें जमेका, क्यूबा, पेरू, हवई बेटें वगैरे ठिकाणीं आढळतात.

समुद्रांत रहाणा-या कांहीं प्राण्यांची मृतशरीरें लांबवर भूपृष्ठावर आढळतात, व भूपृष्ठाच्या ज्या भागावर अशा त-हेचे अवशेष सांपडतात ते भाग केव्हांना केव्हांतरी समुद्रांत असले पाहिजेत. ह्याप्रमाणें सध्यां भूपृष्ठ असलेला असा पुष्कळसा भाग एकेकाळीं समुद्रांत असावा. आल्प्स पर्वत व हिमालय पर्वत ह्या दोहोंवरहि समुद्रांतील प्राण्यांचे अवशेष सांपडतात.

(२) समुद्राच्या लाटांनीं झालेंल्या गुहा:- अशा त-हेच्या गुहा जर भरतीच्या जागेपासून लांबवर आढळल्या तर त्यावरून जमिनीचा भाग उंच गेला आहे असें मानण्यास पुरावा सांपडतो.

(३) समुद्रकांठ वर येणें:- भरती व ओहोटीच्या जागांमधील वाळवंट पुष्कळ वेळां वर गेलेलें आढळतें व त्यावर वृक्ष वगैरे उगवलेले दिसतात व समुद्राच्या भरतीची मर्यादा खालीं दूर गेलेली आढळते. ह्यावरूनहि जमिनीचा भाग हळू हळू वर येत आहे ह्यास पुरावा सांपडतो.

(४) मनुष्यांनीं बांधकाम वगैरे केल्यामुळें मिळणारा अगर लिहून ठेवलेला पुरावा अगर दंतकथा:- सध्याच्या भरतीच्या मर्यादेपलीकडे जर बंदराचे भाग सांपडले तर अर्थातच पूर्वीं समुद्र तेथपर्यंत होता व हल्लीं जमीन वर आल्यामुळें दूर गेलेला आढळतो. आर्टिक महासागराच्या किना-यावर अशा त-हेची उदाहरणें बरींच सांपडतात. बोथनियाच्या सामुद्रधुनीचा किनारा मागील शतकांत सुमारें १८ इंच वर आलेला आहे. सैबेरियाच्या उत्तर किना-याजवळ १७६० सालीं डायोमिडा नांवाचें बेट होतें. तें ६० वर्षांनंतर किना-याचाच भाग झालें.

पृथ्वीचा पृष्ठभाग  खालीं जाणें:- ही हालचाल सिद्ध करणें जास्त कठिण असतें, कारण समुद्राच्या लाटांनीं मूळच्या पृष्ठभागावर क्रिया घडून त्याचें रूपांतर होतें, व सर्व पुरावा नाहींसा होतो. शिवाय कांहीं ठिकाणीं समुद्राची मर्यादा पुढें आलेली जी दिसते ती, पृष्ठभाग खालीं गेल्यामुळें न येतां किनारा धुवून धुवून ढांसळल्यामुळें पाणी वर येऊं शकतें. तेव्हां त्या अडचणीमुळें पृष्ठभाग खालीं केव्हां जात चालला आहे हें शोधून काढणें कठिण असतें. तरी पुढील त-हेचा पुरावा पृष्ठभाग खालीं जात आहे हें सिद्ध करण्यास पुरेसा आहे.

(१) समुद्रांत बुडालेल्या अरण्यांचा पुरावा:- अशा त-हेचा पुरावा ब्रिस्टल चानलच्या उत्तर किना-यावर बारी ह्या ठिकाणीं सांपडतो. त्याठिकाणीं बंदर खोदण्याचें काम चाललें असतांना जमिनीवर गोड्या पाण्यावर उगवणा-या झाडांची मुळें व खोडें जागच्या जागीं पुरलेलीं व त्यावर माती, रेती वगैरेंचा थर अशा स्थितींत असलेले चार थर सांपडले आहेत. ह्यावरून असें स्पष्ट दिसतें कीं, तेथील जमिनीचा पृष्ठभाग खालीं गेला असावा व त्यावर समुद्राच्या लाटांनीं चिखल वगैरेंचे थर तयार झाले असावेत. हॉलंड व फ्रान्सचा उत्तर किनारा ह्या ठिकाणीं वरील त-हेचे पुरावे सांपडतात.

(२) प्राणी व वनस्पती ह्यांचा पुरावा:- सध्यांच्या प्राण्यांच्या वर्गीकरणावरून कांहीं ठिकाणीं पूर्वींच्या काळीं भूपृष्ठाची हालचाल झाली असावी असें मानावें लागतें. ह्यास उत्तम उदाहरण म्हणजे पनामाची संयोगभूमि होय. ह्या संयोगभूमीच्या पूर्वेच्या व पश्चिमेच्या समुद्रांतील प्राण्यांच्या जाती अगदीं वेगवेगळया आहेत परंतु पुष्कळ त-हेचे मासे व कांहीं शंखांतील किडे सारखे आहेत. ह्यावरून असें अनुमान निघतें कीं, एके काळीं ही संयोगभूमी खालीं जाऊन थोडा काल त्या ठिकाणीं सामुद्रधुनी झाली असावी, व त्यामुळें पूर्वेकडील माशांनां पश्चिमेकडे जातां आलें. परंतु ही स्थिति थोडा काल टिकल्यामुळें इतर प्राण्यांनां जातां आलें नाहीं.

(३) खाडया:- यूरोपचा वायव्येकडील भाग खालीं गेला असावा ह्याला पुरावा म्हणजे त्या ठिकाणीं असलेल्या पुष्कळशा खाड्या होत. ह्यापूर्वीं जमिनीवरील प्रदेशांतील द-या असून तो भाग खालीं गेल्यामुळें समुद्राचें पाणी आंत येऊन खाड्या झाल्या असाव्यात.

(४) मनुष्यांनीं बांधलेलें बांधकाम व ऐतिहासिक पुरावा:- रस्ते अगर इमारती ह्यांच्या सपाटीला जर समुद्र येऊं लागला तर त्या ठिकाणचा पृष्ठभाग खालीं जात असावा असेंच अनुमान निघतें. भरतीच्या वेळीं पाण्यांत बुडणारे खडक जर ओहोटीच्या वेळींहि दिसेनासे होऊं लागले तरीहि तेंच अनुमान निघतें. अशा त-हेचीं उदाहरणें जपानचा किनारा, स्वीडनचा दक्षिण भाग वगैरे ठिकाणीं सांपडतात. ग्रीनलंडचा किनारा, हॉलंड व बेल्जमचे किनारे हेहि वरील गोष्टीस पुरावे आहेत.

भूपृष्ठाच्या वर खालीं होणा-या हालचालींचीं कारणें:- जमिनीच्या सपाटींत जो फरक होतो - मग तो एकदम होवो किंवा हळू हळू होवो - त्याचें कारण पृथ्वीच्या अंतर्भागांतील उष्णता हें तर खरें परंतु ह्या उष्णतेचे क्रिया घडवून आणयाचे निरनिराळे मार्ग आहेत ते असेः -

(१) निरनिराळे खडक उष्णतेमुळें प्रसरण पावतात व थंड झाले असतां आकुंचन पावतात. म्हणून पृथ्वीच्या आंतील एखाद्या भागाची उष्णता वाढली कीं वरील खडक प्रसरण पावल्यामुळें तेथील भूपृष्ठभाग वर येऊं लागतात.  व जर एखाद्या भागांतील उष्णता कमी झाली तर आकुंचनामुळें त्याच्या वरील पृष्ठभागाचे थर खालीं जाऊं लागतील. धुमसत असणा-या एखाद्या ज्वालामुखीच्या आसमंतांत अशा प्रकारें उष्णमान वाढूं शकेल व त्यामुळें तेथील पृष्ठभाग वर येईल. लायेल, रीड वगैरे शास्त्रज्ञांच्या मतानें वीस मैल जाडीचा खडकाचा थर, १०००० अंश उष्णमानानें सुमारें १६५० फूट उंच होईल. मि. रीड ह्याच्या मतें निरनिराळे डोंगर निर्माण होण्यास हेंच कारण कारणभूत झालें असावें.

(२) खडकांचें द्रवीभवन झालें असतां ते प्रसरण पावतात, व पुन्हां घनरूप झाले म्हणजे आकुंचन पावतात. म्हणून भूपृष्ठांतील थरांच्या द्रवरूप व घनरूप होण्यानें पृष्ठभाग उंच अगर सपाट होत असेल. परंतु ह्या कारणानें होणारा परिणाम फारच स्थानिक स्वरूपाचा असेल, म्हणून भूपृष्ठाच्या ज्या अफाट भागावर अशा त-हेचे परिणाम झालेले आढळतात त्यास हें वरील कारण पुरें होईल असें दिसत नाहीं.

(३) प्रो. डार्विन ह्यानें जें कारण दिलें आहे तें पुढीलप्रमाणें आहे. पृथ्वी एके काळीं अर्धवट द्रवरूप स्थितींत होती. अशा वेळीं तिच्या दैनिक गतीमुळें व चंद्राच्या आकर्षणामुळें तिच्या भूपृष्ठाच्या निरनिराळ्या भागांची गति निरनिराळी असावी. म्हणजे विषुववृत्ताचा भाग जितक्या गतीनें फिरत असेल त्या गतीनें ध्रुवाजवळील प्रदेश फिरणार नाहीं. ह्यामुळें एक प्रकारचा ताण उत्पन्न होऊन त्याचा परिणाम भूपृष्ठावर जणू कांहीं सुरकुत्या पडतील व ह्या सुरकुत्या म्हणजेच डोंगराच्या रांगा अगर द-या होत. परंतु ही स्थिति शक्य होण्यास सर्व डोंगर अत्यंत प्राचनी काळीं निर्माण झाले असावे असें मानावें लागतें. परंतु पुराव्यावरून त्यांच्यापैकीं पुष्कळ डोंगर बरेच अलीकडील काळांत झालेले सिद्ध झालें आहे. कदाचित भूपृष्ठावर अशा त-हेची पूर्व तयारी ह्या कारणानें झाली असेल व दुस-या कारणांनीं डोंगर अगर द-या निर्माण झाले असतील.

(४) भूस्तरशास्त्रज्ञांच्या मतें भूपृष्ठावर डोंगर व द-यांच्या रूपांत ज्या सुरकुत्या आहेत तें भूपृष्ठ थंड होतांना आंतील भाग आकुंचन पावत असल्यामुळें उत्पन्न झाल्या असाव्यात. ह्या आकुंचनामुळें अर्थातच मुख्यत्वेंकरून भूपृष्ठभाग खालीं खालीं जाईल व ह्या खालीं जाण्यामुळें भूपृष्ठाच्या कांही थरांवर अत्यंत दाब अगर ताण उत्पन्न होईल व त्याचा परिणाम कांहीं ठिकाणचा पृष्ठभाग वर येण्यांत होईल व असें होत असतांना खडक फुटून जातील अगर त्यांचा भुगा होईल, व वर सांगितलेल्याप्रमाणें जर तेथील भागांत पूर्व तयारी झाली असेंल तर ह्या कारणांनीं तेथें डोंगर अगर द-या सहजच निर्माण होतील.

(५) पृथ्वीचा पृष्ठभाग एके ठिकाणीं धुवून धुवून गेल्यामुळें खालीं गेलेला असतो तर दुस-या ठिकाणीं ह्या पदार्थांचे थरावर थर येऊन सांचल्यामुळें उंच झालेला आढळतो. भूपृष्ठाच्या थरांचें उष्णमान त्यांच्या खोलीवर अगर जाडीवर अवलंबून असतें. सुमारें ५० फूट जाडीच्या थरामुळें उष्णमान १ अंश वाढतें. ह्यामानानें जर एखाद्या ठिकाणीं एक हजार फूट उंचीचे थर सांचले तर त्यांच्या खालील उष्णमान २०० अंशानें वाढेल. अशा त-हेनें जी उष्णता उत्पन्न होते तें एक भूपृष्ठ वरखालीं होण्यास कारण असावें असें शास्त्रज्ञांचें मत आहे.

खडकांतील घटकांत व रचनेंत होणा-या फेरफारांचीं अंतस्थकारणें:- पृथ्वीच्या अंतर्भागांतील शक्तींचा आतांपर्यंत जो विचार केला त्यावरून फक्त त्यांच्यामुळें भूपृष्ठावर कसे फरक होतात त्यांचें विवेचन झालें. ह्याशिवाय ह्या आंतील शक्तींच्यामुळें खोल असणा-या खडकांच्या घटकद्रव्यांत व रचनेंत पुष्कळच फरक होत असतात, त्यांचा ह्या भागांत विचार करावयाचा आहे. ह्या क्रिया फारच खोल ठिकाणीं होत असल्यामुळें त्यांचें प्रत्यक्ष्य अनुभवज्ञान मिळणें शक्य नाहीं म्हणून त्यांच्यापासून जे परिणाम झालेले आढळतात त्यांवरूनच ह्या क्रियासंबंधीं अनुमानें काढावीं लागतात. पंरतु अलीकडे कांहीं शास्त्रज्ञांनीं प्रयोगशाळेंत जे प्रयोग करून पाहिले आहेत त्यांवरून ह्या भूगर्भांत खोल होत असलेल्या क्रियांबद्दल कल्पना करतां येते.

सुरवातीस इतकें सांगितलें पाहिजे कीं, पृथ्वीच्या आंत असलेल्या खडाकंवर भयंकर दाब असल्यामुळें हे खडक जणूं कांहीं पिळवटले आहेत, त्यांस सुरकुत्या पडल्या आहेत अगर त्यांच्या एकावर एक घड्या पडल्या आहेत, म्हणजे हे हजारों फूट जाडीचे चुन्याचे, वाळूचे अगर मातीचे घनरूप थर एखाद्या संत्रजीच्या थरांप्रमाणें सहज वरील त-हेचे फेरफार होण्यासारखे होते. कांहीं ठिकाणीं ह्या खडकांनां भेगा पडून त्यांचा चुराडा झाला आहे, कांहीं ठिकाणीं हें मूळच्या जागेपासून पुष्कळ उंचवर ढकलले आहेत तर कांहीं ठिकाणीं खालीं खोल दाबले गेले आहेत. कोठें कोठें त्यांच्यावर इतका दाब पडला असेल कीं ते वितळून पुन्हां त्यांतील घटकद्रव्याची पुनर्रचना झाली आहे. पुष्कळ ठिकाणीं त्याच्यावर नवीन थर येऊन वसले आहेत व ज्वालामुखींतून बाहेर आलेल्या रसानें कित्येक ठिकाणीं पूर्वींचे थर झांकून गेले आहेत.

प्रत्यक्ष प्रयोगावरून जीं अनुमानें निघतात त्याप्रमाणें खालील तीन त-हेच्या क्रिया होत असाव्यात, व त्यांचांच या ठिकाणीं विचार करावयाचा आहे. (१) फक्त उष्णमानामुळें होणारे परिणाम, (२) ऊन पाण्याच्या सहकारितेनें होणारे परिणाम व (३) दाब, ताण वगैरेंचे परिणाम.

(१) उष्णमानाचे परिणाम:- पृथ्वीच्या आंतील भागांत जे वेळोवेळीं फरक होत असतात ते तीन त-हांनीं उत्पन्न झालेल्या उष्णतेनें होत असावेत. ह्यापैकीं पहिली उष्णता म्हणजे भूगोलाच्या आंतील मूळची उष्णता होय. दुस-या त-हेची उष्णता म्हणजे आंत ज्या रासायनिक क्रिया घडतात त्यांपासून उत्पन्न होणारी उष्णता होय व तिस-या त-हेची उष्णता ही पृष्ठभागाचे खडक एकमेकांवर घर्षण पावल्यामुळें त्यापासून उत्पन्न होणारी उष्णता होय, अगर ह्या खडकांवर कांहीं कारणांनीं दाब अगर ताण पडल्यामुळें त्यापासून उत्पन्न होणारी उष्णता होय.

खडक खालीं खोल गेल्यामुळें होणारी उष्णतेची वाढ:- पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या पदार्थांचे खडक बनतात व त्यांचे थरावरथर सांचले म्हणजे खालील थराचें उष्णमान वरील वजनामुळें वाढतें, व ह्या उष्णतेनें आंतील खडकांच्या रचनेंत थोडाबहुत फरक होतो. परंतु ह्या खडकांत जर पाण्याचा अंश नसेल तर हा फरक फारच सूक्ष्म प्रमाणांत होतो असें समजण्यास हरकत नाहीं. नोव्हास्कोशिया आणि साउथ वेल्स खाणींतील दगडी कोळशाचे थर ८ ते १० हजार फूट खोल आहेत तरी त्यांच्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाहीं. त्याचप्रमाणें लेकसुपीरिअर प्रांतांत जे खडक आहेत ते एकेकाळीं बारा मैल खोल असून आतां वर आलेले आहेत तरी त्यांच्यावर ह्या दाबाचा व त्यामुळें उत्पन्न होणा-या उष्णतेचा विशेषसा परिणाम झालेला दिसत नाहीं. त्या ठिकाणच्या उष्णमानामुळें पाण्याची वाफ झाली असती. तेव्हां असें दिसतें कीं, पाण्याशिवाय नुसत्या उष्णतेनें वरील खडकांवर विशेषसा परिणाम होत नाहीं.

रासायनिक क्रियेमुळें उष्णतेची वाढ:- पृथ्वीच्या आंतील भागांत वरील कारणानें किती उष्णता उत्पन्न होत असेल हें सांगणें फार कठीण आहे. परंतु भूपृष्ठावरील पाणी आंत झिरपून तेथील खनिज द्रव्यांशीं त्याचा संयोग होऊन उष्णता उत्पन्न खात्रीनेंच होत असली पाहिजे. ह्या क्रियेबरोबर त्या पदार्थांचा आकारहि वाढतो. क्ले स्लेट, माती, दगडी कोळसा वगैरेंच्या खडकांवर जे प्रयोग करून पाहिले आहेत त्यांवरून असें दिसतें कीं, ह्यांची बारीक पूड करून पाण्यांत मिसळल्यास त्या मिश्रणाचें उष्णमान वाढतें.

खडकांच्या घर्षणामुळें उत्पन्न होणोरी उष्णता:- भूपृष्ठ रचनेंत फरक होऊन जेव्हां खडकांची घडामोड होते त्यावेळीं घर्षणामुळें बरीच उष्णता उत्पन्न होते. ह्या विषयावर प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिलेले आहेत; त्यावरून असें दिसतें कीं, विटांकरितां वापरावयाच्या मातीचें उष्णमान ३/४ तासाच्या घर्षणामुळें १८ अंशांपासून ४० अंशांपर्यंत वाढतें. तसेंच संगमरवरी (मारबल) दगडाचे तुकडे एकमेकांवर घांसल्यास त्यांच्या घर्षणापासून एका मिनिटांत ४.५ अंश उष्णता वाढते. मॅलेट ह्या शास्त्रज्ञानें निरनिराळ्या १६ प्रकारच्या खडकांवर प्रयोग करून पाहिले आहेत व त्यावरून असें दिसतें कीं, एक घनफूट खडकाचें उष्णमान त्याच्यावर उत्पन्न केलेल्या दाबामुळें ८ अंशापासून २१३ अंशापर्यंत खडकाच्या जातीप्रमाणें चढतें. भूपृष्ठावरील कांहीं खडकांवर कित्येक मैल उंचीच्या दगडांचा दाब असल्यामुळें त्यांचें उष्णमान पुष्कळ वाढून त्यांच्या घटनेंत पुष्कळच फेरफार झाले असावेत.

खडकांच्या उष्ण रसानें दुस-या दगडांचें उष्णमान वाढणें:- ज्वालामुखींतून येणारा खडकांचा रस कधीं कधीं भूपृष्ठावर न येतां आंतल्या आंत मूळच्या खडकांत ज्या भेगा अगर चिरा असतात त्यांतून शिरून खडकांचें उष्णमान वाढवितो व त्यामुळें मूळ दगडांच्या रचनेंत कायमचे फरक होतात.

स्फटिकीभवन:- सर जेम्स हॉल या शास्त्रज्ञानें निरनिराळे प्रयोग करून असें सिद्ध केलें आहे कीं उष्णता व दाब ह्यांमुळें चुन्याच्या बारीक भुकटीपासून स्फटिक असलेला संगमरवरी दगड तयार होतो. ह्याप्रमाणेंच भूपृष्ठांतील स्फटिकमय संगमरवरी दगड तयार होतो. ह्याप्रमाणेंच भूपृष्ठांतील स्फकिमय संगमरवरी दगड साध्या चुन्यापासून तयार झाले असावेत. लोखंड तयार करण्याच्या भट्टयांतून असें आढळून आलें आहे कीं, तेथें पुष्कळ काळपर्यंत अतिशय उष्णमान असल्यामुळें तेथील दगड अगर वाळू ह्यांनां खांबासारखा आकार मिळतो. ह्याचप्रमाणें मूळच्या कुरुंदाच्या दगडावर (सँडस्टोन) उष्ण रस येऊन पडल्यामुळें त्यालाहि वरीलप्रमाणें खांबासारखा आकार येत असावा. सर जेम्स हॉल यानें पुष्कळ प्रयोग करून असें सिद्ध केलें आहे कीं, निरनिराळे खडक पुष्कळ उष्णतेमुळें वितळतात व जर हा रस ताबडतोब थंड केला तर त्यापासून कांचेसारखा पदार्थ तयार होतो परंतु जर तो हळू हळू थंड होऊं दिला तर आंतील द्रव्यांचे स्फटिक होऊन नैसर्गिक खडकांच्या निरनिराळ्या जातींचे दगड तयार होतात.

त्याचप्रमाणें उष्णमान जास्त असल्यास खडकाच्या रसाचा वायुरूप पदार्थ होऊन पुन्हां तो थंड झाला असतां त्यापासून स्फटिक तयार होतात. ह्याप्रमाणें निरनिराळ्या खडकांच्या भेगांत जे पदार्थ आढळतात ते तयार झालेले असावेत. कुरुंद, गारगोटी वगैरे खनिज पदार्थ ह्याप्रमाणें तयार झालेले असावेत.

(२) उष्णोदकाचे परिणमः- एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं भूस्तरशास्त्रज्ञांचे दोन वर्ग होते. एकाच्या मतें भूस्तरांतील घडामोडी उष्णतेमुळें होतात व दुस-या वर्गाच्या मतें ह्या सर्व घडामोडी मुखत्वेंकरून पाण्याच्या क्रियेमुळेंच होतात. परंतु त्यानंतरच्या शोधांवरून असें दिसतें कीं, ह्या शक्तींपैकीं एकच शक्ति सर्व घडामोडी घडवून आणण्यास समर्थ नाहीं परंतु ह्या दोन्ही शक्तींच्या सहकारितेनें बहुतेक घडामोडी होत असतात.

सर्व त-हेच्या खडकांत पाण्याचें अस्तित्व:- निरनिराळे खडक तपासले असतां त्यांत दोन त-हांनीं पाणी असलेलें आढळतें: (१) खडकांच्या सूक्ष्म भेगांत पाणी नेहमीं आढळतें व (२) स्फटिकांत ज्या सूक्ष्म पेशी असतात त्यांत पाणी असतें. पुष्कळ प्रयोगांवरून असें आढळून आलें आहे कीं, सर्व त-हेच्या खडकांत थोड्याबहुत प्रमाणांत पाणी नेहमीं असतें. ह्याला खाणीचें पाणी (क्कॉरी वाटर) असें म्हणतात. हे खडक उघड्या हवेंत कांहीं काळ ठेवले असतां त्या पाण्याची वाफ होऊन जाते. या खडकांत असणा-या पाण्याचें प्रमाण दगडाच्या सच्छिद्रतेवर (पौरॉसिटी) अवलंबून असतें. जिप्समध्यें शेंकडा १.५ भाग ग्रॅनाइटमध्यें ०.३७ भाग व चुन्याच्या दगडांत शेंकडा २० भाग पाणी असतें. दुस-या प्रकारचें पाणी स्फटिकांच्या सूक्ष्म पेशींत असतें हें वर सांगितलेंच आहे.

नवीन शास्त्रीय शोधांमुळें असें आढळून आलें कीं, पृथ्वीवर असा एकहि पदार्थ नाहीं की जो थोड्याबहुत प्रमाणांत पाण्यांत विरघळणार नाहीं. बहुतेक खनिज पदार्थ शुद्ध पाण्यांत थोड्याबहुत प्रमाणांत विरघळतात परंतु जर ह्या पाण्यांत (कॅर्बानिक अँसिड) वायु असेल तर हें विरघळण्याचें प्रमाण अर्थातच जास्त होतें. अशा त-हेनें विरघळलेले पदार्थ दुस-या ठिकाणीं वाहून जातात व पाण्याची वाफ झाल्यावर त्यांचीं खनिजद्रव्यें बनतात. ही पाण्याची विरघळण्याची क्रिया कमी उष्णमान असतांनाहि चालू असतेच. एका शास्त्रज्ञानें बर्फाच्या पाण्याच्या क्रियेनें झिओलाइट्स नामक खनिज पदार्थ होत असल्याचें नमूद केलें आहे व जर पाण्याचें उष्णमान वाढलें तर ही पदार्थ विरघळण्याची शक्तीहि वाढते. पृथ्वीची आंतील भागांत जास्त उष्णमान असल्यामुळें तेथील पाण्यांत निरनिराळीं खनिज द्रव्यें पुष्कळ अधिक प्रमाणांत विरघळत असलीं पाहिजेत. ह्यांतच दाबाची भर पडल्यामुळें ही  विद्राव्यशक्ति आणखी जास्त प्रमाणांतच वाढते.

प्र स्त र वि ज्ञा न (पेट्रॉलॉजी)- पृथ्वीचें कवच निरनिराळ्या खनिज द्रव्यांच्या मिश्रणानें तयार झालेल्या खडकांचें बनलेलें आहे. खडक अथवा प्रस्तर एक किंवा अनेक खनिज द्रव्यांच्या मिश्रणानें तयार होतो. त्याच्यांतील खनिज द्रव्यांचें प्रमाण ठरलेलें असतें असें नाहीं व त्याला एखादा विशिष्ट आकारहि नसतो. खडक म्हणजे घट्ट व टणक असतो असें नाहीं. तो मातीसारखा भुसभुशीत किंवा फार कठिण, मऊ अथवा टणक असूं शकतो. खडकांसंबंधीं माहिती ज्या शास्त्रांत सांगितली असते त्याला प्रस्तरविज्ञान किंवा खडकशास्त्र म्हणतात. हें शास्त्र भूस्तरशास्त्राचा एक भाग आहे.

पृथ्वीच्या कवचाचे घटकावयव:- सबंध पृथ्वीचे घटकावयव सांगणें झाल्यास केवळ अनुमानानेंच बोलावें लागेल परंतु पृथ्वीच्या कवचाच्या निरनिराळ्या भागांचीं जीं पृथक्करणें झालीं आहेत. त्यांवरून कवचाच्या घटकावयवाबद्दल खात्रीलायक माहिती देतां येईल. रसायनशास्त्राला जीं मूल द्रव्यें माहीत आहेत तीं सर्व पृथ्वीच्या कवचांत (हवेचें वेष्टण धरून) आहेत. परंतु त्यांच्या प्रमाणाकडे पाहिल्यास सुमारें वीस मूलद्रव्यें विशेष महत्त्वाचीं आहेत; त्यांची यादी खालीं दिली आहे व मूलद्रव्यांचें शेंकडा प्रमाण दिलें आहे.

अधातु
मूलद्रव्य शेंकडा प्रमाण
प्राण (ऑक्सिजन) ४७.०२
सिंक (सिलिकॉन) २८.०६
उज्ज (हायड्रोजन) ०.१७
कर्ब (कार्बन) ०.१२
स्फुर (फास्फोरस) ०.०९
गंधक (सल्फर) ०.०७
हर (क्लोरीन) ०.०१
प्लव (फ्लोरीन) ०.०१
नत्र (नायट्रोजन) थोड्या प्रमाणांत

 

धातु
स्फट (अँल्युमिनिअम) ८.१०
लोह (आयर्न) ४.६४
खट (कॅल्शियम) ३.५०
मग्न (मॅग्नेशियम) २.६२
पालाश (पोटॅशियम) २.३५
सिंधु (सोडियम्) २.६३
तितन (टिटॅनियम) ०.४१
मंगल (मँगॅनीज) ०.०७
भार (बेरियम) ०.०५
स्त्रांत (स्ट्राँटियम) ०.०२
क्रुम (क्रोमियम) ०.०१
निकिल (निकल) ०.०१
ग्राव (लिथियम) ०.०१

बाकीचीं मूलद्रव्यें फार मोठ्या प्रमाणांत आहेत. परंतु त्यामध्यें सोने, चांदी, तांबें, कथील, शिसें वगैरे मूलद्रव्यें येतात. कवचाच्या ज्या भागांची माहिती आहे त्यामध्यें तीनचतुर्थांश अधातु व एकचतुर्थांश धातु आहेत. मूलद्रव्यें स्वतंत्र स्थितींत असतात किंवा दोन अथवा अधिक द्रव्यांचा संयोग होऊन बजलेलीं असतात. खालील मूलद्रव्यांचे संयोग प्रमुखत्वानें दृष्टीस पडतात.

मूलद्रव्यांचे संयोग शेंकडा प्रमाण
सिकद्विप्राणिद (सिलिका) ५९.७१
स्फटप्राणिद (अँल्युमिना) १५.४१
लोहप्राणिद (फेरिक ऑक्साइड) २.६३
लोहसप्राणिद (फेरस् ऑक्साइड) ३.५२
चुना (लाइम) ४.९०
मग्नप्राणिद (मॅग्नॅशिया) ४.३६
पालाशउज्जप्राणिद (पोटॅश) २.८०
सिंधुकर्बित (सोडा) ३.५५
पाणी १.५२
तितनाम्ल (टिटॅनिक अँसिड) ०.६०
स्फुराम्ल (फॉस्फोरिक अँसिड) ०.२२

खडकांत सापडणारीं खनिज द्रव्यें:- मूलद्रव्यांची अथवा त्यांच्या संयोगानें तयार झालेल्या सर्व खनिज पदार्थांची याद फार मोठी आहे, ती येथें देण्याचें कारण नाहीं. जीं खनिज द्रव्यें मोठाल्या खडकांचे घटकावय आहेत किंवा मोठाल्या खडकांत ब-याच ठिकाणीं आढळतात त्यांच्याविषयीं थोडीशी माहिती खाली दिली आहे. जी माहिती दिली आहे तीसुद्धां खनिजद्रव्यशास्त्राच्या दृष्टीनें न देतां भूस्तरशास्त्राच्या दृष्टीनेंच दिलेली आहे.

स्फटिक स्थिति:- खनिज द्रव्यें चार प्रकारचीं असतात; ते प्रकार असेः - (१) स्फटिक - खनिजद्रव्यें स्फटिकासरखीं असलीं म्हणजे त्यांनां विशिष्ट प्रकारचे आकार असतात; हे आकार कित्येक वेळों स्पष्ट बाहेर दिसतात परंतु कित्येक वेळा ते सूक्ष्मदर्शक यंत्रानेंच दिसतात. वितळलेला खडक, निवत असतांना, पाण्यांतून विरघळलेल्या स्थितींतून बाहेर पडतांना किंवा ऊर्ष्वपातन (सब्लिमेशन) होऊन खनिज द्रव्यांचे स्फटिक तयार होतात. (२) कांचस्थिति (ग्लॅसी); कांहीं खनिज द्रव्यें कांचेसारखीं असतात. काचस्थितींतील द्रव्यांत लहान स्फटिक कण असूं शकतात. अर्धवट वितळलेल्या स्थितींतून किंवा एकदम थंड होऊन द्रव्यें निघतात त्यावेळीं त्यांस कांचस्थिति येते. (३) प्रतिस्फटिक, सरसासारख्या चिकचिकीत पदार्थांनां प्रतिस्फटिक (कोलाइड) म्हणतात. पाणी वाहात असतांनां थोडथोडीं सांचणारी द्रव्यें पुष्कळ वेळां प्रतिस्फटिकास्थितींत असतात. (४) आकाररहित (पूड किंवा फकी) स्थितींत अथवा वाटोळा गोळा किंवा काडीसारख्या स्थितींत असणा-या द्रव्यांनां कोणताच विशेष आकार नसतो म्हणून त्यांनां आकारविशेषरहित म्हणतात.

प्रत्येक वर्गाच्या खडकाचीं कांहीं अवश्य खनिजद्रव्यें असतात. त्यांपैकीं एखादें जरी त्यांत नसलें तरी लागलीच त्याचा वर्ग बदलतो व म्हणूनच त्याला अवश्य खनिजद्रव्यें म्हणतात, व हीं खडक तयार होतांना त्यांत तयार होतात. अवश्य नसलेली इतर खनिजद्रव्येंहि खडकांतून सांपडतात व त्या सर्वांनां अनवश्यक खनिज द्रव्यें म्हणतात. अनवश्यक द्रव्यें प्रथमतः खडक तयार होतांना त्यांत तयार झालेलीं असतात किंवा खडक तयार झाल्यावर त्यामध्यें पाण्यानें किंवा दुस-या कारणानें येऊन सांठतात.

मूळ (ओरिजनल) व दुय्यम (सेकंडरी) जीं द्रव्यें खडक प्रथमतः तयार होताना असतात त्यांनां मूळ खनिज द्रव्यें व जीं मागाहून येऊन सांठतात त्यांनां दुय्यम खनिज द्रव्यें म्हणतात. मूळ खडकांतील खड्डे, भोंकें, भेगा वगैरे मधून दुय्यम द्रव्यें साठविलीं जातात, हीं साधारणतः पाण्याच्या योगानें सांठतात. एखाद्या खडकांत एकाच जातीचें खनिजद्रव्य मूळ व दुय्यम अशा दोन्ही प्रकारांनीं असूं शकेल. उदाहरणार्थ, ग्रॅनाइट खडकांत गार (क्वार्टझ) हें मूळ द्रव्य असतें परंतु ग्रॅनाइटच्या भेगांत गार दुय्यम द्रव्य म्हणून सांठविलेली सांपडते. महत्त्वाच्या खनिज द्रव्यांचें वर्गीकरण मूलद्रव्यें, प्राणिदें (ऑक्साइड), सिकितें (सिलिकेटस्) वगैरे प्रकारांनीं करण्याची पद्धत आहे, तिला अनुसरूनच खालील खनिज द्रव्यें दिलेलीं आहेत.

मूलद्रव्यें, हिरा:- कर्ब (कार्बन) म्हणून जें मूलद्रव्य आहे त्याचा हा एक प्रकार आहे. हिरा, मळीच्या जागा व वाळूचे खडक यांमध्यें सांपडतो. अलीकडे दक्षिण आफ्रिकेंत अग्न्युत्पन्न खडकांतहि हिरा सांपडतो. पूर्वीं हिंदुस्थान हि-याविषयीं प्रसिद्ध असे परंतु हल्लीं येथें फारसे हिरे सांपडत नाहींत. हल्लीं मद्रास इलाख्यांतील भागनपल्ली आणि पन्ना संस्थान हीं स्थलें हि-याच्या खाणीबद्दल हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहेत.

शिसें (ग्रॅफाइट):- लकडी पेन्सिलीचें शिसें हा एक कर्बाचाच प्रकार आहे. हें षटकोनी पट्टया, लहान चपटे तुकडे, गोळ्या वगैरे निरनिराळ्या प्रकारांनीं नीस, ग्रॅनाइटसारख्या जुन्या खडकांतून सांपडतें. हिंदुस्थानांत थोड्या प्रमाणांत पुष्कळ ठिकाणीं शिसें सांपडतें. विझगापट्टमच्या डोंगरांत खोंडालाइट खडकांत, कुर्गप्रांतांत, मद्रासच्या गोदावरी जिल्ह्यांत व उत्तर ब्रह्मदेशांत शिसें सांपडतें.

गंधक:- हें पिंवळट, पांढुरक्या रंगाचें असतें. ज्वालामुखीच्या तोंडातून निघणा-या गंधकयुक्त उज्ज (सल्फ्युरेटेड हायड्रोजन) चा प्राणाशीं (ऑक्सिजन) किंवा गंधकद्विप्राणिदाशीं (सल्फर डाय-ऑक्साइड) संबंध येऊन त्यापासून गंधक तयार होतो व तो आसपासच्या खडकांतील भेगांत सांठतो. गंधकाच्या पाण्याचे झरे असतात त्या ठिकाणींहि वरीलप्रमाणें गंधक तयार होतो. कांहीं खनिज द्रव्यांवर रासायनिक क्रिया होऊन गंधक तयार होतो व तो खडकांच्या थरांतून सांपडतो. सिसिली, स्पेन इत्यादि ठिकाणी गंधक सांपडतो.

लोह:-हिंदुस्थानांत, बॅरन बेटें व बलुचिस्तानांत जुन्या ज्वालामुखी पर्वतावर लोह सांपडतें. आकाशांतून जे उल्कापाषाण पडतात त्यांमध्यें लोह सांपडतें. हें लोह, ठोकळे, गोळे, कण किंवा भुगा यांपैकीं एखाद्या प्रकारांत पृथ्वीवर किंवा समुद्रतळाशीं सांपडतें.

काचमणी (क्वार्टझ):- हें खनिजद्रव्य पुष्कळ मोठ्या प्रमाणावर व सर्व ठिकाणीं सांपडतें. पुष्कळ खडकांत हें खनिजद्रव्य अवश्य असतें व खडकांतील भेगा, खड्डे या द्रव्यानें भरलेले असतात. कढत पाणी वहात असतांना त्यांत कांचमणी असतो. व पुढें तो जागजागीं साठतो. कित्येक वेळां मूलद्रव्य खडकांतून निघून जाऊन त्याची रिकामी झालेली जागा काचमण्यानें भरली जाते. काचमणी पाण्यासारखा बिनरंगाचा किंवा कोणत्याहि रंगाचा असतो. त्याचें काठिण्य सात आहे व त्याचें विशिष्टगुरूत्व २.५ ते २.८ मध्यें असतें. काचमणीचे मुख्य चार प्रकार आहेतः - (१) काचमणी (रॉक क्रिस्टल), (२) कॅलसेडोनी, (३) राहूचा खडा, बाण (गास्पर) आणि (४) शिवधातु (ओपल), काचमण्याचे स्फटिक असतात; ते षट्कोनी असून त्यांचीं टोकें षट्कोनी सूच्यग्रस्तंभी (सिक्स सायडेड पिरामिड) असतात. काचमणी हि-यासारखा बिनरंगाचा स्वच्छ असला किंवा त्याला एखादा चांगला स्पष्ट रंग असल्यास त्याचा जवाहिरासारखा उपयोग करतात. काचमणी, तंजावरमध्यें, राजमहेंद्रापाशीं, गोदावरीच्या पात्रांत, दक्षिणेंतील ट्रॅपमध्यें सांपडतात. कांचमण्यांनां निहा रंग असल्यास त्यांनां नीलमणी म्हणतात. नीलमणी तंजावरमध्यें सांपडतात. पांढरा रंग असलेल्या काचमण्यास क्षीरमणी (मिल्क क्वार्ट्स) असें नांव आहे. क्षीरमणी हैद्राबाद व म्हैसूर संस्थानांत सांपडतात.

कॅलसेडोनी:- हे अगदीं बारीक अशा स्फटिकांच्या समुदायानें झालेले असतात. कॅलसेडोनीचे तांबड्या रंगाचे खडे आंगठ्यांकरितां उपयोगांत आणतात व त्याला अकीक (कार्नेशियन) म्हणतात. हे भडोच व खंबायत भागांत सांपडतात. हिरवट रंगाचे खडे निलगिरी डोंगरांत सांपडतात. पट्टे उमटलेले गोमेद नांवाचें खनिजद्रव्य कॅलसेडोनीचाच एक प्रकार आहे. याचे खलबत्ते पुष्कळ ठिकाणीं करतात. हे राजमहाल डोंगरांत मोठ्या प्रमाणावर सांपडतात. या धातूचे बाण तयार करतात. चकमकीचे दगड सुद्धां कॅलसेडोनीपैकीं असून त्यांनां थोडा निळसर रंग असतो.

राहूचा खडा:- यामध्यें नर्मदे गणपती, बाण वगैरे ज्या पासून होतात ते दगड येतात.

शिवधातु:- हा दक्षिणेंतील ट्रॅपमध्यें पुष्कळ सांपडतो.

कुरुंद (कोरंडम्):- हें द्रव्य स्फटप्राणिद (अँल्युमिनिअमचें ऑक्साइड) आहे. हें पुष्कळ ठिकाणीं जुन्या खडकांत दुय्यम खनिजद्रव्य म्हणून सांपडतें. तांबड्या रंगाचें किंवा निळ्या रंगाचे उत्तम खडे असल्यास त्यापासून माणीक (रूबी (नीलमण्यासारखें जवाहीर हीं होतात. कुरुंदाचे बारीक कण एमरीसारखे घांसण्याच्या कामांत उपयोगांत आणतात. ह्याचें काठिण्य (हार्डनेस) ९ व विशिष्टगुरूत्व ३.९ ते ४.१६ असतें. कुरुंद म्हैसूर संस्थानांत रेवामध्यें व आसामांतील खासिआ टेंकड्यांत सांपडतात.

लोहाचीं हीमटाइट्, लायमोनाइट, मॅग्नेटाइट व इल्मनाइट अशीं चार प्राणिदें आहेत.

हीमटाइट:- याचा लोखंडासारखा काळा किंवा तांबूर रंग असतो. पण पूड केल्यास तांबडा रंग असतो. हीमटाइटचें काठिण्य ५.५ तें ६.५ व विशिष्टगुरूत्व ४.५ ते ५.३ असतें. हें द्रव्य पुष्कळ खडकांत सापडतें व कांहीं खडकांत याचे थरच असतात. खडकांचा भुगा होत असतांना जो तांबडा रंग दिसतो तो हीमटाइटचा असतो. मातींत हीमटाइट असला म्हणजे मातीला तांबडा रंग येतो. गेरूंत हें पुष्कळ प्रमाणांत असतें. हें हिंदुस्थानांत जबलपूर, ग्वाल्हेर व इतर पुष्कळ ठिकाणीं सांपडतें.

लायमोनाइट:- याचा व याच्या भुकटीचा रंगहि पिवळा असतो. लायमोनाइटचें काठिण्य ५ ते ५.५ व विशिष्टगुरूत्व ३.६ ते ४ असतें. हें जलजन्य खडकांत मिसळलेलें किंवा थरांच्या रूपानें सांपडतें. झ-याच्या पाण्यांतून कांहीं ठिकाणीं सांठलें जातें. पिवळ्या रंगाच्या मातींत व पिवडींत हें असतें. म्हणून त्याला पिवळा रंग असतो. हिंदुस्थानांत हें पुष्कळ ठिकाणीं सांपडतें.

मॅग्नेटाइट:- याचा रंग लोखंडासारखा असतो; काठिण्य ५ ते ६ व विशिष्टगुरूत्व ४.५ ते ५ असतें. कांहीं अग्निजन्य खडकांत अवश्य व अनवश्य रूपानें हें सांपडतें. ट्रॅप खडकांत हें अवश्य खनिजद्रव्य असतें. लोहमिश्रणाचीं खनिजद्रव्यें रासायनिक क्रियेनें बदलूं लागतात त्यावेळीं मॅग्नेटाइट तयार होऊन त्याचे बारीक कण पुष्कळ खडकांत आढळतात.

इल्मेनाइट:- ह्याचा रंग काळा असतो. काठिण्य ५ ते ६ व विशिष्ट गुरूत्व ४.५ ते ५ असतें. अग्निजन्य खडकांत बारीक कण, लहान चपटे तुकडे अश त-हांनीं हा सांपडतो. पाण्याची किंवा हवेची रासायनिक क्रिया यावर सहजगत्या होत नाहीं. याचे तुकडे पुष्कळ वेळां मॅग्नेटाइटसारखे दिसतात. परंतु कित्येक वेळां त्यांनां पिवळट रंग येतो.

मग्नप्राणिदें (मँगेनीजचीं ऑक्साइडें):- पायरोल्यूसाइट, सायलोमिलेन वगैरे मग्नप्राणिदें आहेत. त्यांचा रंग काळा असून काठिण्य २ ते ६ आणि विशिष्टगुरूत्व ४.५ ते ६ पर्यंत असतें. ही प्राणिदें लोहाच्या प्राणिदांमध्यें थोड्या प्रमाणांत सांपडतात. परंतु त्याशिवाय जागजागीं हीं दृष्टोत्पत्तीस येतात. कित्येक खडकावर याच्या पल्लवासारख्या वगैरे आकृती उमटलेल्या असतात. कांहीं खडकांच्या खाचांत मग्नप्राणिदांचे गोळे सांपडतात. हिंदुस्थानांत मध्यप्रदेश, म्हैसूर संस्थान वगैरे ठिकाणीं मोठ्या प्रमाणावर मग्नप्राणिद सांपडतें.

सिकितें (सिलिकेटस्):- पृथ्वीच्या कवचाचा नऊदशांश भाग सिकितांचा बनलेला आहे. बहुतेक खडकांत हीं आहेत. अनार्द्र व आर्द्र सिकितें असे सिकितांचे दोन वर्ग आहेत. पहिल्या वर्गांत फेलस्पार, हार्नब्लेंड, अभ्रक वगैरे सिकितें व दुस-या वर्गांत झिओलाइट, टाल्क व क्लोराइट इत्यादि सिकितें येतात.

फेल्स्पार:- अग्निजन्य खडकांत फेल्स्पार मोठ्या प्रमाणांत सांपडतात व पुढें त्यांच्यावर रासायनिक क्रिया होऊन त्यांचा बारीक भुगा तयार होतो आणि त्यापासून मातीचे खडक तयार होतात. फेल्स्पार ब-याच प्रकारचे असतात. ते स्फट (अल्युमिनियम) आणि पालाश (पोट्याश), सिंधु (सोडा) किंवा चुना (लाइम) यांचे जोड सिकित असतात. त्यांचें काठिण्य ६ असतें आणि विशिष्टगुरूत्व २ ते ३ असतें. आर्थोक्लेज वर्गाच्या फेल्स्पारचा रंग गुलाबीं किंवा पांढरा असतो. बाकीच्यांचा पांढुरका, पांढरा किंवा निळसर असतो. आर्थोक्लेज, फेल्स्पार, ग्रॅनाइट, सेनाइट यांसारख्या अग्निजन्य खडकांत व बाकीचे फेल्स्पार, डायोराइट, बेसाल्ट वगैरे अग्निजन्य खडकांत सांपडतात. हवेंतील व पावसाच्या पाण्यांतील कर्बद्विप्राणिदाची (कार्बन डायऑक्साइड) फेल्स्पारवर रासायनिक क्रिया होऊन शेवटीं एक प्रकारची माती शिल्लक राहते. या मातीला चांगली असल्यास केओलीन म्हणतात, परंतु ती चांगली नसल्यास मातीचीं हलक्या त-हेचीं भांडीं वगैरे करण्याकडे तिचा उपयोग करतात. फेल्स्पार दक्षिण हिंदुस्थानांतील ग्रॅनाइट, नीसमध्यें व त्याचप्रमाणें ट्रॅपमध्यें मूळ द्रव्य किंवा दुय्यम द्रव्य म्हणून पुष्कळ प्रमाणांत सांपडतो. केओलीनसारखी माती सुद्धां चांगल्या स्थितींत पुष्कळ ठिकाणीं आढळते.

अभ्रकवर्ग:- यामध्यें येणा-या खनिजद्रव्यांचे स्फटिक पापुद्य्रासारखे असतात. हे पापुद्रे वांकविले असतां न मोडतां वांकतात. या द्रव्यांनां मोत्यासारखी चकाकी असते. अभ्रकाचे पांढरा अभ्रक व काळा अभ्रक असे दोन वर्ग आहेत. पांढ-या अभ्रकांत मस्कोव्हाइट अभ्रक मुख्य आहे. त्यांत अँल्युमिनियम, पोटॅश व सोडा यांचें सिकित व लोह हीं असतात. त्यांचें काठिण्य २ ते २.५ असतें व विशिष्टगुरूत्व २.७ ते ३.१ असतें. काळ्या अभ्रकांत बायोटाइट अभ्रक मुख्य आहे. तो काळ्या रंगाचा असतो. त्यामध्यें मॅग्नेशियम व लोह ब-याच प्रमाणांत असतात. त्याचें काठिण्य २.५ ते ३ असतें व विशिष्टगुरूत्व २.७ ते ३.१ असते. दोन्ही त-हेचे अभ्रक हिंदुस्थानांतील ब-याच खडकांत सांपडतात. आज पुष्कळ वर्षे जगांतील सर्व अभ्रकाच्या निम्याहून जास्त अभ्रक हिंदुस्थानांतून निघत आहे. तो मद्रासमधील नेलोर जिल्ह्यांत व बंगालमध्यें गया, हजारीबाग व मोंगीर या जिल्ह्यांत सांपडतो.

हार्नब्लेंड:- हार्नब्लेंडमध्यें कॅलशियम, लोह, अँल्युमिनियम तसेंच सोडियम, पोटॅशियम वगैरे असतात. हार्नब्लेंडचे दोन वर्ग करतां येतात. पहिल्या वर्गांत पांढरा, हिरवट वगैरे रंगाचे विशेषतः तंतुमय असलेले हार्नब्लेंड असतात. दुस-या वर्गांत हिरवे व काळ्या रंगाचे हार्नब्लेंड येतात. पहिल्या वर्गांतील हार्नब्लेंड नीस, चुन्याचे खडक व इतर रूपांतर पावलेल्या खडकांत सांपडतात. दुस-या त-हेचे हार्नब्लेंड ग्रॅनाइट वगैरे अग्निजन्य खडकांत सांपडतात. हार्नब्लेंड पुष्कळ वेळां अँगाइट नांवाच्या खनिज पदार्थांचें रूपांतर होऊन तयार होतात. अँसबेस्टस नांवाचा तंतुमय मऊ असा जो खनिज पदार्थ असतो तो या वर्गांतच येतो. त्याचें काठिण्य ५ ते ६ व विशिष्टगुरूत्व २.९ ते ३.४ असतें.

अँगाइट:- कॅल्शियम, मॅग्नेशियम व अंल्युमिनियमचें सिकित व लोह पदार्थांचें अँगाइट द्रव्य झालेलें असतें. याचेहि हार्नब्लेंडसारखे २ प्रकार आहेत. पांढ-या रंगाचे किंवा फिक्के हिरवट असलेले अँगाइट, नीस वगैरे रूपांतर पावलेल्या खडकांत सांपडतात. व हिरवा किंवा काळसर हिरवा रंग असलेलें अँगाइट अग्निजन्य खडकांत आढळतें. ऑगाइटचें काठिण्य ५ ते ६ व विशिष्टगुरूत्व ३.२ ते ३.५ असतें.

ऑलिव्हाइन:- यांत मॅग्नेशियम सिलिकेट व लोह असतें. हें दक्षिणेंतील ट्रॅपमध्यें सांपडतें. याचा पिंवळट हिरवा रंग असतो. त्याचें काठिण्य ६ ते ७ व विशिष्टगुरूत्व ३.३ ते ३.५ असतें.

गार्नेटः- यांत कॅलशियम, मॅग्नेशियम, अँल्युमिनियमचें सिलिकेट व लोह, मँगेनीजचें ऑक्साइड इत्यादि पदार्थ असतात. रूपांतर पावलेल्या खडकांत हें विशेष सांपडतें. गार्नेट निरनिराळ्या परंतु तांबड्याच रंगाचे असतात. हिंदुस्थानांत कांहीं ठिकाणीं (जयपूर व  कृष्णगड) उत्तम तांबड्या रंगाचे गार्नेटचे खडे सांपडतात.

झीओलाइटः- या नांवाखालीं खनिज द्रव्यांचा एक मोठा वर्ग येतो. हे खनिज पदार्थापासून व विशेषतः फेल्स्पारपासून होतात. हे नेहमीं दुय्यम खनिज पदार्थ असतात व ते खडकांतील भेगांत व लहान मोठ्या खळग्यांत वहात्या पाण्याच्या योगानें तयार होतात. झीओलाइटचे पुष्कळ प्रकार आहेत; त्यांत स्टिलबाइट, स्कॉलेसाइट, ह्यूलंडाइट, अँपॉफिलाइट वगैरे प्रकार मुख्य आहेत. यांत अँल्युमिनियम, कॅलशियम व पोटॅशियमचें सिलिकेट असतें. याचें काठिण्य ४.५ ते ५.५ व विशिष्टगुरूत्व २.३ ते २.४ असतें.

टाल्क (शंखजिरें):- याचा रंग पांढरा, हिरवट किंवा पिंवळट पांढरा असतो. हें मऊ व गुळगुळींत असतें. हें मॅग्नेशियम सिलिकेट असतें. त्याचें काठिण्य १ व विशिष्टगुरूत्व २.५ ते २.८ असतें. याचेच सोपस्टोन, पॉटस्टोन वगैरे प्रकार असतात. त्याच्या दगड्या, चित्रें वगैरे करतात.

क्लोराइट:- हें अँल्युमिनियम, मॅग्नेशियमचें सिलिकेट, लोह, यांचें तयार झालेलें असतें. याचा रंग हिरवा असतो. हें मऊ, गुळगुळीत व ठिसूळ असतें.

सर्पेन्टाईन:- ऑलिव्हाइन व त्यासारखे इतर जे सिलिकेट आहेत त्यांचें रूपांतर होऊन टर्पेन्टाईन तयार हातें. त्याचा रंग बहुधां हिरवा किंवा काळा असतो. परंतु कित्येक वेळा तांबडाहि असतो. सर्पेंटाईनवर हिरवे, तांबडे, पांढरे वगैरे रंगाचे ठिपके पुष्कळ वेळेला असतात. याचें काठिण्य ३ ते ४ व विशिष्टगुरूत्व २.५ ते २.७ असतें.

ग्लॉकोनाइटः- यांत कॅलशियम, मॅग्नेशियम, सोडियम वगैरेंचे सिलिकेट व लोह असतें. याचा रंग हिरवा असतो व हें पुष्कळ वेळां हिरव्या मातीसारखें असतें. दक्षिणेंत ट्रॅपवर हें निरनिराळ्या ठिकाणीं आढळतें. ट्रॅप व त्यांतील दुय्यम खनिजद्रव्यें यांवर हिरव्या रंगाचा जो पातळ थर असतो तो बहुतेक ग्लोकोनाइटचाच असतो. याचें काठिण्य २ व विशिष्टगुरूत्व २.२ ते २.४ असतें.

कर्बित (कार्बोनेट):- खनिज पदार्थांत दोन मुख्य आहेत त्यांपैकीं एक खटकर्बित (कॅलशियम कार्बोनेट) व दुसरें खट (कॅलशियम) आणि मग्नकर्बित (मॅग्नेशियम कार्बोनेट) आहे. तिसरें एक लोहकर्बित असून तें कित्येक ठिकाणीं सांपडतें.

कॅल्साइटः- हें खटकर्बित आहे. हें जलजन्य खडकांत मूळ खनिज द्रव्य म्हणून सांपडतें. परंतु अग्निजन्य खडकांत दुय्यम खनिजद्रव्य म्हणून असतें. पाण्यांत विरघळलेल्या कर्बाम्ल वायूमुळें हें द्रव्य पाण्यांत विरघळतें व पुन्हां खडकांच्या भेगांतून वगैरे साठविलें जातें. याचे स्फटिक स्वच्छ कांचेसारखे असतात. याचें काठिण्य २.५ ते ३.५ व विशिष्ट गुरूत्व २.६ ते २.७ असतें. याचा अगदीं स्वच्छ व उत्तम स्फटिक असल्यास त्याला आइस्लंड स्पार म्हणतात. दक्षिणेंतील ट्रॅपमध्यें व इतर खडकांत कॅल्साइट पुष्कळ ठिकाणीं सांपडतें. कॅल्साइटवर एखाद्या अम्लाचे थेंब टाकल्यास त्यांतून बाहेर निघणा-या कर्बद्विप्राणिदाचे (कार्बन डाय ऑक्साइड) बुडबुडे दिसतात, त्यामुळें कॅल्साइट इतर द्रव्यापासून तेव्हांच ओळखतां येतें.

डॉलोमाइटः- हें खट व मग्नचें संयुक्त कर्बित (जोडकार्बोनेट) आहे. हें पुष्कळ खडकांत सांपडतें व कित्येक ठिकाणीं याचेच खडक झालेले असतात. याचें काठिण्य ३.५ ते ४ व विशिष्टगुरूत्व २.८ ते २.९ असतें. याचीपूड करून तीवर अम्ल टाकल्यास कर्बद्विप्राणिदाचे बुडबुडे येतात, परंतु मूळ द्रव्यावर असे बुडबुडे बहुधां येत नाहींत त्यामुळें कॅल्साइट व डालोमाइट एकमेकांपासून ओळखतां येतात.

गंधकित (सल्फेटवर्ग):- या वर्गांत दोनच खनिजद्रव्यें महत्त्वाचीं आहेत; त्यांपैकीं एक जिप्सम व दुसरें बराइट.

जिप्समः- हें खटगंधकित (कॅलशियमचें सल्फेट) आहे. हें रंगरहित तांबूस किंवा पिंगट रंगाचें असतें. हें पुष्कळ ठिकाणीं खडकांतून सांपडतें. याचें काठिण्य १.५ ते २ व विशिष्टगुरूत्व २.३ असतें. जिप्समपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार करतात. जिप्समचे पुष्कळ प्रकार आहेत. अँलॅबॅस्टर म्हणून जो प्रकार आहे त्याचा खोदीव चित्रें करण्याकडे उपयोग करतात.

बराइटः- हें भारगंधकित (बेरियमचें सल्फेट) आहे. हें खडकांच्या भेगांतून वगैरे आढळतें. हें पांढरें, पिंगट, तांबूस वगैरे रंगाचें असतें. हे जड असल्यामुळें हातांत घेतल्याबरोबर सहज ओळखतां येतें. याचें काठिण्य २.५ ते ३.५ व विशिष्टगुरूत्व ४.३ ते ४.७ असतें.

स्फुरितें (फास्फेट):- सर्व स्फुरितांमध्यें खटस्फुरित बहुतेक असून शिवाय इतर स्फुरितें (फास्फेट) असतात. यांत अँपटाइट, कॉन्पोलाईट वगैरे स्फुरितें महत्त्वाचीं आहेत. अँपटाइटचें काठिण्य ५ व विशिष्टगुरूत्व २.९२ ते ३.२५ असतें.

प्लविद (फ्लुराइड):- यामध्यें खटा (कॅल्शियम) चें फ्लुअर स्पार नांवाचें खनिजद्रव्य मुख्य आहे. याचे रंग पुष्कळ तऱ्हेचे असतात. याचें काठिण्य ४ व विशिष्टगुरूत्व ३ ते ३.२५ असतें.

हरिद (क्लोराइड):- यापैकीं सिंधुहरिद (सोडियम क्लोराइड) हें शेंदेलोण (रॉकसॉल्ट)या नांवानें प्रसिद्ध आहे. कार्नलाइट् वगैरे इतर हरिदेंहि कांहीं ठिकाणीं सांपडतात.

सैंधव (रॉकसाल्ट):- अथवा शेंदेलोण. जुनीं सरोवरें आटून ज्या ठिकाणीं क्षारांचे थर बनले आहेत अशा ठिकाणीं सैंधव सांपडतें. याचा मिठासारखा खाण्याकडे उपयोग करतात. हें सैंधव रंगरहित किंवा पांढरें, तांबडे, पिंवळे वगैरे रंगांचें असतें. याचें काठिण्य २ ते २.५ व विशिष्टगुरूत्व २.१ ते २.२ असतें,

गंधकिद (सल्फाइड):- कथिल, जस्त, तांबें, रूपें व लोखंड वगैरे पुष्कळ प्रकारच्या धातूंचीं गंधकिदें प्रसिद्ध व महत्त्वाचीं आहेत परंतु खडकशास्त्रांत लोहाचें गंधकिद महत्त्वाचें आहे.

लोहगंधकिद (आयर्नपायराइट):- हें पिवळ्या किंवा पांढुरक्यापिंवळ्या रंगाचें असतें. याचे स्फटिक पुष्कळ खडकांत सांपडतात. याचें काठिण् ६ ते ६.५ व विशिष्ट गुरूत्व ४.८ ते ५.१ असतें.

खनिज खडकांशिवाय इतर खडकांसंबंधीं विवेचन 'खडक' या लेखांत दिलें आहे.

भा र ती य भू स्त र.- भूस्तरशास्त्रदृष्ट्या हिंदुस्थानचा विचार करूं लागल्यास त्याचे अगदीं दोन पृथक् भाग पडतात. या भागांचा भूस्तरेतिहास भिन्न असल्यामुळें त्यांचें स्वाभाविक स्वरूपहि भिन्न आहे. यांपैकीं एका भागावर (मुख्य द्वीपकल्पावर) भूस्तरकंपविषयक परिणाम मुळींच झालेले नाहींत. उलट हिमालयाची उत्पत्तीच अशा कंपापासून झालेली आहे. हिंदुस्थानांत समुद्राच्या किना-यानें ज्या ठिकाणीं समुद्र थोडा फार आंत घुसला आहे त्या ठिकाणाशिवाय समुद्रांतील अश्मीभूत वनस्पती सांपडत नाहींत. इतर सर्वत्र या द्वीपकल्पांत जे पर्वत वगैरे झालेले आहेत ते वरील जमीन व माती धुपून जाऊन झालेंले आहेत. परंतु सिंधु-गंगेच्या गाळवट पट्टयाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेस आपणांस याहून निराळाच प्रकार दिसून येतो. सिंध, बलुचिस्तान, हिमालयाचा पट्टा, आसाम व ब्रह्मदेश या भागांतील जमीन पुष्कळ ठिकाणीं पूर्वीं समुद्रांत बुडालेली असावी असें आढळण्यांत येतें. या भागांतील पर्वतांतील खडकांचे थर अगदीं नवीन दिसतात. तसेच या भागांतील नद्यांचे प्रवाह बरेच जोराचे आहेत व त्यामुळें ते ज्या द-यांतून जातात त्यांच्या कांठावरील माती, दगड वगैरे नेहमीं वाहून जात असतात. या दोन भागांस आपण स्थिर-द्वीपकल्प (स्टेबल पेनिन्शुला) व अति-द्वीकल्प (एक्स्ट्रा-पेनिन्शुलर) अशीं नांवें देऊं.

हिंदुस्थानांतील भूस्तरांस जर यूरोपीय संज्ञा आपण योजूं लागलों तर त्या बरोबर जमत नाहींत, कारण यूरोपीय भूस्तरांत अश्मीभूत वनस्पतियुक्त थर ज्या युगांत सांपडतात त्यावेळीं ते हिंदुस्थानांत सांपडत नसून येथें त्या सुमारास जमीन व शुद्ध पाण्याच्या योगानेंच बनलेले थर विशेष सांपडतात. व म्हणून तिकडील युगक्रम येथें लागू पडत नाहीं. शिवाय दूरदूरच्या जलाशयांमध्यें असणा-या प्राण्यांच्या अवस्था ब-याचशा सारख्या असून जलांतील प्राण्यांनां एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणीं जाण्याला सोयी अधिक असतात तशा जमीनीवरील प्राण्यांनां नसतात. कारण दोन निरनिराळ्या भागांमध्यें एखादी न ओलांडतां येण्यासारखी आडकाठी असल्यास एकाच काळामध्यें दोन्ही भागांतील प्राणी व वनस्पती अगदीं निराळ्या स्थितींत असून त्या स्थितीचा त्यांच्या विकासावर परिणाम झालेला आपणांस दिसून येतो व त्यामुळें दोघांस एकाच विकासावस्थेंत येण्यास लागणा-या कालामध्येंहि फारच अंतर पडतें. व त्यामुळें यूरोपीय युगक्रम येथें योजतां येत नसल्यामुळें येथील प्रस्तरांस निराळीं नांवें योजणें सोईस्कर होतें. शिवाय हिंदुस्थानांतील निरनिराळे भाग निरनिराळ्या वेळीं समुद्राखालीं बुडून त्यावर गाळ सांचून मग वर आलेले असून त्यांचे वर येण्याचे काल यूरोपीय कालांशीं जुळत नाहींत.

भूरचनेंतील मूळ प्रस्तर कॅब्रियन पद्धतीचा असून तो किंवा त्याच्याच जातीचे प्रस्तर जागाच्या निरनिराळ्या भागांतून दृष्टोत्पत्तीस येतात, ह्या प्रस्तराच्या खालीं अश्मीभूत-वनस्पतीवह खडक नसून त्याच्यावर जिकडे तिकडे यांचेचे थर दृष्टोत्पत्तीस येतात, व त्यावरून आपणांस प्राण्यांच्या व वनस्पतींच्या मत्स्ययुग (पॉलिओझोइक), सरीसृपयुग (मेसोझोईक), निर्मानुषयुग (सेनोझोइक) या काळापासून तों तहत आजपर्यंत विकास कसकसा होत गेला हें दिसतें. हिंदुस्थानामध्यें हे मूळ प्रस्तर पंजाबमधील क्षारपर्वताच्या (साल्ट रेंज) रांगांमधून दिसतात व ह्या प्रस्तरावर असणा-या भागास भूस्तरशास्त्रज्ञ निओबोलस थर असें म्हणतात. हे यूरोपमधील अधोकँब्रियन (लोअर कँब्रियन) थरांशीं जुळतात.

निओबोलस थर तयार होण्याच्या पूर्वींच्या काळीं (१) हिंदुस्थानच्या द्वीपकल्पामध्यें निरनिराळ्या खनिज द्रव्यांचे थर असणारे खडक (शिस्ट) पसरलेले असून त्यांवर निरनिराळे अविचलित थर एकामागून एक चढत गेले. आणि (२) दुसरे ग्वाल्हेर, कडाप्पा, विंध्य यांसारखे अश्मीभूत वनस्पतिवह खडक तयार झाले.

अधोकँब्रियन युगानंतर तयार झालेले खडक हिंदुस्थानांत दोन प्रकारचे आहेत. (१) अति द्वीपकल्पांत अश्मीभूत वनस्पतिवह खडकांचे यूरोपमधील कँब्रियनपासून कर्बजनक थरापर्यंतचे सर्व थर सांपडतात. स्थिरद्वीपकल्पांत हे थर नाहींत. (२) स्थिर द्विपकल्पांत पर्मो-कर्बजनक (पर्मो-कर्बानिफेरस) कालापासून तो आतांपर्यंत प्राणी व वनस्पती यांच्या विकासांतील सर्व अवस्था आणि अतिद्वीपकल्पांत जवळच असलेल्या महासागराच्या तळाशीं गाळ सांचून तो तळ वर येऊन झालेले खडक.

अशा रीतीनें हिंदुस्थानांतील खडकांचे चार मुख्य भाग करतां येतात. त्यांपैकीं दोहोंमध्यें अनश्मीभूत वनस्पतीयुक्त थर व दुस-या दोहोंमध्यें अश्मीभूतवनस्पतियुक्त थर दृष्टोत्पत्तीस येतात. हे चार भाग (१) प्राक्तनिक (आर्चियन) भाग, (२) पुराण भाग, (३) द्राविड भाग आणि (४) आर्यन भाग हे होत.

(१) प्राक्तनिक (आर्चियन) भागः- हा सर्वांत जुना असून ह्यांत पुष्कळ पर्णयुक्त असे थर आहेत. हा थर याच नांवाच्या अमेरिकन व यूरोपीय थरांशीं पुष्कळ अंशीं जुळतो.

(२) पुराण भागः- ह्यांत अनश्मीभूत वनस्पतिवह खडकांचे थर असून हे थर व वरील प्राक्तनिक थर ह्यांमध्यें बराच मोठा स्तंभक काळ गेलेला आहे. ह्या भागामध्यें स्थिरद्वीपकल्पांतील कडाप्पा, ग्वाल्हेर, विंध्य वगैरे पर्वतांवरील खडक येतात. पुराणभागांतील नवीन खडक कँब्रिअन भागापूर्वीं झालेले आहेत कीं काय हें कळत नाहीं.

(३) द्राविड व आर्यन भागः- वरील दोन्ही भागांत अनश्मीभूत वनस्पतिवह खडक असून अश्मीभूत वनस्पतिवह खडकांचे दोन भाग करतां येतात त्यांपैकीं एक जुना असून तो यूरोपमधील कँब्रियन, आर्डोव्हिसियन, सिल्युरिन, डेव्होनियन व कर्बजनक (कार्बोनिफेरस) रांगा ज्या पॅलेझोईक काळांत येतात त्यांच्याशीं जुळता आहे. या भागास द्रविड भाग असें म्हणतात. व दुस-या भागस आर्यन भाग म्हणत असून त्यामध्यें पर्मो-कर्बजनक काळापासून तों तहत आतांपर्यंतचे खडक येतात.

(४) कडाप्पा, विंध्य, वगैरेंतील अनश्मीभूत वनस्पतिवह थर कँब्रियनच्या पूर्वींचे असून ते पुराण भागांत येतात, तर अतिद्वीपकल्पांतील क्षारपर्वत वगैरे कँब्रियनशीं समकालीन असून द्रविड-भागांत येतात. ह्याच भागांत मध्यहिमालय व ब्रह्मदेशांतील सिल्युरियन व डेव्होनियनसारखे खडकहि येतात.  स्थिरद्वीपकल्पांतील शुद्ध पाण्याच्या योगानें बनलेले खडक व चतुर्थं युगापर्यंत ज्वालामुखींच्या लाव्हारसानें भरत असलेले दक्षिणमधील खडक आर्यन भागामध्यें येतात. अतिद्वीकल्पांतील कांहीं भागांतून अश्मीभूत वनस्पती व हे थर दिसून येतात. ह्यापैकीं ब-याच भागांची उत्पत्ति समुद्रापासून असावी असें दिसतें. हिमालय देखील चतुर्थ युगांत महासागर बाजूला सारीत सारीत वर आलेला असून नवपूर्व (मायोसीन) कालाच्या सुमारास त्याच्या मर्यादा बलुचिस्तान व ब्रह्मदेश या असाव्यात. नूतन (प्लायोसीन) काळांत तो आणखीहि मागें हटविला गेलेला दिसतो, कारण आंत दिसणारे मॅस्टोडनसारखे हत्तीच्या जातीचे प्राणी व कांहीं सस्तन प्राण्यांचीं हाडें ब्रह्मदेशांतील कांहीं अरण्यांमधून व हिमालयाच्या पायथ्याच्या टेंकड्यांवर सांपडतात. त्यांवर आतां वाळू आलेली आहे.

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .