विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भेंडी– भेंडी हळवी व गरवी असते. कोरवहू शेतांत, कोकणांत आणि मावळांत भातशेतीच्या बांधांवर व परसांत जी भेंडी लावितात ती गरवी असते. हिचीं झाडें ५-६ फूट उंच वाढतात. गरव्या जातीच्या भेंड्या पांचधारी व सातधारीहि असतात. त्यांस बहुधां कांटे असतात. त्यांचा रंग तांबूस असतो, व भेंड्या ६ ते ९ इंच लांब व १-१॥ इंच जाड असतात. हळव्या पिकामध्यें जे किडे होतात तेच भेंडीसहि होतात. म्हणून कापसावरील किडे भेंडीवर जाऊन कापूस वांचावा म्हणून कापसाच्या शेतांत भेंडी लावावी असें म्हणतात.
मळेजमिनींत भेंडी करण्याकरितां बीं मुंबईकडील वापरतात. साष्टीबेटांत पुष्कळ बागांमध्यें हळवी भेंडी करतात. तिकडे तिला फारच लवकर भेंड्या धरावयास लागतात. ती भेंडी सुमारें कंबरेइतकी उंच वाढेपर्यंत चांगलीं फळें देतें. पुढें फळें लहान यावयास लागतात. फळें सुमारें वीत सव्वावीत लांब व एक इंच जाड होतात.