विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भोंपळा- भोपळ्याचे (१) काळा भोंपळा, (२) तांबडा भोंपळा, (३) दुध्या भोंपळा, आणि (४) काशीफळ असें चार प्रकार आहेत.
का ळा भों प ळा.- काळा व तांबडा भोंपळा यांसच ''भोंपळा'' म्हणतात. हा उंसाच्या, फळबागेच्या व परसांतील कुंपणाच्या आधारानें लावितात. त्याच्या वेलांचा विस्तार फार होतो. याच्या फुलांत नर व मादी असे दोन प्रकार असतात. नर फुलांस ''वांझीं'' म्हणतात. त्यांच्या मागें फळ नसतें. मादी फुलांसच फळ धरतें. भोंपळ्याचा वेल पावसाळ्यांत व उन्हाळ्यांतहि चांगला वाढतो. उंसांत व फळबागात लागण थंडी संपल्यावर मुख्य झाडांस पाणी देण्याच्या वेळीं करतात. दर वेलास ५ ते २५ फळें येतात. याचा वेल इतका बळकट असतो कीं, १०-१५ शेर वजानाचें फळ त्यास झेंपतें. फळ पूर्ण पक्व होण्यास ३-४ महिनें लागतात. चांगलें पक्व फळ बारा महिनेपर्यंत न सडतां टिकतें. फळाचें वजन तें पक्कें झाल्यावर ५ ते ४० शेरापर्यंत असतें.
विलायती भोंपळे आपल्याकडील भोंपळ्यांपेक्षां पुष्कळ जातींचे आहेत. ज्यास ''पंपकिन'' म्हणतात त्याच्या हिरवा, पांढरा, तांबडा, व पिंवळा अशा चार जाती आहेत, व त्यांची फळें सव्वामणापेक्षांहि जास्ती वजनाचीं होतात, म्हणून त्यांस 'हंड्रेडवेट' असें विशेषण देतात. विलयती भोंपळ्याच्या ''व्हेजिटेबल मॅरो'' नांवाच्या ''काशीफळ'' व ''दूध्या'' भोंपळ्यासारख्या दुस-या अनेक जाती आहेत.
दु ध्या भों प ळा.- ह्या वेलीस पाढरीं फुलें येतात. फळें जवळ जवळ दुधासारख्या पांढ-या रंगाचीं येतात म्हणून त्यास ''दुध्या'' भोंपळा म्हणतात. याच्या जाती दोन आहेत. (१) लांब दुध्या व (२) तुंबी दुध्या. पहिल्या जातीचीं फळें एक हातापासून तीन हातपर्यंत लांब व ४ ते ९ इंच जाड होतात व दुस-या जातीचीं फळें तुंब्याच्या आकाराचीं असतात.
दुध्या भोंपळ्याची कडवी जात आहे; तिचीं फळें वरील दोन आकारांशिवाय गोल टरबुजासारखींहि असतात. कडू भोंपळे वाळल्यानंतर ती भोई लोक नदींत तरून जाण्यास वापरतात. त्यांस 'सांगडी' म्हणतात. गोडव्या जातीचीं फळें गोल आकाराचीं होतात.
दुधे भोंपळे फळबागेंत झाडांच्या मधून आळीं करून त्यांत किंवा बाजूस कुपणाच्या आधारानें लावितात. परसांत छपरावर अगर झाडावर चढवितात व स्वतंत्र रीतीनें केवळ त्याचीच लागण करतात. दुध्याची तिन्ही काळांत लागण केली जाते. परंतु मुख्य लागण पावसाळ्याच्या पूर्वीं करतात. दुय्य्म लावणी मुख्य पिकास पाणी देण्याच्या वेळीं करतात. स्वतंत्र लावणी करणें असल्यास उन्हाळ्यांत जमिनीची मशागत करून सरी अगर सपाट वाफे (वरंबे) करून ४।६ फुटांच्या अंतरानें २।३ बिया लावितात. दुध्याचे वेल पसरण्यास अवकाश असतो तेथपर्यंत एखादी लवकर वाढणारी पालेभाजी घेतां येते. वेल वाढले म्हणजे त्यांस फळें येतात, फळें चिखलांत सडूं नये म्हणून त्याच्या खालीं गवत अगर पाचोळा पसरावा. दर वेलाला १० ते १२ पर्यंत फळें येतात. दुध्याची कोरडी अगर पातळ भाजी करतात. आजारी मनुष्यास ही भाजी पथ्यकर मानतात. साखरेच्या पक्क्या पाकांत याच्या सुक्या वड्या करतात. दुध्याच्या बिया विस्तवावर भाजून खाण्यास गोड लागतात.