विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भैंसरोगड- राजपुताना. हें खेडें उदेपुरापासून १२० मैलांवर ब्राह्मणी व चंबळा नद्यांच्या संगमावर आहे. तेथें एक किल्ला आहे. उदेपूर संस्थानांत भैंसरोगड मिळकतींत हें खेडें आहे. या मिळकतीच्या संस्थानिकाची पहिल्या प्रतीच्या सरदारांत गणना होते. हे संस्थानिक सिसोदिया रजपुतांच्या चोंडावत शाखेचे आहेत. या संस्थानिकाचें उत्पन्न ८००० रूपये आहे. येथील किल्ला चव्हाण राजाच्या नोकरानें बांधिला. त्याचें नांव भैंसासा होतें, म्हणून या किल्ल्यास भैनसरोगड असें म्हणण्याची वहिवाट पडली आहे. ह्या खेड्यापासून ३ मैलांच्या अंतरावर अष्टमाता, त्रिमूर्ति, शेषशायी वगैरे हिंदु देवळें व दुस-या कांहीं इमारती फार प्रेक्षणीय आहेत. ह्या इमारती नवव्या शतकांतल्या आहेत. असें तज्ज्ञांचें मत आहे.