विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भौम(टेलुरिअम)- हें एक रासायनिक द्रव्य असून पृथ्वीवर तें बहुधां भौमिद स्वरूपांत इतर धातूंशीं मिश्रित असें सांपडतें. क्वचित् प्रसंगीं तें स्वतंत्रहि सांपडतें. लोखंडाच्या कच्च्या धातूशींहि तें मिश्र स्वरूपांत सांपडत असल्यामुळें गंधकाम्लाच्या कारखान्यांतील भिंतीवरील लेपांतून किंवा धुराड्यांत सांपडणा-या बारीक राखेमध्यें हें सांपडतें. भौमयुक्त विस्मथ सिंधुकर्बितासह तप्त करून नंतर त्यांत पाणी मिसळून तें मिश्रण गाळून घेऊन खालीं राहणारा द्राव हवेंत उघडा ठेवल्यास भौम हळू हळू सांका रूपानें वेगळें होतें. काळ्या भौमापासून शुद्ध भौम खालील रीतीनें तयार करतातः - भौमाचा कच्चा धातु जोरकस गंधकाम्लासह तापवून झालेल्या द्रावणामध्यें पाणी मिसळतात. ह्या मिश्रणामध्यें हराम्ल मिसळून त्यामध्यें गंधक-द्वि-प्राणिद टाकलें असतां भौम सांकारूपानें वेगळें होतें. हें एक ठिसूळ पांढरें द्रव्य असून त्याचा वितळण्याचा व उकळण्याचा बिंदु अनुक्रमें ४५२० व ४७८० आहे. ह्याचें विशिष्टगुरूत्व ६.२६ असून तें उज्जाच्या वातावरणांत तापविलें असतां त्याचे स्फटिकाकृति कण बाष्परूपांत दिसतात पण गंधक-द्वि-प्राणिदाच्या क्रियेनें केलेला भौम धातु हा ठिसूळ स्थितींतच असतो. हा पाण्यांत विद्रुत होत नाहीं, पण तीव्र गंधकाम्लाच्या योगानें याचा तांबडा द्राव मिळतो.
गंधकाप्रमाणें ह्या धातूचाहि आपणांस भौमोज्जवायु मिळतो. हा फार विषारी असून भौमिदाबर खनिज अम्लाची क्रिया केली असतां तयार होतो. ह्या धातूचीं दोन हरिदें मिळतात; त्यापैकीं एक द्विहरिद आणि दुसरें चतुर्हरिद होय. हीं दोन्हींहि हरिदें हरवायु भौमावरून जाऊं दिल्यास तयार होतात व ऊर्ध्वपातनाच्या योगानें तीं एकमेकांपासून वेगळीं करतां येतात. हीं हरिदें पाण्याच्या योगानें विघटित होऊन भौमसाम्ल वगैरे पदार्थ मिळतात. भौमाचीं दोन प्रणिदें असून त्यापैकीं एकद्विप्राणिद भौम हवेंत तापविलें असतां मिळतें व त्रि-प्राणिद काळें असून भौमाम्ल खूप तापविलें असतां तयार होतें. ह्या धातूचीं भौमसाम्ल व भौमाम्ल अशीं दोन अम्लें आहेत. पहिलें चतुर्हरिदावर पाण्याची क्रिया केली असतां मिळतें व दुसरें अनाम्लामध्यें असलेल्या भौमायितावर हराच्या योगें प्राणिदीकरणक्रिया केली असतां मिळतें, भाराच्या क्षारावर गंधकाम्लाची क्रिया केली असतां भौमाम्ल वेगळें होतें.
या द्रव्याचा परमाणुभारांक १२८ आहे. नियतातरत्वाच्या कोष्टकांतील ह्या द्रव्याच्या स्थानावरून ह्याचा प. भा. अदापेक्षां कमी असावयास पाहिजे, पण ज्या अर्थी हा. प. भा. जास्त आहे त्या अर्थी त्याच्याशीं दुसरें कांहीं तरी द्रव्य मिश्रित असावें असा रसायनशास्त्रज्ञांनीं कयास बांधला व त्याप्रमाणें या द्रव्याचा खरा प. भा. किती हें ठरविण्याकडे ब-याच लोकांचें लक्ष वेधलें गेलें. त्याप्रमाणें ह्या धातूचा अंक निरनिराळ्या रसायनशास्त्रज्ञांनीं १२६.६ पासून १२८ पर्यंत असावा असें सिद्ध केलें. ब्राउनिंग व बेकर यांनीं भौम हें दोन धातूंचें मिश्रण असून त्यापैकीं एकाचा परमाणुभारांक १२५.४५ व दुस-याचा १२८.८५ असावा असें दाखविलें आहे. ह्या बाबतींत अद्याप निर्णायक निकाल लागला नाहीं.