विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भोपाळ, संस्थान. - हे संस्थान मध्यहिंदुस्थानांत उत्तर अक्षांश २२० २९' ते २३० ५४' व पूर्व रेखांश ७६० २८' ते ७८० ५१' यांत आहे. हें भोपाळ एजन्सींत आहे. निझामच्या खालोखाल हें दुसरें मोठें मुसुलमानी संस्थान होय. लोकसंख्या (१९२१) ६९२४४८. क्षेत्रफळ ६९०२ चौरस मैल. एकंदर उत्पन्न ५८ लाख रूपये आहे. हें माळव्याच्या पूर्वेच्या सीमेलगतच्या भागांत आहे. भोपाळ हें नांव भोजपाल यावरून पडलें अशी लोकांची समजूत आहे. भोजपाल हा परमारवंशी धारचा राजा होता (धार पहा). या संस्थानचा बहुतेक भाग माळव्याकडील विंध्यपर्वताच्या पठारांत आहे. यांत चढतीं उतरतीं कुरणें व काळीभोर कंपाशीचीं शेतें दृष्टीस पडतात. विंध्यपर्वतातून पुष्कळ प्रवाह निघाले आहेत त्यापैकीं बटवा व पार्वती या सर्वांत मोठ्या नद्या आहेत. या दोन नद्यास मिळणा-या दुस-या पुष्कळ कालिया, सोट, अजनर वगैरे लहान नद्या आहेत. भोपाळशहराजवळ दोन मोठीं तळीं आहेत. 'तालमें ताल भोपाळ ताल' असें येथील तळ्याचें वर्णन आहे (धार पहा). पळस, साग, तेंडू, साल, वगैरे झाडांचीं जंगलें आहेत. या जंगलांत वाघ, चित्ता, सांबर, चितळ वगैरे हिंस्त्र पशू आढळतात. याखेरीज बदकें व पाणलावे पक्षी फार आहेत. येथील हवामानांत व माळव्याच्या हवामानांत कांहीं फरक नाहीं. दक्षिणभागांत मात्र तीव्र उष्णता व थंडी आहे. पाऊस ४२ इंच पडतो.
इतिहासः- येथील संस्थानिकांचा मूळ पुरूष दोस्तमहंमदखान नांवाचा तिर्ऱ्हा अफगाण मुसुलमान होता; तो औरंगझेबाच्या पदरीं लष्करांत नोकर होता. पुढें वाढत वाढत त्यास औरंगझेबानें माळव्याची सुभेदारी दिली व १६९० सालीं भैरसिया आणि नशिराबाद हे परगणे चाकरीबद्दल त्याला सरंजाम म्हणून मिळाले. औरंगझेबाच्या मरणानंतरच्या धामधुमींत तो स्वतंत्र बनून त्यानें भोपाळ येथें गादी स्थापली व राज्याचें नांवहि तेंच ठेविलें. हा १७४० सालच्या सुमारास मरण पावला. याच्या मागून याच्या महंमद नांवाच्या अज्ञान औरस पुत्रास पदच्युत करून याच्या यारमहंमद नांवाच्या दासीपुत्रानें सत्ता बळकाविली. या कामीं त्यास निझामाची मदत मिळाली. यारमहंमद बेअकली व बायकोच्या तंत्रानें वागणारा होता. त्याला फैज, यासीन, व हयातमहंमद असे तीन पुत्र होते. त्या सर्वांनीं आगेमागें राज्य केलें. त्यांच्या कारकीर्दीत राज्य चालविणारे त्यांचे हिंदु वजीर होतें. फैझमहमंद हा विरक्त असल्यामुळें दिवाण बाजीराम कारभार करीत असे.
फैजमहंमद निपुत्रिक मरण पावल्यानें त्याच्यामागून हयातमहंमद नबाब झाला, हाहि विरक्त होता. त्यानें चार चेले पाळिले; त्यापैकीं एक गोंड व दुसरे दोन ब्राह्मण होते. हे पुढें सर्व मुसुलमान झाले. १७७८ सालीं सर्व सत्ता (गोंड शिष्य) फौलादखानाच्या हातीं होती. यानें गोडार्ड यास बंगल्यांतून मुंबईस जाण्यास पेशव्यांविरूद्ध मदत केली. याच्या वेळेपासून इंग्रज व भोपाळकर यांची दोस्ती झाली. याच्या मृत्यूनंतर (१८०७) यारमहंमदाच्या बायकोनें छोटेखान (ब्राह्मण शिष्य) यास प्रधान नेमिलें. ही बाई कर्तृत्वशक्तींत अहिल्याबाई होळकरणीच्या तोडीची होती. या बाईनें संस्थानचा राज्यकारभार फार दक्षतेनें चालविला. हयात यानें राज्यकारभारांतून अंग काढिलें होतें. तो फक्त नामधारी नबाब होता. छोटेखानाच्या मागून झालेले प्रधान अगदीं नालायक होते. यावेळीं मराठे व पेंढारी या दोघांनीं या राज्याची इतिश्री करण्याचा घाट घातला होता पण तो हयातचा चुलतभाऊ वझीर महंमद यानें हाणून पाडिला. हयातच्या मनांत वझीरास प्रधान नेमावयाचें होतें. पण त्याच्या मुलाचें म्हणजे गोसमहंमद व वझीर यांचें वाकडें होतें. गोसनें शिंद्याच्या व करीमखान पेंढा-याच्या मदतीनें वझीर यास हांकलून देण्याचा दोन-तीनदां प्रयत्न केला. परंतु वझीरनें करीमखानाचा पराभव केला. मध्यंतरीं (१८०८) नागपुराहून सादीकअल्लीनें येऊन बराचसा भोपाळचा प्रांत घेतला तरी देखील गोसखानानें वझीरच्या नाशासाठीं भोपाळास येण्यास मराठ्यांस आमंत्रण दिलेंच त्यामुळें वझीरनें कंटाळून राज्यकारभारांतून आपलें अंग काढून घेतलें. इकडे सदीकअल्लीनें परत जातांना गोसखानाच्या मुलास ओलीस म्हणून घेतलें व तो त्यास घेऊन नागपुरास परतला. तेव्हां मात्र गोसनें वझीर यास पुन्हां राज्याचीं सूत्रें घेण्यास विनंति केली. त्यानें सत्ता धारण केली व राज्यास बळकटी आणण्याचें फार प्रयत्न केले. वझीरनें मोठ्या शिकस्तीनें सुमारें ८ महिने शिंदे व नागपूरकराशीं झगडून भोपाळचें राज्य राखिलें. तो १८१६ सालीं मरण पावला. त्याच्या मागून त्याचा मुलगा नजरमहंमद प्रधान झाला. पुढें हाच सर्वसत्ताधारी बनला. यानें इंग्रजांस पेंढा-यांचा नाश करण्यासाठीं फार मदत केली. या कामगिरीबद्दल इंग्रजांनीं देवीपुरा, अष्टा, सेहोर, दुराह, इच्छावर हे परगणे भोपाळच्या संस्थानिकास परत दिले. नजरखान १८२० सालीं मरण पावला. तो गोसमंहमदचा जांवई होता. त्याला शिकंदर बेगम नांवाची एक मुलगी होती. ही लहान असतांना राज्यकारभार खुदिशिया बेगम (बेगमेची आई) हिनें चालविला. १८३५ सालीं शिकंदर बेगमचें लग्न नाजरच्या पुतण्याच्या जहांगिर नांवाच्या मुलाशीं झालें. पुढें जहागीर गादीवर बसला. तो सन १८४४ मध्यें मरण पावला. त्याच्या मागून शिकंदर बेगम ही गादीवर आली. हिच्या कारकीर्दीत ब-याच सुधारणा झाल्या. ती १८६८ सालीं वारल्यावर तिची मुलगी शहाजहान बेगम ही गादीवर बसली. हिचें लग्न बक्षीबाकरमहंमदखान नांवाच्या पुरूषाशीं झालें पण हा राजघराण्यांतील नसल्यामुळें शहाजहान बेगमच राज्यकारभार चालवीत होती. १८५७ सालच्या बंडाच्या वेळीं हिच्या आईनें इंग्रजांस फार मदत केल्यामुळें इंग्रजांनीं बरेसियाचा मुलूख भोपाळच्या संस्थानिकांस दिला व शिकंदर बेगमेस जी. सी. एस. आय. हा बहुमानाचा किताब दिला. शहाजहान बेगम देखील आपल्या आईसारखी कर्तुत्ववान होती. हिला सुलतान जहान नांवाची मुलगी होती. शहाजहान बेगम हिनें बक्षीबाकर हा पहिला नवरा वारल्यावर महंमद सादीक हुसेन नांवाच्या पुरूषाशीं दुसरें लग्न केलें. महंमद सादीकचेंहि हें दुसरें लग्न होतें. पुढें शहाजहान बेगम व सुलतान जहान या मायलेकींत वाकडें आलें. पण तें प्रकरण इंग्रज सरकारच्या मध्यस्थीनें मिटलें. शहाजहान बेगम ही १९०१ सालीं वारली. हिच्या मागून हिची मुलगी नबाब सुलतान जहान ही सध्यां बेगम आहे. हिचा विवाह १८७५ सालीं मीरमहंमद अल्लीखान नांवाच्या एका अफगाण सरदाराबरोबर झाला. हिला २१ तोफांच्या सलामीचा मान इंग्रज सरकारकडून १९०४ सालीं मिळाला. तसेंच हिला सी. आय; जी. सी. एस. आय. वगैरे पदव्या आहेत. ही सर्व राज्यकारभार स्वतः पहाते. हिनें राज्यांत ब-याच सुधारणा केल्या आहेत. जमीनमहसूल, शिक्षण व अंतर्गत या खात्यावर तीन कौन्सिलर असून राजकीय खातें खास बेगमेच्या हातीं आहे. संस्थानी लष्कराशिवाय इंपीरियल सर्व्हिसची एक पायोनिअरची तुकडी आहे.
भोपाळ संस्थानांत जुने किल्ले फार आहेत; त्यांपैकीं रायसेन, गिनुरगड, सिवान व चौकीगड हे पहाण्यासारखे आहेत. भोजपूर येथील प्रचंड बंधारा, सांची येथील स्तूप, जामगडचें प्राचीन देऊळ, महीलपूर व समसगडी येथील प्रचंड मूर्ति हीहि प्रेक्षणीय आहेत. दिल्लींतील मोठ्या मशिदीच्या धर्तीवर शहाजहान बेगमनें येथें एक मशीद बांधण्यास आरंभ केला होता पण ती अपूर्ण आहे. राज्यांत भोपाळ, अष्टा, तिहोरी, इच्छावार व बरेसिया हीं मुख्य शहरें आहेत. लोकसंख्येमध्यें शें. ७३ हिंदु आहेत. संस्थानांत कालवे नसल्यानें शेती पावसावर अवलंबून आहे. जोंधळा, मका, उडीद, मूग, बाजरी, गहूं, हरभरा, जव, ऊंस, अफू हीं संस्थानांतील पिकें होत.
जंगलाचे तीन वर्ग केले आहेत. पहिल्या वर्गांतील जंगलांत कसलीहि कटाई होऊं देत नाहींत. दुस-या व तिस-या वर्गांतील जंगलांत साग, तेंडू, शिसू, चंदन, मोह वगैरे इमारतीच्या उपयोगी झाडें तोडूं देत नाहींत. तसेंच आंबा, अचार, व मोह हीं झाडें तोडण्याचीं मनाई आहे. जंगलांतील काम गोंड, कोल, धानुक हे लोक करतात. संस्थानांत वालुकामिश्रित व लोहमिश्रित दगड सांपडतात. प्राचीन काळापासून भोपाळचे रत्नजडित अलंकार, सिहोर व अष्टा येथील कापड फार प्रसिद्ध आहे. भोपाळ शहरांत व संस्थानांतील इतर मोठ्या गांवांत साधें जाडेंभरडें कापड व सुती ब्लँकिटें तयार करतात. आगगाडी व पक्क्या सडका झाल्यापासून येथील निर्गत फार वाढली आहे. निर्गत माल तीळ, खसखस, अफू, कापूस, लाख, डिंक, कातडीं, शिंगें असून आयात मीठ, साखर, रॉकेल, लोखंडी समान, बूट, जोडे आहे. संस्थानांत सरकी काढण्याच्या व कापडाच्या कांहीं गिरण्या आहेत. भोपाळशहर, सिहोर, दीप, बर्खेर, दिवाणगंज या व्यापाराच्या उतारपेठा आहेत. जी. आय. पी. रेल्वेचें हें एक स्टेशन आहे. तिचाच एक फांटा भोपाळपासून उज्जैनपर्यंत गेला आहे. या रस्त्यामुळें भोपाळचा राजपुताना-माळवा रेल्वेशीं संबंध जोडला आहे.
राज्यकारभाराच्या सोईसाठीं याचे चार जिल्हे केले आहेत. हें संस्थान पहिल्या दर्जाचें असल्यामुळें येथील संस्थानिकास (दिवाणी, मुलकी, फौजदारी व इतर अधिकार आहेत. संस्थानांत मुलकी (वसुलाचें) काम एका अधिका-याकडे असून त्यास उल-मुहाम असें म्हणतात. दुसरा अधिकारी पोलीस व न्यायखातें पाहातो. त्यास नसिर-उल-मुहाम असें म्हणतात. खुद्द संस्थानिकाच्या मदतीसाठीं व त्याकडे सोंपविलेल्या कामाची चौकशी करण्यासाठीं तीन सभासदांचें एक मंडळ आहे, त्यास इजलास-इ-कामिल असें म्हणतात. याखेरीज कायदेकानू करण्यासाठीं व फडणविशीबाबींसंबंधीं नियम करण्यासाठीं दोन मंडळें आहेत; त्यांशिवाय संस्थानिकाची खाजगी कचेरी, दरबारकचेरी, कुराणानुसार निवाडे करणारी काजीची कचेरी वगैरे कचे-या आहेत. पद्धतशीर न्यायखातें शिकंदर बेगमेनें प्रथम अंमलांत आणिलें. १७८४ सालीं इंग्रजी मुलखांतील न्यायपद्धतीचें अनुकरण करण्यांत येऊन न्यायकचे-या स्थापन झाल्या. शेतसारा अद्यापि मक्त्यानें वसूल होतो.
शिकंदर बेगमनें १८६० सालीं आपल्या प्रजेस शिक्षण देण्यास आरंभ केला. एकंदर शिक्षणविषयक संस्था शंभरापर्यंत असून भोपाळ शहरीं सुलेमानिया नांवाचें एक हायस्कूल आहे यांत शिक्षण मोफत दिलें जातें. सरदारांच्या मुलासाठीं एक स्वतंत्र शाळा आहे.
शहर.- या शहरास तिकडे भूपाल असें म्हणतात. हें या संस्थानची राजधानी असून एका टेंकडीवर वसलेलें आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १६५२ फूट आहे. लोकसंख्या सुमारें ४६ हजार असून क्षेत्रफळ ८ चौरस मैल आहे. यांत शहरच्या बाहेरील वस्तीचा समावेश होतो. हें शहर पुक्तपुल तलावाच्या कांठीं वसलें आहे. याच्या भोंवती दोन तट आहेत. या शहरांतील दोन तलावांच्या मधील बांध धारच्या भोज राजाच्या मंत्र्यानें बांधिला असें म्हणतात. मोठ्या तलावाचा विस्तार २ १/२ मैल व लहानाचा पाव मैल आहे. भोजराजानें येथें पूर्वीं एक किल्ला बांधिला होता. त्याच जागेवर भोपाळ शहर वसलें आहे. भोजराजाच्या नातीनें (११८४) जें सभामंडळ नावाचें देऊळ बांधिलें त्याच्या जागेवर खुदिशिया बेगमची जुम्मा मशीद आहे. दुसरा किल्ला दोस्तमहंमदानें बांधिला, त्यास फत्तेगड म्हणतात. खुदिशिया व शिकंदर बेगम यांच्या अमदानींत या शहराची भरभराट झाली. शहाजहान बेगमनें ताजमहाल, बारामहाल वगैरे इमारती बांधिल्या. १९०३ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली असून तिचें उत्पन्न ५० हजारावर आहे. (गोडबोले - एतद्देशीय संस्थानें; टाईम्स - ईयर बुक. १९२५; इंपे. ग्याझे. पु. ८; डफ.)